नागपूर : रस्ते अपघाताचे खरे कारण रस्ते अभियांत्रिकीमधील दोष हेच आहे. अनेक ठिकाणी अशा चुकांमुळे ब्लॅक स्पॉट निर्माण झाले आहेत. ते शोधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी जवळपास १२ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. जीवनाची सुरक्षा ही सर्वांसाठी प्राथमिकता आहे. त्यामुळे रस्ते अपघात टाळण्यासाठी सर्वांनी जागृतपणे काम करावे, समाजातील सर्व डोळस घटकांनी त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर आणि प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर तसेच संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कविवर्य सुरेश भट सभागृहात झाले. समितीचे नागपूरचे उपाध्यक्ष खासदार डॉ. विकास महात्मे, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अन्य पाहुणे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूरच्या संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीने शोधलेल्या ५२ ब्लॅक स्पॉटपैकी २० सुधारणा केल्या. यामुळे नागपूर ग्रामीणमध्ये अपघाताचे प्रमाण ८ टक्क्यांनी तर मृत्यूचे प्रमाण एक टक्क्याने कमी झाले. तसेच शहरी भागांमध्ये अपघातांचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी झाले असून १६ टक्के मृत्यूमध्ये घट झाली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. जनआक्रोशसारख्या विविध सामाजिक संस्थांच्या कार्याचा गडकरी यांनी उल्लेख केला.
प्रास्ताविक डॉ. विकास महात्मे यांनी केले. या विशेष कार्यक्रमांतर्गत सडक सुरक्षारक्षक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
...
चतु:सूत्रीवर भर
रस्ते अपघात टाळण्यासाठी चतु:सूत्रीवर भर देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. खासदार रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून यावरच भर दिला जाणार असल्याचे सांगितले. यात रस्ते अभियांत्रिकीमध्ये सुधारणा, रस्ते नियमांबद्दल शिक्षण, कायद्याची कठोर अंमलबजावणी, तसेच अपघातग्रस्तांना मदत करण्याची तत्परता यांचा समावेश आहे.
...
दंड दुप्पट करा : अनासपुरे
मकरंद अनासपुरे यांनी रस्ते सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी दंड वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. दंड दुप्पट करा, असे त्यांनी सूचविले. रस्ते सुरक्षा प्रचारासाठी आपण विनामूल्य सहकार्य करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
महापालिकेला सिनेमॅटिक स्क्रीन
नागपूरमधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीपर तसेच महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव चित्रपटांच्या माध्यमातून वृद्धिगंत करण्याच्या हेतूने नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृह सिनेमॅटिक स्क्रीनचे नागपूर महानगरपालिकेला नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या स्क्रीनवर शेतकऱ्यांना उपयोगी असे महाराष्ट्र पशु विज्ञान विद्यापीठातर्फे तसेच इतर संस्थांतर्फे चित्रफीत तयार करून दाखवण्यात येतील. तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक चित्रपट दाखविले जातील.
...