- डॉ. उज्ज्वला दळवी
"चल लवकर पाय उचल!’’
- पायातल्या खडावा काखोटीला मारत, ऑलिव्ह तेलाच्या बुधल्यांची कावड खांद्यावर तोलत त्याने तिला हाकारलं. दिवस माथ्यावर येण्यापूर्वी शेजारच्या गावच्या बाजाराला पोचून तेलाच्या बदल्यात धान्यधुन्य, थोडं कापडचोपड आणि सरपण घ्यायचं होतं. पायवाट पुरातन इजिप्तमधल्या कालव्यालगतची होती. कालवा खणताना उपसलेली माती घट्ट धोपटून बनवलेला तो उंच ‘धोपट’ मार्ग होता. काळ पाच हजार वर्षांपूर्वीचा होता.
नदीला पूर होता. कालव्यात चांगलंच पाणी घुसलं होतं. तरी धोपटमार्ग पाणीपातळीच्या वरच राहिला होता. पण ओलावलेल्या मातीत खडावा दरपावली रुतल्या असत्या. तशात अनवाणी चालणंच सोपं होतं. वाटेत चालून आलेल्या कोल्ह्या-कुत्र्यांना हाकलायला त्याने काठी उगारली. त्याचा एकूण अवतार ‘कावड खांदी, वहाण हाती, संगतीला काठी’ असाच होता. बाजारात पोचल्यावर शिरस्त्यानुसार त्याने ऐटीत पायात खडावा चढवल्या. त्याच्यामागून तीही ‘घट डोईवर, घट कमरेवर’ घेऊन पोचली.
जेव्हा तेलाशिवाय ऑलिव्ह फळांच्या टोपल्याही विक्रीला न्यायच्या असत, दूरच्या गावाकडे जाणारी पायवाट दगडाधोंडय़ाची असे तेव्हा मात्र इजिप्तमधला माल खेचरांवर लादला जाई. गाढवांहून अधिक ताकदवान आणि समंजस असलेली खेचरं दूरच्या प्रवासाला अधिक सोयीची होती. पण गावातल्या गावात ओझी वाहायला गाढवंही चालत.
मेसोपोटेमियाचे व्यापारी गाढवा-खेचरांच्या कळपांवर कापडाचे तागे किंवा तेलाचे बुधले लादून वाळवंटातून, डोंगरद:यातून, गरज पडली तर तराफ्यांवरून नदीही ओलांडून सीरिया, तुर्कस्तान गाठत. तिथून परतताना मद्य, लाकूड, ज्वालामुखीची काच वगैरे माल घेऊन येत. वाटेत धुळीची वादळं येत. सराया, विहिरी, मैलाचे दगड तर सोडाच, धड रस्ताही नव्हता. वाटसरूंना अभय द्यायला सैनिक नेमलेले असत. ते रक्षणाच्या बदल्यात गाढवंच बळकावत. शिदोरी बांधून नेणं अत्यावश्यक होतं. नाहीतर वाटेतल्या गावांत अन्नपाण्यासाठी कापडा-तेलाचा सज्जड मोबदला द्यावा लागे. नुकसान होई. म्हणून तर त्याच काळात सोन्याचांदीच्या तारा किंवा चकत्या चलन म्हणून वापरणं सुरू झालं. परगावातली माणसं एकटय़ादुकटय़ा नवख्या प्रवाशाला लुबाडत. शिवाय लुटारूही टपलेले असत. म्हणून लांब पल्ल्याचा प्रवास अनेकजण जथ्याने करत.
इजिप्तमध्ये स्लेजसारख्या घसरगाडय़ांना गाढवं जोडली जात. त्या गाडय़ा सहज घसराव्या म्हणून मातीच्या रस्त्यांवर मुद्दाम पाणी शिंपडून चिखलाचं वंगण केलं जाई. तशा घसरगाडय़ांतून, गाढवांवरून माल नेणा:यांना कर भरावा लागे. पाठुंगळीवरच्या मालाला मात्र करमाफी होती.
