डॉ. संप्रसाद विनोद
महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनतर्फे ग्रामीण युवक-युवतींसाठी उन्हाळ्याच्या सुटीत एक उपक्रम हाती घेतला होता. ही मुलं बर्याच वेळा कर्ज काढून, राहतं घर गहाण ठेवून, खूप अडचणी सोसत पुण्यात शिक्षणासाठी राहतात. भाषेचा, राहणीमानाचा, शहरी रीतीरिवाजांचा असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे असतात. या सगळ्यांशी जुळवून घेताना त्यांची खूप ओढाताण होते. प्रसंगी स्थानिक सहाध्यायांकडून चेष्टाही होते. त्यामुळे ती हिरमुसतात, निराश होतात. खरं तर त्यातली बरीच मुलं चांगली हुशारही असतात. केवळ घरापासून दूर राहणं, पैशांची चणचण आणि मित्रमंडळींकडून पुरेसं सहकार्य न मिळणं यांमुळे ती मागे पडतात. अशा मुलांना मानसिक, भावनिक, वैचारिक बळ देणं, दिलासा देणं, त्यांच्या ढासळत्या आत्मविश्वासाला नवी संजीवनी देणं हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. मोठय़ा संख्येने युवक-युवती त्यात सहभागी झाले होते; पण त्यांच्यातल्या अंगापिंडाने मजबूत आणि जरा गावरान भाषा असणार्या तुकारामच्या डोळ्यांत बुद्धीची एक वेगळीच चमक होती. अक्षर उत्तम, कपडे बिनइस्त्रीचे, पण स्वच्छ धुतलेले. तो ५-७ किलोमीटर सायकलने किंवा २ बस बदलून योगासाठी यायचा. योगप्रशिक्षणात आणि गटचर्चेत मनापासून सहभागी व्हायचा. छान आणि नेमके प्रश्न विचारायचा. पूर्वपरवानगी घेऊन या उपक्रमात सहभागी झालेले काही शहरी सहाध्यायी त्याच्या अस्सल गावरान भाषेची चेष्टा करायचे.
तुकाराम हा मूळचा विदर्भातला. आई-वडील शेतकरी. घरची परिस्थिती बेताची; पण मुलगा हुशार म्हणून आई-वडिलांनी ऋण काढून पुण्याला पाठवलं. चांगल्या गुणांमुळे पुण्यातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला; पण वसतिगृहाचं आणि भोजनालयाचं शुल्क जास्त असल्यामुळे बाहेरच्या एका वसतिगृहात राहू लागला. पहिलं वर्ष शहरी वातावरणाशी जुळवून घेण्यात आणि सावरण्यात गेलं. नाही म्हटलं तरी या सगळ्याचा अभ्यासावर आणि गुणांवर परिणाम झालाच. अपेक्षेपेक्षा कमी गुण पडले. वसतिगृहातून नाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली. काळजी वाढली. नको ते विचार मनात थैमान घालू लागले. आपल्या यशाकडे डोळे लावून बसलेल्या कुटुंबाचं कसं होणार, याची चिंता वाटू लागली.
रडवेला होऊन तो मला भेटायला आला. मी वसतिगृहप्रमुखांना त्याच्यासाठी गळ घालावी, असं त्याने सुचवलं. मला वाटलं, त्यानेच हा प्रश्न हाताळायला हवा; कारण त्यातूनच त्याला आत्मविश्वास मिळणार होता. तो आत्मनिर्भर होणार होता. मग यावर आमचं बराच वेळ बोलणं झालं. ‘‘एका परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणजे काही सगळं संपलं नाही. गरीब असणं हा काही गुन्हा नाही. या अडचणीतून तू नक्की बाहेर पडशील. निराश होऊ नकोस. प्रथम धीर करून तू वसतिगृहप्रमुखांना भेट. त्यांना सगळी वस्तुस्थिती प्रामाणिकपणे सांग. संकोच करू नकोस. न बिचकता, निर्भयपणे, पण विनम्रपणे तुझ्या अडचणी त्यांना सांग. त्यातून नक्की काही तरी मार्ग निघेल. प्रयत्न तर करून बघ. अगदीच काही झालं नाही, तर तू निश्चिंतपणे माझ्याकडे राहा. काही काळजी करू नकोस,’’ असं त्याला सांगितलं; पण तशी वेळ आलीच नाही.
चार दिवसांनी तो पुन्हा भेटायला आला. आज त्याचा चेहरा नेहमीसारखा हसरा होता. सांगितल्याप्रमाणे तो पर्यवेक्षकांना भेटला. त्यांना सगळं सांगितलं. त्याचा प्रामाणिकपणा त्यांना भावला. त्याची अडचण त्यांनी समजून घेतली. त्याला वसतिगृहात राहण्याची परवानगी मिळाली. फक्त पुढच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची अट मात्र घातली. मी त्याला म्हटलं, ‘‘ही अट घातली, हे तर चांगलंच झालं. त्यामुळे तुला अभ्यासासाठी प्रेरणा मिळत राहील.’’ झालंही तसंच. तो जोमाने अभ्यासाला लागला.
वेळात वेळ काढून तो रोज संस्थेत योगसाधना करण्यासाठी येऊ लागला. त्याला इंग्रजी भाषेची अडचण येत आहे, हे जाणवल्यावर डिक्शनरी आणून रोज त्यातले तीन शब्द ‘अभ्यासायला’ सांगितले. त्याचबरोबर इंग्रजी वृत्तपत्रातली एक बातमी नीट समजून वाचायला सांगितली. माझं शालेय शिक्षण मराठीत झाल्याने महाविद्यालयात गेल्यावर मलाही भाषेची अडचण भासली होती; पण माझ्या अमेरिकेतल्या भावाच्या सांगण्यावरून मीदेखील रोज तीन नवीन शब्द अभ्यासत गेलो.
म्हणता म्हणता माझा शब्दसंग्रह वाढला. तुकाराम रोज संस्थेत साधनेसाठी येत असल्यामुळे मीही त्याच्याशी साध्या-सोप्या इंग्रजीत बोलू लागलो. परीक्षेच्या वेळी ताण आला, की त्याचं निवारण कसं करायचं, हे त्याला सांगत गेलो. शिकण्याची इच्छा आणि तळमळ असल्याने हे सगळं तो छान शिकत गेला. साहजिकच त्याचा मानसिक ताण कमी झाला. तो चांगले गुण मिळवून पास झाला. त्यामुळे पुढची दोन वर्षे वसतिगृहात राहू शकला.
योगसाधना नियमित चालू असल्याने त्यातही तो प्रवीण झाला. शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आल्यावर तो भेटायला आला; पण त्याच्या चेहर्यावर जरादेखील ताण नव्हता. मला शंका आली, की हा गाफील तर झाला नाही ना? तसं त्याला विचारलं, तर म्हणाला, ‘‘सर, तुम्ही पाठीशी असल्यावर मला काळजीचं काय कारण आहे?’’ त्याला सांगितलं, ‘‘मी तर आहेच आणि यापुढेही असेन; पण खरं तर आता योगविद्याच तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे काळजीचं काही कारण नाही.’’
(लेखक हे महर्षी भारतरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)