शुभदा साने
एके दिवशी सहज एका मैत्रिणीकडे गेले. गप्पा मारण्यासाठी दुपारीच गेले. त्या वेळी ती घरात एकटीच असते, हे माहीत होतं मला म्हणून गेले.
बेल वाजवली. तिनंच दार उघडलं आणि बघते तर काय? घरातली सगळी माणसं बाहेरच्या हॉलमध्ये बसलेली. तिचे मिस्टर, मुलगा, मुलगी. महत्त्वाच्या विषयावर काही तरी बोलणं चालू असावं, असं मला वाटलं म्हणून मी म्हटलं, ‘‘मी पुन्हा येईन. सहज आले होते, चालू दे तुमचं बोलणं!’’
यावर तिची मुलगी एकदम पुढे आली आणि म्हणाली, ‘‘मावशी तूसुद्धा आमच्या या चर्चेत सहभागी हो ना! बस अशी निवांत.’’ ‘‘मी होते गं सहभागी; पण विषय तर कळू दे!’’ कोचावर बसत मी म्हटलं.
मग मैत्रीण म्हणाली, ‘अगं त्याचं काय झालं, आज आमच्याकडे एक कार्यक्रम झाला.’’
‘‘कार्यक्रम? कुठला कार्यक्रम?’’
‘‘गौरांगसाठी मुलगी बघायचा कार्यक्रम!’’
‘‘अरे वा! गौरांग तू लग्नासाठी उभा आहेस हे कळलं होतं, असे कार्यक्रमही आता व्हायला लागले! छान! आता लवकरच.’’
पण मला पुढे बोलूच दिलं नाही गौरांगनं. तो कडवटपणानं म्हणाला, ‘‘या हल्लीच्या मुली म्हणजे नमुने असतात.’’
‘‘अरे झालं तरी काय? आज आलेली मुलगी कशी होती?’’
‘‘मुलगी दिसायला सुंदर होती. बांधा रेखीव होता. सॉफ्टवेअर इंजिनिअर. एका उत्तम कंपनीत नोकरीला. तिला बघितल्यावर असं वाटलं, आता जमणार! पण’’
‘‘पण काय?’’
‘‘मोठय़ा माणसांशी प्राथमिक बोलणं झाल्यावर आम्हाला दोघांना स्वत्रंत खोलीत बोलायची संधी दिली.’’
‘‘ते बरोबरच आहे रे. काही गोष्टी मोठय़ा माणसांसमोर बोलता येत नाहीत. त्यामुळे हल्ली हे बरोबरच करतात!’’
‘‘पण मावशी स्वतंत्र खोलीत बसल्यावर ती काय म्हणाली माहीत आहे?’’
‘‘काय म्हणाली?’’
‘‘ती म्हणाली, तुझ बाकी सगळं मला चांगलं वाटतंय; पण घरातली अडगळ मला मान्य नाही!’’
‘‘घरातली अडगळ म्हणजे?’’
‘‘प्रथम मलाही तिच्या बोलण्याचा काही अर्थबोध झाला नाही; पण नंतर मला तिच्या बोलण्याचा रोख कळाला. ती आई-बाबांना अडगळ म्हणत होती. मला तिचा इतका राग आला. मी तिथल्या तिथंच तिला सांगून टाकलं, आपलं काही जमणार नाही म्हणून!’’ एवढं सांगून गौरांग तिथून निघून गेला. तिची मुलगी आणि मिस्टरही उठून गेले. आम्ही दोघीच उरलो. मी म्हटलं, ‘‘काय हल्लीच्या मुलींची मानसिकता असते, नाही? पण हे सगळीकडेच दिसतं बरं का! मध्यंतरी आमच्या शेजारचे जोशी मुलाकडे म्हैसूरला गेले होते. खरं तर तिकडेच कायम राहायचा त्यांचा विचार होता. त्या दृष्टीनं सगळी आवरासावर करूनच ते गेले होते.’’
‘‘मग पुढे काय झालं?’’
‘काही दिवस तिथं छान गेले, आदरातिथ्य चांगलं झालं; पण एखाद्या पाहुण्याशी वागावं तसं मुलगा, सून आणि नातू त्यांच्याशी वागत होते. एक महिना झाल्यावरही ते निघण्याचं नाव घेईनात, तेव्हा नातू सरळच विचारायला लागला, की आजी-आजोबा तुम्ही परत तुमच्या घरी कधी जाणार? म्हणजे आपल्याकडेच हे कायम राहणार आहेत, हे त्याला मान्य नव्हतं. आणि त्यानं असं विचारल्यावर त्याची आईही त्याला रागावत नव्हती. त्यानं दोन-तीन वेळा असं विचारल्यावर जोशी आजी गमतीनं म्हणाल्या, ‘आता आम्ही इथंच राहणार.’
