शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

चिनी माणसं काय खातात?

By admin | Updated: March 25, 2017 14:58 IST

चांदणी चौक ते चायना व्हाया जर्मनी : लेखांक ७.. जगाच्या पाठीवर पसरलेल्या मराठी माणसांनी कमावलेल्या अनुभवांची, त्यांनी चालवलेल्या धडपडीची कहाणी...

  - अपर्णा वाईकर

चीन आणि चिनी माणसाविषयी सगळ्यांना जसं कुतूहल आहे, तसंच त्यांच्या खाण्यापिण्याविषयीही. आजूबाजूला एखादं झुरळ फिरताना दिसलं की चिनी माणूस लगेच ते तोंडात टाकतो, अशीच लोकांची समजूत आहे. आम्ही चीनमध्ये राहतो हे कळल्यावर आम्हीही ‘त्यांच्यासारखंच’ साप, झुरळं खातो की काय, याच नजरेनं लोक बघतात आणि तसं विचारतातही!..

 
 

आम्ही चीनमध्ये राहतो हे ऐकल्यावर खूप वेळा एक प्रश्न विचारला जातो.. तिकडे लोक साप, झुरळं वगैरे खातात असं ऐकलंय ते खरंय का? चिनी मनुष्य म्हटल की तो अशी आजूबाजूला दिसणारी झुरळं पटकन उचलून तोंडात टाकतो अशी काहीशी लोकांची कल्पना आहे. थोडक्यात काय, तर चिनी माणसं काहीही खातात, अगदी कुठलाही प्राणी सोडत नाहीत असा एक समज सगळीकडे आहे. मी इथे आले तेव्हा मीसुद्धा त्यांच्या खाद्यपदार्थांबद्दल साशंकच होते. मुळातच खाण्याची अतिशय आवड असल्यामुळे हे लोक नक्की काय खातात हे समजून घ्यायचं मी ठरवलं होतं. सर्वसाधारण आपल्या भारतीय माणसाची चायनिज फूडची यादी ही हक्का नूडल्स, फ्राइड राइस, मनचुरीयन, चॉप सुई, शेझवान राइस किंवा नूडल्स, मोमोज, चिकन लॉलीपॉप्स आणि सूपचे २-३ प्रकार एवढ्यावरच संपते. हे सगळेच चायनिज प्रकार आपल्याला खूप आवडतात. त्यामुळे चायनात आल्यावर तर आम्ही खूपच उत्साहाने चायनिज खायला गेलो. पण त्या मेन्यूमध्ये यातला कुठलाही पदार्थ दिसेना! थोडे फार शब्द सोडले तर इंग्रजी विशेष लिहिलेलं नव्हतं. बरं वेट्रेसला विचारावं तर त्यावेळी आम्हाला भाषा येत नव्हती आणि आम्ही विचारलेली नावं तिला काही केल्या कळत नव्हती. शेवटी त्या मेन्यू कार्डमधली चित्रं पाहून त्यांच्यावर बोट ठेवून तिला २-३ भाज्यांचे प्रकार आणायला सांगितले. त्यात एक सूपसारखं चित्रही होतं. थोड्या वेळात दोन तीन बाऊल्स भरून असंच जेवण आलं. त्या भाज्या आणि सूप बरोबर पांढरा भात होता आणि ते सगळं खायला दोन दोन लांब काड्या म्हणजे चॉप स्टीक्स. कसं खायचं या काड्यांनी? चमचा किंवा फोर्क मागायची सोय नाही कारण त्याला चिनी भाषेत काय म्हणतात ते माहीत नव्हतं. त्यावेळी आजच्यासारखे स्मार्ट फोन्स नव्हते. भाजी आणि भात खायला घेतला. सूपमध्ये नूडल्सही दिसत होते. आजूबाजूचे लोक भुरके मारत ते नूडल्स खाता खाता सूप पीत होते. मी त्या चॉप स्टीकने नूडल्स उचलून बघावेत म्हणून सूपमध्ये त्या बुडवल्या आणि त्यातून जे वर आलं ते पाहून किंचाळून उभी राहिले. ते चिकन सूप होतं आणि त्यात अक्षरश: चोच आणि डोळ्यांपासून ते पायाच्या नखांपर्यंत अशी अख्खी कोंबडी लपलेली होती. झालं, काहीही न खाता तसेच घरी परत आलो. एवढा भयंकर अनुभव पहिल्यांदाच घेतल्यानंतर मात्र थोडे दिवस पुन्हा हिंमत केली नाही चायनिज फूड खाण्याची. मधल्या काळात भाषा शिकून घेतली तेव्हा माझ्या शिक्षिकेला साधारणपणे नेहमी खाण्यात येणाऱ्या पदार्थांची नावं विचारून घेतली. कारण