पैशाअभावी लग्न रखडलेल्या मुली.बापाची ओढाताण न बघवणाऱ्या मुली.लग्नं ‘लाडाकोडाचंच हवं’ म्हणून हट्ट धरणाऱ्या, हुंड्याच्या पैशातून शहराकडचा नवरा ‘विकत घेऊन’ खेड्यातून सटकणाऱ्या मुली.‘घेतला पैसा तर काय बिघडलं?’असा माज करणारे मुलगे.‘हुंडा न घेण्याची प्रतिज्ञा’ मोडल्याचीलाज बाळगणारे मुलगे.लोक म्हणतात, स्त्री भ्रूणहत्या थांबवायला हव्यात. तिला पोटातच मारू नका. तिचा जीव वाचवा. पण कशासाठी? ती पोटातच मेली ना तर बरं होईल. कारण ती पोटात एकदाच मरेल. मात्र या जगात आल्यावर तिला दररोज मरावं लागेल, क्षणाक्षणाला. जन्मानंतर प्रत्येक सेकंदाला आपल्या मनाविरुद्ध जगावं लागेल, इच्छा-आकांक्षा मारूनच टाकाव्या लागतील आणि खाली मान घालून मुकाट जग अशी अपेक्षा असेल. अशा जगण्यापेक्षा गर्भातच मारून टाकलं तर किती सोपं होईल तिचं निदान मरण तरी..- शीतल वायाळ हिनं केलेल्या आत्महत्येनंतर दुसऱ्याच दिवशी ‘आॅक्सिजन’च्या मेलबॉक्समध्ये येऊन पडलेली ही स्नेहा नावाच्या मुलीची ईमेल. राज्याच्या अगदी टोकावरच्या एका गावातून आलेली, मध्यरात्रीच्या प्रहरी पाठवलेली तुटक मात्र संतापी प्रतिक्रिया.ही अशी पत्रं आणि ईमेल्स ‘आॅक्सिजन’ या लोकमतच्या तरुण मुलांसाठीच्या पुरवणीकडे नियमितपणे येतात. गेली १७ वर्षे सुरू असलेली ही पुरवणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते. आणि छोट्यात छोट्या गावातली मुलंमुली आपल्याला जे जे वाटतं, आवडतं, खटकतं ते स्वत:हून पत्रांद्वारे लिहून पाठवतात. फोनवर बोलतात. पूर्वी पत्र येत, आता गेल्या दोन वर्षांपासून ईमेल्सची संख्या पत्रांपेक्षा जास्त आहे. तंत्रज्ञानानं खेडोपाडी पोहचवलेला बदल तो एवढाच!मात्र तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांनी केलेले बदल जुनाट मानसिकता आणि विचारांच्या चौकटी बदलतात का? याचं उत्तर शोधायचं तर हुंडा पद्धतीकडे एक लिटमस टेस्ट म्हणून पाहावं लागेल. तरुण मुलांच्या पिढ्या, त्यांची जीवनशैली आणि जगण्याकडूनच्या अपेक्षा बदलत असताना, हुंडा या पारंपरिक चर्चेच्या, वादाच्या आणि सामाजिक किटाळाच्या विषयांत काही बदललं का?या प्रश्नाचं उत्तर म्हणून तरुण मुलांनी स्वत: (कदाचित कुणालाही न सांगता, कळू न देता) लिहून पाठवलेली ही पत्रं म्हणजे तरुण समाजमनाचा एक आरसा, एक तुकडा म्हणायला हवीत. कारण सर्व्हे करून, मतं विचारून, प्रश्नावल्या भरून ही माहिती गोळा केलेली नाही; तर मुलं जे जगत आहेत, ते मोठ्या विश्वासानं गेली अनेक वर्षे ते आॅक्सिजन पुरवणीसोबत वाटून घेत आहेत, म्हणून ही निरीक्षणं मोलाची ठरावीत.खेड्यापाड्यात, तालुक्याच्या गावी आणि छोट्या शहरात राहणाऱ्या तरुण मुलामुलींच्या पत्रांत काय दिसतं? - हुंड्यापायी लग्नच ठरत नाही असं साांगणारी, हुंड्यापायी वडिलांची वणवण पाहणारी, लाचारी सांगणारी, जमीन विकल्याची खंत मांडणारी, कर्जाच्या डोंगराचं ओझं वाहणारी, बहिणींच्या लग्नात झालेल्या अपमानाच्या कहाण्या सांगणारी, अजूनही मुलगी ही कशी उरावरची जळती शेगडी आहे हे सांगून अपमानाच्या उकळ्यांना वाट करून देणारी आणि हुंडा देऊनही मनासारखं स्थळ न मिळाल्याची आणि हुंड्यापायी सासरी छळ होत असल्याची परवड सांगणारी मुलींची पत्रं तर गठ्ठ्यानं असतील आमच्याकडे..आणि मुलांची?त्यांचीही आहेतच..हा सारा संवाद एका दुर्दैवी वास्तवाचं चित्र समोर ठेवतो. ते चित्र सांगतं की बहुतांश तरुण मुलांना हुंडा आणि अति थाटामाटात लग्न करून घेणं हा आपला हक्कच वाटतो. काहीजण तर खुलेपणानं लिहितातही की, जन्मभर पोसणारच आहोत की आम्ही सासऱ्याच्या मुलीला, मग लग्नाचा भार उचलला त्यांनी तर एवढं आकांडतांडव कशाला करता?काही तरुण मुलग्यांना खंत वाटते की, आपण हुंडा नाकारू शकत नाही. कारण तसं केलं तर घरचे, नातेवाईक आणि समाज आपल्याविषयी काय म्हणेल. कदाचित आपलं लग्नच ठरणार नाही. जातीत लग्न ठरत नाही आणि परजातीत करण्याची हिंमत नाही अशा कात्रीत सापडल्याच्या कहाण्या तर अनेक.