शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

नौ दो ग्यारह..

By admin | Updated: October 14, 2016 15:13 IST

पहिल्या महायुद्धाच्याही आधी मुंबईत टॅक्सी सेवा सुरू झाली. दरम्यान परिस्थिती खूपच बदलली. तरीही आपल्याकडे अमरपट्टा असल्यासारखे ‘काली-पिली’वाले वागत राहिले.

 - दिनकर रायकर

पहिल्या महायुद्धाच्याही आधी मुंबईत टॅक्सी सेवा सुरू झाली. दरम्यान परिस्थिती खूपच बदलली.तरीही आपल्याकडे अमरपट्टा असल्यासारखे ‘काली-पिली’वाले वागत राहिले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. प्रवाशांनी टॅक्सीला रामराम ठोकला.अ‍ॅपसेवेला प्राधान्य दिले.धंदा मार खाऊ लागल्यावर‘काली-पिली’नेही आपले बुकिंग अ‍ॅप सुरू केले.पण आता फारच उशीर झाला आहे.या टॅक्सीसेवेचे काय होणारहे काळच ठरवेल..मध्यंतरी मुंबईत टॅक्सी बुक करण्यासाठी एक अ‍ॅप सुरू झाले. टॅक्सीसाठीचे अ‍ॅप ही नव्या जनरेशनसाठी अजिबातच अपूर्वाई नाही. त्याची पुरती जाणीव मला आहे. चार दशकांहून जास्त काळ मुंबईत पत्रकारिता केल्यावर हे भान असणे स्वाभाविक आहे. मग टॅक्सीचे अ‍ॅप हा विषय दखलपात्र का वाटला? त्याचे कारणही खास आहे. वर उल्लेख केलेले अ‍ॅप हे ओला, उबरसारख्या आधुनिक टॅक्सीसेवेसाठी नव्हे, तर कालबाह्य मानल्या गेलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी आले. मुंबईकर आताशा तिला काली-पिली असे संबोधतात. मक्तेदारीच्या दीर्घ प्रवासानंतर अचानक स्पर्धेच्या रिंगणात उतरावे लागल्यानंतर आचके देत बंद पडण्याची सुरुवात झालेल्या या टॅक्सीसेवेची ही गोष्ट! ‘काली-पिली’चे अ‍ॅप सुरू झाल्याची बातमी माझ्या डेस्कवर येऊन धडकली, त्याक्षणी माझे मन भूतकाळात गेले. ‘काली-पिली’ केवळ निमित्तमात्र. काळाच्या बरोबरीने बदलले नाही तर काय होते, याचा हा नमुना. भाकरी का करपली, घोडा का अडला आणि पान का सडले, या लहानपणी ऐकलेल्या प्रश्नाची आठवण करून देणारा. तसे पाहिले तर मुंबईतील टॅक्सी सेवेचा इतिहास दीर्घ आहे. पहिल्या महायुद्धाच्याही आधी मुंबईत टॅक्सी सेवा सुरू झाली. ब्रिटिशांच्या राजवटीत तोवर घोडागाडी होती. पुढे ती व्हिक्टोरिया राणीच्या नावाने ओळखली जाऊ लागली. साधारणत: सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचे स्पष्ट प्रतिबिंब सिनेमात पाहायला मिळते. भारतीय सिनेमाही त्याला अपवाद नाही. अर्थात मुंबईत टॅक्सी सुरू झाली, तेव्हा सिनेमा मूक होता. १९११ साली मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी धावू लागल्या. लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीनंतर देशभक्तीचे जहाल वारे वाहू लागल्याचा, लोकमान्य टिळकांनी तयार केलेल्या असंतोषाचा तो काळ. टॅक्सी ही तेव्हा फक्त श्रीमंतांची मिरास होती. सर्वसामान्यांसाठी ती न परवडणारी चैन होती. तेव्हा भारतीय मोटारींचे उत्पादन होत नव्हते. साहजिकच टॅक्सी म्हणून वापरात आलेल्या मोटारी प्लायमाऊथ, डॉज किंवा शेवर्ले अशा विलायती, आलिशान होत्या. या टॅक्सी रस्त्यावर धावायच्या तेव्हा सर्वसामान्यांच्या नजरा त्याकडे वळायच्या. असो. इतक्या मागे, म्हणजे