शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

प्रचंड धीराची केतकी

By admin | Updated: August 23, 2014 14:27 IST

एखाद्या असाध्य आजारात आईच्या शरीराची पडझड पाहणं मुलांसाठी मानसिकदृष्ट्या कोसळवून टाकणारं असतं. सगळं काही माहिती असतानाही अशा वेळी त्याला सामोरं जाण्याचं धैर्य योगसाधनेतून मिळू शकतं. ते मिळवणार्‍या केतकीची गोष्ट.

 डॉ. संप्रसाद विनोद

 
रात्रभर रडून सुजलेले डोळे, लाल झालेला, गोरा, घामाने डबडबलेला चेहरा आणि हातांचा अस्वस्थपणे चाळा करणारी १६-१७ वर्षांची केतकी रडत, मुसमुसत माझ्याशी बोलत होती. हातातला रुमाल अश्रूंनी पूर्ण भिजला होता. केतकीसोबत तिची आई होती. आईला पोटाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्याने दोघी खूप अस्वस्थ होत्या. केतकीचे वडील नोकरीनिमित्त दुबईत आणि भाऊ उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्तीवर अमेरिकेत होते. या बाबतीत तिचं स्काइपवर त्या दोघांशी बोलणं झालं. नेहमीचं हसतं-खेळतं कुटुंबच त्यामुळे चिंताग्रस्त झालं.
केतकीची परिस्थिती तर फारच बिकट झाली. तिच्या ४0 वर्षांच्या आईची- गौरीची कर्करोगाने पोखरणारी प्रकृती. घरात ७0 वर्षांची रक्तदाब आणि सांधेदुखी झालेली आजी. कष्टाची कामं करायला घरात पुरुष माणूस नाही. गौरी ही तिच्या आईची एकुलती एक मुलगी. केतकीची आणि तिच्या परदेशातल्या भावाची महत्त्वाची शिक्षणाची वर्षे. नोकरीमुळे वडील भारतात येण्याची शक्यता नाही. कर्करोगाच्या उपचारांवरील लाखो रुपयांचा खर्च. त्यामुळे त्यांनी भारतात येणं व्यवहार्यही नाही. अशा भयानक परिस्थितीचा केतकीसारख्या लहान मुलीला ताण येणं स्वाभाविक होतं. 
कर्करोगाच्या कुठल्याही रुग्णाला दिलासा देणं, धीर देणं खूपच कठीण असतं. कारण, हार निश्‍चित असलेल्या युद्धासाठी सैनिकाला तयार करण्यासारखं ते असतं. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक हतबल झालेले असतात. त्यातले काही जण तर लढणंच सोडून देतात. आर्थिक कारणांमुळे काहींना तसं करणं भाग पडतं. काहींना घरात असा रुग्ण नकोसा वाटतो. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाची सेवा करणं तसं अवघडच असतं. अशा सेवेची किळस वाटते. कंटाळा येतो. मग, भरपूर पगार देऊन एखादी परिचारिका ठेवली जाते. अर्थात, लठ्ठ पगार असणार्‍यांनाच अशी लक्झरी परवडू शकते.
काही जण उसनं अवसान आणतात. पण, पैशाचं सोंग आणता येत नसल्यामुळे हे सोंग गळून पडतं. आर्थिक ओढाताण असह्य होते. रुग्णाकडे दुर्लक्ष होऊ लागतं. तो नकोसा वाटू लागतो. घरच्या लोकांचं वागणं बदलतं. हा बदल अगतिक, संवेदनशील रुग्णाला जिव्हारी लागतो. त्याचा धीर सुटू लागतो. तो निराश होतो. निराश रुग्णाचा सहवास आणि सेवा आणखीनच त्रासदायक होते.
