शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

तोंड का उघडलं?

By admin | Updated: January 14, 2017 14:31 IST

आपल्याच खात्यातला भ्रष्टाचार वेशीवर टांगण्याची हिंंमत करणारे वाहतूक पोलीस सुनील टोके म्हणतात, ‘एका दिवसात जग बदलणार नाही हे मला चांगलं माहितीये. आपण सगळ्यांनी डोळे उघडे ठेवले पाहिजेत. अनियमिततेवर, भ्रष्टाचारावर बोट ठेवलं पाहिजे. परिस्थिती बदलेल. नक्की बदलेल..’

- ओंकार करंबेळकरआपल्याच खात्याविरुद्ध न्यायालयात गेलेले मुंबई वाहतूक पोलीस विभागातील हवालदार सुनील टोके.जेमतेम दीडेकशे चौरस फुटांच्या घरात राहतात. साधा रस्ता ओलांडतानाही सतत चालत्या गाड्यांचे फोटो-व्हिडीओ काढत असतात.. माहिती अधिकार कायदा, सरकारी नियम, कायदेकानून हीच भाषा अखंड बोलतात. म्हणजे ‘तीसतीनदोनहजारदोनला मी अमुक केलं’,‘चारपाचतेराला मी अमुक यांच्याकडे दाद मागितली’ अशी बाराखडी सतत तोंडी.. आणि संताप.प्रश्न विचारणाऱ्या लोकांसाठी पुराव्यांच्या पोतड्याच मोबाइलमध्ये भरलेल्या!हेल्मेट घातलं नाही म्हणून स्वत:च्या मुलाला दंड करून पावती फाडलीय या गृहस्थाने! ‘तुमच्या आजूबाजूचे, खात्यातले लोक सर्रास पैसे घेताना दिसतात. तुम्हाला नाही वाटलं तसं कधी?’ - असं थेट विचारलं, तर संतापून म्हणतात, ‘का पैसे घ्यावेत मी? माझ्या पगारामध्ये माझं सगळं व्यवस्थित भागतंय की!’परळीच्या जांबोरी मैदानासमोर हातातला पेपर उंचावून मला खूण करण़ारे, मोठ्याने फोनवर बोलणारे टोके दिसले. म्हटलं हेच असणार आपल्याच खात्याविरोधात तक्रार करणारे सुनील टोके. रस्ता ओलांडून जाईपर्यंत ते आजूबाजूच्या गाड्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढू लागले होते. मध्येच एखादा फोन घ्यायचा, त्यावर मोठ्या आवाजात फोनवर बोलायचं, मला एखादं उत्तर द्यायचं आणि पुन्हा गाड्यांचे फोटो काढायचे असं त्यांचं सुरू झालं. शेवटी विचारलंच त्यांना, ‘या गाड्यांचे फोटो का काढता आहात?’‘दाखवतो गंमत’, असं म्हणून त्यांनी आमच्या समोरच असलेल्या स्टॉपला खेटून लावलेल्या गाड्यांचे फोटो दाखवले. म्हणाले, ‘पाहा. या दोन गाड्या स्टॉपला चिकटून लावल्या आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि थोड्या लांब असलेल्या गाडीच्या चाकाला मात्र कारवाई करण्यासाठी जाडजूड क्लीप लावून ठेवली आहे. याचा अर्थ स्टॉपला चिकटून लावलेल्या गाडीमालकांनी कारवाई होऊ नये यासाठी नक्कीच काहीतरी केलं असणार. आता हा बघा व्हिडीओ, एक्स्प्रेस वेवरती नेमून दिलेल्या लेनमधून कोणीच गाडी चालवत नाहीये. जड वाहनं खुशाल लेन बदलून दुसऱ्या मार्गावरून जाताहेत..’असे एकापाठोपाठ एक फोटो आणि व्हिडीओ दाखवत म्हणाले, ‘आता तुम्हीच सांगा, अशाने कसे अपघात कमी होतील? जर मला हे सगळं दिसतंय तर बाकीच्या पोलिसांना हे दिसत नसेल का? दुसऱ्याच्या आणि स्वत:च्या जिवाची पर्वा न करणाऱ्या चालकांना यातलं काहीच कळत नसावं का?’