मानवी तस्करी, गुन्हेगारी, गरीब निर्वासीत, युद्धजन्य परिस्थितीचा भीषण परिपाक
- जय देशमुख
मागील वर्षापासून युरोपच्या दिशेने सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आफ्रिकन देशातील निर्वासीत आणि स्थलांतरितांचे तांडे सरकू लागले. सुरुवातीस केवळ लोकांच्या झुंडी वाटणा:या या प्रश्नाने आता वादळाचे स्वरूप धारण केले आहे. सप्टेंबर महिन्यार्पयतच युरोपमध्ये तीन लाख लोकांनी प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. पूर्वेस म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांनी बोटींमधून थायलंड, मलेशियामध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू केला, तर इकडे आफ्रिकन देशातील लोकांनी भूमध्य समुद्र ओलांडून युरोपात घुसण्याचा प्रयत्न केला. कित्येक वेळेस बोटी फुटल्यामुळे अनेकांनी प्राणही गमावले आहेत. सीरियाचे गृहयुद्ध, आफ्रिकन स्थलांतरितांनी सध्या युरोप मुळापासून हलवून सोडला आहे. या सर्व मुद्दय़ांवर एएफपी वृत्तसंस्थेचे कैरोस्थित प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विशेषत: मध्य-पूर्वेतील घटनांचे अभ्यासक जय देशमुख यांची ही विशेष मुलाखत..
;सध्या आफ्रिका आणि सीरियामधून स्थलांतरितांचा लोंढा युरोपात घुसत आहे, दुस:या महायुद्धानंतर प्रथमच इतके मोठे स्थलांतर होत असावे, यामागची पाश्र्वभूमी काय आहे?
- सध्या युरोपच्या दिशेने सुरू असणा:या स्थलांतराची बीजे गेल्या तीन दशकांमध्ये असल्याचे दिसून येते. युरोपचे आकर्षण लोकांना फार आधीपासूनच आहे. मागच्या तीन दशकांच्या काळातही हे स्थलांतर सुरू होते. आफ्रिकेतील नागरिक त्यांना युरोप जवळ असल्याने बहुसंख्येने स्थलांतर करत असत. त्यामुळे स्थलांतरितांचा युरोपवर ताणही असायचा. तसेच अतिरेकी स्थलांतर होऊ नये म्हणून युरोपीय देश प्रयत्न करत असत. स्थलांतर होऊ नये यासाठी हे देश आफ्रिकन नेत्यांना मदतही देत असत. पण आता सीरियन गृहयुद्धामुळे या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे.
स्थलांतर हे तीन मुख्य कारणांमुळे होत असते. त्यात गरिबी, युद्ध आणि अंतर्गत प्रश्नांचा समावेश होतो. ही तिन्ही कारणो आता दुर्दैवाने मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतील देशांत दिसत असल्याने हे लोंढे निर्माण झाले आहेत.
;या लोंढय़ामध्ये सीरियन नागरिकांचा मोठा भरणा आहे, तेव्हा सीरियातील यादवीचा याच्यावर कितपत गंभीर परिणाम आहे?
- सीरियामध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाचा तेथील नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. लोकांच्या समोर केवळ दोनच पर्याय उरले होते किंवा आजही आहेत. ते म्हणजे पळून जाऊन देश सोडायचा किंवा मृत्यू. म्हणून नागरिकांनी स्थलांतराचा पर्याय निवडला आहे. हे स्थलांतरित गरीबच आहेत असे नव्हे. अनेक नागरिकांची परिस्थिती अत्यंत चांगली होती. उच्च वर्ग आणि मध्यमवर्गातील लोकांनीही जिवाला घाबरून देश सोडला आहे. सुरुवातीला लेबनॉन, जॉर्डन अशा शेजारील देशांमध्ये त्यांनी आश्रय घेतला. पण त्यांची मर्यादा संपल्यावर ते इजिप्त आणि नंतर आता ते युरोपकडे वळले आहेत. त्यातही मानवी तस्करांचा सुळसुळाट झाल्यामुळे त्यांना युरोपात घुसण्याची संधी मिळाली, त्याचा ते वापर करत आहेत. मानवी तस्करांना देण्यास पैसे नसले तर सीरियन लोक त्यांना इतर गि:हाइके शोधून आणून देतात व त्याबदल्यात आपल्या कुटुंबातील एकेक व्यक्तीला युरोपात पाठवितात. तस्करांबरोबर या व्यवसायामध्ये समुद्री चाच्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. एकूणच मानवी तस्करी, गुन्हेगारी, गरीब निर्वासीत, युद्धजन्य परिस्थितीचे एक वाईट मिश्रण या प्रदेशात निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. त्यातून भूमध्य समुद्रात बोटी बुडून किंवा फुटून हजारो लोकांनी मरण्याच्या दुर्दैवी घटना अक्षरश: प्रत्येक आठवडय़ाला घडत आहेत.
