- अभिनय खोपडे
हातात बंदुका घेऊन जे हात घनदाट जंगलात पोलिसांचा शोध घेत फिरत होते, त्या हातात आता बंदुकांऐवजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अवजारे आली आहेत. ही किमया गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात घडली याचं कारण आहे शासनाची नक्षल आत्मसमर्पण योजना!
या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन मूळ प्रवाहात येऊ पाहणा:या नक्षलवाद्यांचे शासनाने पुनर्वसन केल्याने माओवादी चळवळीचे कंबरडे मोडण्यास सुरुवात झाली. मात्र यामुळे सैरभैर झालेल्या नक्षलवाद्यांनी आपल्या या मूळ सहका:यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचंच कारण म्हणजे गेल्या 3क् वर्षात 22 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहका:यांकडून झालेली हत्त्या. परवाच झालेली आणखी एक हत्त्या हा याच अस्वस्थतेचा परिपाक.
पोलीस दल विविध पातळ्यांवर नक्षलवाद्यांवर वरचढ झाल्याचे चित्र गेल्या दोन वर्षात निर्माण झाले आहे. पुनर्वसनानंतर गाव सोडून शहरात दाखल झालेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी आता स्वत:च्या सुरक्षेचे कवच निर्माण करून घेतले आहे. मात्र आत्मसमर्पणानंतर अजूनही गावखेडय़ाकडे जाण्याची या सदस्यांची पुन्हा तयारी होत नाही. अर्थातच यामागचं कारण आहे मृत्यूचं भय!
198क् च्या दशकापासून नक्षलवादी कारवायांनी सतत भयग्रस्त स्थितीत जीवन जगणा:या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना गेल्या दोन वर्षात पोलीस प्रशासनाच्या विविध अभियानांमुळे नक्षलवाद आता कमी झाल्याची जाणीव निर्माण झाली आहे. माओवाद्यांच्या विरोधात पोलीस दल दोन आघाडय़ांवर लढत असून, जंगलातील युद्ध वगळता सामाजिक हिताच्या योजना राबवित आहे.
पण हे सोपे नव्हतेच. यासाठी पोलिसांना बरेच कष्ट घ्यावे लागले. ‘नवजीवन’सारखे अभियान राबवून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी नक्षलवाद्यांच्या गावार्पयत पोहोचले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आपल्या भरकटलेल्या सदस्याला आत्मसमर्पण योजनेचा लाभ देण्याचे आवाहन वरिष्ठ अधिका:यांनी केले. कुटुंबीयांना आत्मसमर्पण योजनेतील फायदे समजून सांगितले. दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळकरी मुलामुलींना महाराष्ट्रातील मोठय़ा शहरांची सहल घडविण्यात आली.
या सहलीत जंगलात काम करणा:या नक्षलवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आवजरून सहभागी करून घेण्यात आले. त्यांची 14 ते 18 वर्षे वयाची मुले पोलीस दलासोबत महाराष्ट्र दर्शनावर गेली. त्यांनीही आपल्या नातलगांचे, आई-वडिलांचे मनपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले. याचे चांगले परिणाम नक्षल आत्मसमर्पण कार्यक्रमाला मिळाले. 2क्क्5 पासून नक्षल आत्मसमर्पण योजना लागू केल्यामुळे नक्षल चळवळीला हादरा बसला.
यातला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अनेक आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा विवाहही पोलीस विभागाने पुढाकार घेऊन लावून दिला. जे हात जंगलात बंदुका चालवायचे, त्यांना प्रशिक्षण मिळाल्याने ते हात सकारात्मक कामाकडे वळले. नक्षलवाद्यांची काळी बाजू समाजासमोर मांडण्याचे बळ त्यांच्यात निर्माण करण्यात पोलीस दलाला यश आले. शहरात येऊन त्यांचे वास्तव्य वाढल्याने माओवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात पोलीस दलाला मोठा उपयोग झाला. मात्र हे होत असताना ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यांच्या सुरक्षेचा एक मोठा प्रश्नही निर्माण झाला.
मागील 3क् वर्षाचा विचार करता 22 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नक्षलवाद्यांनीच केलेल्या हत्त्येची ही संख्या थोडी नाही. ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले त्यांना आजही आपल्या गावात जाता येत नाही, आपल्या आप्तांना, नातेवाइकांना भेटता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण गावात गेलो आणि नक्षलवाद्यांनी घेरलं तर मृत्यूशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याकडे नाही. आपल्या मूळ गावाची, आपल्या रक्ताच्या माणसांची, नातलगांची ओढ स्वस्थ बसू देत नाही आणि जीव मुठीत घेऊन गेलोच तिथे, तर प्राणांवर उदार व्हायचं, अशा विचित्र कात्रीत हे माजी नक्षलवादी सापडले आहेत. त्यातून ज्यांनी हिंमत केलीच, त्यातल्या ब:याच जणांना नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून ठार केलं आहे. त्यामुळेच अनेकांनी आपल्या मूळ गावाचं नाव टाकलं आहे. ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून गाव सोडले, ते सुरक्षित झाले; मात्र पुन्हा गावाकडे जाण्याचे धाडस त्यांच्यात निर्माण होऊ शकले नाही.
पोलीस दलाचे जाळे गडचिरोली जिल्ह्यात आता तिपटीने वाढलेले आहे. अनेक दुर्गम गावार्पयत पोलिसांचा संपर्क वाढला आहे. या संपर्कामुळे आत्मसमर्पण करणा:यांची संख्याही वाढली. एटापल्ली या दुर्गम तालुक्याच्या कोटमी येथे फेब्रुवारी 2क्15 मध्ये पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. त्यानंतर जुलै महिन्यात काही जहाल नक्षलवाद्यांसह 13 जणांनी आत्मसमर्पण केले. मात्र यानंतर कोटमी गावातच माधव पदा या आत्मसमर्पित सदस्याची नक्षलवाद्यांनी हत्त्या केली. जे आत्मसमर्पित गाव सोडण्यास तयार होत नाहीत, त्यांची हत्त्या माओवादी करतात. मात्र आत्मसमर्पणाचा लाभ घेऊन ज्यांनी शहर गाठले आहे, त्यांचे जीवन पोलीस यंत्रणोने सुरक्षित केले आहे. बरेच वेळा आत्मसमर्पित नक्षलवादी इतरांना आत्मसमर्पणासाठी प्रवृत्त करतात. त्यामुळे त्यांचे जुने सहकारी त्यांची जीवनयात्र संपवून टाकतात. आपल्या जीविताची खात्री जर आत्मसमर्पितांना मिळाली तर नक्षलवाद्यांचे आणखीही खच्चीकरण होऊ शकते. आत्मसमर्पण योजनेचे फायदे दिसून येत आहेत, मूळ प्रवाहात येऊ पाहणा:या नक्षलवाद्यांचे पुनर्वसनही शासनाकडून केले जातेय, पण त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र अजूनही गंभीरच आहे. शासनाने अजून एक पाऊल पुढे जाताना माजी नक्षलवाद्यांच्या सुरक्षेतल्या त्रुटी दूर करणो गरजेचे आहे, अन्यथा आत्मसमर्पितांची हत्त्या या मोहिमेला पुन्हा मागे नेऊ शकते.
(लेखक ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीत
वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
abhinaykhopde@gmail.com