शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एका साधिकेचा अस्त!

By admin | Updated: June 7, 2014 19:03 IST

मुलींना शिक्षण देणंच निषिद्ध समजलं जायचं, त्या काळात शास्त्रीय संगीत शिकणं हे धाडसाचंच काम होतं. अथक परिश्रम व संगीतावर असलेली निष्ठा यांतून काही महिलांनी ते साध्य केलं. त्यांच्यातील एक असलेल्या, जुन्या पिढीतील मनस्वी गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा..

  श्रुती सडोलीकर-काटकर

 
श्रीमती धोंडूताई कुलकर्णी यांचं १ जून रोजी माध्यान्ही निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे माझी वैयक्तिक हानी झाली. म्हणजे संगीत क्षेत्रात मला निरपेक्ष प्रेमानं मार्गदर्शन करणार्‍या आत्याला मी मुकले. हिरवडेकर कुलकर्णी आणि सडोलीकर कुलकर्णी यांचं १0 दिवसांतलं (सोयर-सुतकाचं) नातं आहे. माझे वडील (पं. वामनराव सडोलीकर) सांगत, आमचा मूळ पुरुष एक. संगीताचं प्रेम आणि जयपूर घराण्याचे प्रवर्तक उ. अल्लादिया खाँ व त्यांचे सुपुत्र भूर्जी खाँ यांचं शिष्यत्व हा तितकाच एकमेकांना घट्ट बांधणारा एक धागा होता. कालमान आणि प्रत्येकाच्या आपापल्या  उद्योगधंद्यातील व्यस्ततेमुळे जरी वारंवार भेटी झाल्या नाहीत, तरी आपली माणसं ही कायम आपलीच असतात, नव्हे का? पाण्यात काठी मारून पाणी दुभंगतं का?
धोंडूताईंचे वडील गणपतराव कुलकर्णी हे दूरदृष्टीचे खास. ज्या काळात मुलींना शिक्षणासाठी शाळेत घालणंही लोकांना रुचत नव्हतं, त्या काळात त्यांनी आपल्या मुलीला शास्त्रीय संगीताचं विधिवत शिक्षण देण्याचा निश्‍चय केला आणि पद्धतशीरपणे अमलातही आणला.
जुलै महिन्यात जयपूर घराण्यातील त्रिदेवींच्या जन्मतिथी याव्यात, हा योगायोग वैशिष्ट्यपूर्णच म्हणावा लागेल. सूरश्री केसरबाई केरकर १५ जुलैच्या, गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर २0 जुलैच्या आणि सूरयोगिनी धोंडूताई ऊर्फ दुर्गाताई कुलकर्णी २२ जुलै १९२६च्या. या तीनही महिला नादयोगाच्या मार्गावर खंबीरपणे वाटचाल करणार्‍या. बाईमाणूस म्हणून कोणी वावगं वागण्याचं धाडस करू नये, इतक्या तिखट आणि परिस्थितीला निडरपणे सामोरं जाणार्‍या. ज्यांच्या नजरेचा आणि महत्त्वाचं म्हणजे विद्याभ्यास आणि गुणांचा धाक वाटावा, अशा या कलावती केवळ जयपूर अत्रौली घराण्यालाच नव्हे, तर भारतीय शास्त्रीय संगीत विश्‍वाला भूषणावह ठरल्या.
वास्तविक पाहता १९0१मध्ये पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी लाहोरमध्ये आणि १९२६ जुलैमध्ये लखनौ, उत्तर प्रदेश इथे पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी संस्थागत संगीत शिक्षणाचा पाया घातला. आपल्या कुटुंबातील महिलांना व नंतर समाजातील अन्य महिलांना संगीत शिक्षण उपलब्ध करून देऊन पलुस्करांनी नवी दिशा दाखवून दिली. आजच्या महिला कलाकारांनी हे उपकार स्मरले पाहिजेत.
भारताचे भाग्यविधाते म्हणून जेव्हा नामावली लिहिली जाते, तेव्हा ज्या संगीतामुळे भारतीय संस्कृतिपताका देश-विदेशात फडकत आहे, तिचे कीर्तिमणी म्हणून विविध घराण्यांतील अध्वयरूंची नावं घेतली जातात, त्याचबरोबर पं. पलुस्कर व पं. भातखंडे यांचंही ऋण न फिटणारं आहे.