सुदैवाने, केतकी किंवा तिच्या कुटुंबीयांच्या बाबतीत असं नव्हतं. तिची सत्तरी ओलांडलेली आजी, नात्यातले इतर सर्वजण आणि खुद्द गौरीदेखील खूप सकारात्मक राहिली. केतकीचे काका-काकू, आत्या यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. केतकीला मात्र कंबर कसून संगणकातील पदव्युत्तर शिक्षण, वेळोवेळी कराव्या लागणार्‍या गौरीच्या तपासण्या, तिला रुग्णालयात दाखल करणं, तिच्याजवळ जास्तीत जास्त वेळ थांबणं, घरातल्या कामात आजीला मदत करणं, अभ्यास सांभाळून बाहेरची कामं करणं हे सगळं ओळीने दोन-तीन वर्षे करावं लागलं. प्रसंगी, ताण असह्य झाला की ती मला फोन करायची. लहान वयात जबाबदारीने सगळं निभावून नेणारी गुणी आणि हुशार मुलगी म्हणून मला तिचं फार कौतुक वाटायचं. त्यामुळे, तिचा फोन आला की सगळी कामं बाजूला ठेवून मी तिला दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष बोलून धीर द्यायचो. तीही मोकळेपणाने सगळं माझ्याशी बोलायची. परीक्षा फारच जवळ आली की ती आजीवर आणि काका-काकूंवर थोडे दिवस सगळं सोडून शांती मंदिरमधे अभ्यासाला यायची. दिवसभर अभ्यास करायची. आश्‍चर्य म्हणजे, आजूबाजूला कितीही माणसं असली तरी तिची एकाग्रता कधी भंग पावायची नाही. याचं मला फारच कौतुक वाटायचं. त्यामुळे, प्रसंगी तिला मी चहा, सरबत करून द्यायचो. त्यात मला एक वेगळाच आनंद वाटायचा. काही वेळा, ताण फारच असह्य झाला तर ती माझ्यापाशी येऊन तिचं मन मोकळं करायची. पोटभर रडायची आणि शांत होऊन घरी जायची.
धीर देताना तिला गौरीच्या तब्बेतीविषयी ‘वेडी आशा’ वाटणार नाही याची मी कायम खबरदारी घ्यायचो. ‘प्राप्त परिस्थितीत आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, याबद्दल वैचारिक स्पष्टता ठेवून आनंदाने आपलं काम करत राहावं’ असं दुसर्‍याला सांगणं सोपं असतं. पण, आपल्यावर तशी वेळ आली तर ते कठीण जाईल याची प्रामाणिक जाणीव ठेवूनच हे मी तिला सांगायचो. समाधानाची गोष्ट अशी, की ती हे सगळं समजून घ्यायची. मनापासून तसं करण्याचा प्रयत्न करायची. नियमित ध्यान, साधना, प्राणायाम करायची. जोडीला आवश्यकतेनुसार आमचं बोलणं व्हायचं. या सगळ्याचा मला खूप फायदा होतोय, असं ती मला आवर्जून सांगायची. संगणक अभियांत्रिकीच्या सर्व परीक्षांमधे विशेष प्रावीण्यासह यशस्वी होणं ही त्याची पावती होती.
तीन वर्षांच्या काळात तिचे वडील, भाऊ जमेल तसं भारतात येत गेले. वडिलांनी  खर्चाविषयी, भावाने करिअरवर होणार्‍या परिणामांविषयी, आजीने तिला होणार्‍या दगदगीबद्दल, नातेवाइकांनी त्यांना होणार्‍या त्रासाबद्दल चुकूनही कधी तक्रार केली नाही. केतकीने तर तिच्या वयाच्या मानाने सगळं खूपच धीराने घेतलं.
शेवटी, जे होणार होतं ते झालं. गौरी देह सोडून गेली. केतकीचं सर्वस्व असणारी तिची आई आता तिला पुन्हा दिसणार नव्हती. केतकीवर अक्षरश: आकाश कोसळलं. ती कोलमडली. हताश झाली. पण, काही काळानंतर पुन्हा सावरली.  
कर्करोगाने शरीर पोखरलेल्या गौरीच्या चेहर्‍यावर शेवटी एक शांती होती. या शांतीमागे कुटुंबीयांविषयीची कृतज्ञता आणि आपल्या लाडक्या, गुणी लेकीविषयीचं कौतुक दडलेलं होतं. 
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)