- डॉ. अभय बंग
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत, पुण्यात, या वर्षभरात रेव्ह पार्टीत, नववर्षाच्या पार्टीत मध्यम वर्गातील शेकडो युवक मद्यधुंद अवस्थेत सापडले. त्यामुळे स्वाभाविकत: पुण्यातील पालकवर्ग अस्वस्थ झाला. हा बिहारी विद्यार्थ्यांचा परिणाम, असेही स्पष्टीकरण की तुष्टीकरण शोधून काढण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वच पालकांनी याचे खरे कारण समजून घेण्यासाठी तीन गोष्टी लक्षात घ्याव्यात.
- ६0 कोटी लिटर मद्यनिर्मिती करणार्या राज्यात कोणी तरी ते मद्य प्यायलाच पाहिजे. शिवाय, धान्यापासून दारूनिर्मितीच्या कारखान्यांना १00 कोटी लिटर मद्यनिर्मितीचे परवाने देऊन ठेवलेले आहेत. धान्यापासून मद्यनिर्मिती करणारे हे कारखाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबातच असल्याने त्यांच्या फायद्यासाठी त्यांना लिटरमागे दहा रुपये प्रोत्साहक अनुदान शासनच देते आहे. मद्य साम्राज्याचा हा बीभत्स चेहरा आहे.
एकोणिसाव्या व विसाव्या शतकात ब्रिटनने चीनला अफू निर्यात करून अफू साम्राज्य निर्माण केले. अफूची आयात थांबवण्याचा प्रयत्न चीनने केल्यावर त्याची नाकेबंदी करून ब्रिटनने चिनी लोकांना अफू खाणे सुलभच नव्हे, जणू सक्तीचे केले. चीनवरील ब्रिटनचे अफूसाम्राज्य हे साम्राज्यवादाच्या इतिहासातील काळेकुट्ट प्रकरण आहे. तसेच, महाराष्ट्रावर निवडक कुटुंबांचे मद्यसाम्राज्य आहे. जनतेने दारू पिणे या मद्यसाम्राज्याचा आधार आहे. मग, युवकांना कसे प्रवृत्त करावे?
जागतिक मद्य कंपन्यांनी जाणीवपूर्वक अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखली आहे (पाहा जागतिक आरोग्य संघटनेचा मद्यनीतीवरील अहवाल), की दीर्घ काळासाठी दारू पिणारे, बांधलेले गिर्हाईक हवे असल्यास म्हातार्यांचा उपयोग नाही, किशोर व युवक वयोगटावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यानुसार युवकांमध्ये मद्यसंस्कृती निर्माण करणार्या शेकडो युक्त्या आपण टीव्हीवरील जाहिराती, सेलिब्रिटींचे चेहरे, रेव्ह पाटर्य़ा, वाईन महोत्सव अशा विविध रूपांत बघत असतो.
परिणामत: दारू पिणे सुरू करण्याचे सरासरी वय भारतात पूर्वी जे २७ वर्षे होते ते आता १७ वर्षांवर आले आहे. १७ वर्षे वयात, म्हणजे अकरावी-बारावीत असताना अनेक मुले-मुली बिअर, वाईन, शाम्पेन घेणे सुरू करीत आहेत ते आता आधुनिक असल्याचे चिन्ह बनत आहे. अनेक मध्यमवर्गीय मराठी स्त्रियाही आता क्लबमध्ये किंवा घरच्या पार्टीमध्ये पिऊ लागल्या आहेत.
- दिल्लीमधील ‘निर्भया’ कांड, गोव्यामधील तरुण तेजपाल कांड, मुंबईमधील पत्रकार मुलीवरील बलात्कार या व अशा स्त्रियांवरील अत्याचारांच्या बहुतेक बातम्यांमध्ये एक छोटीशी ओळ हमखास असते. अत्याचारी पुरुष दारूच्या नशेत होता. दारूच्या प्रभावामुळे पुरुष सहज पशू होऊ शकतो. दारू ही स्त्री- अत्याचाराची जननी आहे.
