शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

मेंदीच्या पानावर

By admin | Updated: August 23, 2014 14:40 IST

महिलांच्या विविध सणावारांचा महिना म्हणून भारतीय संस्कृतीत श्रावण प्रसिद्ध आहे, त्यामुळेच या महिन्यात मेंदीला फार महत्त्व येते. मेंदी ही एकूणच महिलांच्या भावजीवनाचा अभिवाज्य भाग आहे. अशा या बहुगुणी व बहुउपयोगी मेंदीवर एक शास्त्रीय दृष्टिक्षेप..

 प्रा. श्री. द. महाजन 
 
मेंदी माहित नाही, अशी व्यक्ती भारतात तरी नक्कीच; पण जगातही शोधून सापडणे अवघडच! आहेच तशी ती रंगरंगीली आणि बहुगुणी! सणा-समारंभात आणि लग्नकार्यातही हात-पाय रंगविण्यासाठी, सुशोभनासाठी बायकामुली वापरतात ती मेंदी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही खूपच लोकप्रिय आहे. असं असलं तरी मेंदी ज्यापासून तयार करतात, ती वनस्पती बहुतेकांना अपरिचितच असते. महाराष्ट्रात मेंदीची झाडं तशी दुर्मिळच आहेत. मेंदीच्या झाडाचं मूळ वसतिस्थान आणि उत्पत्तीस्थान (Centre Of Origin) वाळवंटी प्रदेशात आहे. ते मुख्यत: इजिप्तपासून मध्य पूर्वेतील अरब राष्ट्रे आणि बलुचिस्तान-सिंधपर्यंतचा पाकिस्तानचा प्रदेश आहे, असं मानण्यात येतं. डाल्सन आणि गिब्सन या वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते, त्या लगतच्या राजस्थान-गुजरातच्या रूक्ष प्रदेशातही मेंदी वन्य असावी, त्या दृष्टीने ती 
भारतीय आहे, असं म्हणता येईल. भारतात जवळपास सर्वच राज्यांत मेंदीची झाडं तुरळकपणे लावलेली आढळत असली, तरी व्यापारी पातळीवर लागवड केली जाते. मुख्यत: गुजरात आणि हरियानामध्ये. राजस्थान आणि मध्य प्रदेशातही अल्प प्रमाणात अशी लागवड आढळते.
मेंदीची विविध नावे -
प्राचीन भारतातील सौंदर्यपरंपरा प्रसिद्ध आहे. वल्लभदासाने वर्णन केलेल्या सोळा शृंगारांमध्ये मेंदीच्या वापराचा उल्लेख आहे. वैदिक काळातही समावर्तन या संस्कारामध्ये अशा प्रसाधनांचा उपयोग करीत असत, असे दिसते. मेंदीला संस्कृतमध्ये ‘मदयन्तिका’ आणि ‘मेंदिका’ अशी नावे आहेत, त्यावरूनच ‘मेंदी’ आणि ‘मेहंदी’ ही नावे तयार झाली आहेत. संस्कृत वाड्.मयात नखरंजका आणि यवनेष्टा अशीही विशेषणे वापरलेली आढळतात. इतर भाषांतील नावे अशी :- हिंदी-मेहंदी, हीना, गुजराती-मेदी, मेहंदी, कन्नड-मदरंग, इंग्रजी - हेन्ना, इजिप्शियन पिव्हेट, ट्री मिग्नोनेट. वर्गीकरण शास्त्रीयदृष्ट्या मेंदीचा समावेश तामण, नाणा, धायटी याच्या कुळात म्हणजेच लिथ्रेसी (Lythraceae) फॅमिलीमध्ये होतो. वनस्पतीशास्त्रीय नावे आहेत लॉसोनिया इनरमिस (Lawsonia inermis) आणि लॉसोनिया अल्बा (Lawsonia alba). आयझॅक लॉसन या ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञाच्या गौरवार्थ प्रजातीनाम (Generic name) तयार केलं गेलंय. सुप्रसिद्ध वनस्पतीवर्गीकरण शास्त्रज्ञ (Plant Taxonomist) जोसेफ हूकरला भारतीय वनस्पतींवरील लेखनात लॉसनने साहय़ केले होते. जातिविशेषण अल्बा (Specific epithet) म्हणजे पांढरी फुले येणारे झाड. ‘इनरमिस’ हे दुसरे जातिविशेषण मात्र फसवे किंवा चुकीचे आहे, कारण इनरमिस (inermis) म्हणजे काटे नसलेले. मेंदीची झाडे काटेरी असतात आणि त्यासाठी ही कुंपणासाठी लावलात. गुरे त्याला तोंड लावत नाहीत, हेही एक कारण आहेच.
वनस्पतीवर्णन -
‘मेंदींचं झाड माहिती आहे का?’ असे अनेकांना आणि अनेकींनाही विचारलं असताना ते सर्वजण कोयनेल ऊर्फ कडू मेंदीलाच खरी मेंदी समजतात, असे ध्यानात आले. कोयनेल ही अगदी निराळीच वनस्पती असून तिचं शास्त्रीय नाव ‘क्लेरोडेंड्रम इनरमी’ (Clerodendrum inerme) असं आहे. मेंदीशी कोयनेलचं काहीही साम्य किंवा नातं नाही, त्यामध्ये मेंदीसारखे गुणधर्म अजिबातच नसतात.
मेंदीची झुडपे दीड ते तीन मीटर उंच वाढतात. अगदी खालपासूनच अनेक शाखा-उपशाखा फुटलेल्या असतात. उपशाखांचे रूपांतर काही ठिकाणी तीक्ष्ण काट्यात (thorns) झालेले असते. पाने साधी, संमुख (Opposite), छोटी व लांबट असून देठाकडे निमुळती होत गेलेली असतात. ती २ ते ६ ७ १ ते २ सेंमी लांबी-रुंदीची, मळकट हिरव्या रंगाची, टोकदार असतात. उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या पहिल्या अध्र्या काळात (ग्रीष्म आणि वर्षा ऋतूंमध्ये) फुलण्याचा हंगाम असतो. भरभरून फुललेली झाडे आकर्षक दिसतात. असंख्य, छोट्या, पांढर्‍या, सुवासिक फुलांचे मोठे तुरे फांद्यांच्या अग्रभागी येतात. पांढर्‍या फुलांना पिवळसर किंवा गुलाबी छटा असू शकते. फुले नियमित (regular) १/२ ते १ सेंमी आकाराची, चतु:र्भागी (tetramerous) असून पाकळ्या चार तर पुंकेसर आठ असतात. पावसाळ्याच्या शेवटी आणि हिवाळ्यात फळे धरतात. ती वाटाण्याच्या आकाराची असून त्यात अनेक सूक्ष्म बिया असतात.