जयपूर अत्रौली घराण्याची गायकी अवघड मानली जाते. ही गायकी आत्मसात करणं म्हणजे शिवधनुष्याला प्रत्यंचा लावणं! या गायकीला र्मदानी गायकी म्हटलं जाई. धृपदाच्या पायावर उभं राहिलेलं या गायकीचं शिल्प कोरणं म्हणजे टाकीचे घाव सोसणंच! सूरश्री केसरबाईंची, उ. अल्लादिया खाँ साहेबांची गायकी कंठगत करताना आवाज तयार करण्यापासून तयारी होती.१८-१८ तास एक पलटा खाँ साहेब स्वत:समोर बसून गाऊन घेत. खाँसाहेबांची शिकवण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि केसरबाईंची चिवट मेहनत, दोन्ही धन्यच म्हटल्या पाहिजेत!
धोंडूताईंना भूर्जी खाँसाहेब (उ. अल्लादिया खाँसाहेबांचे तृतीय चिरंजीव) यांची तालीम मिळाली. बडोद्याच्या राजगायिका लक्ष्मीबाई जाधव यांचीही तालीम मिळाली होती. या दोन्ही तालमींमुळे कसदार आवाज, भरपूर दमसास आणि खाँसाहेबांनी आपल्या मुलांना दिलेली खास अशी तालाचे खंड भरण्याची रीत, ही देणगी धोंडूताईंना प्राप्त झाली. परिणामी, केसरबाईंकडे शिकायला गेल्यावर पुढच्या रागांचं आणि त्या दमदार गायकीचं शिक्षण घेताना त्यांना कठीण गेलं नाही. एक गोष्ट मात्र नक्की, की तार सप्तकात आवाजाला दिला जाणारा झोत, स्वरांची आस, सट्टे, फिकरे, बेहलावे या प्रकारच्या गायकीचा केसरबाईंचा खास बाज धोंडूताईंनी मेहनतीनं आपल्या गळ्यावर चढवला.
माझ्या मनात आठवणींचा झिम्मा सुरू झाला आहे. १९७९च्या सप्टेंबरला सूरश्री केसरबाईंच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त गोव्याला कला अकादमीत संगीत संमेलन होतं. मी आणि धोंडूताई गाणार होतो; अन्य कलाकारही होते. विमानतळावर जाताना एकत्र जाण्यासाठी मी शिवाजी पार्कला मंजूताई मोडक राहत तिथे पोहोचले. आतील खोलीत धोंडूताईंचा स्वर भरण्याचा रियाज सुरू होता. शुद्ध आकारानं मंद्रसप्तक गाऊन तसंच तार सप्तकापर्यंत जाऊन पुन्हा खाली येण्याचा तो रियाज माझ्याकडूनही माझ्या वडिलांनी करून घेतला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा रियाज त्या अखेरपर्यंत करत होत्या. एकदा या गायकीचं असिधाराव्रत त्यांनी घेतलं, ते अखेरपर्यंत निभावलं. त्यात आश्‍चर्य वाटू नये. कारण, माझ्या वडिलांप्रमाणेच धोंडूताईंची रास धनू. मजेनं म्हणायच्या, ‘‘आम्ही एकदा धनुष्य ताणलं, की सोडत नाही.’’
आमच्या भाऊ (वडील) प्रमाणे धोंडूताईंनासुद्धा ज्योतिषाचा नाद होता. भाऊंनी अनेक लोकांच्या पत्रिका डायरीत उतरवून ठेवल्या होत्या. धोंडूताईंच्या पत्रिकेत गुरू प्रबल होता. फलस्वरूप त्यांना संगीतातील गुरू उच्च कोटीचे मिळाले आणि आध्यात्मिक गुरू म्हणजे पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचा लाभ झाला. त्यांना वर्षानुवर्षे तबला संगत करणारे पं. श्रीधर पाध्ये (पाध्ये मास्तर) हे निष्णात ज्योतिषी. त्यांच्या या विषयावर खूप चर्चा होत.
पार्ल्याला दीनानाथ सभागृहात झालेल्या जयपूर महोत्सवात मी सकाळी तोडी आणि जयजय बिलावल गायले होते. रात्री धोंडूताईंनी छायानटातील ‘केती कही जो ना’ ही त्यांची पेटंट बंदिश उत्तम रंगवली होती. त्या वेळी झालेल्या भेटीगाठीत त्या खूप मनमोकळं बोलत होत्या. तालीम घेणं, ती पचवणं किती कठीण आहे, आम्ही मैफलीत काय गातो, कसं गातो, आपल्या अभ्यासातलं जरी ५/१0 टक्के लोकांना दाखवलं, तरी ते पचवणं त्यांना कसं जड जातं, याबद्दल आपले अनुभवही सांगितले.
