रवींद्र राऊळ
आपल्या आस:याची, घरटय़ाची ओढ पशु-पक्ष्यांनाही असते. मनुष्यप्राण्याला तर घराची ओढ असतेच असते. मग तरीही मुलं घर का सोडतात, हा प्रश्न त्यांच्या पालकांना विचार करायला लावणारा आहे. घरगुती हिंसाचार, व्यसनाधीन पालक, अभ्यासासाठी लावला जाणारा असह्य तगादा, त्यांची मानसिकता समजून न घेणं, अशी अनेक कारणं मुलांना घर सोडून परागंदा व्हायला भाग पाडतात. अगदी दुष्काळाच्या चटक्यांमुळेही चिमुरडी पलायन करत आहेत.
अलिबागचा रमेश जगताप हाही असाच घरातील कटकटींना कंटाळून मुंबईला आलेला. आईबाबा कामाला गेल्यावर मोठा भाऊ असह्य मारहाण करतो म्हणून त्याने थेट मुंबई गाठली. अंधेरीला आपला चुलत काका राहातो इतकंच त्याला माहीत. पण इथे आल्यावर अंधेरी किती मोठी आहे, याचा अदमास त्याला आला. काकाचं घर सापडणार नाही, हे लक्षात येताच तो अंधेरी स्थानक परिसरातच राहू लागला. पोलिसांनी त्यालाही पालकांच्या ताब्यात दिलं. ‘‘बाबा, मी तुमाला कितीदा सांगितलं, दादा मला खूप मारतो. पण आयकलंत का माझं?’’, असं त्याने पित्याला पोलिसांसमोर विचारलं तेव्हा पिताही खजिल झाला.
छत्तीसगढमधील वरदा येथील सतरावर्षीय मुलीला मुंबईच्या स्थानकात एकटीच फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. घरच्या गरिबीमुळे आईवडील वयस्कर इसमासोबत लग्न लावणार असल्याने त्याला विरोध म्हणून आपण पळ काढल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. इचलकरंजीतील नेहरूनगरातील 16 वर्षाचा मुलगा आणि त्याची 14 वर्षीय बहीण यांनीही घरातील वादविवादांना कंटाळून घर सोडलं होतं.
दुरावलेले नातेसंबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक- शारीरिक शोषण, मानसिक छळ, वैफल्य, वैराग्य, फसवणूक अशा कारणांमुळे घर सोडून परागंदा होण्यात मुलांप्रमाणोच प्रौढही आहेतच की. त्यांच्या मनोविश्वातील खळबळ लक्षात येत नसल्याने कुणी त्यांची दखल घेत नाही. कुटुंबीय त्यांच्या शोधासाठी जंगजंग पछाडत असताना ते कुठेतरी आपली सोय करून गुजराण करत असतात.
बेपत्ता व्यक्ती कुठे असेल? काय करत असेल? काय खात असेल? कधी परतेल, असे प्रश्न घरच्यांना छळत राहातात. ती सापडेर्पयत जिवाला घोर लागून राहातो. जाणा:या व्यक्तीची एकच वाट असते. पण त्याला शोधण्याच्या वाटा हजारो असतात. कुठे, कसं शोधायचं हा प्रश्नच असतो. मग सुरू होते शेवट काय आणि कधी होईल हे ठाऊक नसलेली लढाई म्हणजेच शोधमोहीम. कधी त्या व्यक्तीचा शोध लागतो तर कधी लागतच नाही. काही जणांचा शोध लागतो तेव्हा अपघाती मृत्यू, हत्त्या असं काहीतरी अघटित घडलेलं असतं. काही प्रकार अपहरणांचेही असतात.
घर सोडून दिशाहीन भटकणा:या एका मुलाशी पोलिसांनी संवाद साधला असता एक इसम आपल्याला लोकलमध्ये वस्तू विकायला लावत असल्याचं त्याने सांगितलं. त्या इसमाकडे आपल्यासारखीच आणखी 3क् ते 4क् मुलं काम करत असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. म्हणजेच या मुलांचं कुठल्या ना कुठल्या मार्गाने शोषण होत असल्याचं आढळतं.
बेपत्ता व्यक्तीची कधी अल्पावधीत तर कधी प्रदीर्घ कालावधीनंतर सुरक्षित घरवापसी होते तेव्हा तर घरच्यांच्या आनंदाला पारावार ऊरत नाही. लहानपणी कुणी हरवून त्यानंतर लगेचच सापडलेला असेल तर पुढे आयुष्यभर त्याचे पालक कौतुकाने त्याची ती कहाणी सा:यांना ऐकवत राहातात. पण लहान मुलांचं असं हरवण्याचा वयोगट साधारण चार - पाच वर्षार्पयतचा असतो. कारण अशी हरवलेली मुलं आपल्या घराचा ठावठिकाणा सांगू शकत नाहीत.
