शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

एका राजकन्येचा विवाह

By admin | Updated: November 1, 2014 19:00 IST

शिक्षण संस्थांमधील सेवकवर्ग आपला खासगी कर्मचारी आहे अशीच बहुसंख्य संस्थाचालकांची भावना असते. कर्मचारीही तसेच वागून त्यांचा समज बळकट करतात. एखादा स्वाभीमानी कर्मचारी, त्यांना त्यांची जागा दाखवून देतो, मात्र त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, हेच खरे!

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
 
आबासाहेबांच्या माधुरीचा विवाह ठरला. याचा त्यांच्या कुटुंबीयांना जितका आनंद झाला, त्यापेक्षा अधिक आनंद त्यांच्या संस्थेच्या सात मुख्याध्यापकांना, त्यांच्या चोवीस शिपायांना, पस्तीस कार्यालयीन सेवकांना आणि शंभराहून अधिक असलेल्या शिक्षकांना झाला. त्यांना जणू आनंदाचं भरतंच आलं. कमी पाणी असलेला ओढा खडकाळ रानातून जाताना जसा खळाखळा आवाज करीत धावतो, तसा सारा सेवकवर्ग खळाखळा आवाज करीत अभिनंदन करण्यासाठी धावू लागला. नुसती विवाह ठरल्याची बातमी समजल्यावर हारांचा ढीग, पेढय़ांचे पुडे, स्तुतिसुमनांची उधळण यांनी आबासाहेब चिंब होऊन गेले. या सर्वांच्या प्रेमाने आबासाहेब खूष झाले नि आबासाहेबांची अवकृपा आपणावर होणार नाही या भावनेनं सेवकवर्ग खूष झाला. विवाहाच्या आधी आनंदाप्रीत्यर्थ वरात काढण्याची प्रथा असती, तर सात विद्यालयांनी सात दिवस ‘वरात-सप्ताह’ साजरा केला असता. नुसत्या माधुरीचीच नव्हे, तर आबासाहेबांचीही वरात काढली असती.
खरा-खोटा कसा का असेना, पण एवढा आनंद होण्याचं कारणंही तसंच होतं. कारण आबासाहेब हे तसं छोटं प्रकरण नव्हतं. महिरपी कंसाच्या पोटात दोन-तीन छोटे-मोठे कंस असावेत आणि त्यात मग बेरीज-वजाबाकीचे अंक असावेत तसा हा प्रकार होता. ते गावचे सरपंच होते. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते. दूध डेअरीचे चेअरमन होते. एका शिक्षणसंस्थेचे शिल्पकार होते आणि तालुका पंचायतीचे ताकदवान सभासद होते. आणि मुख्य म्हणजे ते एका राजकीय पक्षाचे मान्यवर नेतेही होते. अर्थात राजकीय नेता असल्याशिवाय बाकीची सारी पदे मिळत नसतात, हे विसरूनये. 
राजकीय नेतेपद म्हणजेच महिरपी कंस म्हणायचे. तर अशा या अनेक संस्थांचे ‘संस्थानिक’ असलेल्या आबासाहेबांच्या लाडक्या राजकन्येचा विवाह ठरलेला! कुणाला बरे आनंद होणार नाही? एकाच वेळी शासनाने शिकविणार्‍या आणि न शिकविणार्‍या सार्‍याच शिक्षकांना तीन पगारवाढी दिल्यावर जेवढा आनंद होईल, तेवढा आनंद या सर्व विद्यासेवकांना झालेला होता.
हा विवाहसोहळा भव्य-दिव्य, थाटामाटाचा आणि अविस्मरणीय होण्यासाठी आबासाहेबांनी महिनाभर आधीच सातही मुख्याध्यापकांना घरी बोलावून एक छोटीशी बैठक घेतली. त्यामध्ये खर्चाचे नियोजन, विवाहाची जागा व मंडपव्यवस्था आणि इतर कामांची विभागणी यावर चर्चा झाली. त्यामध्ये प्रेमळ हुकूम करावा तसे आपले मत त्यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘मी कुणाचाही आहेर स्वीकारणार नाही. म्हणजे इतरांप्रमाणे तुम्हा शिक्षकांचा, इतर सेवकांचा आहेरापोटी होणारा खर्च वाचला. शिवाय नको असलेल्या डझनावरी वस्तूंचा घरात ढीग लागतो. दोन डझन मिल्क कुकर, दोन डझन टिफीन बॉक्स, तीन डझन पंखे, दीड डझन भिंतीवरील घड्याळे अन् शेकड्यात मोजावेत एवढे फोटो फ्रेम आणि मूर्ती! काय करूमी हा कचरा घेऊन? त्यापेक्षा तुम्ही मला रोख रक्कम उभी करून द्यावी. तुम्हाला माहीतच आहे, की नुकत्याच झालेल्या दोन निवडणुकीत माझा अफाट खर्च झाला. तुमचा विश्‍वास बसणार नाही, पण मी पार कफल्लक झालो आहे. त्यातच व्याह्याच्या इभ्रतीला आणि आपल्याही इभ्रतीला शोभणारा विवाह झाला पाहिजे.
