संजय कर्हाडे
माधवराव मंत्रींना फलंदाजी करताना किंवा यष्टीरक्षण करताना मी पाहिलेलं नाही. मात्र, त्यांच्याकडून अमूल्य असं मार्गदर्शन मात्र मला वेळोवेळी मिळालेलं आहे. ‘क्रिकेटचे सामने पाहून, खेळाडूंचं निरीक्षण करून, ऐंशी यार्डावरून त्यांची मनं जोखून जो सामन्याचे अवलोकन करू शकतो, तो खरा पत्रकार,’ असं माधवराव नेहमी म्हणायचे. माधवराव हजर असोत किंवा नसोत, वानखेडे स्टेडियममध्ये समिती कक्षातील पहिल्या रांगेतील डावीकडच्या पहिल्या खुर्चीवर कुणी कधी बसलं नाही. हा त्यांचा दरारा नव्हता. त्यांच्याबद्दलचा आदर होता. दिलखुलास हसणारे, दातांची कवळी जिभेने रेटत पाठीवर थापा मारणारे माधवराव एखाद्या दिवशी भेटले नाहीत, तर चुकल्या-चुकल्यासारखं वाटायचं. खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक करण्याची माधवरावांची विशिष्ट पद्धत होती. दोन्ही ओठ मुडपून आपल्या उजव्या हाताची चार बोटं डाव्या तळव्यावर ते घाईघाईने आणि जोरजोरात वाजवत असत. पु. लं.च्याच भाषेत सांगायचं, तर माधवरावांची दाद अशी काही आगळी होती, की तिला जवाब नव्हता! भारतीय क्रिकेटचे एक जाणकार आणि बुजुर्ग म्हणून त्यांची ख्याती होती. विलक्षण स्मरणशक्ती, चकित करून सोडणारी निरीक्षण शक्ती आणि पदरी असलेली अफाट माहिती त्यांच्याकडे होती. एखाद्या बुजुर्ग क्रिकेटपटूचं निधन झाल्यानंतर त्याच्यावर मृत्युलेख लिहिण्याचीही गळ मी त्यांना घातलेली आहे. त्यांचं लिखाण एकटाकी असे. माधवरावांची शब्दांवर हुकमत होती.
आज मला वीस-एक वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवतोय. त्या दिवशीसुद्धा मला त्यांच्याकडून एका क्रिकेटपटूवर मृत्युलेख लिहून हवा होता. ते म्हणाले होते, ‘‘हो, प्रो. देवधर गेल्याचं कळलं मला; पण संध्याकाळी लेख घेण्यासाठी कुणाला पाठवू नकोस, तूच ये.’’ माझ्या हातात माधवरावांनी लेख ठेवला व माझ्या पाठीवर थोपटत ते म्हणाले, ‘‘काय रे, बहुतेक सर्व क्रिकेटपटूंचे मृत्युलेख मी लिहितो. माझ्या मृत्यूनंतर कुणी लिहील का रे लेख?’’ त्यांच्या प्रश्नावर मी तत्क्षणी आणि जोरात हसलो. मला वाटलं, माधवराव विनोद करीत होते; पण त्यांचा प्रश्न गंभीर होता. मी वरमलो, शरमलो. त्यांच्या घरातून खालमानेने बाहेर पडत असताना मला ते म्हणाले होते, ‘‘माझ्यावरील मृत्युलेख तू लिहिशील, असं मला वचन दे.’’ अधूनमधून माधवरावांची भेट झाली, की ते हमखास विचारत, ‘‘काय रे वचनपूर्ती करणार ना?’’ आणि प्रत्येक वेळी आम्ही दोघंही दिलखुलासपणे हसत असू. जणू वचनपूर्ती करण्याची वेळ कधी येणारच नव्हती..
(लेखक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहेत.)