- दत्तात्रय शेकटकर
युरोपमध्ये अँमस्टर्डडॅमहून मलेशियाची राजधानी क्वालालंपूरला जाणारे मलेशियन एअर लाईन्सचे प्रवासी विमान युक्रेन देशाच्या पूर्व भागातून जात असताना या विमानावर हल्ला झाला. या विमानावर मध्यम पल्ल्याच्या ‘बक’ मिसाइलने हल्ला करण्यात आला.
या विमानात प्रवास करणारे २९५ प्रवाशी व विमान कर्मचारी सर्वांचाच मृत्यू झाला. हल्ला झाला तेव्हा हे विमान सुमारे ३३ हजार फूट उंचीवर उडत होते. या आकस्मिक दहशतवादी हल्ल्यामुळे सारे जगच हादरले आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा संरक्षण व्यवस्था, जागतिक व राष्ट्रीय हवाई व्यवस्थापन चक्रावले आहेत. यातून नवीन प्रकारचा धोका व संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण यातून एका धोकादायक अशा नव्या घातक युद्धतंत्राचा जन्म झाला आहे.
मी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरुद्ध मोहिमेचे नेतृत्व करत असताना अनेकदा दहशतवाद्यांच्या संभाषणावरून कळत होते, की काश्मीरमध्ये श्रीनगर विमानतळावर उतरणार्या प्रवासी विमानांवर क्षेपणास्त्राचे हल्ले करण्याची योजना ते आखत होते व तसा दोनदा प्रयत्नही केला; परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही.
नुकताच घडलेला अपघात दुर्दैवी तर आहेच; परंतु द्वितीय महायुद्धानंतर बहुदा अशाप्रकारचा हा पहिलाच हल्ला असावा. सैन्यात वापरणार्या क्षेपणास्त्राचा वापर करून प्रवासी विमान पाडले गेले आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत आधुनिक होते. भविष्यात याचे अत्यंत घातक परिणाम होतील याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ज्या क्षेपणास्त्राचा वापर युक्रेनच्या हल्ल्यात केला आहे ते आकाशात ७0000 फूटपर्यंत युद्धविमान उद्ध्वस्त करू शकतात. अत्यंत आधुनिक युद्धविमाने ५0000 ते ७0000 फुटापर्यंत उडतात. युद्धविमानांच्या तुलनेत प्रवासी विमानांची उडण्याची गती व तीव्रता फारच कमी असते व या कारणाने विमानांवर क्षेपणास्त्र किंवा इतर शस्त्रांद्वारे सहजतेने आक्रमण होऊ शकते.
युक्रेनमधील वायुमार्ग हे जागतिक हवाईमार्गाच्या दृष्टीने जगातील सर्वात व्यस्त वायुक्षेत्र आहे. या मार्गाने दररोज जवळजवळ १८00 विमाने आंतरराष्ट्रीय प्रवास करतात. युरोपपासून ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया, चीन, जपान, भारताला जाणारी बहुतेक सर्व विमाने याच वायुक्षेत्रातूनच प्रवास करतात. एम. एच. १७ विमान वा मिसाइल आक्रमणाच्या काही वेळ अगोदर रशियाचे राष्ट्रपती प्यूतिन यांचे विमानपण याच वायुक्षेत्रातून गेले होते. त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमान परतताना याच युक्रेनच्या वायुक्षेत्रातून प्रवास करत होते. परंतु हा हल्ला करताना मिळालेल्या पूर्वमाहितीत काही चूक राहिली असण्याची शक्यता वाटते. बहुदा त्यांचा निशाणा युक्रेनच्या विमानावर असणार. त्यांनी गेल्या महिन्यातच दोन प्रवासी विमाने व एक हेलिकॉप्टर पाडले होते. ज्या वायुक्षेत्रात विमानावर क्षेपणास्त्र धडकले ते रशियाच्या सीमेपासून ५0 किलोमीटर दूर युक्रेनच्या वायुक्षेत्रातच होते. याचा सरळ अर्थ हा, की क्षेपणास्त्र युक्रेनच्या जमिनीवरूनच वापरले गेले व मिसाइल लाँचर (ज्याच्यामार्फत मिसाइल सोडले जातात) हे युक्रेनच्या क्षेत्रातच असतील. या अभ्यासावरून समजू शकते, की या मिसाइल आक्रमणात रशियाच्या सैन्याचा सहभाग नव्हताच. अमेरिका व पाश्चात्त्य देश रशियावर खोटे आरोप लावत आहेत, हे निश्चित आहे.