;आयएस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेचा या प्रश्नाशी कसा संबंध आहे?
- सीरियन यादवी ही राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि जिहादी गटांमध्ये माजली होती. असद यांच्या विरोधात अल कायदा आणि आयएस (आयसीस) लढत होते. यामध्ये हजारो सामान्य लोक मारले जात होते. असद शिया पंथाचे असल्याने त्याला शिया विरुद्ध सुन्नी असे स्वरूप मिळाले. साहजिकच असद यांना शियाबहुल गटांचा व देशांचा, तर विरोधी गटांना सुन्नींचा पाठिंबा मिळू लागला. इराकमध्येही हीच स्थिती आहे. तेथेही शिया विरुद्ध सुन्नी असेच स्वरूप आहे. 2क्क्3 मध्ये इराकमधील कारवाई झाल्यावर जिहादी गटांच्या कारवायांवर परिणाम झाला. अबू मुसा झरकारी मारल्यानंतर त्याचा अधिकच परिणाम झाला. आणि 2क्11 साली लादेन मारला गेल्यावर ख:या अर्थाने त्यांच्या जगात पोकळी निर्माण झाली. ओसामा बिन लादेन ही त्यांच्यासाठी आदर्शव्रत प्रतिमा होती. ती प्रतिमाच गेल्यामुळे पोकळीसारखी स्थिती वाढीला लागली. याच पोकळीमध्ये आयसीस जन्माला आला. म्हणजे आयसीसच्या जन्मासाठी गेले दशकभर परिस्थिती जुळून येत होती. सुरुवातीस आयसीस केवळ सीरिया, इराक, येमेन, लिबियामध्ये होते. आता मात्र 16 ते 17 देशांमध्ये आयसीस पसरले आहेत. त्यांनी स्वत:चे नियम, कायदे आणि करपद्धतीही लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर स्वत:चा खलिपाही तयार केला.
आता कोठे विकासाची कवाडे ज्या प्रदेशासाठी उघडी होत होती, तेथे पुन्हा जुनाट नियमांना लागू केले जात आहे. आयसीसला सद्दामच्या लष्करातील माजी अधिका:यांनीही मदत केल्याचे सांगण्यात येते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या प्रदेशात इस्लामचे पंथांमध्ये विभाजन झाले होते, त्याच प्रदेशात आज हे पंथांमध्ये व जिहादी गटांमध्ये चाललेले युद्ध सुरू आहे. इतिहासाची अशी पुनरावृत्ती नव्या रूपात दिसत आहे. आयसीस हा असा एकमेव गट आहे जो आपण केलेल्या नृशंस हत्त्याकांडांचे, दहशतवादाचे दस्तावेजीकरण करतो. त्यांच्या प्रत्येक कारवाईचे ते चित्रीकरण करतात, फोटो काढतात. स्वत:च पुरावे देणारे ते एकमेव असावेत. मात्र ते अत्यंत क्रूर आणि घृणास्पद आहेत हे नक्की. त्यांच्या सर्व कारवायांना सामान्य गरीब मुस्लीम बळी पडत आहेत. आणि त्यालाच कंटाळून नागरिक देशांतराला बाहेर पडत आहेत.
;सीरियातील यादवीचा स्थलांतरितांच्या लोंढय़ासारखा परिणाम होईल असे जगातील महासत्तांच्या लक्षात आले नसावे का? आणि अमेरिका याबाबतीत काही करेल असे वाटते का?
- या महासत्तांच्या आधी लक्षात आले असावे, पण स्थलांतराचा प्रश्न इतके मोठे स्वरूप धारण करेल असे त्यांना वाटले नसावे. खरे सांगायचे झाले तर स्थलांतरापेक्षा यातून आयसीससारखा राक्षस निर्माण होणार याचा अंदाज मोठय़ा देशांना आला नसावा असे मला वाटते. अमेरिकेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी युद्धविरोधी भूमिका घेऊनच सत्तेत प्रवेश केला होता. त्यामुळे इराकमधील गाशाही त्यांनी गुंडाळला आणि नंतर कोणत्याही बाबतीत/प्रश्नात स्वत:हून प्रवेश न करण्याची भूमिका घेतली. तशी त्यांना निवडून देणा:या मतदारांची अपेक्षाच होती. त्यामुळे एकेक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका त्यांनी घेतली. नुकताच इराणशी झालेला करार त्याचे द्योतक आहे असे म्हणावे लागेल. सीरियाला मात्र रशिया, चीनसारख्या देशांचा मुत्सद्दी पातळीवर पाठिंबा मिळत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. पण ओबामांना यामध्ये लक्ष घालण्याची इच्छा नाही असे दिसते.
;जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी स्वत:ची एक प्रतिमा निर्माण केली आहे. ग्रीसच्या कजर्बाजारी होण्याच्या वेळेसही त्यांनी वेगळेपण दाखवून दिले होते. आता स्थलांतराच्या बाबतीतही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्याबाबत थोडे सांगा
- स्पष्ट सांगायचे झाले तर ओबामा यांच्यानंतर जागतिक नेतृत्वाच्या बाबतीत अँजेला मर्केल यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. गेल्या दशकभरामध्ये जर्मनीने वेगाने प्रगती केली आहे. जर्मनी हा स्थलांतरितांसाठी नेहमीच आवडीचा व प्रथम प्राधान्याचा देश होता. आताही हे स्थलांतरित जर्मनीच्या दिशेने प्रवास करत आहेत.
जर्मनीमध्ये गेल्यावर आपल्याला सुरक्षित व चांगले राहणीमान मिळेल असे ्त्यांना वाटते. अँजेला मर्केल स्थलांतरितांच्या प्रश्नावर युरोपियन युनियनमध्ये काही तोडगा सुचवतील असे वाटते.
;बाल्कन देशांवर या स्थलांतराचा कितपत ताण येईल असे वाटते?
- बाल्कन आणि पूर्व युरोपीय देश आपल्याला वाटते तितके सुखी संपन्न नाहीत. ते केवळ खाऊन-पिऊन सुखी कुटुंबाचे टुमदार घर असावे त्याप्रमाणो टुमदार देश आहेत. त्यांचेही अंतर्गत राजकीय, वांशिक प्रश्न आहेतच. त्यांच्यावरती या लोंढय़ांचा मोठा ताण येणार आहे व आज आलादेखील आहे. स्थलांतरितांच्या इतक्या मोठय़ा लोंढय़ाला सामोरे जाण्याची या देशांची तयारी किंवा क्षमता नव्हतीच. त्यांची लोकसंख्या व उपलब्ध साधनेही मर्यादित आहेत. ग्रीस आणि इटलीबाबत बोलायचे झाल्यास दोन्ही देशांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. बेल आऊट पॅकेज मिळवून कशीबशी त्यांची वाटचाल सुरू आहे. ग्रीसचे तर पूर्ण कंबरडे मोडले आहे. आणि नेमक्या याच देशांमध्ये स्थलांतरित युरोपातील पहिले पाऊल ठेवतात. त्यामुळे या लोकांना सामावून घेणो ग्रीस व इटलीला शक्य होणार नाही. जरी हे स्थलांतरित पश्चिम युरोपात जाणार असले तरी आताही त्यांचा ताण आहेच आणि काही निर्वासीत येथे राहतीलच.
;ब्रिटनने नवे इमिग्रेशन धोरण अवलंबत कडक उपाययोजना अंमलात आणण्याचा विचार चालविला आहे?
- हो. इंग्लंडने वर्क परमिट्सवर नियंत्रण आणले आहे. कारण त्यांच्याकडे काम करण्यासाठी त्यांचे स्वत:चे विद्यार्थी आहेत. स्वाभाविकपणो कोणताही देश आधी आपल्या नागरिकांचे भले करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच केवळ शिक्षणासाठी आमच्याकडे या असे त्यांचे धोरण आहे. आजही इंग्लंड उत्तम शिक्षणासाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. आर्थिक मंदीचा परिणामही त्यांच्या अर्थव्यवस्थेवर झाला असल्यामुळे आता अशी पावले उचलावी लागली आहेत.
स्थलांतरित युरोपात जातात कसे?
आफ्रिकेतील स्थलांतरितांनी बोटींद्वारे भूमध्य समुद्र ओलांडून इटली किंवा ग्रीसमध्ये जाण्याचा मार्ग निवडला आहे. अत्यंत साध्या व लाकडी बोटींमधून हे लोक प्रवास करतात. टय़ुनिशिया मार्गे सीसिलीची सामुद्रधुनी ओलांडून निर्वासीत सीसिली म्हणजे इटलीमध्ये जातात. या बोटींना वारंवार अपघात होतात. आजवर 25क्क् हून अधिक लोकांनी भूमध्य समुद्रात प्राण गमावले आहेत.
