शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

ना जीवाचा भरवसा ना मरणाचे मोल!

By admin | Updated: January 17, 2015 17:44 IST

जम्मू प्रांतातील सांबा जिल्ह्यात चिचिमाता मंदिरात सध्या लोकांची एक छावणी पडलीय. कडाक्याची

- सुधीर लंके
 
जम्मू प्रांतातील सांबा जिल्ह्यात चिचिमाता मंदिरात सध्या लोकांची एक छावणी पडलीय. कडाक्याची थंडी आणि घरदार सोडून आलेल्या कुडकुडत्या मुला-माणसांची गर्दी. त्यांच्यातच शीलादेवी राहतात. पंचेचाळीसच्या शीलादेवी, कॉलेजात जाणारी त्यांची तरुण मुलगी आणि ऐंशी वर्षांच्या सासूबाई अशा घरातल्या तिघी स्त्रिया सांबा जिल्ह्यातले सुचेतगड नावाचे आपले गाव सोडून या मंदिराच्या आश्रयाला आल्या आहेत. शीलादेवीचा नवरा भारतीय लष्करात आहे आणि सीमेवर लढणार्‍या या जवानाचे अख्खे कुटुंब सरकारच्या छावणीत.शीलादेवीच्या किडनीवर डिसेंबर महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी आराम सांगितला होता. पण ३१ डिसेंबरपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला आणि जो तो आपले चंबुगबाळे उचलून जीव वाचवायला घराबाहेर पडला. घराच्या भिंतींवर तोफगोळे येऊन आदळत असतील, तर कसला आराम आणि जगणे तरी कसले? शीलादेवीच्या सासूबाईंना- पारोदेवींना आपल्या सुनेचे हे हाल बघवत नाहीत. त्या हतबल संतापाने सांगतात, ‘जन्मले तेव्हापासून मी हेच बघतेय. १९४७, १९६५ व १९७१ अशी तीन युद्धे मी पाहिली. आमच्या गावांना बॉम्बगोळे नवीन नाहीत. आता आणखी किती बॉम्ब पाहायचे?’
 
