भांडेवाडीच्या डम्पिंगमध्ये पडलेय उघड्यावर : जनावर आणि माणसांच्या जीवाला धोका नागपूर : शहरी व ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात गरिबांना सहजासहजी धान्य मिळत नाही. दुसरीकडे नागपूर महापालिक ा प्रशासन धान्याची पोती भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये फेकत आहे. किमान १० ट्रक धान्य आतापर्यंत फेकण्यात आले आहे. उघड्यावर पडलेले धान्य परिसरातील नागरिक घरी घेऊन जात आहे. धान्य खाण्यायोग्य आहे की नाही, हे कुणालाही माहीत नाही, त्यामुळे या धान्यातून नागरिकांसह गुरांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. भांडेवाडीच्या कचरा डम्पिंग यार्डमध्ये गेल्या ७ जानेवारीपासून तांदूळ, धान व गव्हाचे पोते कनक रिसोर्सेसच्या कचरा टाकणाऱ्या गाड्या आणून टाकत आहे. शहरातील संपूर्ण कचरा येथे टाकण्यात येतो. कचऱ्यातून प्लॅस्टीक आणि लोखंड गोळा करणारे गरीब आणि गरजू लोकांना ७ जानेवारीला डम्पिंग यार्डमध्ये तांदूळ आणि धानाचे पोते आढळून आले. यातील काही तांदूळ खराब होते व काही चांगले असलेले तांदूळ लोकांनी घरी नेले. ९ व १० जानेवारीलासुद्धा मोठ्या प्रमाणात धान व तांदळाचे पोते डम्पिंग यार्डमध्ये टाकण्यात आले. हे धान्य परिसरातील जनावरेसुद्धा खात होती. काही लोकांनी चांगले धान्य पोत्यांमध्ये भरूनसुद्धा नेले. तांदळाच्या पोत्यांवर ‘रेड रोज राईस’ असे लिहिले होते. तर धानाच्या पोत्यांवर नॅशनल कमोडिटीज सप्लाय कार्पोरेशन आॅफ इंडिया, आफ्रिका पावर असे लिहिले होते. यातील काही धान्य कुजलेले होते. भांडेवाडीत पडलेले मुदतबाह्य धान्य परिसरातील लोक घेऊन जात असल्याची माहिती परिसरातील दोस्ती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळली तेव्हा, फाऊंडेशनचे पप्पू पटेल, मज्जुभाई, गुड्डुभाई, दिनेश लांजेवार, सचिन, इकबाल यांनी लोकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत अनेक लोकांनी हे धान्य घरी नेले होते. लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून मनपाने परिसरात जनजागृती करावी, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी) कचरा उचलणाऱ्या कंटेनरने आणले धान्य हे धान्य आले कुठून यासंदर्भात परिसरातील लोकांना विचारले असता, त्यांनी कनक रिसोर्सेसच्या वाहनातून हे धान्य आणून टाकण्यात आले असे सांगितले. यासंदर्भात डंम्पिंग यार्डमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की गेल्या तीन दिवसात १० च्या जवळपास धान्याचे कंटेनर आलेले आहे. झोन ४ च्या गाडीने हे धान्य आणून टाकण्यात येत आहे. कंटेनर डेपोतून आले धान्य भांडेवाडी डंम्पिंग यार्डचा चार्ज असलेले गोरे नावाचे अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की हे धान्य अजनीतील कंटेनर डेपोतून आणण्यात आले आहे. हे धान्य नष्ट करण्यासाठी मनपाशी बोलणी झालेली आहे. भांडेवाडीत टाकलेले धान्य परिसरातील लोक घेऊन जाऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. जीवाला धोका झाल्यास मनपाची जबाबदारी गेल्या ३ ते ४ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धान्य भांडेवाडी परिसरात आणून टाकण्यात येत आहे. मुदतबाह्य धान्य असले तरी, लोक घरी घेऊन जात आहे. जनावरेसुद्धा हे खात आहे. हे धान्य खाऊन लोकांना धोका झाल्यास, त्याची जबाबदारी मनपा घेणार का? पप्पू पटेल, सामाजिक कार्यकर्ते
१० ट्रक धान्य कचऱ्यात
By admin | Updated: January 11, 2017 02:38 IST