माझ्या जन्माच्याही अगोदरच्या काळात डोकावण्याला कारण आहे. ते असे, की मुंबई शहरात सुरू झालेल्या टॅक्सीसेवेचा बाज श्रीमंती होता. ते एक सार्वजनिक वैभव होते. कालांतराने म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात अ‍ॅम्बॅसिडरने प्लायमाऊथ, शेवर्ले वगैरेंची जागा घेतली. तोवर सिनेमा बोलका झाल्यासही काही काळ उलटला होता. एखादी सेवा निव्वळ भौतिक असत नाही. त्यातून काही भावनिक बंध-अनुबंध तयार होतात. हर्ष-खेदाचे अनुभव गाठीशी येतात. विशेषत: अशी सेवा जेव्हा जनसामान्यांच्या आवाक्यात येते, तेव्हा अशा अनुभवांचा परीघही विस्तारतो. ‘काली-पिली’च्या बाबतीत नेमके हेच घडले. मी मिळवायला लागलो, तेव्हाही टॅक्सीने जाणे हा तसा चैनीचाच मामला होता. पण सामान्यांच्या अगदीच आवाक्याबाहेरचा विषय नव्हता. टॅक्सीचे किमान भाडे, आजच्या भाषेत मिनिमम मीटर रुपयाच्या आत असल्याचे मला चांगले आठवते. एक काळ असा होता, की साधारणत: बोरीबंदर, दादर, मुंबई सेंट्रल यासारखी मोठी रेल्वे स्टेशन्स आणि प्रवासी बंदर असलेला भाऊचा धक्का इथे अपरिहार्यपणे लोकांना टॅक्सीचा वापर करावा लागायचा. यथावकाश ट्राम इतिहासजमा झाली. बेस्टने बस वाहतुकीची धुरा पेलली. त्याचवेळी टॅक्सींची संख्या आणि वापर या दोहोंतही वाढ झाली. अर्थशास्त्राचे काही व्यावहारिक नियम मुंबईत प्रकर्षाने अनुभवास येतात. टॅक्सी सेवा, तिचा विस्तार, वापर, लोकप्रियता आणि कालांतराने तिच्याविषयी मनात निर्माण झालेली अढी हा त्यातीलच एक अनुभव आहे. अनुभवाचेही जेव्हा सार्वत्रिकीकरण होते, तेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजू प्रकर्षाने समोर येतात. अर्थात जो अनुभव अधिकांना अधिक काळ येतो, तो नियमासारखा जनमनावर ठसतो. नाण्याची दुसरी बाजू उरते, ती अपवादापुरती! ‘काली-पिली’चे नेमके हेच तर झाले. मागणी वाढू लागली. पुरवठ्याचा तुटवडा झाला. मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. बेटावरची मुंबई उपनगरांकडे सरकत गेली. मूळ मुंबई बेटावर म्हणजे कुलाब्यापासून शीव आणि माहीमपर्यंत रिक्षा सेवा तेव्हाही नव्हती. परिणामी बस आणि रेल्वेव्यतिरिक्त फक्त टॅक्सीचाच आसरा होता. व्हिक्टोरिया गरजेपेक्षाही हौसेसाठी वापरली जाई. प्रमोद नवलकरांसारख्या भन्नाट भटक्याने घोडागाडीचा रात्रीच्या मुंबईत होणारा वापर अधूनमधून अधोरेखित केला. मुद्दा इतकाच की पुरवठ्याच्या मानाने मागणी वाढत गेली, तशी टॅक्सीचालकांची वृत्ती बदलत गेली. मुजोरी शिरजोर झाली. तशात मुंबईत खूपच कमी चालक असे होते, ज्यांच्या मालकीची टॅक्सी होती. मालक एक आणि चालविणारा दुसराच, या गणितातून टॅक्सीचालक आणि प्रवासी यांच्यातील नाते बदलत गेले. त्यात दुराव्याच्या बरोबरीने तेढही येऊ लागली. प्रवासी कोण आहे, याचा मुलाहिजा न ठेवता बेदरकारपणे भाडे नाकारण्याला सुरुवात झाली. प्रवासी अपंग, गरोदर, वृद्ध, आजारी असला तरी त्याची पर्वा न करता भाडे नाकारणे हा हक्क असल्याच्या थाटात टॅक्सीचालक वागू लागले. तशात युनियनचे भरभक्कम पाठबळ लाभल्यानंतर तर बेमुर्वतखोरीचा कहर होऊ लागला. अमुक ठिकाणी येणार