- प्रा. डॉ. द. ता. भोसले
आमच्या शेजारी सिंचन आणि पाटबंधारे खात्याचे जोशी नावाचे एक सद्गृहस्थ राहतात. या खात्याचे पाणी जसे वेडेवाकडे जमिनीत जिरते, तसेच या खात्यावरचा पैसाही अनेक ‘खात्या’ तोंडात जिरतो. त्यातले चार, दोन घोट या क्लास वन अधिकार्यांच्या मुखातही पडले असावे. म्हणूनच त्यांनी कष्टाविना साचलेल्या पैशातून आपल्या अमित नावाच्या सुपुत्रास एका खासगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. उत्तम शिक्षण, प्रगत ज्ञानाची ओळख, अप्टूडेट राहणीमानाचा फायदा, मोठय़ा लोकांच्या होणार्या ओळखी या सार्यांचा विचार करून त्यांनी मोठी देणगी देऊन मुंबईच्या एका उपनगरात असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्याची सारी सोय लावली आणि परत येताना त्याच्या बँक खात्यावर भली मोठी रक्कम जमा केली. दरमहा कशाला पैसे पाठवत बसा या भावनेने.
दर दोन, तीन दिवसांनी त्याचा यांना फोन येई. यांचा त्याला जाई. त्यावरून त्याचे कमी-जास्त कळायचे. त्याचे सगळे व्यवस्थित चालले आहे हे ऐकून या जोशींनाही समाधान वाटायचे. पण एकेदिवशी पहाटे पहाटे तीनच्या दरम्यान त्यांच्या घरचा फोन खणखणला. अर्ध्या अधिक झोपेतच त्यांनी तो घेतला. मी पोलीस अधिकारी फर्नांडिस बोलतोय. अमित जोशी हा तुमचा मुलगा रात्री तीनच्या सुमारास एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत दारू पिऊन गोंधळ घालताना सापडला. त्याच्या वर्गातले वीस-बावीस युवक-युवती यांनाही पकडले आहे. त्याच्या सुटकेसाठी मी देत असलेल्या पत्त्यावर आपण ताबडतोब येऊन भेटावे, अशा कोरड्या आणि दमदार शब्दांत पत्ता देऊन त्यांनी फोन ठेवला. अर्धवट झोपेतल्या जोशींना खाडकन जाग आली. गारठा असताना घशाला कोरड पडली. देशी वा विदेशी न घेताच पाय थरथरायला लागले. तोपर्यंत जागी झालेली बायकोही हंबरडा फोडून रडू लागली. जोशींनी त्यांच्याच खात्यातील दोन व्यवहारचतुर असलेले अधिकारी घेतले. मलाही इच्छा नसताना गाडीत कोंबले आणि मांडीवर प्रेत ठेवलेल्या माणसांनी प्रवासात गप्प गप्प बसावे, तशा स्थितीत आम्ही अमितचे कॉलेज गाठले. तिथेही पोलिसांचा फौजफाटा, बघ्यांची गर्दी आणि खोट्याखर्या चर्चेला उधाण आलेले आम्हाला जाणवले. अमितच्या खोलीवर बॅगा ठेवायला जात असतानाच त्या वसतिगृहाचे रेक्टर भेटले. खरे नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी जोशींच्या मित्राने त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘काय सांगू साहेब? बड्या घरची, कोट्यधीशांची ही मुले इथे प्रवेश घेतानाच तीस लाखांची गाडी घेऊन येतात.
येताना नोटांनी भरलेल्या दोन, तीन बॅगांशिवाय दुसरे काहीच आणत नाहीत. या आमच्या कॉलेजमध्ये ८0 टक्के पोरे परराज्यांतील आहेत. बडे अधिकारी, बडे व्यापारी, बड्या राजकीय नेत्यांची ही मुले असतात. इथं ती शिकण्यासाठी कमी आणि चैन करण्यासाठीच आलेली असतात. दर चार महिन्याला मोबाईल बदलतात, तर वर्षाला गाडी बदलतात. सारे काही बदलत असले तरी त्यांचं कॉलेजचं वर्ष काही बदलत नाही. ते तरी कसं बदलणार म्हणा? दिवस भर कँटीनमध्ये सिगारेट फुंकत बसतात. कुठल्या तरी गर्लफ्रेंडच्या पाठीवर हात ठेवून गप्पा मारत असतात किंवा बागेत झाडाआड एकमेकांना मिठय़ा मारत असतात. काही वेळाला आम्ही दटावले तर आम्हालाच दमदाटी करतात. काही खरं नाही साहेब. जमाना पार बदलला. पार बिघडला.’’
