नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १२३ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ६१ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही दिवसात शोध पथकांनी २२,४१० नागरिकांविरुद्ध कारवाई करून ९५ लाख ६४ हजाराचा दंड वसूल केला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा अद्याप धोका टळलेला नाही. असे असतानाही अनेक नागरिक विनामास्क फिरताना दिसतात. ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाद्वारे अशा नागरिकांवर कारवाई केली जात आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.
पथकाने लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ११, धरमपेठ २०, हनुमाननगर १६, धंतोली १०, नेहरूनगर १०, गांधीबाग ८, सतरंजीपुरा ११, लकडगंज १२, आशीनगर ११, मंगळवारी १२ आणि मनपा मुख्यालयात २ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई सुरू आहे.