सर्व विवादात एक सत्य स्पष्ट आहे, की निर्दोष लोकांचे प्राण गेले! या विमानात अनेक देशांचे प्रवासी होते. त्यांचा युक्रेन व रशियात चाललेल्या विवादाशी काय सबंध होता? भविष्यात काळजी आहे ती याचीच. युद्धात ८0 टक्के प्रतिशत नुकसान निर्दोष लोकांचे होते! हल्ल्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाला जबाबदार ठरविले आहे. हल्ल्याची जबाबदारी युक्रेनवर ढकलत रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने, आपल्याकडे या भागात यूक्रेनची क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रीय असल्याचे पुरावे असल्याचा दावा केला आहे!! या घटनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी जागतिक नेत्यांनी आधीच केली आहे. बंडखोरांनी प्रवासी विमान पाडणे ही एक दहशतवादी कारवाई नाही का? या बद्दल ध्वनिमुद्रित संभाषण सार्वजनिक केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी युक्रेनवर ढकलत रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्याकडे या भागात युक्रेनची क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रीय असल्याचे पुरावे आल्याचा दावा केला आहे. या सर्व विवादाचे कारण रशियाचे व पाश्चात्त्य देशांचे संबंध शीतयुद्धाच्या अवस्थेकडे चालले आहेत?
पाकिस्तान, अफगाणिस्तान, येमेन, इराक, सिरिया, टर्की मध्य आणि उत्तर आफ्रिका व आता युरोपमध्ये आंतरिक युद्ध चालले आहे. आतंकवाद वाढला आहे. पृथ्वीचा ४0 टक्के भाग आज युद्धात्मक स्थितीत आहे. जरी विश्वयुद्ध घोषित नसले तरी पूर्ण जगात युद्धात्मक स्थिती आहे. इराक आणि सीरियात तर आतंकवादी व कट्टरवादी संघटनांनी नवीन राष्ट्र उभे करण्याची अधिकृत घोषणाही केली आहे! अत्यंत आधुनिक यंत्रे, शस्त्रे वापरली जात आहेत. इस्राईल व पॅलेस्टाइनमध्ये युद्ध चालले आहे. युद्धविमान, रणगाडे, हेलिकॉप्टर, मिसाइल या विध्वंसात्मक शक्तींचा रोज वापर होत आहे. या सर्वांर्ंचे विपरीत परिणाम भारतावर अवश्य होणारच. भारताच्या अवती-भवती पाच राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहे. अणुबॉम्बसज्ज मिसाइल पण आहेत. केव्हा कोणती घटना होईल याची काही खात्री आहे का?