- स्त्रिया लैंगिक अत्याचाराला विरोध करतात. त्यावर पुरुषांनी शोधलेला उपाय आहे तिला दारू पाजून वश करायचा. तरुण तेजपाल असो की उच्चतम न्यायालयाच्या एका न्यायाधीशावरील आरोप- दोघांनी अत्याचाराच्या प्रयत्नापूर्वी सोबतच्या तरुण मुलींना वाईन ऑफर केली होती, असे बातम्या सांगतात.
- स्त्री ही संस्कृतीचे गर्भगृह असते. मद्यसाम्राज्याचे गलिच्छ हात आता संस्कृतीच्या गर्भगृहात पोहोचत आहेत. सिंधूच प्यायला लागल्यावर तळीरामांचे फावणारच!
जागतिक नवे चिंतन :
अशिया खंडातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख या धर्मांमध्ये हजारो वर्षांपासून दारू पिणे निषिद्ध मानले गेले आहे. पण, आज ज्या पाश्चिमात्य संस्कृतीचे जगावर राज्य आहे, ती मूलत: ओली संस्कृती आहे. तिथेदेखील दारूबाबत समाजाची मनोभूमिका व शासकीय नीती गेल्या दीडशे वर्षांत वेळोवेळी बदलत राहिल्या आहेत.
आधुनिक काळात सन १८६0 ते १८८0 हा प्रतिव्यक्ती सर्वांत अधिक दारूवापराचा काळ मानला जातो. या काळात गोर्या लोकांच्या देशात दारूचा प्रचंड सुकाळ माजला होता. अशा दारूनीतीचे दुष्परिणाम व्यापक झाल्याने सन १८९0पासून १९२0पर्यंतच्या काळात अमेरिका व युरोपमध्ये समाजसुधारक व प्रामुख्याने स्त्रियांनी चळवळी करून अनेक देशांमध्ये दारूबंदी आणली. सन १९२0 ते १९५0 या काळात दारूबंदी लागू होती. त्यानंतर अंमलबजावणीच्या र्मयादांमुळे ती ‘फसली’, असे ठरविण्यात आले. (वस्तुत: या काळात अमेरिका व युरोपमधील दारूचा खप व दारूमुळे होणारे रोगमृत्यू कमी झाले होते.) त्यामुळे दारूबंदी ‘अव्यावहारिक’ म्हणून हटवण्यात आली. त्यानंतर साधारणत: सन १९५0 ते १९९0 हा मुक्त दारू धोरणाचा काळ झाला. जगभर दारू व तिचे दुष्परिणाम प्रचंड वाढले. सन १९८५पासून सोव्हिएत युनियनमध्ये गोर्बाचेव्ह यांनी दारूविरुद्ध नियमन आणायला सुरुवात केली. व्होडका पिऊन रशियन कामगार काम करीत नाहीत, उत्पादन घसरले व दारूमुळे होणार्या मृत्यूंमुळे लोकांची आयुर्र्मयादा कमी व्हायला लागली या कारणांस्तव त्यांनी आंशिक दारूबंदी लागू केली. बोरिस येल्त्सिन या मद्यपी राष्ट्राध्यक्षाच्या काळात दारू पुन्हा खुली झाली. अमेरिकेमध्ये पाहुणे राष्ट्राध्यक्ष म्हणून गेले असता येल्त्सिन रात्री दारू पिऊन वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊससमोरील रस्त्यावर नग्नावस्थेत आले होते. राजनैतिक नेत्यांच्या व्यक्तिगत सवयींचा किंवा व्यसनांचा शासकीय नीतीवर कसा परिणाम होतो, याचे ते उदाहरण होते. रशियात पुन्हा काही काळ दारूचा कहर माजला. शेवटी दोन वर्षांपूर्वी रशियाने पुढील काळात दारूचा एकूण खप ७५ टक्क्यांनी कमी करण्याची राष्ट्रीय नीती ठरवली आहे.
युरोपमध्ये दारूचे दुष्परिणाम बघून युरोपियन युनियनने १९९५मध्ये क्रमश: दारू नियंत्रणाची नीती स्वीकारून पुढील पाच वर्षांत दारू ३३ टक्क्यांनी कमी करण्याचा सामूहिक निर्णय घेतला. दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रान्स व इटली या देशांनी पाच वर्षांत हे ध्येय गाठलेदेखील.
