लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : बुटीबाेरी व परिसरात शनिवारी (दि. १३) दारूविक्री बंद असतसाना पाेलिसांनी गस्तीदरम्यान दाेन ठिकाणी धाडी टाकल्या. यात एकास अटक करण्यात आली असून, एकूण १ लाख ११ हजार ३६९ रुपये किमतीची देशी दारू जप्त केली.
चंदू ऊर्फ चंद्रप्रकाश वासे (४०, रा. सातगाव-रिधोरा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी अवैध दारूविक्रेत्याचे नाव आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आले हाेते. त्यातच बुटीबाेरी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना बुटीबाेरी येथील रेल्वेस्थानक परिसरात राहणारा रामचंद्र गद्दामवार हा दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी लगेच धाड टाकून त्याच्या घराची झडती घेतली. यात त्याच्या घरातून ४६,०८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५७६ बाटल्या जप्त केल्या. ताे घरी आढळून न आल्याने पाेलिसांनी त्याला अटक केली नाही.
दरम्यान, चंदू वासे हादेखील दारू विकत असल्याची माहिती याच पथकाला मिळाली. त्यामुळे त्यांनी सातगाव-रिधाेरा गाठून चंदूच्या घराची झडती घेतली. ताे घरी आढळून येताच त्याला अटक केली. त्याच्या घरातून ६५,२८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ८१६ बाटल्या जप्त केल्या. या दाेन्ही घटनांमध्ये बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, हवालदार मिलिंद नांदुरकर, सत्येंद्र रंगारी, प्रवीण देव्हारे, पंकज ढोके, राकेश तालेवार, विवेक गेडाम, सातव यांच्या पथकाने बजावली.