गावात आपल्या घराची काय अवस्था असेल? परत गेल्यावर घर दिसेल का? जनावरांचे काय झाले असेल? ती जिवंत असतील का? - याची काहीही खबरबात नाही.  मिळाले आणि गिळवले तर जेवण, आली तर झोप आणि झाला तर अभ्यास.. सगळे छावणीत!
- माणसे बदलतील, तपशील वेगळा असेल; पण ही कहाणी सीमेवरच्या गावागावांत, घराघरांत आहे. जम्मूतील सांबा आणि कथुआ हे जिल्हे भारत-पाकमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेला लागृून आहेत. या सीमेवर सुरू असलेल्या गोळीबारात जीवितहानी टळावी म्हणून या भागातली गावेच्या गावे उठवून रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सीमा भागातून थोड्या आतल्या गावातली मंदिरे, सरकारी शाळा, ग्रामपंचायतींची कार्यालये हे यांचे तात्पुरते आसरे.  
- परत गेल्यावर आपले गाव आहे तसेच दिसेल की नाही, याची काहीच खात्री नाही. कारण मागे राहिलेल्या गावांत सध्या माणसेच नाहीत. शाळा बंद आहेत. गावांत फक्त पाळीव जनावरे अन् कुत्री फिरतात, कारण जीव वाचवायला पळताना त्यांना सोबत नेता येत नाही. सांबा जिल्ह्यातच बॅम व ग्लाड ही दोन गावे अशी आहेत, जेथील ९0 टक्के लोक सैन्यात काम करतात. ही दोन्ही गावे सध्या निर्मनुष्य आहेत. सैन्यातील जवानही रजा टाकून छावण्यांत आपल्या नातेवाइकांच्या मदतीला आले आहेत.. कडाक्याची थंडी आणि घर सोडून रस्त्यावर आलेले लोक. त्यांचा गुन्हा काय? - तर ते अत्यंत तणावाचे वातावरण असलेल्या सीमेवर राहतात. 
सीमेपलीकडून गोळाबारी सुरू झाली की गाव सोडायचे अन् सुरक्षित स्थळी, शक्य तर शहरात येऊन काही दिवस राहायचे, हे सीमावासीयांना आता नित्याचे झाले आहे. 
सीमा भागातील गावांत बहुतांश घरे दगडांची आहेत. का? - तर दगडांना बंदुकीची गोळी छेदू शकत नाही म्हणून. फायरिंगचा आवाज म्हणजे गावावर संकट आल्याचा अलार्मच जणू. रात्र असेल तर लगेचच मग गावातील दिवे बंद होतात. दिवे बंद केल्याने शत्रूला टार्गेट दिसत नाही, यासाठी ही खबरदारी. मग गाव अंधारात बुडते. घरांतून कुणीही बाहेर पडत नाही. कधीकधी सीमेपलीकडून तोफा डागल्या जातात. मग जीव वाचविण्यासाठी लोक पलंगाखाली झोपतात. घराबाहेर वाळूच्या गोण्या भरून ठेवलेल्या असतात, ज्याच्याआड पटकन लपता येते. हे घमासान सुरू झाले की भेदरलेली मुले अक्षरश: जीव मुठीत धरून न्हाणीघरात रात्र काढतात, कारण त्यांना ती जागा सुरक्षित वाटते. काही गावांमध्ये जमिनीच्या खाली बंकर करण्यात आले आहेत. सात-आठ फूट खोलीच्या या बंकरमध्ये जाऊन माणसे बसतात. दिवसा फायरिंग झाली तर शेतात काम करणारी माणसे तिथेच जमिनीवर झोपून तासन्तास तशीच मुकाट पडून राहतात. कारण उभे राहिल्यावर गोळी लागण्याचा धोका अधिक. गोळ्यांपासून निदान बचाव करता येतो; पण तोफगोळा पडला तर काहीही घडू शकते. बुलेट एके-४७ मधून आली आहे की एसएलआरमधून, हेदेखील नागरिकांना ओळखता येते, इतका हा गोळीबार त्यांना सरावाचा झाला आहे. 
सीमेवरील काही गावांत जायला धड रस्तेदेखील नाहीत. वाहने नाहीत. गोळीबाराच्या वेळी ‘बीएसएफ’चे जवानही शत्रूचा मुकाबला करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे गावकर्‍यांनाच आपापले संरक्षण करावे लागते. गोळीबारात कुणी जखमी झाले, तर गावातील नागरिकच कसेबसे जखमींना दुचाक्यांवर टाकून जवळच्या शहरातील दवाखान्यात हलवितात. मीडियाने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणल्यावर आता कुठे जखमींना बुलेटप्रूफ वाहनांतून दवाखान्यात हलविण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. 
डॉ. अमित वांछू श्रीनगरला असतात. रोटरी क्लबच्या माध्यमातून गोळीबाराच्या प्रसंगी नागरिकांच्या वैद्यकीय मदतीसाठी जातात. ते सांगतात, ‘‘देशातल्या कुठल्याही शहरावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याची मोठी चर्चा होते; पण या गावांना नित्याने अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागते.  या सततच्या तणावग्रस्त वातावरणामुळे गावांतील अनेकांना रक्तदाब आणि मधुमेहाचे आजार जडले आहेत. सीमेवरील गावांची परिस्थिती माहीत असल्यामुळे विमा कंपन्या या भागातील मालमत्तांचा विमा उतरविण्यासाठीदेखील सहसा तयार नसतात. माणसे दगावली तर सरकार प्रतिमाणशी एक लाख रुपये अर्थसाहाय्य देते. कुणी जखमी असेल तर अवस्था पाहून पाच-पंचवीस हजार रुपये दिले जातात. पण एवढय़ाने कसे भागेल? घरे उद्ध्वस्त झाली तर बर्‍याचदा काहीच मिळत नाही. जनावरांचेही तसेच. या भागात सरकारी रोजगारांची संख्या कमी आहे व खासगी रोजगारही नाहीत. अशा वेळी नुकसान भरून काढायचे कसे, हा मोठा प्रश्न असतो.’’
