शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

मंगळ मंगल

By admin | Updated: September 27, 2014 15:33 IST

गेल्या बुधवारी चर्चा होती ती मंगळाचीच! कारणही अर्थात तसेच. पहिल्याच प्रयत्नांत भारताच्या मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि मंगळाला गवसणी घातली. अवघे जग पाहत राहिले. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातील भारताची ही कामगिरी सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशीच आहे. यानिमित्ताने आजवरच्या जगभरातील मंगळ मोहिमांचा आणि भारताच्या अवकाश प्रवासाचा वेध..

- डॉ. प्रकाश तुपे 

 
 
भारतीय शास्त्रज्ञांनी अवकाश संशोधन क्षेत्रात एक देदीप्यमान कामगिरी पार पाडून सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी भारताने त्याचे पहिलेवहिले मंगळयान मंगळाच्या कक्षेत नेऊन इतिहास घडविला. या प्रकारची कामगिरी पहिल्याच प्रयत्नात पार पाडणारा भारत हा एकमेव देश असून, मंगळ मोहिमा यशस्वीपणे राबविणारा तो जगातील चौथा देश ठरला आहे. भारतीय अवकाश संस्थेने (इस्रो) अवघ्या पन्नास वर्षांच्या काळात पृथ्वीभोवती फिरणारे विविध कामांसाठीचे उपग्रह प्रक्षेपित केले. एवढेच नव्हे, तर ऑक्टोबर २00८मध्ये यशस्वीपणे चंद्रापर्यंत मजल मारली. यानंतर अवघ्या सहाच वर्षांत इस्रोने मंगळाला गवसणी घालण्याची करामतदेखील करून दाखविली. 
मंगळ हा सूर्यमालेतील पृथ्वीशेजारचा व बर्‍याच अंशी पृथ्वीसारखा ग्रह आहे. दुर्बिणीच्या शोधानंतर मंगळाचे सखोल निरीक्षण करण्यात आले. मंगळाच्या पृष्ठभागावर रेघोट्यांचे जाळे दिसत असल्याने तेथे प्रगत जीवसृष्टी असावी व पृष्ठभागावरच्या रेषा त्यांनी बांधलेले कालवे असल्याचा निष्कर्ष एच. जी. वेल्स या आकाश निरीक्षकाने काढला; त्यामुळे मंगळावर असणार्‍या प्रगत जीवसृष्टीशी संपर्क साधावा, असे अनेकांना वाटू लागले. कदाचित यामुळेच अवकाश मोहिमा सुरू झाल्याबरोबर चंद्राप्रमाणेच मंगळ मोहिमांचा प्रारंभ रशिया आणि अमेरिकेने केला. रशियाची पहिली मंगळ मोहीम १९६२मध्ये पार पडली; मात्र ती संपूर्णपणे अयशस्वी ठरली. त्यानंतर अवघ्या दोनच वर्षांनी अमेरिकेने मंगळाकडे मरिनर यान पाठविले आणि तेसुद्धा अयशस्वी झाले. त्यानंतर मात्र या दोन्ही चुका सुधारून मंगळ मोहिमा यशस्वीपणे राबविल्या गेल्या. असे असले तरी मंगळ मोहिमेत हमखास यश दोन्ही राष्ट्रांना कधीच मिळू शकले नाही. अमेरिकेच्या १५ मंगळ मोहिमांपैकी अवघ्या ९ मोहिमांना यश मिळाले. जपानने १९९८मध्ये नोझोमी नावाची मंगळ मोहीम आखली होती; मात्र ती अयशस्वी झाली. तसेच, चीन-रशियाची २0११ची संयुक्त मोहीमदेखील अयशस्वी ठरली. मंगळाच्या कक्षेत यान पाठविण्याचा प्रयत्न यापूर्वी शास्त्रज्ञांनी ४१ वेळा केला होता. या प्रयत्नांत २३ वेळा त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. 
या पार्श्‍वभूमीवर, जेव्हा चांद्रयानाच्या यशानंतर मंगळ मोहिमांची चर्चा सुरू झाली, तेव्हा काही शास्त्रज्ञांनी या मोहिमांना विरोध केला. मात्र, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी २0१0मध्ये मंगळ मोहिमेचा आराखडा तयार करून पंतप्रधानांकडे मंजुरीसाठी पाठविला.
 
 
 
 तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी १५ ऑगस्ट २0१३ रोजी मंगळ मोहीम जाहीर करून इस्रोला या मोहिमेसाठी हिरवा कंदील दाखविला. मंगळ पृथ्वीजवळ आला असताना मोहिमा राबविल्या जात असल्यामुळे इस्रोने मंगळ मोहीम २0१३-१४मध्ये राबविण्याचे ठरविले. कारण, त्यानंतर ३ वर्षांनी म्हणजे २0१६मध्ये मंगळ मोहीम राबविता येणार होती. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अवघ्या १५ महिन्यांत व ४५0 कोटी रुपयांत मंगळ मोहीम राबविण्याचे आव्हान स्वीकारले. 
चांद्रयानाप्रमाणेच मंगळयान १.५ मीटर चौकोनी आकाराचे असून, त्याचे वजन १,३५0 किलो होते. यानाला अंतराळात प्रक्षेपित करण्यासाठी ‘पीएसएलव्ही’ या भरवशाच्या अग्निबाणाची मदत घ्यायचे ठरले. मात्र, या अग्निबाणाची ताकद काहीशी कमी असल्याने मंगळयान सरळ मंगळाकडे न पाठविता ते काही काळासाठी पृथ्वीभोवती फिरवून त्याचा वेग वाढविला गेला. या प्रक्रियेत मंगळयानाची कक्षा २४ हजार किलोमीटरपासून २ लाख किलोमीटर एवढी वाढविण्यात आली. अखेरीस १ डिसेंबर २0१३ रोजी मंगळयानातील मोटर सुरू करून यानाला मंगळाच्या दिशेने पाठविण्यात आले. पुढील दहा महिन्यांत या यानाने ६८0 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. 
मंगळयान मंगळाच्या कक्षेत येण्यासाठी यानावर गेले दहा महिने बंद असलेली ‘लिक्वीड अपोगी मोटर’ चालू होणे अपेक्षित होते. पृथ्वीवरून पाठविलेला संदेश यानाकडे पोहोचण्यास १२ मिनिटांचा अवधी लागत असल्याने मंगळयानातील कामे पार पाडण्यासाठीची आज्ञावली यानातील संगणकाकडे यापूर्वीच पाठविली गेली. संपूर्ण मोहिमेचे भवितव्य ज्या मोटरवर सुरू होते, तिची तपासणी करण्यासाठी व मंगळयानाच्या कक्षेत लहानमोठे बदल करून ती मोहीम यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी २१ तारखेला ४ सेकंदांसाठी मोटर चालू केली. सुदैवाने मोटर चालू होऊन तिने अपेक्षित काम पार पाडले. आता शास्त्रज्ञांना खात्री झाली, की २४ तारखेला मंगळयान बरोबर कक्षेत पोहोचेल. 
अखेरीस २४ सप्टेंबरचा तो दिवस उजाडला. बंगळुरू येथील नियंत्रण कक्षात शास्त्रज्ञांच्या हृदयातील धडधड वाढत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने नियंत्रण कक्षात येत असल्याने मोठे दडपण शास्त्रज्ञांवर आले होते. पहाटे सव्वाचार वाजता यानावरील संदेशवहनासाठीचा मीडियम गेन अँटिना सुरू केला गेला. सकाळी ६.५६ वाजता मंगळ यानाची पाठ मंगळाकडे करण्यात आली व त्यामुळे मोटर चालू झाल्यावर तिच्या रेट्यामुळे मंगळ यानाचा वेग कमी होणार होता. अगोदरच पाठविलेल्या संदेशानुसार बरोबर ७.१३ वाजता मोटर सुरू झाली व तसा संदेश यानाकडून पाठविला गेला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच यान मंगळामागे गेल्याने त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला. शास्त्रज्ञ मनोमन प्रार्थना करीत होते, की मंगळामागे सारे काही सुरळीत पार पडू दे. यानाचा वेग कमी होत गेला व २४ मिनिटे आणि १४ सेकंदांनी म्हणजे ७.४१ वाजता यानाचा वेग सेकंदाला ४.२ किलोमीटर झाल्यावर यानाची मोटर आपोआप बंद झाली. यानाने पुन्हा त्याचे तोंड फिरविले व ते मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. नियंत्रण कक्षातील शास्त्रज्ञ यानाच्या संदेशाची चातकासारखी वाट पाहत होते. अखेरीस २२.४ कोटी किलोमीटर अंतरावरून मंगळयानाने पाठविलेला संदेश नियंत्रण कक्षात आला आणि शास्त्रज्ञांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पंतप्रधान मोदींनी उभे राहून शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. सर्वत्र एकच जल्लोष सुरू झाला. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी मंगळाला ‘मॉम’ मिळाली, असे सांगितले. जी कामगिरी सार्‍या जगातील शास्त्रज्ञांना पहिल्या प्रयत्नात जमली नाही, ती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी करून दाखविल्यामुळे ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. 
 
 
 
मंगळावर कधी काळी पृथ्वीसारखेच वातावरण होते का, सजीव सृष्टीसाठी आवश्यक असलेला प्राणवायू तिथे होता का, असेल तर नष्ट कसा झाला, याचा शोध घेणे मंगळयानामुळे शक्य होईल. त्याविषयी जगभर उत्सुकता आहे.
 
यानाचा आकार मोठा असेल, तर त्यातून आपल्याला अनेक प्रकारच्या यंत्रणा पाठवता येतात. सध्या मंगळयानातून आपण फक्त ५ प्रकारच्या यंत्रणा पाठवू शकलो आहोत. त्यामुळे संशोधनावर र्मयादा येतात. यापुढच्या मोहिमेत आपल्याला यानाचा आकार वाढवावा लागेल.  
 
यापुढे आपल्याला मंगळापेक्षाही पुढच्या ग्रहावर जावे लागेल. त्यासाठी आता स्वयंनिर्णय घेणारे यान विकसित करणे महत्त्वाचे आहे. सध्या आपण संदेश पाठवतो, तो १२ मिनिटांनी यानाला मिळतो व नंतर ते त्याप्रमाणे ऑपरेट होते. तसे न होता त्याने स्वत: निर्णय घेणे गरजेचे आहे. तार्‍यांवरून दिशा ओळखणे, यंत्र सुरू करणे, गती कमी-जास्त करणे हे निर्णय आपोआप झाले पाहिजेत. 
(लेखक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आहेत.)