डॉ. संप्रसाद विनोद
टेनिस, बॅडमिंटनसारख्या एका पाश्चात्त्य खेळात चांगलं कौशल्य दाखवणार्या १0 वर्षांच्या स्नेहाचा चंचलपणा कमी व्हावा आणि खेळातली कारकीर्द यशस्वी व्हावी, यासाठी तिचे पालक तिला घेऊन माझ्याकडे आले. उत्तम क्रीडापटू असलेली स्नेहा वयाच्या मानाने चांगली उंच आणि दणकट होती. चेहरा मात्र वयाला साजेसा निष्पाप, निरागस होता. रोजचा सराव संपवून संध्याकाळी शांतिमंदिरमध्ये आलेली स्नेहा खूपच दमलेली होती. त्यामुळे, ती खुर्चीवर आरामात पाय पसरून बसली. अर्थात, त्या बसण्यात कुठेही ‘आगाऊपणा’ नव्हता. विश्रांतीच्या आवश्यकतेतून आलेली ‘अपरिहार्यता’ होती. मला तरी त्यात काहीच गैर वाटलं नाही. तिच्या आईला मात्र ते खटकलं. ‘मुलीच्या जातीला असं पाय पसरून बसणं शोभत नाही’ असं म्हणून आईने तिला झापलं. बाबांची आईला मूकसंमती असल्यामुळे स्नेहा थोडी सावरून बसली. पण, थोड्याच वेळात पुन्हा पाय पसरले गेले. प्रचंड दमल्यामुळे स्नेहाचं शरीर आपोआप विश्रांतीच्या स्थितीत जात राहिलं.
तिच्या खेळातल्या प्रगतीविषयी तिच्या आईवडिलांनी मला बरंच काही सांगितलं. ती लहान असल्यापासून कशी खेळते आहे, तिचे कोच तिच्या टॅलेंटवर कसे खूष आहेत, त्यांचं तिच्या प्रगतीवर जातीने कसं लक्ष आहे, राष्ट्रीय पातळीवर ती कशी पोचली, तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना कसं न्यायचंय?, त्यासाठी वाट्टेल ते करायला ते कसे तयार आहेत, खेळातलं राजकारण कसं असतं, वगैरे वगैरे. मी सगळं ऐकून घेतलं. समजून घेतलं. दरम्यान, स्नेहा छानपैकी झोपून गेली. ही माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट होती. कुठेही गाढ झोपू शकणं ही खेळाडूच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट असते. गाढ झोपेमुळे सगळा थकवा दूर होतो. माणूस ताजातवाना होतो. शारीरिक श्रमांमुळे शरीराची झालेली झीज झोपेत भरून निघते. खेळाडूला रोज अशी झोप अत्यावश्यक असते. सर्व यशस्वी खेळाडू उत्तम झोपू शकणारे असतात.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे स्नेहा आली. तिच्याशी मला वेगळं बोलायचं होतं. पण, तिच्याबरोबर तिचे आईवडीलही आले. वयाने लहान असल्याने तिच्याबरोबर त्यांनी येणं तसं योग्यही होतं. पण, ती दोघं तिला सतत सूचना-उपसूचना देत राहिले. त्याही बर्याच परस्परविरोधी होत्या.
आई एक सांगत होती तर वडील नेमकं उलटं. स्नेहाला बिचारीला त्यांच्यापैकी कोणाचं बरोबर आहे हे नीट समजत नव्हतं. त्यामुळे, ती गोंधळून गेली. खरं तर, त्या दोघांमधे ‘आपण कसे बरोबर आहोत’ हे दाखवण्याची स्पर्धा सुरू होती- ज्याला इंग्रजीत ‘वन-अपमनशिप’ म्हणतात तशी! दोन हुशार माणसं एकत्र आली की त्यांच्यापैकी ‘कोण वरचढ आहे’ हे ठरवण्यासाठी अशी स्पर्धा सुरू होते. स्नेहाचे आईवडील खूप हुशार आणि यशस्वी असल्याने त्यांच्यात ‘कोण श्रेष्ठ?’ अशी स्पर्धा असणं मला अपेक्षित होतं. स्नेहा फक्त निमित्त होती. त्यांची स्पर्धा परस्परांशीच होती. दोघांचं स्नेहाविषयीचं ‘स्पर्धात्मक कथन’ बराच वेळ चालू राहिलं.
स्नेहाशी बोलताना माझ्या सहज लक्षात आलं, की क्रीडापटूत्वाबरोबर ही मुलगी आईवडिलांसारखी खूप हुशारही आहे. प्रत्येक परीक्षेत ९0-९५ टक्के गुण मिळवते आहे. गणित, शास्त्र विषयात उत्तम गती आहे. फक्त, आईवडीलांच्या परस्परविरोधी स्वभावामुळे आणि विचारांमुळे जरा गोंधळलेली आहे. तिने मला असंही सांगितलं, की ती केवळ हौस म्हणून खेळते आहे आणि मोठेपणी तिला डॉक्टर व्हायचंय. पण, तिच्या खेळाडू आईला तिला क्रीडापटू, तर उत्तम करिअर आणि व्यवसायाने इंजिनियर असलेल्या वडिलांना तिला इंजिनियर करायचंय. अशा परिस्थितीत या मुलीचं काय होत असेल याची मला कल्पना आली आणि तिची काळजीही वाटली.
मग, तिच्या आईवडिलांना समजावून सांगितलं, ‘‘खेळात प्रावीण्य दाखवणारी सगळीच मुलं थोडीशी चंचल असतात. तशी स्नेहाही आहे. पण, काळजी करू नये. स्नेहा योगसाधनेसाठी अजून जरा लहान आहे. पण, तुम्ही दोघं योगसाधना शिकलाय आणि नियमितपणे करताय असं तिला दिसलं, की ती आपोआप योग शिकण्याची इच्छा व्यक्त करेल. असं झालं, की स्नेहाला तुम्ही केव्हाही योगासाठी आणा. सध्या तिला खेळातला आणि आनंद घेऊ दे. खेळासाठी उपयुक्त असणार्या काही गोष्टी मी तिला हळूहळू शिकवीनच.’’
सुदैवाने माझं म्हणणं त्यांना पटलं आणि ‘मुलीच्या’ योगप्रशिक्षणाऐवजी ‘पालकांचं’ योगप्रशिक्षण सुरू झालं. दोघं त्यात चांगला रस घ्यायला लागले. आमचं मग वेळोवेळी बोलणंही होऊ लागलं. त्याद्वारे त्यांना समजावून सांगितलं, की त्यांनी स्नेहाची अजिबात काळजी करू नये. तिला फक्त तिच्या आनंदासाठी खेळू आणि अभ्यास करू द्यावं. तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तिला पुढं जाऊ द्यावं. त्यातूनच तिला साजेसं, तिला आवडणारं आणि सहज जमणारं करिअर आकाराला येईल. तुम्ही फक्त त्यासाठी लागणार्या सगळ्या सुविधा तिला उपलब्ध करून द्या. त्यानंतर जर ‘तुमची’ स्वप्नं ही ‘तिची’ स्वप्नं झाली तर फारच छान. पण नाही झाली तरी काही बिघडणार नाही, हे जर तुम्ही मनापासून मान्य केलं तर स्नेहाचं सगळं छान होईल. झालंही तसंच. स्नेहा काही वर्षे राष्ट्रीय पातळीपयर्ंत खेळली आणि नंतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन डॉक्टरही झाली.
(लेखक महर्षी न्यायरत्नविनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरूआणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)