का, असे विचारायला गेलेल्या प्रवाशाची दखलही न घेता तुच्छपणे इतरत्र नजर फिरविणाऱ्या टॅक्सीवाल्यांपायी लोक त्रस्त झाले. प्रवासी हा जणू काही भीक मागतो आहे, अशा थाटात त्यांचे वागणे होऊ लागले. पावसाळ्यात किंवा एरवीही अन्य कारणाने रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला की मुंबईकरांची कोण त्रेधातिरपीट उडते. अशा दिवशी तर अवाच्या सवा पैसे उकळण्यात टॅक्सीचालक माहीर बनले. हे सारे पर्याय नसल्याने लोक मुकाट सहन करीत राहिले. १९९०च्या दशकात ग्राहकही संघटित होऊ लागले. मग परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. याच काळात चंदेरी-आकाशी रंगाच्या कूल कॅबने मुंबईत प्रवेश केला. मुंबईकरांनी नवे अप्रुप पाहिले. दशकभरातच इंटरनेट क्रांतीमुळे जग वेगाने बदलले. त्याचाच परिपाक म्हणून टॅक्सीच्या सेवेत ओला, उबर यासारखे प्लेअर्स हिरीरीने उतरले. तरीही काली-पिलीवाले ‘नही जाना है भाई, बंद करने का समय हो गया, खाना खाने जाना है, उधर से खाली आना पडता है’ अशी कारणं देत प्रवासी नाकारण्याचे मनमानी व्रत पार पाडतच होते. इतर टॅक्सी सेवा अ‍ॅप घेऊन आल्या, तरी आपल्याकडे अमरपट्टा असल्यासारखे काली-पिलीवाले वागत राहिले. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. धंदा मार खाऊ लागल्यावर ओला, उबरच्या विरोधात लाक्षणिक बंद पुकारू लागले आहेत. पण वेळ निघून गेली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने अलीकडेच केलेल्या पाहणीत ८० टक्क्यांनी काली-पिलीपेक्षा इतर टॅक्सी सेवांना प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले आहे. अ‍ॅपची महती उशिरा लक्षात आल्यावर काली-पिलीने बुकिंग अ‍ॅप सुरू केले. ९२११ हा त्याचा नंबर. याच नंबरची टॅक्सी असलेला नाना पाटेकरचा सिनेमा आला होता... टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह..‘नौ दो ग्यारह’ याचा हिंदीत एक वेगळा अर्थ आहे. पोबारा करणे, गाशा गुंडाळून पसार होणे, या अर्थाचा उलगडा ‘नौ दो ग्यारह’चे अ‍ॅप काढणाऱ्यांना एव्हाना झाला असेलच ना!रुपेरी पडद्यापासून काली-पिलीचा प्रवास..हिंदी सिनेमा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट होता, तेव्हापासून या ‘काली-पिली’ला रुपेरी पडद्यावर जागा मिळाली. चित्तथरारक पाठलागापासून प्रेमकहाणी फुलण्याच्या निमित्तापर्यंत अनेकानेक कारणांनी टॅक्सीचा वापर हिंदी सिनेमाने केला. नायक, चरित्रनायक आणि खलनायकही टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका करण्यात कमीपणा मानत नसत. तात्पर्य इतकेच की टॅक्सी ही समाजजीवनाची अनेक अंगे व्यापून राहिली होती. तिच्याविषयी जनसामान्यांच्या मनात अढी नव्हती. मी शिक्षण-चरितार्थासाठी म्हणून मुंबईत दाखल झालो, तेव्हाची ही भावना मनात खोलवर रुजली. १९६५ च्या सुमारास टॅक्सीच्या धंद्यात फियाट गाड्यांचाही प्रवेश झाला. पुढे प्रीमियर कंपनीने टॅक्सीगाड्यांचे म्हणजे ‘काली-पिली’चे घाऊक उत्पादन सुरू केले. त्याच मोटारीची प्रतिमा टॅक्सी म्हणून जनतेच्या मनावर बिंबली. पुढचा इतिहास नव्याने सांगण्याची गरज नाही.