पं. जवाहरलाल नेहरू
(भारतरत्न पुरस्कार सन १९५५)
स्वातंत्र्य लढय़ातील एक सेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावी नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचा भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या जडण-घडणीवर सुमारे चार दशके मोठय़ा प्रमाणावर प्रभाव होता.
त्यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण उत्तर भारतीय शाळेत झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमधून बॅरिस्टर ही पदवी संपादन करून, भारतात येऊन त्यांनी वकिली व्यवसायास सुरुवात केली. पं. नेहरू यांनी या असहकार चळवळीत उडी घेतली. १९२९ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जवळपास ३0 वर्षे त्यांचा स्वातंत्र्य लढय़ात सहभाग होता. १९४५ मध्ये सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवरील खटला पं. नेहरूंनी चालविला होता.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय, आरोग्य अशा सर्व क्षेत्रात नवनव्या कल्पना अंमलात आणण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसांची नेमणूक केली. शेती, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, रेल्वे या क्षेत्रातील अनेक योजना त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्याचबरोबर विद्युत केंद्रे, पोलाद कारखाने, मोठी धरणे, महामार्ग यांची उभारणी केली. सोविएत रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जगातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. १९६१मध्ये ‘युनो’च्या आमसभेत त्यांनी भाषण केले. पं. नेहरूंनी पंचशील तत्त्वांचा अंगीकार केला आणि त्याचा प्रचार संपूर्ण जगात केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारताला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली.
पं. नेहरू साहित्यप्रेमी होते. वाचनाइतकेच त्यांचे लेखनावरही प्रेम होते. भारताचा शोध, आत्मकथा, जागतिक इतिहासाचे दर्शन असे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या कन्येला म्हणजे, इंदिराला तुरुंगातून लिहिलेली पत्रे पुढे ‘लेटर्स फ्रॉम अ फादर टू डॉटर’ म्हणून प्रसिद्ध झाली. लहान मुले ही राष्ट्राची अनमोल देणगी असते, असे त्यांचे मत होते. मुलांच्या मेळाव्यात ते आनंदाने रंगून जात. मुलांचे ‘चाचा नेहरू’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लोभस पैलू होता. पं. नेहरूंचा जन्मदिन १४ नोव्हेंबर ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.
- सुबोध मुतालिक
(लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे
कार्यकारिणी सदस्य आहेत.)