गंभीर चेहर्यानं जोशींच्या सहकार्यानं विचारलं, ‘‘पण साहेब, आमचा अमित तसा नाही हो. सुस्वभावी, निर्व्यसनी, संस्कारी वातावरणात वाढलेला मुलगा आहे. साध्या सुपारीचंदेखील त्याला व्यसन नाही. मग हे असं कसं घडलं म्हणावं?’’ आमच्यासाठी चहाची ऑर्डर देत ते सांगू लागले, ‘‘साहेब, मी आठ वर्षांपासून इथे आहे. मी पाहत आलोय, की स्वत:च्या हुशारीवर काही गरीब घरातील मुलेही इथे असतात. त्यांना परिस्थितीशी चांगली जाण असल्याने ती, आपण भले नि आपला अभ्यास भला अशीच वागत असतात. पण वर्गातील बाकीचे विद्यार्थी त्यांना आपल्या या उठवळ ग्रुपमध्ये बळजबरीने आणतात. त्यातूनही एखादा त्यांच्यात मिसळला नाही, तर त्याच्यावर पार बहिष्कारच टाकतात. त्याला बाजूला फेकतात. टोचून बोलतात. अथवा पार त्याच्याशी अबोलाच धरतात. तो मग मनाने खचतो. एकलेपण नकोसे होते अन् यात सामील होतो. नाईलाज म्हणून. तसेच या मुलांना पाटर्य़ा करायला, त्यानिमित्ताने प्यायला नि गोंधळ घालायला कोणतेही कारण पुरेसे होते. एकेक विद्यार्थी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी सत्तर हजारांपर्यंत खर्च करतो. आज याचा वाढदिवस. उद्या त्याचा वाढदिवस. परवा तिचा वाढदिवस. रविवार मौजमजेचा दिवस. त्याशिवाय याला स्कॉलरशिप मिळाली त्यासाठी पार्टी. त्यानं नवी गाडी घेतली म्हणून पार्टी, तर कुणाचं बरेच दिवस रेंगाळलेलं लफडं सफल झालं यासाठी पार्टी. भरपूर दारू पिऊन नाचायचे. गाणी म्हणायची. मुलींबरोबर नाचायचे. दारूच्या नशेत गोंधळ घालायचा. एकमेकांना मिठय़ा मारायच्या आणि मिठीतच बेशुद्ध अवस्थेत पडायचे. आम्ही आणि आमच्या पदाधिकार्यांनी या मुलांना खूपदा तंबी दिली, पण ऐकत नाहीत.’’
हे सारे ऐकल्यावर आजचं शिक्षण आणि आजची चंगळवादी पिढी किती अध:पतित झाली आहे याचा मला धक्कादायक अनुभव आला. माझ्या मनात आले, शिक्षणाने माणसाचा देवमाणूस बनतो हे खरे मानायचे का खोटे मानायचे? चोवीस तासांपैकी सोळा तास ज्याच्या तोंडात सिगरेट असते नि हातात मद्याचा ग्लास असतो, असा आमचा युवक कुणाच्या फायद्याचा? दिवसभर चॅटिंग करणारा, फेसबुकात अडकलेला, मोबाईलवर कामक्रीडेची चित्रे पाहणारा, एखाद्या मुलीबरोबर सेक्सचा आनंद घेण्यात धन्यता मानणारा आणि पैसा टाकला, की कोणतीही गोष्ट सहज मिळते अशी धारणा असणारा हा तरुण सुशिक्षित म्हणायचा, की अशिक्षित? आपल्या चैनीसाठी पैसे कमी पडले, तर हे कुलदीपक आपल्या आईबापालाही उद्या विकायला कमी करणार नाहीत. थोडासा शांत झाल्यावर मी जोशी साहेबांना म्हणालो, ‘‘जोशीसाहेब, तुमच्या अमितची चूक नाही.
मांसाला चटावलेल्या लांडग्याच्या कळपात गरीब स्वभावाचं कोकरू सापडावं तशी त्याची अवस्था झालेली आहे. आधी आपण या कोकराला सोडवू या. त्याची भीती दूर करू या. तुमचा अमित माणसं मारणारा डॉक्टर होऊ नये असं वाटत असेल, तर त्याला दुसरीकडे कुठे तरी ठेवा. आपल्याला पोरगा महत्त्वाचा आहे. पैसा नव्हे.’’ जोशीसाहेबांचे डोळे डबडबले होते. ते अश्रू पुत्रवियोगाचे होते, की पश्चात्तापाचे होते कळले नाही. पण आम्ही पोलीस कार्यालयात गेलो. अधिकार्यांना भेटलो. हातापाया पडलो. लेखी लिहून दिले आणि गुडघ्यात मान घालून बसलेल्या अमितजवळ गेलो. ‘‘पुन्हा असं करू नको. तुझा हा पहिला गुन्हा म्हणून तुला सोडून देतो.’’ असे म्हणून त्याच्या हाताला धरून त्यांनी अमितला आमच्यासमोर आणले. समोर जोशीसाहेबांना पाहताच त्यांच्या गळ्यात पडून तो रडत म्हणाला, ‘‘मला या लोकांनी बळजबरीने प्यायला लावली. माझे हात बांधून मला पाजली बाबा. माझा नाईलाज झाला बाबा, मला माफ करा.’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)