मिसिंगच्या प्रत्येक प्रकरणामागे वेगवेगळी कारणं आणि वेगवेगळ्या कहाण्या. वयोगटानुसार ती बदलत असतात. काही मिसिंग प्रकरणांत लहान मुलं खरोखरच हरवलेली असतात. अनोळखी, सार्वजनिक ठिकाणी पालकांची साथ सुटली की भांबावतात. आपल्या घराचा ठावठिकाणा सांगू शकत नाहीत त्या हरवलेल्या मुलांची घरवापसी त्यांना पोलिसांर्पयत पोहोचवणारा कुणी भेटतो का यावर अवलंबून असते. काही मुलं अपघाताने हरवतात तर काही मुलं स्वत:हून घरापासून दूर जातात. सावत्र आई अथवा पित्याकडून होणारा छळ, उपेक्षा, उपासमारी, कुसंगत यामुळे घरातून पळून जातात. काही आईवडिलांच्या ताब्यातून निसटतात आणि अनोळखी जगात येऊन पडतात. बराच काळ लोटला की घरच्यांबद्दलच्या त्यांच्या स्मृती हळहळू पुसल्या जातात. त्यांच्याबद्दल ओढ राहात नाही आणि ती बाहेरच्या जगात रमून जातात. अशी मुलं घरी परतण्याची शक्यता धूसर होते.
कुणीही हरवणं, बेपत्ता होणं म्हणजेच मिसिंग होणं म्हणजे काय? तर त्याच्या कुटुंबीयांना त्याचा ठावठिकाणा न लागणं, त्याचा संपर्क पूर्णपणो तुटणं. अपेक्षित वेळेत कोणतीही व्यक्ती घरी परतली नाही आणि त्याने संपर्कही केला नाही तर ती व्यक्ती मिसिंग असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली जाते.
मिसिंगच्या प्रकरणात स्थानिक पोलीस अथवा पोलिसांचा मिसिंग पर्सन ब्युरो काय करतो तर हरवलेल्या व्यक्तीचं रेकॉर्ड ठेवतो. पोलीस नोटीसमध्ये हरवलेल्या व्यक्तीची माहिती, वर्णन प्रसिद्ध केलं जातं. वायरलेस मेसेज पाठवला जातो. छायाचित्रसह अन्य माहिती सर्व शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवली जाते. दूरदर्शनवर माहिती प्रसारित करण्यासाठी पाठवली जाते. गेस्ट हाऊस, हॉस्पिटल, रेल्वेस्थानकं, विमानतळ, बस आगार, उद्यानं अशा सार्वजनिक ठिकाणी शोध घेतला जातो. रेल्वेच्या मिसिंग पर्सन ब्युरोकडे चौकशी केली जाते. हरवलेल्या नातेवाइकांच्या संमतीने छायाचित्रसह वर्णन प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रंकडे पाठवली जाते.
अर्थात हे झाले केवळ सांगण्यापुरते आणि ठरलेले सोपस्कार. पोलीस अधिकारी खासगीत जे काही सांगतात ते मात्र धक्कादायक आहे. त्यांच्या अनुभवानुसार व्यक्तीच्या हरवण्याबाबत पोलीस कधीच फारसा गंभीरपणो तपास करीत नाहीत. (अपवाद अपहरणासारख्या गुन्ह्यांचा) त्यातल्या त्यात व्यक्ती अल्पवयीन असेल तर थोडाफार शोध घेतला जातो. प्रौढांच्या बाबतीत फारसा प्रयत्न केला जात नाही. मात्र ती व्यक्ती कुणा व्हीआयपीशी संबंधित असेल तरच कसून शोध घेण्याचा प्रयत्न होतो. वानगीदाखल सांगायचं तर मुंबई पोलिसांचीही याबाबत तपास करण्याची पद्धत वर्षानुवर्षे सरळधोप आहे. अगदी ब्रिटिश कालापासून मिसिंग रजिस्टर मेंटेन करण्याचा प्रकार आजही कायम आहे. त्यात हरवलेल्या व्यक्तीचं नाव, फोटो, वय, पत्ता, वर्णन नोंदवलं जातं. हाच तपशील पोलीस नोटिशीत असतो आणि वायरलेसवर पाठवला जातो. म्हणजेच निव्वळ खानापूर्ती म्हणजेच सांख्यिकी जंत्री गोळा करायची आणि ती साप्ताहिक, मासिक बैठकीत सादर करायची इतकंच मिसिंग पर्सन ब्युरोचं काम. पण त्याचं पुढे काय होतं?
