- सुरेंद्र सुर्वे
अलीकडेच जातीयवादाचे राजकारण करणार्यांना एक नवीन कल्पना सुचली. त्यांच्या सुपीक डोक्यात गब्बर घुसला. कितने आदमी थे? कितने आदमी है? या विचाराने त्यांना ग्रासले. त्यांची पार झोप उडवून लावली. सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्यांना एक मोठे शस्त्र सापडल्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी देशाच्या सुरक्षिततेबाबतची आपली आत्यंतिक तळमळ (!) व्यक्त करीत देशाची चिंता अखंडपणे वाहण्याचा आव आणणार्या संधिसाधू राजकारण्यांनी एक मोठा प्रश्न देशाच्या सुरक्षेबाबतच्या अतीव काळजीने विचारला.
‘भारतीय सैन्यामधे मुसलमानांची संख्या किती?’
सर्वसामान्य जनतेच्या मनात एकदा शंकेची पाल चुकचुकली किंवा संशय पिशाचाने एकदा मनाचा ताबा घेतला, की त्याचे समूळ उच्चाटन सहजासहजी होत नसते. मनाच्या कोपर्यात कुठेतरी पेरल्या गेलेल्या विषवल्लींची मुळं थोड्याशा खतपाण्याने फोफावून समाजामध्ये सहज दुफळी निर्माण करू शकतात. विशेषत: ज्या देशाचा काही शतकांचा इतिहास हा केवळ हिंदू-मुस्लिम संबंधातील तणावामुळेच रक्ताने लिहिला जात आहे. सध्याच्या बॉम्बस्फोटांच्या मालिकांच्या अत्यंत स्फोटक वेळी तरी मतांचेच राजकारण करणार्यांनीसुद्धा थोडेतरी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे, नाहीतर धर्मांधतेची पट्टीच बांधून बसलेल्या माथेफिरूंना भडकवून अराजक माजवायला वेळ लागत नाही.
केवळ मतांच्या राजकारणासाठी, सवंग प्रसिद्धीसाठी जर कोणी भारतीय सेनेच्या गौरवशाली परंपरेचा अनादर करीत असेल, तर त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी अलीकडच्या काळातील कारगिल युद्धातील भारतीय सेनेच्या इतिहासातील सुवर्णाक्षरात लिहिल्या गेलेल्या प्रसंगाची माहिती देणे उचित होईल. भारतीय सैन्यदलातील प्रशिक्षणाने निर्माण केलेल्या सैनिकांचे उच्च मनोबल, एकता, देशप्रेम, बंधुभाव, निधर्मी सहिष्णुता सद्य परिस्थितीत संपूर्ण देशाला मार्गदर्शक व दिशादर्शक ठरू शकेल.
यह मत पूछिये, भारतीय सेना में कितने आदमी (मुसलमान) है.? यह पूछिये, जो है, वह देश के लिए कैसे लढे.?
भारत-पाकिस्तानदरम्यानच्या कारगील युद्धातील हा एक प्रसंग.. बटालिक क्षेत्रातील खालुबार पर्वतरांगेतील पॉइंट ५२५0 शिखरावरील (सीमेवरील महत्त्वाची पर्वतशिखरं ही त्यांच्या नकाशात दर्शविलेल्या उंचीवरून ओळखली जातात) पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्याची कठीण जबाबदारी २२ ग्रेनेडियरच्या जांबाज मुस्लिम कंपनीवर सोपविण्यात आली. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांत १५000 ते १७000 फूट उंचीवर, शून्याखाली १५0 ते १७0 तापमानात (फ्रीजमधील बर्फ-४ डिग्री तापमानात तयार होत असतो.), हवेतील प्राणवायूचे प्रमाण खूप कमी असताना जिथे मुळी साधे चालणेच कठीण असते, तिथे युद्धवेशात अवजड युद्धसामग्री घेऊन, अवघड डोंगर चढून जाऊन शत्रूवर हल्ला करणे, लढणे किती कठीण असेल, याची सर्वसामान्यांना कल्पनासुद्धा करता येणे कठीण आहे. कारगिल युद्धात बहुतेक ठिकाणी पाकिस्तानी घुसखोर हे उंच डोंगरावर होते आणि भारतीय सेनेला अवघड डोंगर चढून हल्ला करून त्यांना हुसकावून लावण्याचे कठीण काम करावयाचे होते. वर बसलेल्या शत्रूला आपल्या हालचाली सहज दिसत असल्याने, सूर्यास्तानंतर पडलेल्या अंधाराचा फायदा घेत आपल्या सैनिकांना डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोहोचून डोंगर चढून हल्ला करावयाचे दुष्कर काम करावयाचे होते. शत्रूला जरा जरी शंका आली, तरी त्यांचे काम सोपे होते. वरून दगडांचे ढिगारे किंवा बर्फाच्या राशी खाली ढकलूनसुद्धा ते आपल्याला रोखू शकत होते.
