नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या १०९ नागरिकांविरुद्ध कारवाई करून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ५४ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३४,५४५ नागरिकांविरुद्ध कारवाई करुन १ कोटी ५६ लाख ३१ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
बुधवारी मनपा उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २३, धरमपेठ झोन ४, हनुमाननगर १, धंतोली झोन ७, नेहरूनगर झोन १७, गांधीबाग झोन १०, सतरंजीपुरा ८, लकडगंज झोन ९, आशीनगर झोन १०, मंगळवारी झोन २० जणांविरुद्ध ही कारवाई केली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत २९,०७५ नागरिकांकडून १ कोटी ४५ लाख ३७ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
नागपुरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज सर्व झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करीत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केल्या जात आहेत.