रघुनाथ पांडे
'तल्खी..’ हा सामान्य हिंदी शब्दापेक्षा कानाला जरा तिखटा जाणवणारा निराळा शब्द आता दिल्लीच्या राजकारणात ऐकू येतो, तो अमित शहा यांच्याबाबतीत! तल्खी म्हणजे झोंबणारा, तिखट स्वभावाची व्यक्ती..!! लोकसभा निवडणुकीदरम्यान, लखनौत शहा यांनी पत्रकारांना चर्चेसाठी बोलविले. तेव्हा त्यांच्यापुढे तीन वेळा चहा आला, कपाकडे बघत त्यांनी तो नाकारला. शेवटी पत्रकारांनी त्यांना विचारले, हे असे का? शहा म्हणाले, ‘मुझे देर तक उबाली हुई, कडक चाय चाहिऐ..’
चहा, मोदी आणि अमित शहा यांचे नाते हे असे. जोशपूर्ण आणि काळाच्या कसोटीवर खूप वेळ उकळलेले! राजकारणात अशा बारीकशा इशार्यांना भरपूर कंगोरे असतात. शहा त्याबाबतीत चलाख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सावली असे त्यांचे खास वर्णन होते. चालणे, बोलणे, हावभाव व देहबोली सारेच मोदीमय. लोक त्यांना नमस्ते म्हणून अभिवादन करायलाही भितात, कारण काय, तर ते कशी प्रतिक्रिया देतील याचा नेमच नाही. याउलट काही जण सांगतात, ते कार्यकर्त्यांचा एकही फोन मिस करत नाहीत! ते मीडियापासून दूर राहतात, अत्यंत तोलून मापून बोलतात. ‘मै मुद्दो में नही जाना चाहता, लेकिन जो वाजिब मुद्दे है वो हमेशा रहेंगे..’ हे त्यांचे अयोध्येतील भाजपा कार्यकर्त्यांपुढील भाषणाचे सार नऊ जुलैस जेव्हा शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले त्यादिवशी दिल्लीच्या रस्त्यावरील फलकांवर लिहिले होते. ‘परफेक्ट मॉडर्न-डे पॉलिटिशियन’ गांधीनगर ते दिल्लीचे सात आरसीआर या पंतप्रधान मोदींच्या अलीकडच्या सोळा- सतरा वर्षांच्या राजकीय जीवनात शहा यांनी मोदींच्या मार्गात येणारी प्रत्येक अडचण, त्यांना बसू शकणारी प्रत्येक ठेच दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला.. असं म्हणतात, की सरकारविरुद्ध निदर्शने करताना सारेच कार्यकर्ते पोलिसांच्या धाकाने पळून जात, पण शहा अखेरपर्यंत लढत. भाजपाला राम तारत असला तरी मोदींचे हनुमान मात्र अमित शहा आहेत. मोदींच्या हायटेक सभांचे नियोजन शहा यांच्या देखरेखीखाली व्हायचे. मोदींची भाषणे, त्यातील मुद्दे शहा पुरवायचे. सभेतील भाषण प्रारंभ करण्यापूर्वी मोदींना एक लहानसा कागद दिला जायचा, तो ते गंभीरपणे चाळायचे आणि वरच्या खिशात ठेवून भाषण द्यायचे.. ते मुद्दे शहांचे असायचे. शहांना आदेश देण्यामध्ये त्यांना सर्वाधिक रुची. ते कार्यकत्यार्ंचे मत, सूचना ऐकतात. पण शेवट त्यांच्या मनात जे असेल त्यानेच होतो. लोक आपल्या वर्तणुकीमुळे नाराज होतील यावर त्यांचा विश्वासच नाही. त्यांचे सगेसोयरे त्यांना याबाबत सांगतात, तेव्हा ते म्हणतात, ‘आपण बदलून काही वेगळे घडेल याची पर्वा करायला वेळ तरी कुठे आहे..’