मेंदीचे उपयोग आणि रंगद्रव्ये व त्यांची क्रिया : 
मेंदीचा वापर जगातील ६0 देशांमधील सहा प्रमुख धर्मांतील लोक करतात. मेंदी हे जगातील सर्वांत प्राचीन आणि सुरक्षित सौंदर्यप्रसाधन असावे. मेंदीमधील रंगद्रव्य प्रामुख्याने पानांमध्ये असते. वाळलेल्या/वाळवलेल्या पानांची पूड सौंदर्यप्रसाधनासाठी वापरली जाते. त्याचा उपयोग वस्त्रोद्यागात कापड रंगविण्यासाठीही करतात. पिवळा, तांबडा, पिंगट, शेंदरी असे रंग विविध पदार्थांच्या मिश्रणाने तयार करून वापरले जातात.
पानांचे रासायनिक पृथक्करण केले असता त्यामध्ये ४७ प्रकारची घटकद्रव्ये आढळली, त्यांपैकी ३६ द्रव्यांचं निश्‍चितीकरण केलं गेलंय. त्यातील रंग निर्माण करणार्‍या घटकद्रव्य समुच्चयाला ‘लॉसोन’ असं नाव देण्यात आलंय. प्रमुख रंगद्रव्य घटकाला ‘हेन्नोटॅनिक अँसिड’ म्हणतात. झाडाच्या पंचागामध्ये लॉसोनचे प्रमाण पानांमध्ये जास्त एकवटलेले असते आणि त्यातही पानांच्या देठात ते सर्वाधिक असते. रंग चांगला उतरण्यासाठी आणि तो अधिक काळ टिकण्यासाठी वाळलेल्या पानांच्या भुकटीमध्ये लिंबाचा रस, चहाचा कडक काढा (दूध, साखरेशिवाय उकळलेला), निलगिरी तेल, कॅजेपूट किंवा लव्हेंडर तेल मिसळले जाते. त्वचा चांगली रंगण्यासाठी मेंदीचा लेप ६ ते १२ तास व्यवस्थित राहणे आवश्यक असते, कारण पानातील सेल्युलोजमधून विरघळून रंगद्रव्ये पसरण्यास तेवढा अवधी लागतो. त्यासाठी काही लोकांमध्ये मेंदी वाळल्याबरोबर त्यावर साखरमिश्रित लिंबाचा रस लावण्याचा प्रघात आहे, तर कित्येक जण नुसतेच साखरेचं पाणी लावतात, त्यामुळे रंग अधिक गडद आणि चमकदार दिसतो.
मेंदीतील (लॉसोनमधील) नारिंगी लाल रंगद्रव्याच्या रेणूंना प्रथिनांचे रासायनिक आकर्षण असते. प्रथिनांबरोबर त्यांची रासायनिक अभिक्रिया घडून येते, त्यामुळे प्रथिनबहुल भाग किंवा पदार्थच चांगले व पक्के रंगतात. उदाहरणार्थ, त्वचा (बाहय़त्वचा), केस, नखे, चामड्याच्या वस्तू, रेशीम आणि लोकर. आपली त्वचा दोन स्तरांनी बनलेली असते - बाहय़ अभित्वचा आणि आंतरत्वचा, त्यांपैकी मृतपेशींच्या अनेक स्तरांनी तयार झालेली बाहय़ अभित्वचाच (Epidermis) फक्त रंगद्रव्याशी एकरूप होऊन रंगीत बनते. आंतरत्वचेमध्ये रंगद्रव्ये जात नाहीत, त्यामुळे ती शरीरात शोषली जात नाहीत. हाता-पायांच्या तळव्याची बाहय़त्वचा अधिक जाड असल्यामुळे जास्त चांगली रंगते! व्यक्तीपरत्वे हे अभिरंजन एक ते चार आठवडे टिकते. हळूहळू फिके होत जाऊन नाहीसे होते. केसांना मेंदी लावल्यावर ते तेजस्वी, चमकदार आणि गडद दिसतात; परंतु त्यासाठी काही औषधीद्रव्ये - जसे की, आवळा चूर्ण, माका, जास्वंद फुले, कोरफड इ. मिसळून विशेष प्रकारे तयार केलेली मेंदी वापरणे चांगले.
मेंदीच्या पानांमध्ये प्रभावी जंतूनाशक गुणधर्म असल्यामुळे त्यांचा काढा, पूड किंवा लेप त्वचारोगात वापरण्याचा  प्रघात आहे. केस केवळ चमकदार दिसण्यासाठी आणि रंगविण्यासाठीच नव्हे, तर केशवर्धक म्हणूनही मेंदी गुणकारी आहे. मुखरोग तसेच घसादुखीमध्ये गुळण्या करण्यासाठीही काढा वापरला जातो. डोकेदुखी, ताप आणि कुष्ठ वगैरे जुनाट रोगात फुलांचा उपयोग केला जातो. भाजलेल्या त्वचेसाठी सालीच्या क्वाथाची घडी ठेवतात. रक्तमिश्रित आवेमध्ये मेंदीचे बी वाटून तुपाबरोबर आरोग्यसंवर्धक म्हणूनही वापरतात.
लागवड 
मेंदीची रोपे बियांपासून तसेच छाटकलमांद्वारेही तयार करतात. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. मूळचे वाळवंटी प्रदेशातले हे झाड समुद्रकिनारीही छान वाढते! कोरड्या उष्ण किंवा थंड हवामानातही तग धरू शकते. मुळे बर्‍यापैकी खोलवर जात असल्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाला पाणीही फारसे घालावे लागत नाही. पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत झाडे छान वाढतात. अशा या बहुगुणी झुडपाचा समावेश एक उद्यानवानस म्हणून झाला नसता तरच नवल. महाराष्ट्रात मेंदीची झाडे इतकी दुर्मिळ का असावीत, ते समजत नाही. भरपूर रोपे तयार करून त्यांचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे.
 
