- डॉ. दत्ता देशकर
महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख एक दुष्काळी जिल्हा म्हणून आहे. या जिल्ह्यातील किल्ले धारूर गावात एका व्यक्तीच्या घरी जावे लागले. ते घर म्हणजे एक तीन मजली वाडा होता. त्या वाड्याच्या मध्यभागी एक विहीर होती. संपूर्ण घरात वळचणींना पन्हाळ्या बसविल्या होत्या आणि पावसाचे सर्व पाणी त्या विहिरीत सोडले होते. गेल्या तीन पिढय़ांमध्ये दर वर्षी उन्हाळ्यातही त्या विहिरीला भरपूर पाणी राहत असल्याचे त्या घरमालकाने अभिमानाने सांगितले. एवढेच नव्हे तर गावातील कित्येक लोक उन्हाळ्यात त्या विहिरीच्या पाण्यावर गुजराण करतात, अशीही माहिती त्यांनी दिली. ही कल्पना त्याच्या पणजोबांची. आपण पाण्यावर फक्त बोलतो; पण जवळपास १00 वर्षांपूर्वी एका माणसाने ही कल्पना प्रत्यक्षपणे आपल्या घरी राबविलेली मी पाहत होतो.
वर दिलेले उदाहरण शहरी भागाशी निगडित आहे. आपण जरा ग्रामीण भागात जाऊ या. रोटरी क्लबने औरंगाबाद शहरापासून ३0 किलोमीटर दूरवर एक खेडेगाव दत्तक घेतले होते. त्या गावातील ग्रामस्थांना आम्ही विहिरीचे पुनर्भरण कसे करायचे, याची माहिती सांगितली. त्यांपैकी १५ शेतकर्यांनी आपल्या शेतातील विहिरीवर हा प्रयोग केला. दोन वर्षांनंतर ते माझ्या घरी आले. त्यांच्या बोलण्यात नाराजीचा सूर होता. त्यांनी आपली नाराजी जेव्हा शब्दांत व्यक्त केली, त्या वेळी मला हसावे की रडावे, हेच समजेना. ते तक्रारीच्या सुरात म्हणाले, ‘तुमच्या कल्पनेमुळे आमच्या विहिरीचे पाणी वाढले हो; पण आजूबाजूच्या विहिरींचेही वाढले ना.’ मी त्यांना समजावून सांगितले, ‘बाबांनो, जलदान हे जगातील सर्वांत पवित्र दान समजले जाते. असे समजा, तुम्ही त्यांना पाण्याचे दान दिले आहे. उद्या त्यांनाही सुबुद्धी होईल, तेही पुनर्भरण करतील, त्याचा फायदा आणखी काही लोकांना नव्हे तर संपूर्ण गावाला होईल.’
या दोन उदाहरणांवरून आपण काही शिकणार की नाही? आपल्या गावातील आपले पाणी आपण नाही वापरायचे तर ते कोणी वापरायचे? त्यासाठी थोडे कष्ट उचलायची तयारी आपण ठेवावयास हवी. किमान आपण जे वरकड कामासाठी पाणी वापरतो ते तरी या मार्गाने मिळवायला काय हरकत आहे? पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलपुनर्भरणासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. मध्यंतरी पुण्यातील किती लोकांनी आपल्या घरी जलपुनर्भरण केले आहे, याची आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. पुण्यात एकूण सहा लाखांहून अधिक घरे आहेत. यांपैकी फक्त सहा ते सात हजार घरांनी हे काम केल्याची माहिती देण्यात आली होती. म्हणजे टक्केवारीच्या स्वरूपात बोललो तर एक टक्का घरातही हे काम करण्यात आलेले नाही. पुण्यातील जनता जागरूक आहे, असे आपण म्हणत असतो. हाच का तो जागरुकपणा? पुण्यात किती पाणी आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे काय? दर वर्षी जो पाऊस पडतो, त्यात पुण्याची सरासरी ६५0 ते ७00 मि.