खरोखरच्या म्हणजे चीनमध्ये मिळणाऱ्या चायनिज जेवणाबद्दलचं कुतूहल वाढतच होतं. सुदैवाने माझ्यासारख्याच भटकंती आणि खादाडी आवडणाऱ्या मैत्रिणी मला इथेही भेटल्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून चिनी खाद्यपदार्थांची चव चाखून बघण्याचा सपाटा लावला. आपल्यासारख्याच चिनी लोकांच्यासुद्धा स्वयंपाक करण्याच्या पद्धती आणि पदार्थ हे प्रांताप्रमाणे बदलत जातात. आपण जसं गुजराथी थाळी, साउथ इंडियन इडली-डोसा, गोअनीज फूड, मालवणी थाळी, काश्मिरी किंवा राजस्थानी पदार्थ खायला जातो तसंच इथेसुद्धा कँटोनीज युनानी, हुनानी, सिचवान, शियानीज, शिंजीयांग फूड असे चायनिज फूडचे किती तरी वेगवेगळे प्रकार मिळतात. मात्र यात कुठेही मनचुरीयन आणि चॉप सुई हे प्रकार अस्तित्वात नाहीत. ते फक्त भारतात मिळतात. ‘चाऊनीज’ आणि ‘शेझवान’ हे प्रकार मात्र खऱ्या शब्दांचे अपभ्रंश आहेत. सिचवानचा आपल्याकडे ‘शेझवान’ झालाय आणि ‘छाओ मियान’ म्हणजे ‘फ्राइड नूडल्स’चा आपल्याकडे ‘चाऊ मीन’ झालाय हे कळल्यावर आम्हाला खूप गंमत वाटली. सिचवान प्रांतातले पदार्थ अतिशय तिखट आणि मसालेदार असतात. यांत आपल्या तिरफळासारखं दिसणारं एक विशिष्ट प्रकारचं ‘सिचवान पेपर’ (मिरी) घालतात. हे चुकूनही दाताखाली आलं तर जीभ बधीर होते. खूप वेगळ्याच प्रकारचा असा तोंड बधीर करणारा हा अनुभव आहे. याच्या बरोबरीला आणखीन भरपूर लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या असतात. अगदी साध्या फरसबी किंवा वांग्याच्या कापांवरसुद्धा हा मसाला घालून, परतून खातात. मोठ्या बाऊलमध्ये खूप सारी ब्राऊन रंगाची, ढिगाने तरंगणाऱ्या लाल मिरच्या असलेली ही फीश किंवा चिकनची सिचवान पद्धतीची करी खायला प्रचंड हिंमत लागते. हे येरागबाळ्याचे काम नव्हे. आपल्याकडे जसा कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा असतो किंवा नागपुरी सावनी रस्सा असतो, त्याचंच हे चिनी भावंडं. बिजिंग रोस्टेड डक किंवा पेकिंग रोस्टेड डक हा पदार्थ इथे खूप प्रसिद्ध आहे. याला चिनी भाषेत ‘पेकिंग खाओ या’ असं म्हणतात. हा पदार्थ फक्त उत्तरेतच नाही तर सगळीकडेच मिळतो. आणि खूप वेळा रस्त्यांवरच्या स्टॉल्सवर या ‘खाओ या’ ला खाण्यासाठी लोक रांगा लावून उभे असतात. आपल्याकडे उत्तर भारतातले काही पदार्थ सगळीकडे प्रसिद्ध आहेत तसा हा बिजिंग रोस्टेड डक चीनमध्ये सगळीकडे मिळतो.इथे शांघायमध्ये मी पाहिलं की जवळपास सगळेच लोक सकाळी बाहेर पडून नास्ता करतात. रस्त्याच्या कडेला सकाळी ‘बाओझं’ आणि ‘बिंग’ हे दोन पदार्थ खायला एकच गर्दी असते. बाओझं म्हणजे गव्हाच्या पिठाने बनलेले वाफवलेले बन्स. याच्या आत पानकोबी, टोफू, मशरुम अशा भाज्यांचं किंवा पोर्कचं सारण असतं. ‘बिंग’हा आंबवलेल्या तांदळाच्या पिठाचा दोसा असतो. फरक असा की हा दोसा तव्यावर टाकल्यानंतर त्यावर थोडं फेटलेलं अंडं पसरवतात आणि मग त्यावर मसाला, कोथिंबीर, कांद्याची पात वगैरे घालून घडी घालून खायला देतात. याच्या बरोबर आपल्या आप्प्यांसारखे दिसणारे आणि त्याच पद्धतीने बनवलेले पण अंडं घातलेले पॅनकेक्सही मिळतात. मला खूप आश्चर्य वाटायचं की या गोष्टी हे लोक घरी का बनवत नाहीत. पण मग लक्षात आलं की हे पदार्थ खूपच स्वस्त