नव्या सरकारने संरक्षण सज्जतेसाठी ८0 हजार कोटींची तरतूद केल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण जम्मू-काश्मीरच्या सीमावासीयांना गोळीबारापासून संरक्षण करायला बंकर द्या, ही मागणी मात्र वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. आम्हाला सुरक्षित जागी भूखंड द्या, अशीही सीमेवर राहणार्‍या नागरिकांची मागणी आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी बाराशे चौरस फुटांचे भूखंड देण्याची घोषणा केली आहे; पण ती प्रत्यक्षात कधी उतरेल, हा प्रश्नच आहे.
सीमेवरील या जीवन-मृत्यूच्या संघर्षाला अनेक तरुण आता कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी आपापली गावे सोडून शहरांमध्ये शिकायला जाणे पसंत केले आहे. नोकरी-रोजगाराच्या शोधात गाव सोडणार्‍यांचे प्रमाणही मोठे आहे. पण ज्यांच्याजवळ काहीच पर्याय नसतो, त्यांना गावात राहावेच लागते. 
जम्मू-काश्मिरात सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि दहशतवाद्यांच्या अंतर्गत चकमकी असा दुहेरी धोका हे जम्मू-काश्मीरचे जणू प्राक्तनच बनलेले आहे. या हिंसाचाराचा अनुभव घेतलेले काही तरुण सध्या पुण्यात ‘सरहद’ संस्थेच्या सहकार्याने शिक्षण घेतात. यात जोगिंदरही आहे. तो दोडा जिल्ह्यातील लेहोटा गावचा. १९९९ साली त्याच्या डोळ्यांदेखत त्याच्या आईवडिलांची आणि कुटुंबातील १५ सदस्यांची दहशतवाद्यांनी हत्त्या केली. जोगिंदरला त्याच्या दीदीने दूर फेकले म्हणून तो वाचला. जोगिंदर वाचला खरा; पण पुढे त्याचे शिक्षण थांबण्याची वेळ आली. तेव्हा एका सभेत तो थेट तत्कालीन मंत्री गुलाम नबी आझाद यांना भेटला. त्यानंतर आझाद यांनी त्याला पुण्यात सरहद संस्थेत शिक्षणासाठी पाठविले. 
काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील बानू मुशर्रफ ही तरुणी सध्या अधिक कदम यांच्या ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून पुण्यात एका प्रशिक्षणासाठी आली आहे. ती सांगत होती- ‘माझे गाव केरण. ते अगदी सीमारेषेला लागून आहे. सीमेवरील नदीवरच आम्ही पाणी भरतो. माझे पाच काका गोळीबारात मारले गेले. तेव्हापासून गावात जाण्याची आम्हाला भीती वाटते. या गावांमध्ये शिक्षकही जायला घाबरतात. त्यामुळे शाळा जवळपास बंदच असतात.’’ बानूसह तिची तीनही भावंडे सध्या कुपवाड्यात राहून शिकतात. ‘सरकार आम्हाला पैसे देईल; पण गेलेल्या नातेवाइकांचे व आमच्या जिंदगीचे जे नुकसान होते, ती भरपाई कोठून मिळणार? दोन्ही देश सध्या जमिनीसाठी लढतात. आमचे म्हणणे आहे देशांनी आपापली माणसे वाचविण्यासाठी, जगविण्यासाठी लढावे. माणसे मारणारी नव्हे, तर माणसे वाचविणारी लढाई आज महत्त्वाची आहे.’’
 अशा अनेक कहाण्या या गावांमध्ये आहेत. गोळीबार आणि तोफांचा मारा होतो, त्यावेळी उडणार्‍या गोंधळात दहशतवाद्यांना भारतात घुसविणे सोपे जाते. त्यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानकडून गोळीबाराचा अवलंब केला जातो, असे एक कारण दिले जाते. जोवर सामान्य नागरिकांना ‘टार्गेट’ केले जात नाही, तोवर या आंतरराष्ट्रीय प्रश्नाची तीव्रता वाढत नाही, असेही पाकिस्तानला वाटते. त्यामुळे दोन लष्करांमधील लढायांमध्ये सामान्य नागरिकांना आणि गावांना लक्ष्य केले जाते, असेही एक कारण या हल्ल्यांमागे सांगितले जाते. 
दोन्ही बाजूंच्या सरकारांच्या सध्याच्या प्रतिक्रिया या इशार्‍याच्याच आहेत. भारताचे संरक्षणमंत्री म्हणाले, ‘सीमेपलीकडून सुरू असलेल्या गोळीबाराला उत्तर देऊ’. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री मोहम्मद यांनीही अशाच उत्तराची भाषा केली आहे. पण या दोन्ही उत्तरांतून सीमेवरील गावांमधील ‘प्रश्न’ आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. ‘जशास तसे उत्तर देऊ’ या शब्दांनी सर्वांत मोठी धडकी कुणाला भरत असेल, तर ती या गावांना. 
..आणि दुर्दैव असे, की अशी गावे सीमेच्या दोन्ही बाजूला आहेत. त्यांचे देश वेगळे असतील, दु:ख आणि संताप एकच आहे!
 