बिनचाकाची घसरगाडी
खांद्या-पाठुंगळीवरून फक्त मालच जात नसे. मालदार धनिकांची आसनं आणि आच्छादित-सुशोभित पालख्याही भोयांच्या खांद्यांवरून जात. धनिक बाळांना धक्का पोचू नये म्हणून भोयांना खास प्रशिक्षण घ्यावं लागे!
सुमारे सात-आठ हजार वर्षांपूर्वी मेसोपोटेमियातल्या लोकांनी ढकलगाडय़ांखाली गडगडणारे ओंडके वापरले. रस्त्यावर घासून ओंडक्याचा मधला भाग ङिाजला की गडगडणं अधिक सोपं होई. म्हणून त्या हुशार माणसांनी तो मध्यभाग कोरून जवळजवळ आसाने जोडलेली दोन चाकंच बनवली. गाडीतूनच घुसवलेल्या आसाला दोन भरीव चकत्या जोडणं साधारण सहा हजार वर्षांपूर्वी जमलं. त्या गाडीला गाढवं जोडून तालेवारांसाठी सुबक गदर्भरथ बनले.
गदर्भरथातला लापिस लाझूली
साध्या गाढवगाडीतून मद्य, तलम कपडे, भाजलेल्या विटा, खारवलेले मासे वगैरे माल अधिक दूरच्या ठिकाणी पोचवणं सोपं झालं. इजिप्तच्या नद्यांवर पूल नव्हते. गाढवगाडय़ांना आणि रथांना तराफ्यांवरून पैलतीर गाठावा लागे. सिंधू खो:यातही गाढवं-खेचरं होती. पण मणी, बांगडय़ा, तिळेल नेणा:या तिथल्या गाडय़ांना मात्र बैलजोडय़ाच जुंपल्या गेल्या. भिन्न शहरांना जोडणा:या पुराण्या गाडीवाटा त्या तिन्ही वसाहतींच्या सॅटेलाईट-फोटोंमध्ये आजही स्पष्ट दिसतात.
घोडा मात्र जरा उशिराच भारवाहू झाला. तशी त्याची माणसाशी घसरट सुमारे आठ-दहा हजार वर्षांपूर्वीपासूनच असावी. रशियाच्या गवताळ प्रदेशातले पारधी-शोधी लोक मोठय़ा प्रमाणात घोडय़ांची शिकार करत. त्यांच्याकडे पाळीव घोडेही असल्याचे सुमारे सात हजार वर्षांपूर्वीचे पुरावे आहेत. सोमालियातल्या गुहांच्या भिंतींवर घोडय़ावरून शिकार केल्याची पाच हजार वर्षांपूर्वीची चित्रं आहेत. बहुतेक ठिकाणी घोडा आधी सागुतीला, मग दुभत्याला, नंतर नांगरटीला आणि सरतेशेवटी ओङयाला वापरला गेला. मेसोपोटेमियाच्या भाषेत तर त्याचा उल्लेख ‘डोंगरी गाढव’ असाच झाला.
गाडय़ा ओढण्यात गाढवाशी स्पर्धा होती ती खेचराची. तुर्कस्तानात खेचराची किंमत घोडय़ाच्या तिप्पट होती. ‘राजाच्या रथाला उमदं खेचरच जोडायला हवं. तिथे सामान्य घोडा शोभत नाही! तो नका हो लावू!’ असा विनवणीवजा सल्ला मेसोपोटेमियाच्या राजाला मिळाल्याची नोंद आहे. वाळवंटी कामधेनू असलेला उंट चार-पाच हजार वर्षांपूर्वी माणसाळला आणि येमेन-ओमानचा ऊद-धूप वाळवंट ओलांडून भारत-चीन-इजिप्तला पोचला.
