प्रा. डॉ. द. ता. भोसले
तिचे नाव तारामती. जगण्यातल्या लढाईतली अपराजिता. हाती धन, ज्ञान, दौलत वा भूमी नसताना आणि साथीला कोणी नसताना शस्त्राविना एकटी लढणारी. या लढाईबद्दलही तिची तक्रार नाही. आपल्या जगण्याचाच तो अटळ भाग आहे, अशी तिची धारणा. तिचे शरीर आणि त्या शरीरावरचे कपडेच तिची उपासमार, तिचे दारिद्रय़, तिचे कंगालपण ठळकपणे सांगणारे. तळहातावरच्या फोडाला जपावे तसा जपलेला एकुलता एक कुलदीपक बायको मिळताच भांडण करून वेगळा राहिला. वेगळ्या गावी गेला. भूक गिळता येत नाही, भोग टाळता येत नाहीत आणि जगणं अकारण नासता येत नाही. म्हणून या तिन्ही गोष्टींना उत्तर म्हणून ही तारामती एका मुलींच्या शाळेसमोर किरकोळ खाऊचे पदार्थ विकते. जवळच्या खेड्यातून ती बोरे, चिंचा, कैर्या, पेरू, काकडी आणि हंगामानुसार ओला हरभरा, ओल्या शेंगा असा रानमेवा विकत घेते व दिवसभर उन्हा-पावसात थांबते. मधल्या सुट्टीत वा शाळेला जाताना-येताना फांदीवर चिमण्यांनी कलकलाट करावा, तशा या प्राथमिक शाळेतल्या चिमण्या तिच्याभोवती गोळा होतात. मुलींना ती आवडते आणि तिला मुली आवडतात. कुणीतरी तिला सल्ला दिला, की तू या वस्तू विकण्याऐवजी गोळ्या, चॉकलेट, तळलेले पापड विकत बैस. आजच्या मुला-मुलींना याच वस्तू अधिक आवडतात. त्यावर तिचं म्हणणं असं, की या असल्या पदार्थांनी मुलींची तब्येत बिघडते. त्यापेक्षाही या शहरातल्या लेकरांना रानमेवा कुठला मिळायचा? मी विकल्या नाहीत तर ओल्या गाभुळलेल्या चिंचा त्यांना कशा खायला मिळणार? कैरीला मीठ लावून चोखत बसण्याची गंमत त्यांना कशी कळणार? हा रानमेवा तळलेला नसतो. नासका नसतो, हानिकारक तर अजिबात नसतो. या लेकरांनी असला रानमेवा खाल्ला तरच आपलं बालपण भोगल्यासारखं त्यांना वाटेल. या म्हातारीचा वस्तूकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वेगळा व निकोप होता, याचा एक नवा साक्षात्कारच घडला.
मधल्या सुट्टीत मुलींचा थवा तिच्या टोपलीतच येऊन आदळतो. ‘ताराआजी ताराआजी’ असं लाडानं करीत त्या स्वत:च टोपलीत हात घालतील. हवे ते फळ घेतील. किमतीवरून घासाघीस करतील. एखादी पैसे नसल्यामुळे काहीच घेत नसेल, तर ‘पैसे उद्या परवा दे. हा पेरू खा, मीठ लावून देते,’ असं प्रेमानं म्हणून एखाद्या गरीब मुलीच्या हातात पेरू ठेवते. त्या मुली तिच्यासमोर खात थांबल्या, की यांचा एक नवा तास सुरू व्हायचा. म्हातारी म्हणायची, ‘पोरींनो, मी तुमास्नी हुमान घालते, म्हणजे कोडं घालते. त्याचं उत्तर जी सांगेल तिला एक चिंच बक्षीस म्हणून देणार.’ ‘हं सांगा सांगा देतो उत्तर’ असा पुकारा आला, की ती म्हणते ‘मुठीतच बसते; पण मोजता येत नसते, काय सांगा?’ या पाचवी-सहावीतल्या मुली विचार करतात. एकमेकींकडे बघतात. तोंडातल्या तोंडात पुटपुटतात अन् हार खात म्हणतात, ‘सांगा आजी तुम्ही.’ आजी रुबाबात म्हणते, ‘पोरींनो, आगं आपले केस गं.’ नंतर ती पुन्हा म्हणते, ‘लहान मुलीला दहा पाय. कोण सांग बरं?’ मुलींना उत्तर येत नाही. त्यावर ताराआजी म्हणते, ‘आगं खेकड्याचं पिलू गं, खेकड्याला दहा पाय असतात ना!’ पुन्हा हसणं-खिदळण्याचा स्फोट. गमतीला येऊन म्हातारी आणखी एक कोडं घालते, ‘बरं का पोरींनो, एक होती बाई, आधी नेसली हिरवं लुगडं. त्याचं झालं लाल लाल, हातात घेतली, तोंडाला लावली. आन् दणक्यात चावली, नाव सांगा या बाईचं.’ या चिमण्यांनी कपाळाला हातच मारला. कुणालाच उत्तर सुचेना. मग आजी म्हणाली, ‘आपण भाजीला वापरतो ती मिरची. आधी ती हिरवी असते. पिकल्यावर लाल होते आणि तोंडात घालताच झणझणते. कळलं ना?’ तिचे हे उत्तर ऐकल्यावर एखादी छकुली सलगीनं विचारते, ‘आजी, तू काही शाळा शिकली नसताना हे सगळं तुला कसं गं येतं?’ गाभुळलेलं बोर एकेकीच्या हातावर ठेवत ती सांगते, ‘हे सारं आपणास रोजच्या जगण्यातून मिळतं. तुमची पुस्तकं ज्ञान देतात, आपलं जगणं शहाणपण देतं अन् तेच जास्ती उपयोगी असतं. मला पुस्तक वाचता येत नाही; पण माणसं वाचता येतात.’ तिचं हे सारं ऐकून चकित झालेल्या मुली वर्गाकडे धावत जातात. दुसर्या दिवशी आता आजीची फजिती करायची म्हणून या पाच-सहा मुलींचा घोळका तारामतीला घेराव घालतो. ‘आज आम्ही तुझी परीक्षा घेणार. उत्तर चुकलं तर तुला आम्ही शिक्षा करणार,’ असं म्हणून एका छकुलीनं विचारलं, ‘आज्जे, स्काय म्हणजे काय? बॉय म्हणजे काय? स्कूल कशाला म्हणतात?’ आजीचा चेहरा गार गारठलेला. दुसरीनं विचारलं, ‘आजी, मला तेराचा पाढा म्हणून दाखवतेस का?’ तिनं मानेनंच नकार दिला. तिसर्या छोकरीनं विचारलं, ‘सांग आजी, पिझ्झा कसा करतात ते?’ ‘डोंबल माझं! मला कसं ग येईल हे? भाकरी आन् आमटीशिवाय दुसरं मला ठाऊकच न्हाय. कसं सांगणार मी?’ असं तिनं सांगताच, टाळ्या वाजवत मुलींनी आजीचा पराभव साजरा केला. थोडा वेळ गेल्यावर म्हातारी म्हणाली, ‘बाळांनो, मला कोणता पेरू पिकला व कोणता पिकला नाही हे सांगता येईल. विजा चमकायला लागल्यावर पावसाचा अंदाज मला सांगता येईल. एखादी बाई अडली तर तिचं बाळंतपण मला करता येईल. चुलीवरचा करपणारा पदार्थ कोणता ते मी वासावरून सांगू शकते; पण तुमचं ते स्काय, बॉय मला न्हायी जमायचं. माज्यापरीस तुमी खूप हुशार आहात हे मी मान्यच करते पोरींनो. मग तरं झालं?’ आणि मग सार्याच जणी हसत सुटल्या.
एके दिवशी दुपारी कुठला तरी एक तास रिकामा असल्यामुळे या सार्या चिमण्या आजीकडे धावल्या. आजी अध्र्या भाकरीवर मिरचीचा ठेचा घेऊन आपलं जेवण उरकत होती. तिची ती तळहाताएवढी भाकरी व मिरची बघून या मुलींना आश्चर्य वाटलं व तितकंच वाईटही वाटलं. या मुली आलेल्या पाहून उरलेली भाकरी फडक्यात बांधत असतानाच एक कन्या म्हणाली, ‘आजी, तू एवढीच भाकरी कशी ग खाते? अन् भाजी कुठाय तुझी? एवढय़ाशा भाकरीवर भूक भागते का तुझी?’ या आपुलकीच्या विचारलेल्या प्रश्नामुळे म्हातारीच्या डोळ्यांत पाणी आले. त्याच दाटलेल्या गळ्यानं ती म्हणाली, ‘या रानमेव्याच्या विक्रीतून मला कितीशी कमाई होणार? त्या कमाईत एक वेळच कशीबशी भागते. रातीला मी पाणी पिऊन झोपते किंवा फार तर अर्धा कप चहाबरोबर एक पाव खाते. पण मला आता त्याची छान सवय झाली आहे.’
तिचे हे उत्तर ऐकल्यावर सार्या मुलींनी दुसर्या दिवसापासून आपल्या डब्यात अर्धी पोळी जादा आणायला सुरुवात केली. आपला डबा खाण्यापूर्वी त्या भाजीपोळी देत म्हणाल्या, ‘उद्यापासून तू तुझी भाकरी आणू नको. तुझा डबा आम्ही आणणार. रात्रीसुद्धा पुरेल एवढं आणणार. तू नाही म्हणू नकोस. तू आता आम्हा सर्वांची आजी आहे. शाळेत आम्ही जे शिकतो, त्यापेक्षा तुझ्यापासून खूप शिकायला मिळाले, माझी आजी म्हणायची, जे दु:ख पचायला शिकवतं आणि फाटक्या जीवनावरही प्रेम करायला शिकवतं ते खरं शिक्षण. ते तू आम्हाला देतेस, कळलं ना आजी?’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)