गुजरातेतील मोदीयुगाच्या आरंभीच भाजपाच्या यादीतून बाद झालेले केशूभाई पटेल, शंकरसिंह वाघेला, संजय जोशी हे मातब्बर शहा यांचे एकदम खासमखास होते. तर कुशाभाऊ ठाकरे, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी आणि आता नरेंद्र मोदी यांच्या ते गळ्यातील ताईत! ८0च्या दशकात शहा यांची मोदींशी भेट संघाच्या एका शाखेत झाली. मोदी अत्यंत साधे संघ प्रचारक तर शहा गर्भश्रीमंत घरातील छोकरा. जेमतेम १४ वर्षांचा किशोर स्वयंसेवक. त्यांना शहा यांनी स्वयंसेवक म्हणून परिचय करून देताना, मला संघातून राजकारणात जायचे आहे, असे थेट सांगितले होते. कालौघात, शहा यांनी प्लास्टिक पाईप निर्मिती व शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात चांगलाच जम बसविला होता. अभाविप आणि छोट्या-मोठय़ा निवडणुकीत रस घेतला. पण मोदींशी त्यांचा संपर्क उत्तरोत्तर वाढला होता. एक दिवस मोदींनी शहा यांची तेव्हाचे गुजरात भाजपचे अध्यक्ष शंकरसिंह वाघेला यांच्याशी ओळख करून दिली. ‘या छोकर्याला पार्टीत काही काम द्या, प्लास्टिक पाईप निर्मितीचा त्याचा चांगला व्यवसाय आहे’ असे सांगितले. पण त्यांना फार मदत झाली नाही. १९९१ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी केली आणि अडवाणींच्या निवडणूक व्यवस्थापन- नियोजनाची जबाबदारी आपण घेतो अशी गळ मोदींनी संघाकडे घातली. मोदींच्या मदतीला शहा होते. अडवाणी प्रचंड बहुमताने जिंकले आणि मोदी व शहांची जोडगोळी अडवाणींच्या गोतावळ्यात आपसूक दाखल झाली. आता शहा यांच्या उमेदीला घुमारे फुटले होते. पुढच्या खेपेत म्हणजे १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधीनगरमधून निवडणूक लढण्याची तयारी केली आणि निवडणूक व्यवस्थापन, नियोजनाची संपूर्ण जबाबदारी संघ व पक्षाने शहा यांच्या खांद्यावर दिली. अडवाणी व वाजपेयींच्या मनात मोदी व शहा यांनी स्थान मिळविले.
दिल्लीत ‘कानाफुशी’ राजकारणात कमालीचा राबता असलेल्या शहांनी मग मोदी यांना राजकारणात सक्रिय होण्याचा सल्ला दिला. संघाच्या मुशीतून नांगरणी केल्याने गुजरातमध्ये पल्ला गाठावा अशी मोदींची महत्त्वाकांक्षा जागी झाली आणि शहांना घेऊन मोदी गुजरातच्या गल्ल्यान्गल्ल्या पायाखाली घालू लागले. गुजरातमधील भूकंपात केशूभाईंच्या सरकारची लोकप्रियता संपली, त्यांना दूर करावे यासाठी दिल्लीत जे लॉबिंग झाले, त्यात मोदींच्या बरोबरीने शहा आघाडीवर होते. दुसरीकडे गुजरातेत भाजपचा की मोदी आणि शहांचा कार्यकर्ता असे चित्र विभागूू लागले. पण पक्षाला सत्ता हवी होती. ती मोदींनी मिळवून दिली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले.. शेअर ट्रेंडिंगचा व्यवसाय करणार्या शहांचा सेन्सेक्स कमालीचा वधारला, ते गृहराज्यमंत्री झाले. नंतर अनेक वर्षे गृहमंत्री व मोदींच्या विशेष रुचीतील दहा मंत्रालयांचे प्रभारी मंत्री होते. १९९७ मध्ये सरखेज विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रथम व त्यानंतर तेथूनच चार वेळा व आता २0१२ मध्ये नरणपुरा येथून ते विधानसभेत आले. ३३ वर्षांचे असताना आमदार व ४९ वर्षांचे असताना भाजपासारख्या सत्ताधारी पक्षाचे, सर्वात तरुण असे दहावे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