अंधारात, मुस्लिम कंपनीच्या तीस हट्टय़ाकट्टय़ा जवानांनी, कंपनी कमांडर मेजर अजितसिंगच्या नेतृत्वाखाली पॉइंट ५२५0 शिखरावरील पाकिस्तानी घुसखोरांवर करारी हल्ला चढवला. घुसखोरांनी आपली पोझिशन खूप मजबूत आणि अभेद्य बनवली होती. दोन तासांच्या शर्थीच्या कडव्या झुंजीत मुस्लिम कंपनीचे दहा जवान शहीद झाले आणि अठरा जवान जखमी झाले. मोठय़ा प्रमाणात झालेल्या हानीमुळे कंपनी कमांडरने तात्पुरती माघार घेण्याचा निर्णय घेतला.
डोंगराच्या पायथ्याशी, एका खडकाच्या मागे जखमी जवानांची तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत होती. कंपनी कमांडर मेजर अजितसिंग डोक्याला दगड लागून स्वत: जखमी झाले होते. एवढय़ात कंपनीतला तरुण नाईक झाकीर हुसेन, कंपनी कमांडरसमोर उभा राहत कडक सॅल्यूट करत म्हणाला,
‘आम्ही परत दुसरा हल्ला करतो सर.! आपल्या परवानगीने.’
मोठय़ा मनुष्यहानीने कमकुवत झालेल्या चिंतित कंपनी कमांडरने आपल्या इतर साथीदारांशी चर्चा केली. दहा जवान शहीद आणि अठरा जवान जखमी होऊनसुद्धा इतर जवानांचे मनोबल कमी झाले नव्हते, ‘पुरी कंपनी मर मिटेगी, मगर पिछे नही हटेगी सर.! हमे दिया हुआ काम पुरा करके ही दम लेंगे, किसी भी किमत पर।’ त्यांनी कंपनी कमांडरला ग्वाही दिली. कंपनी कमांडरने निर्णय घेतला आणि रात्री दोननंतर कमालीच्या कमकुवत असलेल्या आपल्या अठरा जखमी साथीदारांसह शत्रूवर दुसरा हल्ला चढवला. या वेळी त्यांनी मागच्या बाजूने शिखर चढत वर पोहोचताच, ‘अल्ला-अो-अकबर’ चा नारा दिला. मागून आल्यामुळे आपल्या मदतीसाठी येणार्या अधिकच्या कुमकेची वाट पाहणार्या पाकिस्तानी घुसखोरांना, ‘अल्ला-अो-अकबर’ चा नारा ऐकताच आपल्या मदतीसाठी आपलीच कुमक आल्याचे समजून त्यांनी भारतीय सेनेच्या ग्रेनेडियर्सच्या मुस्लिम जवानांना मदतीचा हात दिला.