‘‘तेव्हा नातू म्हणाला, ‘मग तुम्हाला इथं राहता येणार नाही. इथं म्हणजे या खोलीत राहता येणार नाही. कारण ही पाहुण्यांची खोली आहे. तुम्हाला मग आउट हाऊसमधल्या खोलीत राहावं लागेल.’ असं म्हणून त्यानं त्यांना ती खोलीसुद्धा दाखवली. खोली बर्यापैकी मोठी होती.
‘‘पण तिथं नको असलेलं सामान व्यवस्थित रचून ठेवलं होतं. या खोलीत आपली रवानगी होणार. म्हणजे आपणसुद्धा नको असलेल्या सामानासारखेच म्हणजेच अडगळ गं!’’ ‘‘‘खरं आहे गं! त्यांना तसं वाटलं असणारच नक्की! मग त्यांनी काय केल?’’ ‘‘त्यांनी तिथून परत यायचं ठरवलं. तिथं अडगळ होऊन राहण्यापेक्षा आपल्या घरी परत जावं, असं त्यांना वाटलं’.’ ‘‘तो निर्णय त्यांनी चांगला घेतला. जोशी आजींना अजून घरातलं संगळं करणं होतंय म्हणून त्यांनी तसं ठरवलं; पण ज्यांना खरोखरच मानसिक आणि शारीरिक आधाराची गरज असते, त्यांनी काय करायचं?’’
माझ्यापुढे चहाचा कप ठेवत मैत्रिणीनं विचारलं. ‘‘एक तर त्यांनी एखाद्या वृद्धाश्रमाची वाट धरायची किंवा मुलगा-सुनेच्या संसारात अडगळ म्हणून राहायचं!’’ चहाचे घोट घेत मी म्हटलं आणि जायला निघाले. घरी गेल्यावरही माझ्या मनात ‘अडगळ’ हा शब्दच घोंगावत राहिला.
शारीरिक आणि मानसिक आधाराची त्यांना गरज असते. डॉक्टरी ट्रीटमेंटमुळे शारीरिक आधार मिळू शकतो; पण मानसिक आधाराचं काय? मला माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवतोय. माझी आजी लवकर गेली; पण आजोबा मात्र खूप दिवस होते. ते एका पायानं अधू होते. त्यामुळे त्यांना फार कुठं बाहेर जाता यायचं नाही. नुसतंच बसून त्यांना कंटाळा येऊ नये, म्हणून माझी आई मला आणि माझ्या भावाला आजोबांशी गप्पा मारत बसायला सांगायची. मी शाळेतून आल्यावर शाळेत काय-काय घडलं, हे सगळं आजोबांना सांगायची. आजोबांचं मराठी उत्तम होतं. मी त्यांना एखाद्या निबंधाची सुरुवात, एखादा कल्पनाविस्तार विचारायची. खरं तर मला येत असायचं; पण आजोबांना बर वाटावं. आपला काही तरी उपयोग होतोय, असं त्यांना वाटावं म्हणून मी तसं वागायची, हे आईच्या सांगण्यावरूनच. त्यामुळे आजोबांचा वेळ मजेत जायचा आणि त्यांच्या मनात नकारात्मक विचारही यायचे नाहीत.
परीक्षेला जाताना देवाला नमस्कार केल्यानंतर आम्ही आजोबांना नमस्कार करायचो मग आई-वडिलांना. आजोबांना असं सन्मानानं वागवल्यामुळे त्यांना रिटायरमेंटनंतर एकटेपणा जाणवला नाही. अशा पद्धतीनं सगळेच वागले तर.?
हे लिहिताना मला मंगलाताईंची आठवण होतेय.. मंगलाताई एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. अतिशय हुशार होत्या. सगळ्या भाषांवर त्याचं प्रभुत्व होतंच; पण हल्लीचं गणितही त्यांना यायचं.
मंगलाताई रिटायर झाल्या आणि जास्त करून घरातच राहायला लागल्या आणि तिथूनच सगळं चुकायला सुरुवात झाली. सुनेशी काही त्याचं जमेना. त्यांचं वागणं तिला आवडेना. त्यांची प्रत्येक कृती तिला खटकायला लागली. खरं तर तिला मदत म्हणून त्या काही तरी करायला जायच्या; पण सुनेला ते पटायचं नाही.
