- अ. पां. देशपांडे
भारतात दर वर्षी कुठेना कुठे दुष्काळ जाणवतोच. यावर काही ठोस उपाय करण्याची जरुरी आहे.
भारतात दर वर्षी सरासरीने १000 मिलिमीटर पाऊस पडतो. एवढा पाऊस अन्यत्र पडत नसल्याने भारताला जगात ओला देश असे म्हणतात. भारतात पडणार्या पावसाच्या २५ टक्के जरी पाणी साठवले, तरी ते पुरेसे आहे. दुर्दैवाने आपण तेवढेही साठवत नाही म्हणून आपल्याला दर वर्षी जानेवारी ते जून महिन्यात जागोजागी टँकर पुरवावे लागतात. प्रश्न असा पडतो, की जर टॅँकरने पुरवण्यासाठी कुठेतरी पाणी आहे, तर मग इतक्या वर्षात त्या -त्या ठिकाणाहून टंचाईग्रस्त गावापयर्ंत पाईपलाईन का टाकल्या जात नाहीत?
१९५0 सालापर्यंत सगळीकडे नद्यांचे पाणी वापरले जात होते. त्यानंतर जागोजागच्या नगरपालिकांनी नळाने पाणी पुरवायला सुरुवात केली, ही चांगली गोष्ट झाली. लोकांना घरबसल्या पाणी मिळाले. त्यांनी नगरपालिकांना दुवा दिला. त्यामुळे नद्यांचा वापर जवळजवळ संपला. मग या रिकाम्या पडलेल्या नद्यांचा वापर नगरपालिका आणि उद्योग-व्यवसायांनी आपापले सांडपाणी टाकण्यासाठी करायला सुरुवात केली आणि त्यांच्या गटारगंगा केल्या. जर या नद्या परत आपल्याला वापरात आणता आल्या, तर आज जाणवणारी पाणीटंचाई दूर होईल. नद्या साफ करून त्या वापरात आणणे यात अशक्य काही नाही. १00 वर्षांपूर्वी लंडन शहर टेम्स नदीचे पाणी वापरत असे. संपूर्ण लंडन शहरात तेव्हा हातपंप बसवले होते. पण, पुढे हे पाणी नाना कारणाने प्रदूषित झाल्याने या हातपंपांना कुलपे घातली. पण, यावर लंडनवासी हात जोडून स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी ही नदी पूर्णपणे साफ केली. इतकी की आता परत एकदा लंडन शहराचा ८0 टक्के पाणीपुरवठा या नदीतून होतो. हे असे चित्र आपल्याकडे निर्माण करणे शक्य आहे.
मुंबईत एकूण १७,000 विहिरी होत्या, असे मुंबई महानगरपालिका सांगते. हळूहळू या विहिरी बुजवून तेथे घरे व इतर इमारती झाल्या. पण, आजही त्यातील ज्या विहिरींवर इमारतींचा पाया नसेल तेथे ७५ मिलिमीटरचे भोक पाडून पंप लावून वरच्या वापरासाठी पाणी मिळवणे शक्य आहे. शिवाय अशा विहिरी गच्चीवर पडणार्या पावसाच्या पाण्याने भरून घेणेही शक्य आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर गावाच्या २00 चौरस किलोमीटर परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष कायमच असे. १0 वर्षांपूर्वी नुकतेच सरकारी नोकरीतून भूशास्त्रज्ञ म्हणून नवृत्त झालेले सुरेश खानापूरकर यांनी मग तेथील स्थानिक आमदार अमरीश पटेल यांच्या आमदार निधीतून पैसे वापरून तेथील नद्या, तलाव, विहिरी यातील गाळ काढला, पात्रे १५-१५ मीटरने रुंद आणि खोल केली. त्यामुळे पडणार्या पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता वाढवली. हे काम टप्प्याटप्प्याने चार-पाच वर्षे चालू होते. परिणामी, गेली पाच वर्षे आता येथे मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, ऐन उन्हाळ्यातही येथील नद्यांतून पाणी वाहत असते. २0१२च्या दुष्काळानंतर मराठवाड्यात काही ठिकाणी लोकांनी खानापूरकरांचा सल्ला घेऊन काही कामे केल्याने त्यांना त्याचा फायदा झाला. हे इतरत्र का होऊ नये? आमदार निधीचा इतका चांगला उपयोग होत असेल, तर तो सगळीकडे व्हायला हवा. किंबहुना मतदारांनीही अशी मागणी जागोजागी करायला हवी.
