- प्रा. डॉ. द. ता. भोसले
आलोक इयत्ता चौथीला गेला आणि घरातील सारे वातावरणच बदलले. रमेश आणि मानसी यांनी त्याचा अभ्यास, त्याची शाळा, त्याची परीक्षा आणि त्याचे करिअर यासाठी अगदी काळजीपूर्वक नियोजन केले. वाटेल तेवढा पैसा खर्च करायचे ठरविले. एखादी पंचवार्षिक योजना काळजीपूर्वक तयार करावी तशी. म्हणून मग त्यांनी मोठा वशिला लावून आणि घसघशीत देणगी देऊन शहरातील एका नामवंत प्रशालेत त्याचा प्रवेश घेतला. तशी या शाळेची नेहमीची फीदेखील सामान्य पालकांना न पेलवणारी होती. शाळेची फी ऐकताच तोंडाला कोरडच पडावी असा तो आकडा होता. मात्र, रमेशने एकुलत्या एका पोराच्या भविष्यासाठी कसलीही तडजोड केली नाही. शाळा सुरू होऊन एखादा महिना होतो न होतो; तोच शाळेतील काही शिक्षकांना भेटण्यासाठी हे दोघे पतिपत्नी शाळेत गेले. महत्त्वाचे विषय असलेल्या शिक्षकांना भेटून म्हणाले, ‘‘सर, यंदाच तुमच्या शाळेत आमच्या आलोकला घातले आहे. त्याच्या उत्कृष्ट करिअरसाठी आतापासूनच आम्ही तयारीला लागलो आहोत.
मी एका नामवंत बँकेत मॅनेजर आहे. माझी पत्नी अनेक सामाजिक संघटनांत काम करते. एका महिला मंडळाची ती अध्यक्षाही आहे. आम्हा दोघांनाही वेळ मिळत नसल्याने आपण माझ्या मुलाची स्पेशल शिकवणी घ्यावी, त्याची उत्तम तयारी करून घ्यावी. तुमची असेल ती फी आम्ही द्यायला तयार आहोत. त्याची स्पेशल तयारी करून घ्या, अशी विनंती करायला आलो आहोत. शिक्षकांनी ‘तशी त्याची गरज नाही. शाळेच्या तासांतच आम्ही चांगली तयारी करून घेतो; आणि त्यातूनही गरज भासली तर सहामाहीनंतर बघू,’ असे सांगूनही ते ऐकायला तयार नव्हते. आठवड्यातून तीन दिवस तरी तास घेण्याचा त्यांनी आग्रह केला आणि नाईलाजास्तव शिक्षकांना होकार द्यावा लागला. त्याशिवाय आपल्या मुलाचे इंग्लिश उत्तम होण्यासाठी एका नवृत्त विषय शिक्षकाला घरी येऊन शिकविण्याची विनंती केली. त्यासाठीही मोठी फी देण्याचे आमिष दाखविले.
मनासारखे सारे घडल्याने रात्री जेवताना रमेश बायकोला म्हणाला, ‘‘आपल्या आलोकचं उद्याचं करिअर अतिशय उत्कृष्ट होणार बघ. त्याच्या करिअरची पायाभरणीच आपण इतकी चांगली करतोय, की सार्या शिक्षणक्षेत्रात त्याचे नाव घेतले जाईल. आपले नातेवाईक, मित्रमंडळी आणि कॉलनीतील प्रत्येकानं तुझा-माझा आणि आलोकचा हेवा केला पाहिजे. आदर्श पालक म्हणून बोट दाखविले पाहिजे.’’ आणि शेजारी बसून गृहपाठ पूर्ण करणार्या चिरंजिवाला ते म्हणाले, ‘‘हे बघ आलोक; तुझ्या शिक्षणासाठी आम्ही लाखानं खर्च करतोय. तू एकही तास बुडवू नको शिकवणी बुडवू नको मनापासून अभ्यास कर. आळस करू नको. तसेच अवांतर गोष्टीची पुस्तकं वाचणं, खेळासाठी वेळ घालवणं; टीव्ही बघत बसणं, यांसारख्या गोष्टी एकदम बंद कर. प्रत्येक विषयात तुझा नंबर आला पाहिजे. आणि प्रत्येक परीक्षेत तुझा पहिला नंबर आला पाहिजे.
समजा, एखादा विषय कठीण वाटत असेल तर आणखी एखादी स्पेशल शिकवणी लावतो. जाऊ दे पैसे गेले तर.’’ गृहपाठ करता करताच खालच्या मानेनेच त्याने होकार दिला. तेवढय़ात आठवल्यासारखं करीत मानसी म्हणाली, ‘‘आमच्या महिला मंडळाच्या सेकेट्ररीबाई आहेत ना; त्यांचा मुलगा की नातू स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलाय. त्या अगदी त्याला स्कॉलरशिप मिळालीच अशा तोर्यात सांगत होत्या. माझ्यावर भाव मारण्यासाठी. आपणही आलोकला बसवूया या परीक्षेला. आपला आलोक काही कमी हुशार नाही. नक्कीच नंबर काढेल तो आणि समजा नाही स्कॉलरशिप मिळाली तर त्या निमित्ताने त्याची तयारी तरी चांगली होईल.’’ आलोककडे चेहरा वळवून त्या म्हणाल्या, ‘‘आलोक, तुला काय वाटतं? बसायचंय ना स्कॉलरशिप परीक्षेला’ तो चेहरा वेडावाकडा करीत म्हणाला, ‘‘ममा, मी नाही बसणार! किती तासांना बसू मी? वर्गातले तास, जादा तास, स्पेशल शिकवणीचे तास, त्या काणे सरांचा तास, दिवसभर तासच तास, त्यात आता तुझे स्कॉलरशिपचे तास! मी दिलेला अभ्यास कधी पूर्ण करू? जादा शिकवणीचा कधी करू? मला स्वत:ला काय येते नि किती येते हे बघायला वेळच नाही. प्लीज, आता आणखी तासांचं ओझं लादूू नको.’’ नवराबायको यानंतर एकदम चकित झाले. गप्प झाले. परस्परांकडे वेगळ्याच नजरेने बघू लागले. रमेश खालच्या आवाजात मानसीला म्हणाला, ‘‘तूर्त बळजबरी नको. काही दिवसांनी त्याचा मूड बघून त्याला विचार. त्याला तयार करू.’’ मानसीने होकार दिला.