नोटिशीतील माहिती अन्य पोलीस ठाण्यांना जाते तेव्हा ती फार तर दोन — चार पोलीस अधिकारीच वाचतात. ती माहिती कनिष्ठ अधिकारी अथवा कॉन्स्टेबलना दिली जात नाही. वास्तविक पोलीस ठाण्यातील शिपायापासून सर्वाना ती द्यायला हवी. त्यांनी ती आपल्या डायरीत नोंदवून घ्यायला हवी आणि त्याआधारे कुणी आढळल्यास ते पोलीस ठाण्याला कळवायला हवं. तेच वायरलेस मेसेजच्या बाबतीतही होतं. पोलीस ठाण्यातील वायरलेस ऑपरेटर ती माहिती फारतर टिपून घेतो. पण स्टेशन इन्चार्जला देतोच असं नाही. अर्थात त्यांनाही ती जाणून घेण्यात रस नसतो किंवा कामाच्या धबडग्यात वेळही मिळत नसतो.
वाढत्या मिसिंग प्रकरणांची स्थिती लक्षात घेऊन हरवलेल्या मुलांबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत पोलीस समाधान व्यक्त करतात. आतार्पयत मिसिंग हे अदखलपात्र (नॉन कॉगिAङोबल) असल्याने त्यात तपास करता येत नव्हता. सखोल चौकशीसाठी झडती वॉरंटसह अनेक अधिकार आले आहेत. परिणामी व्यवस्थित तपास करता येत आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलांना बालगृहात ठेवलं जातं. मात्र बालगृहांची दुरवस्था सर्वज्ञात आहे. ही मुलं तेथे राहाण्यास नाखूश असतात. तरीही या मुलांना तेथेच ठेवण्याचा सरकारी अधिका:यांचा आग्रह असतो. अनेक स्वयंसेवी संस्थाही घर सोडून महानगरे गाठणा:या मुलांना हुडकण्याचं काम करतात. या संस्थांना पुनर्विकास केंद्र सुरू करण्यासही सरकार परवानगी देत नाही. नियमांचा काथ्याकूट केला जातो.
गेल्या सात वर्षात साडेपाच हजार मुलांची घरवापसी करणा:या समतोल फाउण्डेशनचे विजय जाधव सांगतात, ‘देशाच्या कानाकोप:यातून अनेक लहान मुलं दररोज कामाच्या शोधात, फसवणुकीमुळे किंवा घरच्यांशी झालेल्या भांडणानंतर मुंबई -ठाण्यासारख्या शहरात येतात. अशा मुलांकडे कोणाचंच लक्ष जात नाही. भीक मागणा:या इतर मुलांमध्ये ती मिक्सअप होतात. मिळेल ते काम करून गुजराण करताना ही निष्पाप मुलं गुन्हेगारीकडे वळण्याची भीती असते. त्यामुळे या मुलांशी आपुलकीने बोलून, त्यांच्या समस्या जाणून त्यांना आपलंसं करावं लागतं’.
असह्य परिस्थितीत अथवा तिरीमिरीत घर सोडलेल्या मुलांच्या मनात घराची ओढ निर्माण करण्याची, भरकटलेल्या चिमुकल्यांना मायेची ऊब देण्याची गरज आहे. ती मिळाली तर त्यांना परत आपलं हक्काचं घर मिळण्याची शक्यता आहे. हरवलेल्या, आई-वडिलांपासून, कुटुंबापासून पारख्या झालेल्या, वणवण फिरत आयुष्य काढणा:या या मुलांना प्रतीक्षा आहे याच मायेच्या ममतेची.
पालकांच्या भावनांशी खेळ
पोलीस ठाण्यात अथवा रेल्वे पोलीस ठाण्याच्या आसपास चक्कर मारली तर तेथील नोटीस बोर्ड ‘हरवला आहे’, ‘लापता’, ‘मिसिंग’ अशा शीर्षकाची असंख्य पत्रकं लटकवलेली आढळतात. त्यावर हरवलेल्या व्यक्तींचे फोटो आणि वर्णनं असतात. जर त्या वर्णनाची व्यक्ती सापडली तर संपर्क साधण्यासाठी फोन नंबरही दिलेला असतो. अनेकदा तक्रारदार त्यासाठी इनामही जाहीर करतात.
लहान मुलांची अशी पत्रकं शोधून त्यावरील फोनवर संपर्क साधून ‘तुमचं मुल कुठे आहे ते आम्हाला ठाऊक आहे’, असं खोटंच सांगत पैसे उकळण्याचाही प्रयत्न केला जातो.