तोफेच्या तोंडी
कथुआ जिल्ह्यातील पहाडपूर ते 
सांबा जिल्ह्यातील रामगड अशा 
६0 किलोमीटरच्या परिसरातील गावे
सीमेपलीकडून मॉर्टर शेलिंग
उखळी तोफांचा मारा सुरू असल्याने
परागंदा अवस्थेत आहेत.
 
६0 गावे आणि १२,000 माणसे 
कथुआ आणि सांबा जिल्ह्यांमधल्या ६0 गावांतील सुमारे 12,000 नागरिकांना स्थलांतरित केले आहे. हाडे गोठवणार्‍या कडाक्याच्या थंडीत ही माणसे निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहतात.
 
 
३ जिल्हे, २00 किलोमीटर
 
जम्मू, कथुआ व सांबा या तीन जिल्ह्यांना लागून २00 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे.
 
इकडे आणि तिकडेही
पाकच्या हद्दीतील सीमेवरील गावेही
भारताचे बॉम्बगोळे झेलतात, असे 
पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे.
दोन्हीकडचे जगणे लष्करांच्या आणि
दहशतवाद्यांच्या हवाली आहे.
 
मरणाला मोल नाही!
 
मुंबईवर २६/११ ला दहशतवादी हल्ला झाला. त्याची व्यापक चर्चा झाली. जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात राहणारे गावकरी  म्हणतात, ‘आमच्या नशिबी कायमच २६/११ आहे. कधी गोळीबार होईल याची काहीच खात्री नसते. खरे तर आम्हीही जवानांप्रमाणे सीमेवर देशाचे रक्षण करतो. आमची गावे म्हणजे तटबंदीच आहे. आमच्यामुळे घुसखोरांना पायबंद बसतो. पहिले बॉम्बगोळे आम्हीच झेलतो. आम्ही सीमा सुरक्षा दलाचे, लष्कराचे खबरे बनतो. पण सीमेवर लढणारा जवान शहीद झाल्यावर देश जसा हळहळतो, तशी साधी हळहळसुद्धा आमच्या वाट्याला येत नाही. दोन देशांच्या भांडणात आम्ही बेदखल होऊन मरतो. आमच्या मरणाला मोल नसते.’
 
एकदा सीमा ओलांडली की..
 
सध्या सीमेवर जो तणाव सुरू आहे, त्यामध्ये सांबा जिल्ह्यात बसंडा नदी ओलांडून पाकिस्तानमधून एक तरुण भारताच्या हद्दीत आला आहे. तो सध्या सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात आहे. त्याला आपले नाव, गाव काहीच सांगता येत नाही. तो मनोविकलांग आहे. 
या भागातले स्थानिक पत्रकार सांगतात, मनोरुग्णांचा असा वापर अनेकदा केला जातो. पाकिस्तानच्या हद्दीतील गावांतून वर्षातून २0-२५ मनोरुग्ण भारताच्या हद्दीत पाठविले जातात. बहुधा हे जाणीवपूर्वक केले जाते. कारण भारताचे सीमा सुरक्षा दल किती सतर्क आहे, याची चाचपणी त्यातून करता येते. 
घुसखोर समजून सीमा सुरक्षा दलाने गोळीबार केलाच तर मनोरुग्ण मरेल, त्यातून फार काही नुकसान होणार नाही, अशी मानसिकता यात असू शकते. 
योग्य त्या चौकशीनंतर या वाट चुकलेल्या नागरिकांना भारतातून पुन्हा जेव्हा पाकिस्तानच्या हवाली केले जाते, तेव्हा ते आपलेच नागरिक आहेत का? याची शहानिशा करण्यासाठी त्यांची कसून तपासणी होते. 
हे सगळे काही अत्यंत अमानवी असते. देशाच्या सीमा ओलांडून पलीकडे जाणार्‍या अशा माणसांना पुन्हा घरी परतण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते.
 
या लेखासाठीची पूरक माहिती :
*अश्‍विन कुमार (ब्युरो चीफ, आज तक, जम्मू) 
* जुगल शर्मा (पत्रकार, पंजाब केसरी, जम्मू) 
* डॉ. अमित वांछू (श्रीनगर) 
* संजय नहार (संस्थापक, सरहद) 
* अधिक कदम, (बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन)
* जोगिंदरसिंग, स्टँजिन दोज्रे, शकील अहमद शेख, मुशर्रफ बानू, निघत कुरेशी आणि रुबिना (पुण्यात शिकणारे काश्मिरी तरुण-तरुणी. यांची घरे सीमा भागातल्या गावांमध्ये आहेत.)