अफवांना पेव : दुकानदार घेईनात नागपूर : आधीच ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा बंद झाल्याने लोक त्रस्त आहेत. नवीन नोटा बदलवून घेण्यासाठी बँकेत व पोस्टात रांगा लावून आहेत. दरम्यान अनेक अफवा पसरत आहेत. अशात दहा रुपयाचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिकांना वेगळाच त्रास सोसावा लागत आहे. मंगळवारी सकाळी दहा रुपयाने नाणे सुद्धा बंद झाल्याची अफवा पसरली. यामुळे छोटे दुकानदार, भाजीविक्रेते, फळवाले, चहा, पान टपरी आणि नाश्त्याच्या दुकानदारांनी दहा रुपयाचे शिक्के घेणे बंद केले. नोटा बंद झाल्याने नागरिकांना पैशाची चणचण भासू लागली. अशात लहान मुलांसाठी साठवून ठेवण्यात आलेली नाणीच लोकांच्या कामी येऊ लागली. ५ व १० रुपयाचे नाणे लहान मुलं जमा करून ठेवतात. ते मोठ्या प्रमाणात बाहेर होते. मात्र या अफवेमुळे नागरिकांना वेगळाच त्रास सहन करावा लागला. परंतु १० रुपयाचे नाणे बंद करण्याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असून नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये. (प्रतिनिधी)
दहा रुपयाचे नाणे बंद झाले ?
By admin | Updated: November 17, 2016 03:10 IST