एकाच चित्राच्या किती बाजू दिसतात या ‘संवादा’त! १ हुंडा हे वास्तव आहे आणि कायद्यानं तो प्रश्न सुटलेला नाही. राज्यात सर्वदूर हुंडा सर्रास घेतला, दिला जातो. त्याशिवाय मुलींची लग्नच होत नाहीत. शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, ते अमेरिकेत स्थायिक ते साधा सरकारी नोकरीत शिपाई ते पत्रकार ते शेतकरी व्हाया बीए/बीकॉम/बीएस्सी आणि पुढे यांची अनेक समाजातली हुंडा दरपत्रकं ठरलेली आहेत. त्यानुसार लग्न व्यवहार ठरतात. स्वत:ला राज्याचे कर्तेधर्ते समजणारे बहुसंख्य जातसमुदाय त्यात आघाडीवर आहेत. २ नुस्त्या मुलांच्या शिक्षणाने आणि नोकऱ्यांनीच हुंड्याचं दरपत्रक वधारलेलं नाही, तर मुलीही शिकल्या, त्यांना आपल्यापेक्षा जास्त शिकलेला नवरा पाहिजे, सुबत्ता पाहिजे आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी म्हणून त्या लग्नाकडे पाहतात. त्यामुळे वडिलांना भरीस घालून का होईना, जास्त हुंडा देत, मोठं लग्न करून देत आपल्याला हवं ते स्थळ त्या पदरात पाडून घेतात.३ हुंड्याच्या सक्तीपायी मुलींची घुसमट भयंकर आहे, हे तर खरंच; पण या चित्राला एक आणखीही बाजू आहे. खेड्यापाड्यात, छोट्या शहरांत मुली लग्नाकडे स्थलांतराची आणि आर्थिक स्तर बदलाची एक संधी म्हणून पाहतात. अनेक मुलींना शेतकरी मुलगा, खेड्यात राहणं नको आहे. संधी मिळाली तर मोठं शहर, मुंबई-पुणे, त्यापुढे युरोप अमेरिका किमान दुबईला तरी जायचं आहे. त्यापायी वडिलांनी किंमत मोजणं मुलींना चुकीचं वाटत नाही.४ हुंडा न देता लग्न करू असं म्हणणाऱ्या मुलींची संख्या नगण्यच. त्याची कारणं दोन. एकतर मुलींचं घरात काही चालत नाही. तू गप्प बस आणि आम्हाला मोकळं कर म्हणून त्यांना भरीस घातलं जातं. ऐकलं नाही तर चार फटके देऊन ऐकायला भाग पाडलं जातं. दुसऱ्या टप्प्यात मुलींना हवंच असतं पालक जितकं जास्तीत जास्त देतील तितकं. वारसा हक्कच आहे तो आपला. पुढे जमिनी, घरंदारं मागू न मागू, आता काय ते सोनंनाणं, पैसा आणि घरदार द्या असं मुली स्वच्छ सांगू लागल्या आहेत. ५ ज्या रंगरूपानं बेतास बात आहेत म्हणजे खरंतर रंग सावळा किंवा काळा आहे, उंची ठीक, अपंगत्व असेल तर विचारायलाच नको अशा मुलींची लग्न जुळणंच अवघड. त्यात घरात दोन-तीन मुली असतील तर अडचण जास्त. म्हणून वडील हुंड्यासाठी पैसा उभारतात आणि स्थळ म्हणेल तेवढा पैसा देऊन लग्न लावून मोकळे होतात. रंग हा आजही अत्यंत गंभीर प्रश्न आहे.६ मुलीचं वाढतं वय हे सर्वात मोठं संकट आजही पालकांना वाटतं. म्हणूनच शक्य तेवढ्या लवकर मुलींची लग्नं केली जातात. लग्न ठरतच नाही या काळजीनं धास्तावलेले अनेक पालकही आॅक्सिजनला पत्र लिहून कळवतात की, मुलगी पंचविशीनंतर घरी असेल तर भयानक लाजिरवाणी परिस्थिती होते समाजात. त्यात अनेक घरांत मुली आपल्या अटींवर ठाम राहतात आणि लग्न ठरता ठरत नाही.७ साधेपणानं वडिलांनी लग्न करून देणं हा मुलींना अनेक ठिकाणी अपमान वाटतो. तसा पालकांनाही वाटतो, अप्रतिष्ठा होते समाजात असं वाटतं. त्यामुळेच गेटकेन करणं, सुपारीत लग्न, साखरपुड्यात लग्न, साधं लग्न या गोष्टी कौतुकाच्या नाही, तर अत्यंत अपमानजनक समजल्या जातात.८ घुसमट सोसणाऱ्या मुली आहेत, तशाच लाडाकोडासाठी स्वत:च हट्ट धरणाऱ्या, त्यापायी आईवडिलांची पर्वा न करणाऱ्याही आहेत.९ हुंडा हा आपला हक्कच असं बेमुर्वतपणे सांगणारे मुलगे आहेत, तसे ‘हुंडा न घेण्याची आपली प्रतिज्ञा पाळू न शकल्याची’ मनोमन लाज बाळगणारेही आहेत.१० या मुलामुलींना शिक्षणाने नवं जग दाखवलं आहे, नवा विचार दिला आहे. पण त्यांना कृतीचं स्वातंत्र्य ना मिळालं आहे, ना ते मिळवता आलं आहे.
थोडं "पर्सनल"
By admin | Published: April 22, 2017 2:55 PM