शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेला किसन

By admin | Updated: September 27, 2014 15:14 IST

प्रतिकूल परिस्थिती हाच ज्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो, त्यांना संघर्ष वेगळा शिकावा लागत नाही. त्याच वेळी जर जीवनात काही वेगळं करण्याची आस असेल आणि योग्य दिशा देणारं कुणी असेल, तर यशाची वाटचाल मग अवघड कशी राहील?

- डॉ. संप्रसाद विनोद

 
अवघ्या १२-१३ वर्षांचा किसन ज्या वेळी प्रथम माझ्याकडे आला, तेव्हा मला पु.लं.च्या सखाराम गटणेची आठवण झाली होती. सखारामसारखा तोही खूप छापील बोलत होता. त्याने महर्षी विनोदांची, माझी आणि इतर अनेक लेखकांची बरीच धार्मिक, आध्यात्मिक पुस्तकं वाचली होती. नुसती  वाचली नव्हती, तर त्यातलं बरंच त्याला तोंडपाठही होतं. मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्ष हे सगळं तर त्याच्या जिभेवर होतं. प्रथम मला त्याच्या छापील वागण्याचं हसू आलं; पण तो कुठल्या सामाजिक, आर्थिक पार्श्‍वभूमीतून आलाय, हे समजल्यानंतर मात्र मला त्याचं खूप कौतुक वाटलं होतं. आजही वाटतं. 
एकदा त्याच्या वडिलांवर उपचार करण्यासाठी त्याच्या घरी गेलो, त्या वेळी तो पुण्याच्या पूर्व भागात राहायचा. चुना-मातीत बांधलेलं, शेणानं सारवलेली जमीन आणि भिंती असलेलं त्याचं जुनं, खिळखिळं झालेलं भाड्याचं घर पहिल्या मजल्यावर होतं. त्या भागात अशी बरीच घरं होती. दोन घरांमधे अंतर खूप कमी. त्या अरुंद बोळांमधून जाताना जपून जावं लागलं. अंगावर ‘वरून’ कधीही केर पडण्याची शक्यता होती. असा ‘वरून’ पडलेला केर त्या बोळात जागोजागी दिसत होता. सायकलस्वार, हातगाड्या जात-येत होत्या. मुलं गोट्या खेळत होती. त्यांचा आरडाओरडा चालू होता. 
सार्वजनिक नळापाशी बादल्या, हंडे, कळशा ठेवून अनेक बायका पाण्यासाठी उभ्या होत्या. त्यांची मधूनमधून जोरदार भांडणं होत होती. या सगळ्यातून वाट काढत मी त्याच्या घराजवळ पोहोचलो. त्याच्या घरी जायचा जिना फारच तकलादू होता. चढून जाताना तो डुगडुगत होता. जिन्याच्या पायर्‍या अरुंद होत्या. जिन्याचं लाकडी रेलिंगही खूप हलत होतं. जपून जिना चढून वर गेलो. जपून चालत त्याच्या घरी पोहोचलो. इतकं जपून चाललं तरी जमीन हादरत होती. त्या मजल्यावरचे इतर भाडेकरूही जपून चालताना दिसले. कारण, त्यांच्या थोड्याशा जोरात चालण्यानेदेखील खालच्या घरात माती पडत होती. 
किसनचं घर होतं १0 बाय १२ची एक अंधारी खोली. खोलीत शिरल्यावर त्याच्या आईनं प्रसन्नपणे हसून माझं स्वागत केलं. खरं तर, एवढं प्रसन्न वाटण्यासारखं त्या खोलीत किंवा तिच्या आयुष्यात काहीच नव्हतं. खोलीच्या कोपर्‍यात एका जुन्या पलंगावर किसनचे दमेकरी वडील पहुडले होते. दुसर्‍या कोपर्‍यातल्या छोट्याशा मोरीत त्याची अविवाहित बहीण भांडी घासत होती. आणखी दोन बहिणी अवघडून बाजूला उभ्या होत्या. किसनच्या वडिलांना तपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपाययोजना केली. एवढय़ाशा खोलीत ही सगळी माणसं कशी राहत असतील, असा मला प्रश्न पडला. थोड्या वेळानं त्याच्या आईनं मला जुन्या, तडा गेलेल्या कपात चहा दिला. किसनच्या वडिलांनाही दिला; पण त्यांच्या कपाला कान नव्हता. मी घरच्यांशी बोलत असताना किसन हळूच बाहेर गेला. बिस्किटाचे दोन पुडे घेऊन आला. एक पुडा उघडला. माझ्यापुढे ठेवला. 