धोंडूताई दिल्लीत राहत असता, मुंबई आकाशवाणीवर निमंत्रितांसाठी त्यांचा कार्यक्रम ठेवला होता. भाऊंबरोबर मीही ऐकायला गेले होते. आयत्या वेळी त्यांच्याबरोबर तानपुरा संगतीसाठी त्यांनी मला बोलावलं. एवढंच नव्हे, तर गायला उत्तेजनही दिलं. चेंबूरच्या अल्लादिया खाँ पुण्यतिथीच्या पहिल्या वर्षी मी कामोदनट गायले. धोंडूताई ऐकायला आल्या होत्या. माझ्या गाण्यानंतर ‘थोरले खाँसाहेब आणि केसरबाई या रागात बंदिशीचा मुखडा घेताना काय-काय करत,’ हे त्यांनी सांगितलं. माझा हवेली संगीताचा अभ्यास त्यांना माहीत होता. त्याचा त्यांनी आपल्या एका व्याख्यानात आवर्जून उल्लेख केला होता. नव्या पिढीनं जयपूर अत्रौली घराण्याची गायकी समजून घ्यावी, श्रोत्यांना तिचं र्मम कळावं; म्हणून गेल्या काही वर्षांत त्या आपल्या मैफलीत रागदारी उलगडून दाखवत. अनवट रागांची चर्चा करत. त्यांचे विचार बुरसटलेले नव्हते, काळाबरोबर जाणारे होते, हे यातून दिसतं.
आपण आणि आपली गायकी यांबद्दल श्रोत्यांच्या मनात काही गूढ किंवा रहस्य निर्माण करण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. उगाचच फणकारा दाखवून रसिकांची सहनशीलता ताणली नाही. धोंडूताईंचं गाणं त्यांच्यासारखंच सरळ, शुद्ध, रोखठोक होतं. ख्याल गायकीचा त्यांनी ध्यास घेतला आणि रसिकानुनयासाठी त्यांनी कुठेही समझोता नाही केला.
कुठेही वर्णी लावून आपल्याबद्दल त्यांनी सहानुभूती गोळा केली नाही. प्रसिद्धी किंवा सन्मानामागे त्या गेल्या नाहीत. ‘आपण बरं, आपलं काम बरं,’ या त्यांच्या व्रतामुळे सन्मान त्यांच्याकडे आपोआप आले. भूर्जी खाँसाहेब किंवा केसरबाईंच्या निधनानंतर ‘मला भूर्जी खाँसाहेबांच्या वह्या द्या,’ म्हणून त्यांनी कधी बाबा खाँसाहेबांना गळ घातली नाही. कारण, नुसत्या वह्या घेऊन गाणं येत नाही, हे पक्की तालीम मिळालेल्या माणसालाच ठाऊक असतं. आमच्या घराण्याचे खलीफा (उ. अजीजुद्दीन खाँ) बाबांनी त्यांना अनेक राग व बंदिशी दिल्या. बाबांची धोंडूताईंनी खूप मनोभावे सेवा केली आणि विद्यार्जन केलं.
कलाक्षेत्रातील महिलांना स्वाभिमान आणि स्वकर्तृत्व हे अलंकार सतत घासून-पुसून लख्ख ठेवावे लागतात. त्यावर धूळ किंवा गंज चढणं परवडत नाही. धोंडूताई लोकांना ‘शिष्ट’ वाटाव्यात, इतक्या स्वावलंबी होत्या. त्यांनी अखेरपर्यंत जीवन मनस्वीपणानं व्यतीत केलं. कोणावर आपला भार नाही टाकला.
धोंडूताईंच्या जाण्यानं उ. अल्लादिया खाँ आणि भूर्जी खाँ  यांच्या परंपरेतील एका स्वयंप्रकाशी तारकेचा अस्त झाला आहे. जन्मभर घेतला वसा त्यांनी टाकला नाही. शुद्ध, निर्मळ आणि सर्मपित जीवनाचा आदर्श पुढील पिढय़ांसाठी ठेऊन जाणार्‍या धोंडूताईंना शतश: प्रणाम.! 
(लेखिका ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आहेत.)