आज जगात माहिती तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून तरुण पिढीची मानसिकता, विचारशक्ती याचा यावर आक्रमण केले जात आहे. कट्टरपंथी, राष्ट्रद्रोही, विध्वंसक, आतंकवादी, फुटीरवादी व बदला घेण्याकरता, न्यायप्राप्तीकरता आत्मघाती संगठन यांची आत्मघाती मानसिकता व युद्धनीती तयार झाली आहे. भारतातले बरेच तरुण अनधिकृतपणे मध्यपूर्व अशिया व अरब देशांत युद्धात सक्रीय व सहभागी आहेत. या तरुणांना अरब देशांत युद्धात भाग घेण्याकरता- पाठविण्याकरता उत्तरदायी कोण आहे? युद्ध कार्यवाहीचा (घोषित किंवा अघोषित, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष) प्रशिक्षण व अनुभव घेऊन जेव्हा हे तरुण भारतात परत येतील तेव्हा त्यांच्या विध्वंसात्मक अनुभवाचा फायदा भारतात सक्रीय देशद्रोही संगठन विध्वंसक कार्यवाहीसाठी घेणार नाहीत का? आज अमेरिका व युरोपच्या देशात जन्मलेले अनेक तरुण सीरिया, इराकमध्ये चाललेल्या युद्धात भाग घेत आहेत, हे एक दुर्भाग्यपूर्ण वास्तव आहे. अमेरिकेत तर अमेरिकेचे तरुणच अमेरिकेच्या नागरिकांना, लहान विद्यार्थ्यांना, महिलांना व तरुणांना मारत आहेत. हे सर्व का व कसं होत आहे याची काळजी कोण करणार? युक्रेनच्या या वायुक्षेत्रात प्रवासी विमानावर मिसाइलचा मारा झाला तर त्याच वायुक्षेत्रातून भारताची सर्व प्रवासी विमाने युरोप, अमेरिकेला जातात व येतात, त्या क्षेत्रात युद्धात्मक वातावरण असल्याकारणाने कधीही काहीही होऊ शकेल. त्याचप्रमाणे भारताच्या समुद्रकाठच्या पश्चिम राज्यांतून युरोप व मध्यपूर्व अशिया, अरब क्षेत्र व आफ्रिकेत सर्वजागी समुद्र व वायुमार्गांनी प्रवास होतो. या क्षेत्रात आतंकवादी, अफगाणवादी, संगठन व हमास, आय.एस.आय.एस. संगठन सक्रीय आहेत. या सर्वांकडे प्रवासी व वाहतूक विमान आकाशात उडताना ध्वस्त करण्याची क्षमता आहे.
मलेशियाच्या यात्री विमानावर मिसाइलचा वापर करून २९५ निर्दोष प्रवासी नागरिकांच्या सामूहिक हत्याकांडाला जबाबदारी कोण? रशिया, युक्रेन किंवा रशिया संबंधित बंडखोर संगठन यांना काहीच होणार नाही. यात सहभागी कोण लोक आहेत? त्यांना कोण ओळखतं? ते संगठन आहे कुठे? या प्रश्नांची उत्तरे कधीच स्पष्ट मिळणार नाहीत; परंतु प्रवासी विमानावर मिसाइलचे आक्रमण झाले, हे सत्य जगात सदैव राहणारच. ज्याप्रमाणे मलेशियन एअरलाइनच्या अजून एक प्रवासी विमान गायब होण्याच्या घटनेला जग विसरत चालले आहे त्याचप्रमाणे या घटनेलाही फारच फार एक महिन्यात लोक विसरतील.
उद्या जर दहशतवादी संघटनांनी किंवा इतर संघटनांनी, पाकिस्तानच्या सीमेतूनच भारतीय प्रवासी वायुविमानवर मिसाइलचा हल्ला केला, तर भारत कुणाला दोषी ठरवणार? पाकिस्तान शासन जरी अनेक आतंकवादी संघटनांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहायता करत आहे, या स्थितीत भारतीय सुरक्षानीती व धोरण काय असले पाहिजे? याबद्दल कधी आपण विचार-विर्मश केला आहे का? शासकीय अधिकारी व शासकीय आर्थिक सहायतेवर जगणारे ‘तज्ज्ञ’ ‘विश्लेषक’, ही शक्यता कधीच स्वीकारणार नाही. परंतु ही स्थिती उत्पन्न झाली तर आपली योजना काही आहे का? हा खरा प्रश्न आहे. मलेशियाच्या विमान अपघाताने तो अधिक ठळकपणे अधोरेखित केला आहे.
(लेखक निवृत्त लेफ्टनंट कर्नल असून, दहशतवाद व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)