- मिलिंद थत्ते
पंचतंत्रतली एक अपडेटेड गोष्ट आहे. एक डबके असते. त्यात अनेक मासे, खेकडे, बेडूकबिडूक राहत असतात. त्या डबक्यात बेडकांचे दोन गट असतात. त्यांच्यात राजकारण चालते. कधी एक गट वरचढ होतो, तर कधी दुसरा. खेकडे आणि मासेही त्यांच्या त्यांच्या भूमिका वगैरे घेतात. डबक्यातली जी काही संपत्ती आहे त्यावरचे अधिकार, त्याचे वाटप, त्याची टेंडर, त्यातली टक्केवारी वगैरे त्यांच्या मीडियातले गरम विषय असतात. हे सगळं असंच कितीतरी पिढय़ा चालू असतं.
एके दिवशी अचानक एक बगळा येतो. बगळा ध्यान लावून उभा राहतो आणि दुरूनच बिचकून पाहणा:या माशांना सांगू लागतो, ‘अब जमाना बदल गया है, ग्लोबलायझेशन वगैरे झालंय. पण तुम्ही इथे राहताय ना, तुम्हाला काय कळणार त्यातली मजा!’ असं रोज रोज येऊन बगळा ज्ञान पाजू लागतो. आणि दूर थांबणारे मासे त्याच्या जवळ जवळ येऊ लागतात. त्यांनाही बाहेरच्या जगाचे आकर्षण वाटू लागते. बगळा त्यांना व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ दाखवतो. बाहेरच्या जगात मॉल काय, इंडस्ट्री काय, गाडय़ा काय, उड्डाणपूल काय, मेट्रो काय, रोजगाराच्या संधी काय - एकदम दणादण विकास होतोय.
हे सारे पाहून त्या माशांचे आणि बेडकांचे डोळे दिपू लागतात. मग एक दिवस एक मासा धीर करून त्या बगळ्याला विचारतो, ‘साहेब, आम्हाला तिकडे जायचा काही पर्याय सांगा की.’ बगळा म्हणतो, ‘तसे तर मीही तुम्हाला तिथे नेऊ शकतो, पण तुमचा आमच्यावर विश्वास नाही ना! उद्या तुम्ही म्हणाल बगळ्याने खोटी आश्वासने दिली, फसवले.’ माशांना बाहेर पडण्याची इच्छा आता इतकी अनावर झालेली असते, की ते म्हणतात, ‘नाही साहेब, तसं कसं? तुमच्यामुळेच तर आम्हाला जगात काय चालले आहे ते कळले. आता तुमच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर? काहीही करा पण आम्हाला न्या..’
मग बगळ्याने मोठे उपकार केल्याच्या थाटात त्यांना एक ‘डिस्क्लेमर फॉर्म’ भरायला दिला. बगळ्याबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही स्वेच्छेने घेत असून, आम्ही कोणत्याही दडपण अथवा प्रलोभनाखाली नसून नशापाणी न करता येथे सही करत आहोत. (अंगठा केला असल्यास ‘वरील मजकूर मला वाचून, समजावून दिला आहे’ अशा वाक्याखाली परत एकदा अंगठा टेकवावा.) मग हा फॉर्म भरायला मोठी रांग लागली. त्यातल्या त्यात गब्दुल माशांनी स्वत:चा नंबर पुढे लावून घेतला.
मग बगळा रोज एकेका माशाला चोचीत उचलून घेऊन जाऊ लागला. परत येऊन तो ‘तिथे’ गेलेल्या माशांचे आता कसे धमाल आयुष्य आहे वगैरे वर्णने ऐकवत असे. बेडकांना आता राहवेना. आमच्याच जातीला डावलल्याचा जोरदार निषेध त्यांनी बगळ्यासमोर केला. रांगेतल्या माशांना त्यांनी धक्काबुक्की वगैरे केली. मग बगळ्याने त्यांनाही फॉर्म देऊ केले. तुम्हालाही नेईन बरे, अशी त्यांची समजूत घातली. जेव्हा हा रेटा वाढला तेव्हा बगळ्याने आणखी दोन बगळ्यांना आपले फ्रँचाइजी म्हणून नेमले. बगळ्याचे राजकीय आणि शारीरिक वजन दिवसेंदिवस वाढत चालले आहे, पोट सुटले आहे हे एका हुशार खेकडय़ाच्या लक्षात आले. त्याने बगळ्याकडे लकडा लावला, मला न्या, मला न्या. एव्हाना माशांचे, बेडकांचे पुढारी, त्यांचे जावई वगैरे सगळे ‘तिथे’ गेले होते. त्यामुळे बगळ्याशी वाद घालेल असे फार कोणी उरले नव्हते. होते ते फक्त अजीजी करून एकदाचा माझा नंबर लावा असे म्हणणारे लाचार इच्छुक! त्यात खेकडय़ाने थोडी दादागिरी केल्यावर बगळ्याने ‘उगीच शांतताभंग कशाला’ म्हणून त्या खेकडय़ाचे म्हणणो मान्य करून टाकले. पण खेकडय़ाची एक अट होती. मी मानेवर बसून येणार, चोचीत नाही. बगळ्याने त्याला मानेवर घेतले आणि उडाला. थोडे पुढे गेल्यावर खेकडय़ाला माशांचे सांगाडे दिसायला लागले. त्याने काय झाले ते ओळखले आणि बगळ्याची मान आपल्या नांग्यांमध्ये धरून आवळली. बगळ्याचा गेम करून खेकडा चालत चालत परतला. येताना चार ठिकाणो फिरून आला.