पुणे शहरात पेशव्यांच्या काळातील एक पाणीपुरवठा योजना अजूनही चांगली अस्तित्वात आहे. कात्रजच्या घाटात दोन तलाव आहेत. एकाला वरचा तलाव म्हणतात, तर दुसर्याला खालचा तलाव म्हणतात. कारण दोन्ही तलाव वेगवेगळय़ा पातळ्यांवर आहेत. या तलावांचे पाणी पेशव्यांनी जमिनीखाली खापराचे चर बांधून ५-६ किलोमीटर दूर असलेल्या पुणे शहरापयर्ंत आणले आहे. याच पाण्यावर सदाशिव पेठेतील हौद चाले. १९६0पूर्वी पुण्यात चालणार्या टांग्यांच्या घोड्यांना पिण्याचे पाणी या योजनेमार्फत उपलब्ध करून दिले जाई. यात पुष्कर्णीचा हौद, बाहुलीचा हौद येत. ही योजना ३00 वर्षांपूर्वीची असली, तरी ती निकामी झाली नाही. १९६१ला पानशेतचे धरण पडले, त्या वेळी पुणे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद होता. आमच्या घरासमोर असलेल्या वाड्यात त्या पेशव्यांच्या पाण्यावर चालणार्या एका विहिरीतून आम्ही पाणी काढत असू व वरच्या वापरासाठी त्याचा उपयोग करत असू. त्याला पुणेकर विहीर न म्हणता त्यांच्या भाषेत ‘उच्छ्वास’ असे म्हणत.
मुंबईतील काही इमारातींनी गच्चीवर पडणार्या पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर ते संडास-बाथरूमसाठी करीत आहेत. आपल्या रोजच्या वापरातील ३0-३५ टक्के पाणी संडास-बाथरूमसाठी लागते. तेवढा भार जर आपण कमी केला, तर महापालिकेला २0 टक्के पाणीकपात किंवा पुण्यासारख्या ठिकाणी एक दिवसाआड पाणी पुरवावे लागणार नाही. महाराष्ट्रातल्या अनेक गावांत आठवड्यातून एकदा, पंधरवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा पाणी पुरवले जात आहे. हे चित्र कसे बदलायचे?
महाराष्ट्रातल्या प्रत्येक नदीचे, तलावाचे पात्र रुंद आणि खोल करून पाणीधारण करण्याची क्षमता वाढवायची आणि पावसाचे जास्तीत जास्त पाणी साठवून आणि आपण काटकसर करून दर वर्षी २0-२0 टक्के पाणी तलावात शिल्लक ठेवायचे. या पद्धतीने पाच-सहा वर्षांत आपल्या तलावात एका वर्षाचा साठा शिल्लक राहिला पाहिजे. त्यामुळे एखाद्या वर्षी पाऊस उशिरा आला किंवा कमी पडला, तरी आपल्याला घाबरून जायचे कारण नाही.
शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करतात? सगळ्या गोष्टी सरकारने का पुरवायच्या? शेती तुमची मग तुम्ही काही करायला नको का? प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेताच्या १0 टक्के जमिनीवर पावसाचे पाणी साठविले पाहिजे. त्यामुळे शेती तर दुबार करता येतेच, पण मी असे ठाणे जिल्ह्यातील बोर्डीला पाहिले आहे, की दुबार पिके घेऊनही जून महिन्यात २५-३0 टक्के पाणी शिल्लक आहे. शेतकरी म्हणतात,आमची शेती अगोदरच लहान आहे. त्यातील १0 टक्के जमिनीवर तुम्ही पाणी साठवायला सांगता, मग आम्ही शेती कशावर करायची? पण पाणी मिळाले नाही, तर १00 टक्के शेती वाया जाते, मग आत्महत्या करायची वेळ येते. त्याऐवजी १0 टक्के जमीन पाणी साठवण्यासाठी वापरून उरलेल्या ९0 टक्के जमिनीवर दुबार शेती करणे केव्हाही फायद्याचे ठरेल. नाही का?
(लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आहेत.)