जलयुक्त शिवार अभियान : आज पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभनागपूर : पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करता यावी, सोबतच सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी या हेतूने राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १९७५ गावांसाठी पुढील पाच वर्षाचा १२३७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेत जिल्ह्यात ३४७५२ कामे प्रस्तावित असून २०१९ पर्यंत पाच टप्प्यात ती पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २०१५-१६ या वर्षात ३३० गावांचा समावेश आहे. २६ जानेवारी २०१५ ते १५ जानेवारी २०१६ या कालावधीत ही योजना राबविली जाणार आहे. १६ जानेवारी ते ३१ मार्च २०१५ दरम्यान कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. यात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकाम, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, जलस्रोतातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर, आदी बाबींवर भर दिला जाणार आहे. यातून टंचाईवर कायमस्वरूपी मात होण्याची अपेक्षा आहे. या हेतूने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा शासन पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील ३३० गावांची निवड करण्यात आली आहे. २०१४ मध्ये पर्जन्यमानात २० टक्के पेक्षा जास्त घट असलेले राज्यात १८४ तालुके आहेत. भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या ७२ आहे. २ ते ३ मीटर पेक्षा जास्त घट झालेले ११६ तर १ ते २ मीटर पेक्षा जास्त घट झालेले १९० तालुके आहेत. म्हणजेच भूगर्भातील पाणी पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या १८८ इतकी आहे. (प्रतिनिधी)
१७९५ गावांसाठी १२३७ कोटींचा आराखडा
By admin | Updated: January 26, 2015 00:56 IST