घरातलं त्यांचं अस्तित्वच तिला सहन व्हायचं नाही. ‘हे असं कशाला केलंत? कुणी सांगितलं होतं तुम्हाला हे करायला? उगीच काही तरी करत जाऊ नका,’ अशा शब्दांत ती त्यांचा पाणउतारा करायची. थोडक्यात काय, सुनेच्या दृष्टीनं त्या अडगळ झाल्या होत्या. आणि एके दिवशी ती अडगळ तिनं वृद्धाश्रमात नेऊन टाकली. त्यांना वृद्धाश्रमात पोचल्यावर मुलगा-सुनेनं सुटकेचा नि:श्वास टाकला. पण, नातीनं नाही टाकला. तिला सारखी आजीची आठवण यायला लागली. ती शाळेतून यायची तेव्हा नेहमी घराला कुलूप असायचं, कारण आई-बांबाच्या नोकर्या. कामावरून घरी यायला त्यांना उशीर व्हायचा. आईनं काही तरी करून ठेवलेलं असायचं तेच तिला संध्याकाळी खावं लागायचं. त्या वेळी तिला आजीनं केलेला एखादा गरम पदार्थ आठवायचा आणि तिच्या डोळ्यांत पाणी जमा व्हायचं. तिच्या अभ्यासातसुद्धा आजी तिला मदत करायची. त्यामुळे आजीची उणीव तिला जास्तच भासायला लागली. या सगळ्यांचा तिच्या मनावर अतिशय परिणाम झाला. ती सारखी आजारी पडायला लागली. डॉक्टर म्हणाले. ‘शारीरिक दोष काही नाही; पण ती मनानं फार खचलीय. एकटेपणाची तिला भीती वाटते. तिला घरात एकटी ठेवू नका? डॉक्टरांचं बोलण ऐकून मंगलाताईंचे मुलगा-सून चक्रावून गेले. यावर इलाज काय? नोकरी सोडून घरी तर बसायचं नाही.
मुलगा म्हणाला, ‘आपण आईलाच पुन्हा घरी आणू या! दुसरा काही इलाजच नाही!’ आणि सांगायची गोष्ट म्हणजे या कारणासाठी मंगलाताईंना पुन्हा घरी आणलं गेलं. ज्या मंगलाताईंची अडगळ सुनेला घरात नको होती, तीच अडगळ कामी आली. नातीची तब्येत सुधारली.
या विषयाचा विचार करताना मला पूर्वीच एक प्रसंग आठवतोय. एकदा मे महिन्याच्या सुटीत वेळ जाईना म्हणून मी आणि भावानं घर आवरायचं ठरवलं. आमच्या परीनं आम्ही ते आवरलंही; पण वडिलांची महत्त्वाची कागदपत्रं असलेली अटॅची त्या गडबडीत सापडेनाशी झाली. बरेच दिवस टेबलाखाली असलेली ती अटॅची होय? ती आम्ही अडगळीच्या खोलीत ठेवलीय. बरेच दिवस ती टेबलाखाली होती. आम्हाला वाटलं महत्त्वाचं नसेल तिच्यात काही! ‘परस्पर असा निर्णय घ्यायचा नाही. मला विचारायचंत तरी!’ वडील थोड्या रागानं म्हणाले. अडगळीच्या खोलीनं ती अटॅची व्यवस्थित सांभाळून ठेवली होती.
हा प्रसंग आता आठवण्याचं कारण म्हणजे, घरातल्या अडगळीमध्येसुद्धा काही महत्त्वाचं सापडू शकतं. आजी-आजोबांना अडगळ समजून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करायची आणि मग मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना संस्कारवर्गाला पाठवायचं, हे कितपत बरोबर आहे? आजी-आजोबा जर घरातच असले, तर नकळत ते मुलांवर चांगले संस्कार करीत असतातच की!
आई-वडील दोघंही हल्ली नोकरी करीत असतात. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. म्हणून त्यांना ट्यूशनला पाठवलं जातं. अगदी पहिलीपासून. हल्लीचे आजी-आजोबा काही अशिक्षित नसतात. छान शिकलेले असतात. ते जर घरात असतील तर ते मुलांचा अभ्यास नक्की घेऊ शकतील; पण त्यांना तर निरुपयोगी अडगळ समजायचं!
या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. शेवटी एवढंच सांगावंस वाटतं, की निरुपयोगी म्हणून टाकून दिलेली वस्तूसुद्धा उपयोगी पडू शकते!
पण, एवढं मात्र खरं, की सगळाच दोष तरुण मंडळींना देऊन चालणार नाही. ज्येष्ठांनीही त्यासाठी काही तरी केलं पाहिजे. तरुणांच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय करायचं? इंटरनेट, लॉपटॉप, गुगल, व्हॉटस्अँप, फेसबुक, कॉम्प्युटर आणि मोबाईलमधल्या सुविधांची माहिती करून घेऊन ही उपकरणं वापरण्याची सवय केली पाहिजे. त्यामुळे ज्येष्ठ तरुण मंडळींच्या जवळ पोहोचतील आणि ते त्यांना अडगळ न वाटता पूजनीय वाटतील!
(लेखिका साहित्यिक आहेत.)