नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने मागील १२ दिवसांमध्ये १२२ आॅटो जप्त केले. शुक्रवारी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १७ टाटा मॅजिक वाहनांवर तर मध्य प्रदेशातील सहा बसेसमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.आरटीओने मागील दोन दिवसांत ३८ आॅटो जप्त केले. विशेष म्हणजे आरटीओने सुटीच्या दिवशीही आॅटो तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे, यात वाहतूक पोलिसांची मदत मिळत असल्याने मोहिमेला गती आली आहे. आॅटोरिक्षा परवानाधारकाने मीटर प्रमाणे न चालणे, सदोष मीटरचा वापर करणे, मीटर नसताना वाहन वापरणे, मीटर सील तुटलेले असताना वाहनाचा वापर करणे आदी बाबी तपासण्यात येत आहेत. शुक्रवारी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजिक वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने चालकांचे धाबे दणाणले आहे. आरटीओच्या वायु पथकाने आज मध्य प्रदेशातील बसेसचीही तपासणी केली. यात सहा बसेसमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्या कार्यालया जमा केल्या. ही कारवाई आणखी काही दिवस सुरू राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
१२२ आॅटो जप्त
By admin | Updated: November 8, 2014 02:50 IST