डॉ. संप्रसाद विनोद (लेखक महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे योगगुरू आहेत.)
अभिजात योगसाधनेवर व्याख्याने देण्यासाठी आणि कार्यशाळा घेण्यासाठी फ्रान्सला गेलो असता क्रिस्टिनाची ओळख झाली. साठीकडे झुकलेल्या क्रिस्टिनाचा उत्साह अगदी विशीतल्या तरुणीसारखा होता. परदेशात राहणार्या लोकांचं वय तसं चटकन लक्षात येत नाही. पन्नाशी-साठीचे स्त्री-पुरुष वयाच्या मानाने खूपच लहान दिसतात. क्रिस्टिनाचंही तसंच होतं. ती साठीची असली, तरी जेमतेम ४0-४५ची वाटत होती. शुद्ध हवा, सकस आहार, दैनंदिन विवंचनांचं प्रमाण कमी असणं आणि जीवनही कमी धकाधकीचं असणं ही त्यामागची कारणं म्हणता येतील. क्रिस्टिना पूर्वी एका मोठय़ा कंपनीत कामाला होती. ती कंपनी तिने काही कारणांमुळे सोडली. आता तिच्या कामाचं स्वरूप खूप बदललंय. म्हणजे ती आता लोकांच्या लहान लहान गटांबरोबर काम करते. त्यांना काही व्यवहार कौशल्यं आणि सॉफ्ट स्किल्स शिकवते. त्यामुळे तिच्यात एक आत्मविश्वास निर्माण झालाय; जो तिच्या देहबोलीतून प्रकट होतो. म्हणूनच मला ती इतर साधकांपेक्षा खूप वेगळी वाटली. तिच्यात बुद्धीची चमक होती. तिने पूर्वी योगाचा अभ्यास केला होता आणि सध्याही करते आहे. भारतात पूर्वी आलेली असल्याने मी शिकवीत असलेल्या अभिजात योगाशी किंवा सर्वसमावेशक योगसाधनेशीदेखील ती काही प्रमाणात परिचित होती. कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर तिने ज्या नेमकेपणाने, जिज्ञासेने काही मूलभूत प्रश्न विचारले, त्यावरून हे स्पष्ट झालं. तिने योगावर बरंच चिंतन, मनन केलंय, असं त्यातून मला जाणवलं. तिच्याबरोबर एका निवासी शाळेत शिकणारी तिची १४ वर्षांची मुलगीदेखील आली होती. तीही तिच्या आईसारखीच बुद्धिमान वाटली.
दोन दिवसांची ही कार्यशाळा फारच चांगली झाली. अनेकांना या साधनेचे खूप चांगले परिणाम मिळाले. क्रिस्टिना ही त्यातलीच एक होती. तिला मिळालेल्या परिणामांमुळे तिचा अभिजात योगसाधनेवरील विश्वास अधिकच दृढ झाला. आणखी नेटाने प्रयत्न केले, तर आपल्याला आत्मसाक्षात्कारदेखील होऊ शकतो, असं तिला वाटू लागलं. तिला आत्मसाक्षात्काराची प्रचंड ओढ निर्माण झाली. हे कळल्यानंतर मला फार आनंद वाटला. एका परदेशी व्यक्तीला आत्मप्रचितीची ओढ लागणं, ही फार मोठी घटना होती. अशी प्रामाणिक तळमळ निर्माण होणं अर्थातच खूप चांगली आणि शुभ गोष्ट आहे. मी तिला म्हणालो, ‘योग्य दिशेने, योग्य प्रमाणात, योग्य मार्गदर्शनाखाली प्रेमाने प्रयत्न केले, तर कोणालाही आत्मानुभूती येऊ शकते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येकाची प्रयत्न करण्याची क्षमता मात्र कमी-अधिक असल्याने या प्रयत्नांना मिळणार्या यशाचं प्रमाणदेखील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत कमी-जास्त असू शकतं. हे प्रयत्न प्राधान्याने चित्तशुद्धीचे असतात. ज्यांचं चित्त लवकर शुद्ध होतं, त्यांना कमी वेळ लागतो आणि ज्यांचं होत नाही, त्यांना जास्त. तुलादेखील आत्मसाक्षात्कार जरूर होऊ शकतो; पण त्यासाठी तुला जरा संयमाने घ्यावं लागेल. थोडा धीर धरावा लागेल. दमाने घेणं म्हणजे उगीचं जास्त वेळ लावणं किंवा वेळकाढूपणा करणं नव्हे. पण, ही अनुभूतीच इतकी सूक्ष्म आणि गहन आहे, की त्यासाठी प्रत्येकाला पुरेसा वेळ द्यावाच लागतो. घाई करून चालत नाही. घाई केली तर उलटा परिणाम होतो.