असतात म्हणून घरी ते बनवण्यात वेळ न घालवता कामावर जाताना ते खाऊन पुढे जाणं या लोकांना जास्त सोयीचं वाटतं. अर्थात, आपल्या भारतीय मनासाठी मात्र असं रोज बाहेर नास्ता करणं जरा विचित्र वाटतं. सकाळचं जेवणसुद्धा बरेच लोक बाहेर घेतात. कामावरच्या कँटीनमध्ये किंवा बाहेरून जेवण मागवून. या जेवणात मुख्यत: फ्राइड राइस, नूडल्स आणि डंपलिंग्ज (चाओझं) असतात. या भातात आणि नूडल्समध्ये भरपूर भाज्या घातलेल्या असतात. तसंच डंपलिंग्जमध्येही बऱ्याच वेळा नुसत्या पालेभाज्यांचं आणि टोफूचं सारण असतं. डंपलिंग्जला आपल्याकडे ‘मोमोज’ म्हणून विकतात. पण खरं तर मोमोज हा पदार्थ भारतातल्या उत्तरांचल आणि अरुणाचल भागातला असावा. तो चायनिज डंपलिंग्जसारखा दिसतो पण बनविण्याची पद्धत वेगळी असते. हे लोक खरंच साप, झुरळं खातात का? यांच्या जेवणात नुसता मांसाहारच असतो का? तर त्याचं उत्तर असं की सगळेच चिनी लोक बेडूक, साप, झुरळं खात नाहीत. केवळ एका विशिष्ट जमातीचे किंवा प्रांताचे लोक हे खातात आणि त्यांची संख्या कमी आहे. हे कुठलेही प्रकार साधारण रेस्टॉरंट्समध्ये मिळत नाहीत. त्यासाठी त्या प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं. मग त्यांच्या मेन्यूमध्ये तुम्हाला ‘कासवाचं सूप’, ‘मगरीची भाजी’ हे प्रकारसुद्धा दिसतील. आम्ही एकदा नाव न कळल्यामुळे चुकून या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मेन्यू पाहून नुसतंच पाणी पिऊन परत आलो.यांच्या आहारात शाकाहार आणि मांसाहाराचा अगदी योग्य समतोल असतो. सुपी नूडल्समध्ये मांसाच्या किंवा सी फूडच्या बरोबर भरपूर हिरव्या भाज्या, मोड आलेले मूग, मशरुम्स घातलेले असतात. इथे जितके मशरुम्सचे प्रकार मिळतात तितके मी कुठेच पाहिले नाहीत. अगदी बारीक इनोकी मशरुमपासून ते शिताके मशरुम, एलीफंट इअर मशरुम असे १०-१५ मशरुमचे प्रकार इथे आढळतात. आपल्याकडे मी फक्त बटन मशरुम पाहिले आहेत. आणि बरेच शाकाहारी लोक आपल्या इथे मशरुम खातसुद्धा नाहीत. मशरुमसारखेच इथे टोफूचेही बरेच प्रकार आहेत. हे लोक खूप पदार्थांमध्ये टोफू वापरतात. टोफू म्हणजे सोयाबीनच्या दुधाचं पनीर असं म्हटलं तर समजायला सोपं आहे.सोयाबीनपासून बनल्यामुळे यात प्रोटीन भरपूर असतं. यात ड्राय टोफू, मीडियम टोफू, वास येणारा टोफू - याचा वास अतिशय भयंकर असतो आपल्यासाठी, पण त्यांच्यासाठी मात्र ती डेलिकसी आहे - असे बरेच प्रकार मिळतात. यातला मीडियम टोफू हा प्रकार आपल्या पनीरसारखा दिसतो.इथे शाकाहारी लोक फार कमी आहेत. बौद्ध देवळांमधले जे पुजारी असतात ते पूर्णपणे शाकाहारी असतात. पण इतर लोकांमध्ये मात्र आपल्या भारतीय दृष्टीने संपूर्ण शाकाहार घेणारे लोक क्वचितच आढळतात. कारण अंडं आणि मासे (किंंवा सी फूड) याला हे लोक मांसाहार समजत नाहीत. त्यामुळे इथे आलेल्या शाकाहारी भारतीयांना फारच जागरूक राहावं लागतं. कारण आपण जशी भाज्यावंर किंवा पुलावर कोथिंबीर किंवा नारळ घालतो तसे हे लोक फ्राइड राइसवर किंवा वांगी-शेंगांच्या वगैरे भाजीवर बारीक सुकलेली कोळंबी किंवा वाळलेल्या पोर्कची भुकटी भुरभुरतात. -त्यामुळे काळजी घ्यायची ती एवढीच!

 
(लेखिका शांघायमध्ये वास्तव्याला आहेत.aparna.waikar76@gmail.com )