त्यांचं ते फोटो काढणं, फोनवर बोलणं इतरांचं लक्ष वेधून घेत होतं. तिथल्या लोकांना त्याची सवयही असावी, पण आमचं नीट बोलणं होत नव्हतं. शेवटी मीच त्यांना म्हटलं, ‘इथे फारच गोंगाट आहे. थोडा वेळ तुमच्या घरी जाऊनच बोलूया का?’मागेच असणाऱ्या बीडीडी चाळीत ते मला घेऊन गेले. वरळीच्या बीडीडी वसाहतीतील त्यांची एक टिपिकल इमारत होती. आम्ही घरी जाताच संध्याकाळी टीव्ही पाहायला आलेल्या शेजारच्या बाई उठून गेल्या. शंभर-दीडशे चौरस फुटांच्या आतबाहेर असणाऱ्या त्या जागेत त्यांनी सगळा संसार बसवला होता. एका नजरेतच घरातील सगळ्या चीजवस्तू दिसतील एवढ्याशा त्या घरात टोकेंच्या कुटुंबातले एकूण सहाजण राहतात. घरी गेल्यावर टोकेंचं पुन्हा माझ्याशी आणि अधेमधे फोनवर बोलणं सुरू झालं. त्यामुळे शेवटी टीव्ही बंद करून त्यांची पत्नी चहा करायला गेली. टोके जरा शांत झाल्यावर त्यांना स्पष्टच विचारलं, ‘टोके, तब्बल बत्तीस वर्षांपासून तुम्ही नोकरी करताहात. मग गैरव्यवस्थेबद्दल तुम्ही आताच कसे इतके स्पष्ट आणि बेधडकपणे बोलू लागलात? व्यवस्थेतला तुमचा नेमका अनुभव काय?’टोके क्षणात म्हणाले, ‘अहो दादासाहेब, नाही हो. मी काही आजच तोंड उघडलेलं नाही. प्रकरण कोर्टात गेल्यामुळे ते आज सर्वांसमोर आलं इतकंच. मी सगळं करून बसलो. कोणीच दाद दिली नाही म्हणून कोर्टाची पायरी चढावी लागली. माझ्या परीनं मी बरेच प्रयत्न केले. अँटी करप्शनकडे तक्रार झाली, आरटीआय झाले, पण काहीच होईना. शेवटी मी हायकोर्टाचा पर्याय निवडला. मला अजिबात हिरो व्हायचं नाहीये, की प्रसिद्धीचा हव्यास मला नाही. पण सगळं करून झालं. न्यायालयाशिवाय दुसरा कुठला पर्यायच शिल्लक न राहिल्यानं हे सगळं करावं लागलं.’ न्यायालयाची पायरी चढण्याच्या आधी टोकेंनी भरपूर तयारी केलेली दिसत होती. फोटो- व्हिडीओच्या पुराव्यांसकट त्यांनी याचिका दाखल केली आहे. पण ‘न्यायालयात जाण्यापूर्वी तुम्ही मॅटमध्ये का गेला नाहीत’ असं विचारताच ते म्हणाले, ‘मॅटचा पर्याय होता, पण त्यात केवळ आदेश देण्यात आला असता, शिक्षा झाली नसती. भ्रष्टाचारामध्ये समाविष्ट असणाऱ्या लोकांना शिक्षा होण्यासाठी न्यायालयात जाणं मला योग्य वाटलं.’टोकेंना म्हटलं, ‘नियमबाह्य वर्तणूक आणि भ्रष्टाचार आपल्याकडे जागोजागी दिसतो, पण आपल्याच खात्यातल्या गैरकारभाराविरुद्ध उभं राहावं आणि तो मोडून काढावा असं तुम्हाला का आणि कधीपासून वाटायला लागलं? त्याचा तुम्हाला त्रास नाही झाला? कुठून या फंदात पडलो याची कधी काळजी नाही वाटली?’ एकदम उसळून टोके म्हणाले, ‘अहो, हे वाहतूक पोलीस मयताच्या गाडीला पण सोडत नाहीत हो... जो येईल त्याच्याकडून पैसे काढायचे असं चाललंय. लोक कर भरतात म्हणूनच आमच्या नोकऱ्या आहेत, आम्हाला पगार मिळतो हे विसरून कसं चालेल? ‘चिरीमिरी’ शब्द एकदम क्षुल्लक वाटतो एवढी मोठी रक्कम प्रत्येकवेळेस उकळायला लागलेत. मीही माणूसच आहे. उघड्या डोळ्यांनी कुठवर पाहणार? हे मला सहन होत नाही. एखाद्या माणसाने सिग्नल तोडला किंवा हेल्मेट नसेल तर त्याला कोणत्या नियमाखाली आपल्यावर कारवाई होतेय हे समजायलाच हवं. त्याने तसं काही विचारलं की लगेच त्याचं रूपांतर भांडणात होतं आणि त्याच्या पावतीवरचा आकडा वाढत जातो. इतर गुन्ह्यांप्रमाणे त्याच्या पावतीवर १७९ अंतर्गतही दंड होतो.’ - टोकेंना मध्येच थांबवून विचारलं, ‘१७९ हा काय प्रकार आहे? कुठलं कलम?’टोकेंनी समजावून सांगितलं, ‘१७९ म्हणजे पोलिसांशी हुज्जत घातल्याबद्दल होणारा दंड. म्हणजे आपणच हुज्जत घालण्यासारखी परिस्थिती तयार करायची आणि मग लोकांना दंड करायचा. दंड मिळत नसेल तर पावतीविना पैसे घ्यायचे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. असा हा सारा प्रकार..’खात्यातून आपल्याला काही त्रास झाला का, भीती वाटली नाही का, या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी खुबीनं टाळलं. इतक्या वर्षांच्या नोकरीमुळे टोकेंची भाषा खास सरकारी झाली आहे. माहिती अधिकार कायदा, सरकारी नियम, कायदेकानून.. सारखं त्याच वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या भाषेतही कलमं, तारखा, आकडेवारीची सरकारी भाषा सारखी येत होती. म्हणजे ‘२३ आॅगस्ट २०१६ला मी दुसऱ्यांदा राजीनामा दिला’ असं सांगण्याऐवजी ‘तेवीसआठसोळाला मी दुसरा राजीनामा दिला’, ‘तीसतीनदोनहजारदोनला मी अमुक केलं’, ‘चारपाचतेराला मी अमुक यांच्याकडे दाद मागितली’ अशी त्यांच्या भाषेची बाराखडी होती.. त्यांच्याशी गप्पा मारत असताना मध्येच त्यांना माध्यमांमधून किंवा त्यांच्याच खात्यातल्या लोकांचे फोन यायचे. त्यावर लगेच मोठ्या आवाजात ‘हो, दादासाहेब, बोला...’ वगैरे सुरू व्हायचं. त्यातलाच एक फोन लांबला आणि बोलत बोलत ते खोलीबाहेर गेले, म्हणून समोरच मटार निवडत बसलेल्या त्यांच्या पत्नीला मघाचाच प्रश्न पुन्हा विचारला, ‘तुमचे पती कधीपासून आपल्याच खात्याच्या विरोधात, सिस्टिमविरोधात भांडतायत, लढताहेत, तुम्हाला कधी त्याबद्दल काळजी, चिंता वाटली नाही?’ झटकन त्या म्हणाल्या, ‘काळजी सोडा, आम्हाला तर भयंकर भीती वाटते. कोणीतरी बदला घेईल, मारझोड होईल, काही करेल असं सारखं वाटत असतं. खूप वेळा 'ह्यांना’ सांगून झालंय, पण हा माणूस घाबरत नाही आणि बदलणार पण नाही. म्हणून आता त्यावर बोलायचंच सोडून दिलंय. पण कधी काय होईल, फार फार भीती वाटते. एखादेवेळी आम्ही एकदम रस्त्यावर येऊ असंही वाटतं.’