मेंदीचे दुष्परिणाम
काही व्यक्तींना मेंदीची ‘अँलर्जी’ असू शकते. ही गोष्ट दुर्मिळ असली, तरी लक्षात असणे आवश्यक आहे. मेंदी लावल्यावर एक-दोन तासांतच अँलजिर्क रिअँक्शन दिसून यायला लागते. लावलेल्या जागी चुरचुरणे किंवा खाज सुटणे, छातीत दडपल्यासारखं वाटणे, श्‍वासोच्छवास नीट न होणे अशा प्रतिक्रिया होऊ शकतात, क्वचित गंभीर परिणामही संभवतात. लॉसोनमुळे रक्तातील तांबड्या पेशी (RBCS) नष्ट व्हायला लागतात, त्याला ‘हीमोलिसिस’ म्हणतात. ‘जी-६ पी.डी.’ नामक विकराच्या (enzyme) आनुवंशिक कमतरतेमुळे असे दुष्परिणाम घडून येतात. दहा हजारांत एखाद्या व्यक्तीमध्ये असा दोष असू शकतो. अशा व्यक्तींना, विशेषत: बालकांना त्यामुळे मृत्यूही येऊ शकतो म्हणून मुला-मुलींना त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा मेंदी लावताना काळजी घेणं, प्रथम एकाच हाताला किंवा पायाला अगदी थोड्याच भागाला मेंदी लावून पाहणं अत्यावश्यक ठरतं. सध्याच्या भेसळीच्या युगात तर अधिकच काळजी घेणं आवश्यक आहे, कारण रासायनिक रंग मिसळून मेंदी आणखी रंगीत केलेली असू शकते. 
(लेखक ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ आहेत.)