खेकडा परत आलेला दिसल्यावर डबक्यातल्या मंडळींची गर्दी झाली. कुतूहलाने सगळे प्रश्न विचारू लागले. मग खेकडय़ाने बाहेरच्या जगातल्या सांगाडय़ांचे वर्णन करून सांगितले. तरीही बगळ्यांच्या जाहिरात विभागाने मंडळींच्या डोक्यावर जे गारुड केले होते, ते जाईना. मग रातोरात एक सभा बसली. एव्हाना जास्त डरांव करणारे, हुशार, लवकर आरक्षण मिळवलेले असे सगळे पैलथडीला निघून गेले होते. उरले-सुरले म्हणजे दुबळे जीवच आता डबक्यात शिल्लक होते. त्यांचीच सभा भरली. बाहेरच्या जगाबद्दल आम्हाला जे कळले ते सारे खोटे, आणि हा आगाऊ खेकडा काय बघून आला ते मात्र खरे? असा त्यांचा धोशा होता. बाहेरची आकांक्षा लोपलेली नव्हती. टीव्ही-इंटरनेट यातून नवीन नवीन चित्रे दिसतच होती. मग काही वृद्ध खेकडय़ांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. त्या म्हाता:यांना आता कुठे जाण्यात रस नव्हता. आहे त्यात ते सुखी होते. तरुण मंडळींनी त्यांना गप्प केले. ‘तुम्हाला काही फ्युचर, करिअर वगैरे नाहीए, आम्हाला आहे, तुम्ही बोलू नका.’
मग एका बेडकाने तोंड उघडले. आपण जरी बाहेर गेलो नाही, तरी हे डबके हळूहळू कमी होत जाणार आहे. आज बगळे आले, उद्या कावळे येतील. हे ग्लोबलायझेशनवाले आपल्याला सोडणार नाहीत. हळूहळू त्यांची दुकानेही इथे काठावर येऊन बसतील, आणि मग जागा कमी पडते म्हणून आपले डबकेही भूसंपादनात घेऊन टाकतील. दुसरा म्हणाला, म्हणजे आपण असेच बसून राहिलो तर खड्डय़ात जाणार आणि बगळ्यासारख्या दुकानदारांवर विश्वास टाकून बाहेर गेलो तर आणखी मोठय़ा खड्डय़ात जाणार. तिस:याने अचंबित होऊन विचारले, म्हणजे आपल्याला खड्डा निवडण्याचाच काय तो अधिकार आहे वाटतं? डबके सोडले तर बाहेरच्या जगात आपल्याला किंमत नाही. इथेच राहतो म्हटले तरी काही खरे नाही.
तो खेकडा इतका वेळ गप्प होता. धीर करून तो म्हणाला, ‘आणखी एक पर्याय आहे. आपल्या डबक्यात जी काही संपत्ती आहे, त्यावर आधारित उद्योग आपण सुरू करू. एकटय़ाने, जोडीने किंवा सगळे मिळून जितके होतील तितके उद्योग काढू. त्यातून बाहेरच्या जगाशी व्यापार सुरू करता येईल. बाहेर मागणी भरपूर आहे. आपल्या हातात पैसा खुळखुळेल. तो पैसा ग्लोबल असेल. आपण रांग लावण्यापेक्षा बगळे आपल्यापुढे रांग लावतील. डबक्यातले राजकारण आणि त्याच त्याच गोष्टीत कंत्रटबाजी करण्यापलीकडेही संधी आपल्या तरुणांना मिळेल. ज्या भपकेबाज ग्लोबल सुखसुविधांचे आपल्याला आकर्षण वाटते, त्या इथेही उभारता येतील. जर डबक्याचे उत्पादक मूल्य शेजारच्या कावळ्यांपेक्षा जास्त झाले, तर आपल्यालाच डबक्याच्या विस्तारासाठी त्यांची जमीन मिळवता येईल. इतर डबक्यांशी जोडून मोठय़ा ब्रँडसुद्धा करता येतील.’
खेकडय़ाच्या या पर्यायावर सगळे विचारात पडले. आणि अजूनही सगळे विचार करतच आहेत.
टीप : खेकडे, बेडूक, बगळे यांपैकी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगीर आहोत. मनुष्यमात्रंना यात मानवी जगाशी काही साम्य दिसल्यास तो निव्वळ योगायोग मानून शक्य तितके दुर्लक्ष करावे.
(लेखक ‘वयम्’ या समावेशक विकासाच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)
milindthatte@gmail.com