टोके पुन्हा खोलीत आले. मुंबईतल्या वेगवेगळ्या जागांवर चालणाऱ्या भ्रष्टाचाराचे फोटो, व्हिडीओ फोनवर पुन्हा दाखवू लागले. म्हणाले, ‘महसूल खात्याची जबाबदारी आपलीच असल्यासारखं हे वाहतूक पोलीस पैसे गोळा करतात. तुम्ही लोकांना शिस्त लावायला, नियम सांगायला तेथे उभे आहात. नियम मोडणाऱ्याला दंड करण्यासाठी आहात. पण त्याऐवजी हे लोक नोटाच गोळा करायला तिथे थांबतात. कुठल्यातरी झाडाखाली लपायचं आणि अचानक समोर येऊन वाहनचालकाला थांबवून पैसे काढायचे! हे तुमचं काम आहे का? मी त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही पोलीस आहात, महसूल कर्मचारी नाहीत. पण तरीही पैसे गोळा करायचं काम खालपासून वरपर्यंत चालूच असतं.’वाहतूक पोलिसांवर इतकी उघड टीका ऐकल्यावर त्यांना विचारलं, ‘म्हणजे तुमच्या खात्यात सगळेच भ्रष्ट आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का?’त्यावर ते चटकन म्हणाले, ‘मुळीच नाही. अत्यंत प्रामाणिकपणे नोकरी करणारी फार चांगली माणसंही आहेत आमच्याकडे. त्यांना कितीही लाच द्यायचा, चिरीमिरी द्यायचा प्रयत्न करा, ते बधणार नाहीत. असे भरपूर लोक आमच्याकडे आहेत, त्यांचा मला अभिमान वाटतो. मी नेहमी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना प्रोत्साहनही देतो.’ बोलता बोलता ते म्हणाले, ‘खोटं वाटत असेल तर बघा प्रयत्न करून. मी आता तुम्हाला एक नंबर देतो, करा त्याला फोन. किंवा रस्त्यात कधी त्याला चिरीमिरी द्यायचा, फितवायचा प्रयत्न करून पाहा, तो अजिबात तुमचं ऐकणार नाही. फुकटचा, नियमबाह्य एक छदामही तो घेणार नाही.’ आपण जे काही बोलू, विधान करू, त्या प्रत्येक वाक्यावर पुरावा मागितला जातो म्हणून टोके आजकाल सगळी माहिती हाताशी, फोनवर ठेवतात. काहीही सांगितलं की म्हणतात, ‘हा घ्या त्यांचा नंबर, लावा फोन माझ्यासमोर.. मग कळेल, मी खरं बोलतोय की नाही?’ बोलता बोलता म्हणाले, ‘सगळ्यांना सारखाच नियम. हेल्मेट घातलं नाही म्हणून मी स्वत: माझ्या मुलाला दंड केलाय. वरिष्ठ नको म्हणत होते तरीपण मी म्हटलं, नाही साहेब, तो कमावता आहे. त्याच्याकडे पैसे आहेत आणि त्यानं नियम मोडलाय. ही पाहा पावती..’ - असं म्हणत त्यांनी पावतीचा फोटो फोनवर दाखवला. त्यांचा फोन अशाच प्रकारच्या फोटोंनी भरून गेला आहे. याचिका दाखल केल्यापासून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर ते एकदम अ‍ॅक्टिव्ह झालेले दिसले.एखादा धबधबा कोसळावा तसे, पोटतिडीकेनं टोके बोलतात. बरंच काही सांगत राहतात. थोडं थांबवून त्यांना म्हटलं, ‘पण तुमच्या आजूबाजूचे, खात्यातले लोक नियमबाह्य सर्रास पैसे घेताना दिसतात. तुम्हाला नाही वाटलं तसं कधी?’ टोके म्हणाले, ‘का पैसे घ्यावेत मी? माझ्या पगारामध्ये माझं सगळं व्यवस्थित भागतंय. अंथरूण पाहूनच मी हातपाय पसरतो. घरात ज्या मोठ्या वस्तू दिसताहेत, ती प्रत्येक वस्तू मी कर्जाच्या हप्त्याने घेतली आहे. काहींचे हप्ते अजूनही चालू आहेत. पण या साऱ्याच गोष्टी माझ्या स्वत:च्या कमाईच्या, स्वकष्टातून घेतलेल्या आहेत, याचा मला आनंद आहे. ज्या लोकांनी लाचेच्या हप्त्यांनी वस्तू घेतल्या त्यांची अवस्था जाऊन पाहा. आज त्यांचं काय झालंय. त्यांची मुलं काय करतात ते विचारून पाहा, म्हणजे साध्या-सरळ आयुष्याचं महत्त्व लगेच समजेल. आज माझे दोन मुलगे आणि एक मुलगी नोकरी करते. सूनबाईलाही नोकरी लागलीय. पाच-पाच पगार घरात येत असल्यावरसुद्धा मी वाईट मार्गाने पैसे का मिळवू?’यावर टोकेंना विचारलं, ‘पण आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांनी कधी तुम्हाला 'समजवायचा' प्रयत्न नाही केला? किंवा ‘तू कशाला मधेमधे करतोस’ असं कोणी विचारत नाही? ‘तू पण आमच्यात ये’ असं कोणी सांगत नाही?..’टोके आणि त्यांची पत्नी दोघंही हसले. म्हणाले, ‘हे नेहमीचंच आहे. हरतऱ्हेने सांगायचा प्रयत्न झालाय. मला सिव्हिअर डायबिटिस आहे. माझ्या मागे याचीही चौकशी व्हायची. खरंच मी आजारी आहे का याची चाचपणी व्हायची. पण आम्ही त्यालाही टक्कर दिली.’सुनील टोकेंनी माहितीच्या अधिकारात भरपूर अर्ज केले आहेत. म्हणाले, ‘आपण ज्या कॉटवर बसलोय त्याखाली सगळे माहितीचे अधिकार आणि त्यासंदर्भाचीच कागदपत्रं भरलेली आहेत. माहितीच्या अधिकारामध्ये मी सातशे ते आठशे अर्ज केले आहेत. एका दिवसात ८७ अर्ज मी केलेत. मी माझ्या बदलीचं कारणही माहितीच्या अधिकाराखाली विचारलं. पण, ‘आपली विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे आपल्याला माहिती देता येत नाही’ असं उत्तर मला देण्यात आलंय. दोन दिवसांपूर्वीच ज्या बीएसएफ जवानानं अन्नाच्या दर्जाबाबत व्हिडीओद्वारे कैफियत मांडली, त्याला लगेच वेडं ठरवून टाकलं. जर त्याची मन:स्थिती नीट नाही तर त्याच्या हातात तुम्ही बंदूक दिलीच कशी याचं उत्तर आपल्याला नको का? व्हिसल ब्लोअरच्या बाबतीत हे नेहमीच होतं. मूळ प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी आवाज उठवणारा माणूसच कसा चुकीचा आहे हे सांगायला जो तो पुढे. असं कसं चालेल?’टोके त्यांच्या अर्जांवर, माहिती अधिकारावर भरपूर बोलत होते. शेवटी त्यांना विचारलं, ‘तुम्ही कोर्टात गेलात, मीडियामध्ये गेलात, आता तुमच्यावर खात्याची बदनामी केली म्हणून कारवाई होऊ शकेल, त्याची भीती वाटते का?’ त्यावर टोके म्हणाले, ‘मी खात्याकडे वरिष्ठांकडे तक्रारी करताना एक अर्जही केला होता, त्यात मी लिहिलं होतं.. भ्रष्टाचारात सामील होत नसल्यामुळे मला त्रास देणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर मला सन्माननीय न्यायालय आणि माध्यमांकडे दाद मागावी लागेल, तेव्हा मी खात्याची बदनामी केली असं कृपया समजू नये. माझा न्यायालयावर १०१ टक्के विश्वास आहे. मला तिथे न्याय मिळणारच. जर मी चूक असेन, भ्रष्ट असेन, माझ्यामुळे कोणाची बदनामी झाली तर ते पुराव्यानिशी सिद्ध करावं. मी शिक्षेला सामोरा जाईन. २०२३ साली मी निवृत्त होणार आहे, मुदतवाढ असेल तर फार तर २०२५ पर्यंत सेवेत राहू शकेन. एका दिवसात जग बदलणार नाही हे मला चांगलं माहितीये. आपण सगळ्यांनी डोळे उघडे ठेवले पाहिजेत. अनियमिततेवर, भ्रष्टाचारावर बोट ठेवलं पाहिजे. परिस्थिती बदलेल. नक्की बदलेल..’टोकेंचा आत्मविश्वास आणि त्यांची जिद्द बुलंद आहे. त्यांच्याशी बोलताना त्याचा प्रत्यय वारंवार येतो. ‘तुमच्या प्रयत्नांना यश येवो’ असं म्हणून टोकेंचा निरोप घेतला. बीडीडीच्या पायऱ्या उतरताना वाटलं, न्यायालयात या खटल्याची दुसरी बाजूही मांडली जाईल. ज्यांच्यावर आरोप केले आहेत ते बचावाचे प्रयत्न करतील. नेमकं काय होईल पुढे? काळाच्या ओघात ते समोर येईलच, पण संपूर्ण व्यवस्था आणि स्वत:च्याच खात्याविरुद्ध एकट्यानं दंड थोपटून उभं राहणाऱ्या टोकेंसारख्या एकांड्या शिलेदाराच्या धाडसाचं कौतुक वाटतंच.एकेका पावलाचं मोलही मोठंसुनील टोके यांनी उचललेल्या पावलाचं खरंच मनापासून कौतुक वाटतं आणि हे काम मला अगदी अपूर्व वाटतं. कोणत्याही व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार कमी करणं आणि लोकांची संवेदनहीनता बदलणं ही दोन महत्त्वाची आव्हानं असतात. काम करताना एखाद्या चांगल्या कारणासाठी रिस्क घेतली जाऊ शकते. आपल्याला व्यवस्थेत राहूनही नियम पाळून आणि मर्यादा ओळखून भ्रष्टाचाराविरोधात लढता येतं. टोकेंच्या या पावलामुळे व्यवस्था कितपत बदलेल हे माहिती नाही, पण अशा एकेक पावलामुळे, पुढाकारामुळे व्यवस्था सुधारण्याची प्रक्रिया गतिमान होईल. ही प्रक्रिया यशस्वी होईल अशी आशा वाटते.- लीना मेहेंदळे (माजी सनदी अधिकारी)व्यवस्था बदलणं शक्यमुळात हेतू शुद्ध असला की तुम्ही काहीही करू शकता. व्यवस्थेत राहून तुम्ही भ्रष्ट व्यवहारांविरोधात तोंड उघडू शकता. कायद्याच्या चौकटीत राहून, पूर्ण अभ्यासासह चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करण्याची तुम्हाला पूर्ण संधी असते. फक्त तुमच्यामध्ये धमक हवी, धैय हवं. हे धैर्य पूर्ण अभ्यासाअंतीच येतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय घटकांशी संलग्न असू नये किंवा त्यांचा कल घटकाकडे असू नये. माझ्या मते सुनील टोके यांचे धाडस आणि त्यांनी केलेली धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे. ही व्यवस्था आतून आणि बाहेरून बदलणे शक्य आहे.- अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी)(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

onkark2@gmail.com