मी. एवढी आहे. एवढा पाऊस पडत असेल तर दर एकरात किती पाऊस पडतो, हे तुम्हाला सांगू का? तो पडतो जवळपास २५ लाख लिटर. पुण्याचे क्षेत्रफळ गूगल नकाशाप्रमाणे ७१0 चौरस किलोमीटर एवढे आहे, म्हणजे १,७५,४४४ एकर. २५ लाख लिटर व १,७५,४४४ एकरांचा गुणाकार केला व त्याला लोकसंख्या (४0,00,000) व वर्षाचे दिवस (३६५) यांनी भागले तर दरडोई दररोज ३00 लिटर एवढे पाणी उपलब्ध होऊ शकते. अबब. एवढे पाणी आपल्या जवळ असेल तर आपण शेजारच्या चार तलावांवर कशासाठी अवलंबून आहोत? एवढेच नव्हे तर आता आपण भामा-आसखेडवरून पाणी आणण्याचा विचार का करतो आहोत? जो आपल्या ताटातले अन्न खातो, त्याला ‘माणूस’ म्हणतात. जो स्वत:च्या ताटातले अन्न दुसर्याला खाऊ घालतो, त्याला ‘देव’ म्हणतात व जो दुसर्याच्या ताटातील अन्न ओरबडून खातो, त्याला ‘राक्षस’ म्हणतात. आपल्या ४0,00,000 लोकांना राक्षस म्हटले तर आपल्याला ते निश्चितच आवडणार नाही. मग आपण आपल्या ताटातील अन्न कसे खायचे, याचा विचार करणे जास्त योग्य ठरेल. आज प्रत्येक शहरात जवळपासच्या धरणांमधून पाणी आणण्याची स्पर्धाच लागली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या सर्व शहरांची कथा एकच आहे. विनासायास पाणी मिळते आहे ना? मग कशाला जास्त विचार करायचा? झाले इतरांचे नुकसान, त्याचे आपल्याला काय, ही प्रवृत्ती बळावत चालली आहे. बरं, पुनर्भरण करणे फार कठीण काम आहे का, तर तसेही नाही. जलपुनर्भरण कसे करायचे, हे आपण थोडक्यात समजून घेऊ. आपल्या अंगणात उभे राहा. पावसाचे पाणी कोठे जमते, याचा अंदाज घ्या. त्या ठिकाणी पाच फूट लांब बाय पाच फूट रुंद बाय आठ फूट खोल असा खड्डा खणा. गरजेनुसार एकापेक्षा जास्त खड्डेही खोदावे लागतील. घरातील व्यक्तींना अपघात होणार नाही, याची काळजी घेऊन हे खड्डे खणावेत. तशी जागा निश्चित करावी. या खड्डय़ांची खोली किमान ८ फूट असलीच पाहिजे. या खड्डय़ात छोटे दगडाचे तुकडे, विटांचे तुकडे व जाडी रेती क्रमाक्रमाने सम थरात भरल्यास खड्डा पूर्णपणे भरला जाईल, त्यातील अगणित फटींमधून पाणी मात्र जमिनीत सहजपणे पाझरेल. हे करण्यास जास्त खर्चही येणार नाही. शिवाय हा खर्च एकदाच करावा लागेल; पण त्याचा लाभ मात्र वर्षानुवर्षे मिळत राहील. घरातीलच व्यक्तींनी हे काम केले तर खर्च आणखी कमी होईल. दर वर्षीच्या सुरुवातीला हा भरलेला माल साफ करून पुन्हा भरणे योग्य ठरेल. गच्चीवर जमा झालेले पाणी या खड्डय़ापर्यंत आणून सोडल्यास ते पाणी या ठिकाणी चांगले मुरेल.
हा प्रयोग सर्व ठिकाणी यशस्वी होईलच असे नाही कारण जमिनीत दगडाचा थर वरच असेल तर तो पाणी स्वीकारणार नाही. आपल्या घरी बोअर असेल तर गच्चीवरील पाणी या बोअरमध्ये गाळून सरळ सोडले जाऊ शकते. हे गाळून सोडले नाही तर अशुद्ध पाणी बोअरमध्ये शिरून भूजलाचा दर्जा खालावेल. आजकाल पाणी फिल्टर होऊन बोअरमध्ये टाकण्यासाठी एक गॅजेट तयार करण्यात आले आहे. ते बंगलोरच्या इस्टिट्यूट ऑफसायन्सने डिझाईन केले आहे, ते बसविणे अत्यंत सोपे असून अत्यंत टिकाऊही आहे. बर्याच ठिकाणी त्याचा वापरही सुरू झाला आहे. मोठय़ा सोसायट्या असतील तर त्या ठिकाणी जास्त संख्येने हे गॅजेट्स बसवावे लागतील.
पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरही साठवले जाऊ शकते; पण सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन होऊन त्याचा लाभ घेता येत नाही. त्याचप्रमाणे टाक्या बांधूनही पाणी साठविले जाऊ शकते; पण त्या टाक्यांची साठवणक्षमता फारच र्मयादित राहते. शिवाय टाक्या बांधणे ही एक खर्चिक बाब आहे, ते परवडणे शक्य नाही. गेल्या काही वर्षांपासून पाऊस पडण्याच्या पद्धतीत फरक पडलेला आपण पाहत आहोत. पावसाचे दिवस कमी होत आहेत. दर वर्षी फक्त ३0 ते ३५ दिवसच पाऊस पडतो; पण पावसाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. दर वर्षी तो अनियमितपणे पडतो; पण त्याचा प्रयत्न सरासरी गाठण्याचाच राहतो. याचाच अर्थ पाऊस पडण्याचा वेग वाढलेला आहे, असा होतो. वेगाने पडलेला पाऊस जमिनीत जास्त मुरू शकत नाही, त्यामुळे नैसर्गिकपणे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी-कमी होत चालले आहे.
निसर्गही जलपुनर्भरण करीत असतो; पण पावसाच्या वाढत्या वेगामुळे त्याची पुनर्भरण करण्याची शक्ती क्षीण झाली आहे. त्याची भरपाई माणसाला करायची आहे. या ना त्या मार्गाने पाणी जमिनीत कसे शिरेल, हे पाहणे आता गरजेचे झाले आहे.
जलपुनर्भरणाचे आदर्श उदाहरण चेन्नई महानगराचे देता येईल. या शहराची अवस्था इतकी बिकट झाली होती, की महिन्यातून एकदा पाणी देणेही महानगरपालिकेला जड झाले होते. अतिउपशामुळे बोअर रिकामे झाले होते. या रिकाम्या बोअरमध्ये समुद्राचे खारे पाणी यावयास सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत महानगरपालिकेला कठोर पावले उचलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तिने भूजल पुनर्भरण सक्तीचे केले. त्याचा परिणाम म्हणून आज महानगराचा पाणीप्रश्न सुटू शकला आहे. ही वेळ आपल्यावर येऊ नये, असे वाटत असेल तर हे काम आपण स्वेच्छेने करायला काय हरकत आहे? जमिनीत भरलेले पाणीही खरे पाहिले असता ‘पाण्याची बँक’ आहे. त्या बँकेत सातत्याने पाणी जमा करावयास हवे. ते भरपूर जमा झाले असेल तर एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तरी हे भूजल आपल्या कामी येऊ शकते. बँकेत पैसा जमा न करता सतत पैसा काढत गेलो तर बँक बॅलन्स शून्यावर येऊन आपण संकटात सापडू शकतो. जमिनीत पाणी भरपूर प्रमाणात साठविल्यास आपण दुष्काळावर सहजपणो मात करू शकतो. जमिनीत तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर जलस्तर असतात. शेवटच्या जलस्तरात पाणी जाऊन पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षांचा कालावधी लागतो. आज आपण पाणी उपसत-उपसत या तिसर्या जलस्तरातील पाणी उपसायला लागलो आहोत. ते जर संपले तर हाहाकार माजेल व आपण आपले अस्तित्वच गमावून बसू. आपल्याला निव्वळ आजच नाही तर भविष्यातही जगायचे आहे. ते सुखा-समाधानाने जगता यावे, यासाठी या जलस्तरातील वापरलेले पाणी आपल्याला पुन्हा जमा करायचे आहे, त्यासाठी एकट्या-दुकट्याने केलेले प्रयत्न अपुरे ठरतील, म्हणून ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे विसरता कामा नये.
(लेखक पाणी प्रश्नाचे अभ्यासक आहेत.)