वर पोहोचताच ग्रेनेडियर्सच्या मुस्लिम जवानांनी परत, ‘अल्ला-ओ-अकबर’ चा नारा देत पाकिस्तानी घुसखोरांवर फायरिंग करत दुसरा जबरदस्त हल्ला चढविला. गोंधळलेल्या घुसखोरांनी सावरत प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. घुसखोर संख्येने जास्त होते. एका जागी बसून लढत होते. ग्रेनेडियर्सचे दहा जवान पहिल्या हल्ल्यातच शहीद झाले होते, १८ जवान जखमी अवस्थेत लढत होते. दुसर्यांदा डोंगर चढून हल्ला करून ते सर्व थकले होते, तरीसुद्धा निकराने शत्रूच्या एकेका खंदकावर हल्ला चढवत होते. एवढय़ात घुसखोरांची अपेक्षित कुमकसुद्धा येऊन पोहोचली. ग्रेनेडियर्सचे मुस्लिम जवान दोन्हींच्या मध्ये सापडले होते. दोघांच्या मध्ये पोझिशन घेऊन त्यांनी खालून येणारी कुमक मशीनगनचा मारा करत रोखून धरली. त्यांना खालुबरला पोहोचू दिले नाही व वरच्या घुसखोरांशीसुद्धा ते लढत राहिले. मधे सापडलेले ग्रेनेडियर्स हे मुस्लिम आहेत हे कळल्यावर घुसखोरांनी त्यांना धर्माचा वास्ता देत भावनिक आव्हान करून आपल्याकडे वळविण्याचा पण प्रयत्न करून पाहिला. अत्यंत थकलेल्या, जखमी अवस्थेतल्या या मुस्लिम कंपनीच्या जवानांनी अन्नपाण्याविना, अविश्रांतपणे अखंड ७२ तास (तीन दिवस) जिवाची बाजी लावत ही झुंज चालूच ठेवली. आपल्या मातृभूमीच्या निष्ठेपायी. तिसर्या रात्री ग्रेनेडियर्सच्या मदतीसाठी खालुबरला धावून आलेल्या १/११ गुरखा रायफलचे जवान हे रात्रभर पहाडच चढत होते. खरं तर त्यांना संपूर्ण एक दिवस विश्रांतीची गरज होती; पण ग्रेनेडियर्सच्या आपल्या मुस्लिम कंपनीचे जखमी अवस्थेतील जवान तीन दिवस झुंज देत असल्याचे कळताच गुरखा रायफल्सने क्षणाचीही उसंत न घेता, युद्धातील स्वसुरक्षेचे नियम बाजूला ठेवत, स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता, ‘आयो गोरखाली’च्या रणगर्जना करत आणि आपल्या धारदार कुकर्या तळपवत, दिवसाढवळ्याच पाकिस्तानी घुसखोरांवर शेवटचा निर्णायक हल्ला चढवला आणि पॉइंट ५२५0 शिखरावरील घुसखोरांच्या रक्ताचे पाट वाहवले. जीव वाचवित पळताना अनेक घुसखोरांचा कडेलोट होऊन ते अल्लाला प्यारे झाले. ग्रेनेडियर्सच्या मुस्लिम कंपनीच्या पराक्रमावर कळस चढवत १/११ गुरखा रायफल्सच्या जवानांनी पॉइंट ५२५0 शिखरावर तिरंगा फडकवला.
२२ ग्रेनेडियरच्या जांबाज मुस्लिम कंपनीचा तरुण नाईक आबिद हुसेन सतत बहात्तर तास मशीनगन चालवत होता, रक्त गोठवणार्या कडाक्याच्या थंडीत, जखमी अवस्थेत, उघड्यावर बर्फ पडत असताना, सोसाट्याच्या वार्याला तोंड देत अन्नपाण्याविना, जिवाची बाजी लावून, आपल्या कुटुंबियांच्या भविष्याची पर्वा न करता. शत्रूच्या गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळणी केली होती, तोफांच्या स्प्लिंटर्सनी त्याच्या शरीराचे तुकडे केले होते. आपल्या मशीनगनने खालुबरला येणारी कुमक तीन दिवस रोखून धरणार्या शहीद नाईक आबिद हुसेनच्या बोट शरीराचे तुकडे झाले तरी बोट मशीनगनचा ट्रिगरच दाबत होते. कोणासाठी? आता परत विचारा, ‘भारतीय सैन्यामधे मुसलमानांची संख्या किती?’
(लेखक युद्ध विश्लेषक व लष्कराचे
नवृत्त अधिकारी आहेत.)