सीरियन नागरिक ग्रीसच्या कॉस बेटावरून ग्रीसमध्ये प्रवेश करतात. ग्रीसमध्ये पाय ठेवल्यावर रस्ते किंवा रेल्वे मार्गाने मॅसिडोनिया, सर्बिया, हंगेरी, ऑस्ट्रिया आणि शेवटी जर्मनी असा प्रवास करतात. कॉसबेटावर निर्वासितांचे लोंढे थडकल्याने तेथील पर्यटन व इतर व्यवसाय ठप्प झाले आहेत. हंगेरीने आपल्या सीमांवर आयत्यावेळेस कुंपण घालण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. तारांची कुंपणो वाकवून नागरिकांनी आत प्रवेश केला. अनेक सीमांवर त्यांना अडविण्यात आले, काही ठिकाणी अश्रुधुराचा मारा, पाण्याचा मारा केला गेला तरीही जर्मनीच्या दिशेने स्थलांतरित सरकत आहेतच.
फायनल डेस्टिनेशन
सध्या बाल्कन देशांवर या स्थलांतरितांचा ताण आला असला तरी या नागरिकांचे मुख्य ध्येय जर्मनीला पोहोचण्याचेच आहे. जर्मनीमध्ये एकदा पोहोचल्यावर आपला रोजगाराचा व सुरक्षित जीवनाचा प्रश्न सुटेल असे त्यांना वाटते. जर्मनीदेखील गेल्या काही वर्षामध्ये युरोपचे आर्थिक नेतृत्व करणारा देश झाला आहे. त्यामुळे साहजिकच सर्वाधिक संधी जर्मनीमध्ये उपलब्ध असल्यामुळे तेथे जाण्याची इच्छा या नागरिकांच्या मनामध्ये आहे. या वर्षभरामध्ये जर्मनीकडे दोन लाख लोकांनी आपल्याला आश्रय द्यावा अशी विनंती केली आहे.
केलेई आणि चनेल
केलेई हे वायव्य फ्रान्समधील महत्त्वाचे बंदर आहे. इंग्लंड आणि फ्रान्सला जोडणारी पाण्याखालूून जाणारी रेल्वे (ब्रिटिश चॅनेलमधील टनेलमधून रेल्वे जाते म्हणून त्यास चनेल असे म्हणतात) येथून सुरू होते त्यामुळे आफ्रिकन व सीरियन लोकांनी येथे ङोप घेतली आणि इंग्लंडमध्ये कधीकाळी जायला मिळेल या आशेने ते येथे तळ ठोकून बसले आहेत. आज येथे दररोज शेकडो लोक येऊन थडकतात. अनेक निर्वासितांनी येथे दुकाने थाटली आहेत, तर चर्चही उभारण्यात आले आहे.
वाटेतली अमानुष अवस्था
भूमध्य समुद्रात निर्वासितांनी प्राण गमावले त्याप्रमाणो युरोपच्या भूमीवरही सीरियन निर्वासितांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नुकतीच ऑस्ट्रियात 71 मृतदेहांनी भरलेली एक लॉरी आढळून आली. हे सर्व मृतदेह सीरियन निर्वासितांचे होते. या लोंढय़ांमध्ये गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि लहान बालकांचाही समावेश आहे. त्यांच्या अन्न, पाणी आणि इतर सामान्य गरजाही पूर्ण होणो अवघड झाले आहे. मैलोन्मैल रेल्वे ट्रॅकवर चालणो, तारांच्या कुंपणाखालून जाणो, गर्दीने कोंबलेल्या रेल्वेचा प्रवास अशा दिव्यांचा ते रोज सामना करत आहेत.
मानवी तस्करीची राजधानी
पश्चिम आफ्रिका आणि मध्य आफ्रिकेतील स्थलांतरितांना एकवटणारे केंद्र नायजर देशातील अगादेझ या शहरात निर्माण झाले आहे. कॅमेरून, माली, केनियापासून सर्व देशांतील आफ्रिकन नागरिक येथे येतात. तेथून ते लिबिया, टय़ुनिशियाच्या दिशेने प्रवास करतात. अगादेझ हे प्राचीन वाळवंटी शहर असून, आता त्याची ओळख मानवी तस्करांची राजधानी अशी झालेली आहे.
(जय देशमुख हे एएफपी या वृत्तसंस्थेसाठी कैरो प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी श्रीलंका, इराक, इराण, लिबिया, सायप्रस येथेही काम केले आहे.)
मुलाखत : ओंकार करंबेळकर