अमित शहा यांची राष्ट्रीय पातळीवरील चर्चा सुरू होते ती त्यांच्या उघड झालेल्या, बहुर्चित ठरलेल्या आणि काळाच्या ओघात कालबाह्य ठरू पाहणार्या महत्त्वपूर्ण चार प्रकरणांवरून. सोहराबुद्दीन, शेख व तुलसीदास प्रजापती बनावट चकमकीवरून गृहमंत्री असलेल्या शहा यांना अटक झाली. तीन महिने ते तुरुंगात होते. हा मामला बराच गुंतागुंतीचा असून, सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाची राळ उठलीच आहे, पण जेव्हा या प्रकरणाला अल्पविराम लागतो न लागतो तोच ते, एका मुलीचे दूरध्वनीवरील ‘गूफ्तगू’ कथितरूपाने सार्वजनिक झाले. ही ‘जासुसी’ शहा यांना पुन्हा प्रकाशझोतात आणण्यास निमित्त ठरली. देश-विदेशात ‘स्नूप गेट’ म्हणून हा विषय गाजला. गुजरात सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय आयोग नेमला. खरेतर ३0 जूनला अहवाल अपेक्षित होता. आता अहवालाला ३१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शहांना दोन जुलैला झेड प्लस सुरक्षा आणि नऊ जुलैला राष्ट्रीय अध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. त्यांच्या नियुक्तीला ज्या पद्धतीने ‘ग्लोरिफाय’ करण्यात आले, त्यावरून पक्षातील संयमी गटाच्या भुवया उंचावल्या. सीपीएम, काँग्रेस व आम आदमी पार्टीने नियुक्तीवर टीका केली. नैतिक आचरण मानणारी भाजपा आरोपीच्या पिंजर्यात असताना शहांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्याची घाई का करतोय, हा सर्वांना सतावणारा प्रश्न आहे. काँग्रेसने आघाडीची साथ सांभाळण्यासाठी लालुप्रसाद यादव यांना साथ देण्याची कसरत केली होती. तर भाजपाने आरोप असलेल्या येदियुरप्पा, बापू बोखरीयाद यांना सामील करून घेतले होते. त्यामुळे राजकारणात गरज म्हणून पोळी आपल्या पद्धतीने भाजली जाते, पण ती करपू नये याची काळजी कशी घेतली जाईल हे मोठे आव्हान चारित्र्याचे धडे गाणार्या भाजपापुढे आहे. कारण, भाजपाला संख्यात्मक ताकद मिळाली याचा अर्थ असा होत नाही, की पक्ष किंवा व्यक्तीचे राजकारण योग्य दिशेने चालेल. संघ व भाजपाने मोदींवरच्या विश्वासापोटी शहांना मोठे पद दिले, त्यामागे या दोन्ही संघटनांचे काही सूचक संकेत नक्कीच आहेत. बरेच काही पणालाही लावले आहे. सरकार असताना पक्ष चालवणे सोपी गोष्ट नाही, त्याची पुन्हा बांधणी करावी लागेल. विजयानंतर पक्ष व कार्यकर्त्यांंमध्ये आळस येतो, तो झटकून चैतन्य आणण्याचे कौशल्य शहांना दाखवावे लागणार आहे. जिथे विजय झाला आहे, तेथील जमीन सांभाळून पूवरेत्तर राज्ये अधिक बळकट करायची आहेत. संघाचा सरकारवरील वरचष्मा वाढला असे दिसत असले तरी, मोदींवर भाजपाचे नियंत्रण आहे, संघाचे नाही हे सांगणारी ही नियुक्ती मानली जात आहे. मुजफ्फरपूरच्या दंगलीनंतर शहा चर्चेत आल्याने ‘सईया भए कोतवाल, तो अब डर काहे का..’ अशी अवस्था होण्याची धास्तीही धर्मनिरपेक्ष भावना ठेवणार्यांना सतावत असल्यास वावगे ते काय?
निवडणुकीने अध्यक्ष झालेल्या राजनाथसिंहांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीची अजून दीड वर्ष शिल्लक होते. त्यांना बदलवून शहा यांची नियुक्ती झाली. पुढील दीड वर्ष शहांना पक्ष ‘हर वॉर्ड- हर घर’ पोहचवायचा आहे. आतापर्यंत ४२ लहान-मोठय़ा निवडणुका जिंकलेल्या शहांचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांचा ट्रेलर दिसेल.
विश्वास आणि रहस्य या सीमारेषेत काळ्या मांजरीच्या सुरक्षा कवचात अमित शहांचा तसा सध्या दिनक्रम आहे. त्यांच्या एका मित्राने सांगितले, परदेशात स्थायिक झालेल्या सहा भगिनींनी त्यांना एक निरोप दिला आहे, ‘अमित तूम अमिट बनो..’
परंतु, राजकारणात सावली मोठी करण्याचा प्रघात नाही, हे त्यांना कुणी सांगायचे?
(लेखक लोकमतचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी (राजकीय) आहेत.)