अनेक पालकांना त्यांच्या भावनांशी खेळणा:या समाजकंटकांचे क्लेशकारक अनुभव येत असतात.
ंमुंबईत दर महिन्याला सरासरी
884 व्यक्ती बेपत्ता होतात.
गेल्या दहा वर्षामध्ये मुंबईत
एक लाख दहा हजार जण गायब झाले.
नंतर त्यातले लाखभर सापडले.
देशाची आकडेवारी तर हादरवणारी आहे.
1 मिनिटाला
2 ‘मिसिंग’!
मुंबई पोलिसांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार दर महिन्याला सरासरी 884 व्यक्ती बेपत्ता होतात. यात लहान मुलं, मुली आणि प्रौढ स्त्री-पुरुष असे सर्वच आले. गेल्या दहा वर्षामध्ये मुंबईत तब्बल एक लाख दहा हजार 547 व्यक्ती बेपत्ता झाल्या. कालांतराने त्यातील एक लाख 439 व्यक्ती सापडल्या अथवा त्यांचा ठावठिकाणा समजला. पण दहा हजार 1क्8 व्यक्ती अजूनही बेपत्ताच आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये विशेषत: महिला आणि मुलींचं प्रमाण अधिक आहे. प्रेमप्रकरणातून पळून जाणं हे त्यामागचं प्रमुख कारण. त्यानंतर अधिक प्रमाण आहे ते अल्पवयीन मुलांचं. ही केवळ मुंबईची आकडेवारी. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारे, बॉलिवूडच्या करिअरने झपाटलेले, मुंबई पाहाण्याची इच्छा असलेली हजारो मुलं मुंबईत धडकतात. यावरून राज्यात आणि देशात दरमहा कसे हजारो जण बेपत्ता होत असतील, याचा कल्पना यावी.
देशभरात हरवणा:या व्यक्तींची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. कारण अनेक प्रकरणात तक्रारच दाखल केली जात नाही. मात्र एका अंदाजानुसार देशभरात वर्षाला सुमारे दहा लाख जण घर सोडून पळ काढत असतात. म्हणजेच दर तीस सेकंदाला एकजण ‘मिसिंग’ होत असतो!.
कुठे मिळतो आश्रय?
घर सोडून पळणा:या मुलांना महानगरांमध्ये आसरा मिळणं फारसं कठीण नसतं. रेल्वेस्थानकं, बस आगारं, मंदिर-मशिदींसारखी प्रार्थनास्थळांचे परिसर येथे ते आश्रय घेतात. शहरांमध्ये कॅटरिंगवाल्यांकडे काम करून मिळेल त्या जागेत पथारी टाकणा:या मुलांची संख्या मोठी आहे. बालमजुरीला कायद्याने बंदी असली तरी चोरीछुपे बालमजुरांना राबवण्याचे प्रकार सुरूच असतात. मान खुर्द, गोवंडीसारख्या ठिकाणी चालणा:या जरीकामासाठी घरातून पळून आलेल्या मुलांना हेरून राबवलं जातं. वर्षानुवर्षे अशी अंगमेहनतीची कामं करून या मुलांचं बालपणच कोमेजून जातं. अधूनमधून अशा ठिकाणी पोलिसांचे छापे पडतात आणि बालमजुरांची सुटका केली जाते. पण पुन्हा ही मुलं कामाच्या शोधात भटकताना दिसतातच. अगदीच काही जमलं नाही तर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, भंगार गोळा करण्याचं काम पत्करलं जातं. रेल्वेस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशी मुलं भटकताना दिसतात.
समतोल फाउण्डेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकत्र्या अशा मुलांना हुडकून काढतात. मात्र अशा मुलांशी बोलणं, त्यांची मन:स्थिती समजून घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणं हे खूप कठीण काम असतं. घर सुटल्यामुळे सैरभैर झालेली, वाईट संगतीनं व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या, कुमार्गाला लागलेल्या मुलांशी बोलून हे कार्यकर्ते त्यांना शिबिरात नेतात. तात्पुरत्या निवासगृहात ठेवून त्यांच्यासाठी मतपरिवर्तन शिबिरं घेतली जातात. ध्यान, ज्योत, अनौपचारिक शिक्षण, समुपदेशन अशा विविध सत्रंद्वारे या मुलांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अशाप्रकारे आजवर शेकडो मुलांची त्यांच्या घरी पाठवणी करण्यात
समतोल फाउण्डेशनला यश आलंय.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत
मुख्य वार्ताहर आहेत.)
ravirawool@gmail.com