चित्तशुद्धी व्हायला जास्त वेळ लागतो; पण थांबायची तयारी ठेवली, तर तुलनात्मकदृष्ट्या परिणाम किती तरी लवकर मिळतात.’ मी उत्साहाने तिच्याशी बोलत राहिलो. तीदेखील माझं बोलणं मनापासून लक्ष देऊन ऐकत राहिली. ‘आणखी एक गोष्ट तू नीट लक्षात ठेवायला हवीस, की थांबायची ‘तयारी’ ठेवणं म्हणजे काही प्रत्यक्ष थांबावं ‘लागणं’ नव्हे. म्हणून मला तुला असं सुचवावंसं वाटतं, की प्रथम तू सध्या करीत असलेल्या साधनेची गुणवत्ता वाढवण्यावर भर दे. साधनेबद्दल पूर्ण वैचारिक स्पष्टता येईल, असं पाहा. साधनेशी संबंधित सर्व स्थूल आणि सूक्ष्म संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेऊन साधना कर. असं केलंस, तर तुझ्या साधनेला एक प्रकारची उंची आणि खोली प्राप्त होईल. हे सगळं साध्य करायचं म्हणजे रोज मनापासून, अखंडितपणे साधना करायला हवी. साधनेच्या जोडीला तत्त्वचिंतन आणि मननासाठी पुरेसा वेळ अग्रक्रमाने काढायला हवा. हे सगळं करायला जमलं, की तुला साधनेत हळूहळू चांगली अंतर्दृष्टी प्राप्त होईल. अशा प्रभावी दृष्टीमुळे तुला तुझ्या ‘मिथ्या मी’चं म्हणजे ‘अहंकाराचं’ स्वरूप समजून घेणं सोपं जाईल. त्याद्वारे अहंकाराने प्रभावित आणि नियमित केल्या जाणार्या भ्रामक जगाशी आणि त्यातल्या क्षणभंगूर सुखदु:खांशी तू चांगल्या प्रकारे परिचित होऊ शकशील. त्यामुळे तुझ्या जीवनावरील ‘मिथ्या मी’चा पगडा कमी होऊ लागेल. एकीकडे ‘मिथ्या मी’विषयी समग्र जाण येत गेली, की त्याचा नैसर्गिक परिणाम म्हणून ‘वास्तव मी’च्या अस्तित्वाची जाणीव करून घेणंदेखील तुला खूप सोपं जाईल. ‘वास्तव मी’ची जाणीव होऊ लागली, की त्याचं स्वरूप समजून घेणंदेखील सहज सुलभ होईल. ही जाणीव प्रगाढ झाली, की ‘वास्तव मी’च्या अस्तित्वाचा स्पष्ट बोध होऊ लागेल. असा स्पष्ट बोध म्हणजे खरा आत्मसाक्षात्कार आहे आणि तो कायम स्थिरावणं म्हणजे ‘आत्मस्थिती’ आहे. तू करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये तुला चांगलं यश येवो, हीच माझी हार्दिक शुभेच्छा. या बाबतीत तुला सर्व प्रकारचं साहाय्य करण्यात मला नेहमीच आनंद वाटेल. त्यामुळे अशी मदत घेताना तू अजिबात संकोच करू नकोस.’
क्रिस्टिनाच्या आत्मानुभूतीच्या तळमळीमुळे प्रभावित होऊन मी तिच्याशी बराच वेळ बोलत राहिलो आणि तीही जिवाचे कान करून माझं सगळं बोलणं ऐकत राहिली. शेवटी भरल्या अंत:करणाने, डबडबल्या डोळ्यांनी, हुंदके देत, अडखळत्या शब्दांनी तिने बरंच काही मला सांगण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्यक्षात ती फार थोडं बोलू शकली. तिचा कृतज्ञतेने ओथंबलेला चेहरा मात्र मला बरंच सांगून गेला. तिच्या जीवनात विशुद्ध अध्यात्माचा दीप प्रज्वलित झालेला पाहण्यातलं समाधान जे मी अनुभवलं, ते केवळ अवर्णनीय असंच होतं.