किसनच्या वडिलांवर उपचार करण्यासाठी माझं मधूनमधून त्याच्याकडे जाणं व्हायचं, त्या वेळी मला वाटायचं, अशा दैन्यावस्थेत माणूस फार तर कसाबसा ‘जिवंत’ राहू शकतो. पण, किसन मात्र तशा परिस्थितीत स्वत:चा ‘विकास’ साधण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी धडपडत होता. सगळ्या अडचणींमधून धिरानं मार्ग काढत अभ्यास करीत होता. शिकत होता. चांगले गुण मिळवत होता. अभ्यासाव्यतिरिक्त इतर वाचन करीत होता. जे वाचलंय त्यावर विचार, मनन करीत होता. चर्चा करण्यासाठी माझ्याकडे, तसंच आणखी कोणाकोणाकडे जात होता. त्याची ज्ञानाची ओढ फार विलक्षण होती. जिज्ञासा तर एवढी तीव्र, की नवीन काही समजून घेताना त्याचा चेहरा आनंदानं उजळून यायचा. प्रांजळपणे प्रश्न विचारायचा. कधी बिचकायचा नाही. हसत-हसत अडचणीत टाकणारे प्रश्न विचारण्याची त्याची अशी एक वेगळी शैली होती. एखादा विषय समजून घेताना, त्यावर चर्चा करताना त्याला कधी भीती, संकोच वाटला नाही. बोलण्याचा उत्साह एवढा दांडगा, की प्रश्नांमागून प्रश्न विचारायचा. बर्‍याच वेळा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वीच त्याचा पुढचा प्रश्न येऊन धडकायचा. त्याची ही प्रश्नांची सरबत्ती काही वेळा मला थांबवावी लागायची; पण त्याच्या शिकण्याच्या प्रामाणिक तळमळीचं कायम कौतुकही वाटायचं. 
जगणंदेखील अवघड झालेला किसन वेळ काढून संस्थेत येऊन मनापासून योगसाधनाही करायचा. त्याची परिस्थिती पाहता हे खूप होतं. सगळ्या अडचणींवर मात करीत किसन अभियांत्रिकीची पदविका पास झाला. काही काळ नोकरी केली; पण नोकरीत मन रमलं नाही. स्वत:चा फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला. कष्टाळू, अभ्यासू आणि बोलक्या स्वभावामुळे लवकरच चांगला जम बसला. प्रामाणिकपणानं काम केल्यामुळे नाव झालं. आपोआप कामं येत गेली. मंदीच्या काळात दुसरा व्यवसाय सुरू करावसा वाटला. आमचं याबाबत बोलणं झालं. मूळ व्यवसायाशी संबंधित व्यवसाय करण्याविषयी सुचवलं. त्यानं तसं केलं. मंदी आली आणि गेली. दरम्यान, बांधकाम साहित्य विक्रीपासून सुरुवात करून त्यानं दोन-तीन वर्षांत पूर्णवेळ बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्यातही हळूहळू स्थिरावला. आज तो यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहे. काही कोटींची मालमत्ता आहे. दोन्ही मुलं शिकूनसवरून मोठी झाली आहेत. आता तो आजोबाही झालाय. व्यवसायाच्या चढउतारांच्या काळात आई पाठीशी उभी राहिली. नंतर सरकारी नोकरी करणार्‍या पत्नीची साथ मिळाली. 
प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले धडे, चिकाटी, सकारात्मक विचारसरणी, कष्टाळूपणा, आईचे चांगले संस्कार, पत्नीची साथ आणि ‘अभिजात योगसाधने’ची वेळोवेळी झालेली मदत यांमुळे आज तो यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, अजूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत!!
 
(लेखक महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरूआणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)