ओली संस्कृती असलेले पाश्चिमात्य देश मुक्त दारू धोरणापासून क्रमश: वाढत्या दारू नियंत्रणाकडे का वळताहेत?
वैद्यकीय व अर्थशास्त्रीय पुरावा :
अल्कोहोल हा मादक पदार्थ असून, त्याचा परिणाम मेंदूवर व पूर्ण शरीरावर होतो, विविध प्रकारचे ६0 रोग निर्माण होतात, कायमची सवय व व्यसन लागते. व्यसनींचे आयुष्य सरासरी १५ वर्षांंनी कमी होते. मद्यपानामुळे एकूण मृत्यूचे प्रमाण वाढते. जगभरात दारूमुळे दर वर्षी ३३ लाख मृत्यू होतात. (जागतिक आरोग्य संघटना, २0१४).
दारू कुठल्याही माणसाला घातक ठरू शकते; पण विशेषत: भारतीय उपखंडातील (व पूर्व युरोप आणि रशियामधील) लोकांना आपल्या दारू पिण्यावर आत्मनियंत्रण ठेवता येत नाही. त्यांतील अनेक जण भरमसाट पिणारे (बिंज ड्रिंकिंग) बनतात. ‘रोज एक ते दोन ग्लास ‘माफक’ दारू प्यायल्यामुळे हृदयरोग कमी होतो म्हणून नियमित थोडी दारू प्या,’ असा भ्रामक प्रचार मद्य कंपन्यांद्वारे पसरविला जातो. पण, भारतीय संशोधकांना असे आढळले, की रोज एक किंवा दोन ग्लास पिणार्यामंध्येही हृदयरोगाचे प्रमाण वाढते. मृत्यू तर अर्थातच वाढतात. अशा रीतीने भारतीय मद्यपी हा दारूचा सहज बळी बनतो. भारतात दारूमुळे दर वर्षी ८२ लाख वर्षांचे आयुष्य नष्ट होते.
जगभराच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळले, की दारू पिणार्यांपैकी १५ टक्के व्यसनी बनतात. समाजातील लोकांवर केलेल्या दीर्घ काळाच्या पाहणीत तज्ज्ञांना असे आढळले, की जी माणसे ओठाला पहिला प्याला लावतात, त्यातले २0 ते २५ टक्के आयुष्यभरात दारूच्या आहारी जातात व ३0 ते ५0 टक्क्यांना दारूमुळे कोणती ना कोणती समस्या निर्माण होते.
म्हणजे, आत्मनियंत्रणाखाली ‘सुरक्षित सोशल ड्रिकिंग’ हा निव्वळ भ्रम आहे. हा २५ टक्के घात असलेला मार्ग आहे. कल्पना करा, तुमचे एक वैद्यकीय ऑपरेशन करायचे आहे व त्यात २५ टक्के धोक्याची संभावना आहे. तुम्ही कराल? (आज बहुतेक मोठय़ा ऑपरेशनमध्ये धोका एक टक्क्याच्या आसपास असतो.) पण, मग व्यक्तीच्या पिण्याच्या स्वातंत्र्याचे
काय? दारूचा पहिला प्याला पोटात गेल्यावर सर्वांंत प्रथम जे नाहीसे होते, ते असते आत्मनियंत्रण, संयम, विवेक. जो पदार्थ मेंदूला विवेकहीन करतो, त्या पदार्थाच्या सेवनाबाबत नंतर गिर्हाइकाला
‘निवडीचे स्वातंत्र्य’ राहतच नाही, तो पदार्थच पुढला निर्णय घेतो.
म्हणून, आधुनिक विचारक हा प्रश्न विचारू लागले आहेत, की गिर्हाइकाचे निवड स्वातंत्र्य हिरावून घेणार्या दारूचा उपभोग हा मुक्त बाजार व निवडीचे स्वातंत्र्य या मूलभूत तत्त्वांविरोधी नव्हे का? म्हणजे दारू पिण्याचे स्वातंत्र्य निवडले, की जीवनातील इतर सर्व स्वातंत्र्य, विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमताच गहाण टाकली जाते. दारू पिण्याचे स्वातंत्र्य हा भ्रम आहे. वस्तुत: दारू पिणे हे स्वातंत्र्य गमावणे आहे.
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
(पुढील भाग पुढील अंकात)