गाढव-खेचर-बैल-उंट वगैरे मालवाहू-गाडाओढू-चराऊ जनावरं वाटेत लाभणारी कसलीही हिरवाई चवीने चघळत. त्यांचे चा:याचे चोचले नव्हते. त्यामुळे गाडय़ांचे काफले, उंटांचे तांडे घेऊन व्यापारी एकमेकांच्या सोबतीने दूरचे पल्ले गाठू शकले. अफगाणिस्तानातला निळा, मौल्यवान लापिस लाझूली दगड सिंधू खो:यातल्या आणि इराकच्याही बंदरांपर्यंत खुष्कीच्या मार्गाने तशा काफल्यांतूनच पोचला. वाटखर्च आणि भरमसाठ कर यांमुळे मालाची किंमत अव्वाच्या सव्वा वाढत जाई. पण तसा दूरवर जाणारा माल श्रीमंतांसाठीच असे.
गाडय़ा केवळ मालासाठीच नव्हत्या. तालेवार मंडळी पालख्या सोडून रथांतून फिरायला लागली होती. चाकंवाल्या गाडय़ांना दगडा-धोंडय़ांचे रस्ते जमेनात. मातीवाटांत रथाची चाकं रुतायला लागली. म्हणून रथपती कर्णांनी उदारपणो रस्ते बांधले. मेसोपोटेमियात फरसबंदी रस्ते, तर सिंधू खो:यात भाजलेल्या विटांचे पक्के मार्ग बनले. गाडय़ा जातील तिथवर तशा पक्क्या रस्त्यांचं जाळं झालं. विस्तारलेल्या राज्यांत रथी-अतिरथींनी सर्वत्र फिरून अनुशासनाला हातभार लावला. ते राजाचे सन्माननीय प्रतिनिधी झाले. अतिरथी-महारथींमुळे सहज हालवता येणारी, बलदंड सैन्यं उभी झाली. रस्त्यांवरून, गाडय़ांतून व्यापार सुरू झाल्यामुळे वाटेतल्या मोक्याच्या ठिकाणी व्यापार केंद्रांचा उदय झाला. मेसोपोटेमियातल्या एबला, मरी, नगार वगैरे व्यापारपेठांची भरभराट झाली. तिथे अनेक गावांचे व्यापारी एकत्र येत, फावल्या वेळच्या गप्पा मारत, एकमेकांचे दोस्त बनत. त्यांच्यात उदीमाच्या मालासोबतच प्रवासातले अनुभव, वेगवेगळ्या चालीरीती, अनेक भाषांतले चपखल शब्द यांचीही देवाणघेवाण झाली. संस्कृतिसंगम घडला. साडेचार हजार वर्षांपूर्वी एबलाच्या पाचरलिपीत, मातीच्या पाटय़ांवर ती सगळी हकीगत नोंदली गेली. एका राजवाडय़ाच्या उत्खननात चौदा हजारांहून अधिक लहानमोठय़ा पाटय़ा-ठिक:यांचं विषयवार लावलेलं संग्रहालयच सापडलं आहे. एबलाची भाषा तर अशी पसरली की, त्या प्रदेशातल्या अरबी, हिब्रू, आरामाइक वगैरे भाषांचा उगम तिच्यातूनच झाला.
एबलाची पाचरलिपीतली पाटी
व्यापारपेठांची संपत्ती बलदंड राजांच्या वक्रदृष्टीत भरली. एबलानगरी तर तीन वेळा लुटली गेली. त्यावेळच्या जाळपोळीत पाचरलिपीतल्या नोंद-पाटय़ा भाजून अधिकच पक्क्या झाल्या! तशा सगळ्या धुमश्चक्रीत व्यापारपेठा आणि त्यांच्या भोवतालच्या वसाहती घुसळून निघाल्या. हरलेल्यांनी जेत्यांचं अनुकरण केलं, जेत्यांनी शरणागतांचे गुण उचलले, सगळ्यांच्याच वागण्याबोलण्याला नवे पैलू पडले. संस्कृतिमंथन झालं.
चाकाची घोडय़ाशी जोडी जुळली आणि रथचक्राच्या चाकोरीने माणसाच्या जगण्याला चाकोरीबाहेरच्या वाटा दाखवल्या. मानव्याचा अर्थ अधिक व्यापक, समृद्ध केला.
( पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘मानवाचा प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा, संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com