आणि घड्याळाच्या काट्याबरोबर आलोकचा दिनक्रम सुरू झाला. काट्याबरोबर तासांचे चक्र धावू लागले. दप्तराचं ओझं, तासांचं ओझं, जादा शिकवणीचं ओझं, अभ्यासाचं ओझं व पालकांच्या अपेक्षांचं ओझं यामुळे त्याला त्याचं आयुष्य गाठी सैल झालेल्या ओझ्यासारखंच वाटू लागलं. उगवणारा प्रत्येक दिवसच ओझ्यासारखा वाटू लागला. दिवसभर मानेवर असलेल्या जूमुळे बैलाचा खांदा जसा सुजावा- रक्तबंबाळ व्हावा, तशी त्याच्या मनाची स्थिती झाली. मेंदूची अवस्था झाली. ‘थकवा’ एवढा एकच शब्द त्यासाठी पुरेसा आहे. देहाचा थकवा; मनाचा थकवा आणि इंद्रियांचा थकवा त्याला जाणवू लागला. अनेकदा त्याला इतका थकवा यायचा, की तो शाळेतून आल्यावर न जेवताच झोपून जायचा. बाबा ऑफिसमधून आलेले नसायचे. ममा सभा, भाषणे, मीटिंग किंवा ब्युटीपार्लरमधील रूप-साधना यात गुंतलेली असायची. ते उशिरा घरी आले नि त्याला खाण्यासाठी आग्रह केला, तरी त्याला नकोसे वाटे नि झोपावेसे वाटे. मुलाची आणि आई-बाबांची भेट दुर्मिळ होत गेली. रात्री हा झोपलेला. सकाळी ते दोघे झोपलेले. जादा तासासाठी तो पहाटेच घराबाहेर पडत असल्याने जिथे भेटच होत नाही; तिथे मग संभाषण कुठले? विचारपूस कुठली? त्याचे काय दुखते-खुपते आहे, त्याला काय हवे नको; त्याच्या शिकण्या-शिकवण्यात काय अडचणी आहेत, यांची चौकशी करायला यांना वेळ नव्हता आणि आपण फीच्या रूपाने एवढी मोठी रक्कम देतोय; तेव्हा ती जबाबदारी शाळेची आहे. शिक्षकांची आहे. आम्हा पालकांची नाही, अशी रमेश-मानसीची धारणा झालेली.
या सार्या गोष्टींमुळे आलोक अबोल झाला. मनाने कोरडा होत गेला. अतिश्रमानं त्याला कशातच उत्साह वाटेनासा झाला. त्याला भूक लागेनाशी झाली; एक-दोन वेळा त्याला ताप आल्यासारखा वाटला. अंगही दुखत होते. आपल्या आईला तो विचारायला गेला, तर मानसी म्हणाली, ‘‘प्लीज आलोक, आता मी घाईत आहे. महिला मंडळाच्या वतीने सौंदर्यस्पर्धा आहेत. त्याचं उद्घाटन माझ्या शुभहस्ते असल्याने मला आता जायला हवे. तुला काय सांगायचे असेल तर ते तू रात्री मी आल्यावर सांग. किंवा मोलकरीण मालनला सांग. ओ. के.?’’ आणि ती निघून गेली.
आलोकला कमालीचे वाईट वाटले, त्याला धक्का बसला. आपण म्हणजे एक अवयव असलेलं यंत्र आहोत, मालकाने त्यात इंधन घातले, की त्याची जबाबदारी संपली. त्या यंत्राने न थांबता फिरले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात आला आणि दिवसभर तसाच तो तासांसाठी यंत्राप्रमाणे फिरला. घरी आल्यावर त्याने चिठ्ठी लिहिली. त्यात लिहिले, ‘गेले दोन दिवस मला ताप आहे, पोटात घासभर अन्न गेले नाही. औषध घेण्यासाठी व देण्यासाठी तुमच्याकडे जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा माझा विचार करा. नाही केला तरी चालेल.’ चिठ्ठी वाचताच दोघांनाही आपली चूक लक्षात आली. त्याला मांडीवर घेऊन थोपटतानाच रमेश म्हणाला, ‘‘बाळा, आम्ही चुकलो. विकत मिळणार्या सुख आणि प्रतिष्ठेला आम्ही भाळलो. तुझा सहवास, तुझे बोलणे आणि तुझे सुख-दु:ख हेच आम्हाला मोलाचे आहे. त्याचा विसर आता पडणार नाही.’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)