नारायणराव फडके
सुशीलाराणी पटेल यांचा सुसंस्कृत कोकणी कुटुंबात २0 ऑक्टोबर १९१८ रोजी जन्म झाला होता. वडील आनंदराव तांबट पेशानं ‘क्रिमिनल लॉयर’ होते. त्यांना साहित्य, सिनेमा, नाटक आणि विभिन्न कलांमध्ये विशेष रुची होती. साहजिकच सुशीलाबाईंना लेखनाचा वारसा वडिलांकडून मिळाला, परंतु संगीताचा वारसा मात्र त्यांना आपल्या आईकडून मिळाला.
वयाच्या ७व्या वर्षीच त्यांचं संगीताचं शिक्षण सुरू झालं. पंडिता मोगुबाई कुर्डीकर आणि सुंदराबाई जाधव यांच्याकडे त्यांचं रीतसर शास्त्रीय गायनाचं शिक्षण झालं. त्यांची ग्रहणशक्ती विलक्षण होती; म्हणून
सुशीलाबाई ‘एकपाठी’ असल्याचा पं. मोगुबाई कुर्डीकर निर्वाळा देत. शास्त्रीय संगीत गायन हा त्यांच्या जगण्याचा आत्मा होता. शेवटच्या श्वासापर्यंत त्या नित्यनियमाने शास्त्रीय गायनाचा रियाज करीत होत्या. श्रेष्ठ संगीतकार नौशाद यांनी त्यांचा रियाज आणि गायन ऐकून त्यांची खूप प्रशंसा केली होती आणि म्हटलं होतं, ‘‘रियाज ठेवला तर वय वाढलं तरी त्याचा आवाजावर परिणाम होत नाही, याचं सुशीलाबाई हे उत्तम उदाहरण आहेत. त्या शास्त्रीय संगीताच्या खरोखर भक्त आहेत.’’
शास्त्रीय गायनात प्रवीणता मिळवूनही आपल्या अँकॅडेमिक शिक्षणात त्यांनी खंड पडू दिला नाही आणि आपलं शिक्षण त्यांनी तितक्याच तत्परतेने पूर्ण केले. त्यांनी शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती, तसेच विधी शाखेचीही पदवी घेतली होती. विशेष म्हणजे वयाच्या ६0व्या वर्षी त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिलीही केली.
‘फिल्म इंडिया’ पाक्षिकाचे प्रसिद्ध संपादक ‘बाबूराव पटेल’ यांची सुशीलाबाईंशी प्रथम भेट १९४२ मध्ये झाली. बाबूराव पटेल यांनी सुशीलाबाईंना एचएमव्हीमध्ये शास्त्रीय गायनासाठी करार मिळवून दिला. इथूनच सुशीलाबाईंची शास्त्रीय गायनाची दीर्घ कारकीर्द सुरू झाली. पुढे बाबूराव पटेलांनी सुशीलाबाईंना चित्रपसंत नायिका म्हणून चमकवले आणि ‘ग्रहण’, ‘द्रौपदी’ (१९४४), ग्वालन (१९४६) हे चित्रपट काढले.
१९८२ साली बाबूराव पटेल यांचे निधन झाले. त्यानंतर ‘फिल्म इंडिया’ मासिकाची जबाबदारी त्यांनी स्वत: घेतली. १९८५ मध्ये ‘फिल्म इंडिया’ बंद झाले; परंतु सुशीलाबाई शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम करीत राहिल्या. विशेष म्हणजे बाबूराव पटेल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जन्मदिवशी प्रत्येक ऑक्टोबरमध्ये त्या आपल्या ‘गिरनार’ बंगल्याच्या हिरवळीवर संगीताचा कार्यक्रम आवर्जून करीत. या कार्यक्रमात अनेक श्रेष्ठ कलाकार भाग घेत.
सलमान खानची बहीण ‘अलविरा खान’ आणि पुढे आमीर खानशी लग्न करणार्या ‘किरण राव’ यांनीदेखील डॉ. सुशीलाराणी पटेल यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्षे नियमाने रियाज केल्यामुळे बाईंचा आवाज स्वच्छ व उत्तम होता. ‘खयाल’, ‘द्रुपद’ आणि ‘ठुमरी’ हे संगीत प्रकार पुढच्या पिढय़ांसाठी योग्य स्वरूपात राहावेत, या भूमिकेतून त्यांनी आपल्या शिष्यांना योग्य संगीत शिक्षण दिले. आकाशवाणीवर अनेक वर्षे ए-ग्रेड व्होकल सिंगर म्हणून त्यांनी आजवर गायनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. मुंबईत ‘स्वर आलाप’तर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदानसमयी, ९२व्या वर्षी त्यांचे गायन सादर झाले, तेव्हा त्यांचा आवाज व गायन ऐकून मी थक्कच झालो. या कार्यक्रमाप्रसंगी मी माझ्या सिनेमा पुस्तिकांच्या संग्रहासंबंधी चर्चाही केली होती व त्यांनी विशेषरूपानं मला सांगितलं, की तुमच्या संग्रहाची गिनीजबुक रेकॉर्ड्सने दखल घेतली पाहिजे आणि त्यानंतर मला शुभाशीर्वादही दिला, हे मी कधी विसरणार नाही.
त्यांना जीवनात अनेक पुरस्कार लाभले. ‘संगीत नाट्य अँकॅडमी’ने पुरस्कार देऊन त्यांचा विशेष गौरव केला होता. तसेच शासनानेही ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये ‘दादासाहेब फाळके अँकॅडमी’चा पुरस्कार महत्त्वाचा आहे. या उतारवयात त्यांना पाहणारे जवळचे कुणीही नातेवाईक नव्हते; म्हणून त्यांचे शिष्यच त्यांची शेवटपर्यंत देखभाल करीत होते. आपल्या पश्चात हा ‘गिरीनार’ बंगला, इथली पेंटिंग्ज आणि पुरातन वस्तू चांगल्या स्वयंसेवी संस्थेला दिल्या जाव्यात, ही त्यांची शेवटची इच्छा होती आणि बाबूराव पटेलांचीही इच्छा होती. गुरुवार २४ जुलै २0१४ रोजी दुपारी १.३0 वा. हृदयविकाराने त्यांची जीवनज्योत मालवली गेली. त्यांच्या स्मृतीस ही माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
(लेखक ज्येष्ठ सिनेसंग्राहक आहेत.)