शिक्षक आणि इतर मंडळींची अशी सर्वांची जेव्हा आपण बैठक घेऊ तेव्हा तुम्ही पुढाकार घ्यायचा. सभेत प्रथम तुम्हीच मोठय़ा रकमेचा आहेर जाहीर करायचा. लाजेकाजेस्तव मग बाकीचे सारे चांगले आकडे जाहीर करतील आणि त्याच वेळेला इतर कामाचीही जबाबदारी पक्की करू. सार्‍या शिक्षकांची पुढच्याच आठवड्यात बैठक घेऊ.’’ दुसरे काहीच करता येण्यासारखे नसल्याने सातही मुख्याध्यापकांनी आपल्या माना डोलावल्या. त्यांना पाठिंबा जाहीर केला.
ठरल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात शाळेमध्येच बैठकीचे नियोजन झाले. त्यासाठी आबासाहेबांच्या नात्यातले आणि मर्जीतले उपाध्यक्ष आणि सेक्रेटरीही सभेला उपस्थित होते. आबासाहेबांनी आधीच पढवून ठेवल्यामुळे सभेच्या प्रारंभीच उपाध्यक्ष म्हणाले, ‘‘हा जसा आबासाहेबांच्या घरचा सोहळा आहे, तसा आपल्याही घरचा आहे, असे प्रत्येकानं समजले पाहिजे. हा समारंभ उत्तम पार पाडण्यासाठी प्रत्येकानं सांगितलेलं काम करायचं आहे. चुकारपणा केलेला खपवून घेतला जाणार नाही. एका गटानं भोजनाची व्यवस्था बघावी, दुसर्‍या गटाने पाहुण्यांची सोय-गैरसोय पाहावी, काहींनी वाढण्याचे काम करावे, काहींनी मंडपात पाणी वाटप करावे, एखाद्याने अक्षदा वाटण्याचे काम घ्यावे. प्रसंगी जेवणाची ताटे उचलावी लागली, तरी संकोच करू नये. आलेल्या लोकांसाठी सतरंज्या टाकाव्या लागल्या तरी त्या टाकल्या पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे माधुरीला आहेर म्हणून एकही भेटवस्तू न आणता, लोकांनी वाहवा करावी, अशी रक्कम जाहीर करावी. घेणार्‍याला आनंद वाटला पाहिजे.’’ असे म्हणताच आबासाहेबांनी आधीच सांगून ठेवल्याप्रमाणे प्रत्येक मुख्याध्यापक स्टेजवर येऊन अगदी पाच आकड्यातली रक्कम आहेर म्हणून जाहीर करू लागले. 
मोजक्या मंडळींनी भरपूर टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. तेवढय़ात अचानक एक खटकणारी गोष्ट घडली. राखीव जागेपोटी दोन वर्षांपासून नोकरीस असलेले एक शिक्षक बसलेल्या जागेवरूनच म्हणाले, ‘‘आजकाल अनेक जण आहेर आणू नका असे आग्रहानं सांगत असताना, ही आहेराची सक्ती कशासाठी? गेल्याच वर्षी आम्हा शिक्षकांकडून इमारत निधीसाठी तुम्ही एकेक महिन्याचा पगार घेतला. ग्रंथालय, क्रीडास्पर्धा, जयंती यासाठी किरकोळ देणग्या देतोच आहे. आता पुन्हा आहेरापोटी घसघशीत रक्कम द्यायची म्हणजे..’’ आबासाहेब ओरडले, ‘‘कोण आहे रे तो हरामखोर? गुरं राखायलाही ठेवलं नसतं. दिवसाकाठी तास न् तास वायफळ बडबड करतोस अन् एवढा मोठा पगार घेतो. लाज वाटत नाही? सगळ्यांना सांगतो मी, मला तुमचा कुणाचाच आहेर नको, मला काय भीक लागली नाही. तुमच्या भरवशावर लग्न ठरविलं नाही. आता मी मात्र तुम्हाला आबासाहेब ही काय चीज आहे ते दाखवतो. तुम्हाला तुमच्या भानगडी मिटविताना मी हवा असतो. दारू पिऊन गोंधळ घातल्यावर पोलिसांना सांगण्यासाठी मी हवा असतो, तुमच्या कॉपीच्या प्रकरणात मिटवा-मिटवी करताना माझी गरज भासते. आता इथून पुढं माझ्याकडे यायचं नाही. माझी मदत मागायची नाही. सांगून ठेवतो सर्वांना.’’
असं म्हणून ते खाली बसले. तद्नंतर प्रत्येकानं त्याचा उद्धार केला आणि आपली नोकरी शाबूत ठेवण्यासाठी चढाओढीनं आहेराच्या रकमा जाहीर करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर लग्नावेळी तीन दिवस प्रत्येक जण एखाद्या मजुरासारखा राबराब राबला अगदी पाहुण्याच्या हातावर पाणी धरण्यापासून पाहुण्यांची सिगारेट पेटवण्यासाठी काडी ओढून समोर धरण्यापर्यंत; राजकन्येचा विवाह दिमाखात पार पाडण्यासाठी एकानेही कसूर केली नाही.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)