- संगीता जोशी
द. भि. सरांना मी एकदा विचारलं, ‘सर, तुमचा पीएच.डी.चा विषय महाकाव्य होता ना? मग कविता या विषयावर तुम्ही खूप लिहिलं असेल! कुठल्या कुठल्या पुस्तकात असतील ते लेख?’ सरांनी ते मला सांगितलं; पण मला शोधायलाही सांगितलं. मला वाचण्याकरिता अशा तर्हेने एक दिशा मिळाली. मी आनंदले. सरांचं एवढं मोठं ‘पुस्तक-भांडार’ लगेच थोडंच वाचून होणार होतं? भाषा अशी भारदस्त व अलंकारिक की वाचताना काही वेळा पुन्हा मागे जावं लागतं. पूर्ण आकलनासाठी असं करावं लागतं. वाचन करीत राहिले. अधूनमधून सरांना वेळ असेल त्याप्रमाणे भेटून चर्चा होत राहायची. सर बोलत असले, की संदर्भावरून विषय साखळीप्रमाणे वाढत जायचे. आजही तसंच होतं. दभिसर बोलतात तेव्हा कळतं, की त्यांचं वाचन अफाट आहे. समुद्रासारखं विस्तारलेलं आणि तसंच खोल. कुठलाही विषय निघाला तरी सरांना त्याची माहिती व ज्ञान असल्याचे जाणवतेच.
मानसशास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत, तुकारामांपासून इंग्रजी साहित्यापर्यंत, शिल्पकलेपासून ते उपनिषदांपर्यंत कुठल्याही विषयावर दभिसर सहज बोलू शकतात. ज्ञानेश्वर, त्यांच्यासाठी ज्ञानदेव व ज्ञानदेवी हा केवळ त्यांच्या अभ्यासाचा विषय नाही, तर ती त्यांची जीवननिष्ठा आहे. ते म्हणतात, ‘मी सगुणोपासक नाही; निगरुणोपासक आहे. मी गीतेत-ज्ञानेश्वरीत सांगितलेले मूल्याधिष्ठित जीवन जगतो आहे.’
कधी-कधी सरांचा ‘मूड’ इतका छान लागतो, की जणू ज्ञानतपस्व्याची समाधीच लागलेली असावी! ते एकाग्रतेने बोलत राहतात; आपणही तल्लीन होतो. त्यांना मधेच काही विचारायला व त्यांच्या एकतानतेचा भंग करावासा वाटत नाही. आपले पूर्ण अवधान आहे ना, याकडे मात्र त्यांचे लक्ष असते. असंच एकदा सर सांगत होते, ‘मी साहित्यावर प्रेम केलं आणि करतो; स्वत:पेक्षाही जास्त! साहित्यानं माझ्यावर प्रेम करावं, माझ्यावर प्रभुत्व गाजवावं, यासाठी मला सात जन्म घ्यावे लागतील. वयाच्या बाराव्या वर्षीच मी ठरविलं होतं, की साहित्यवाड्मयच वाचायचं, लिहायचं, शिकवायचं. साहित्य ही एक कला आहे; आणि ती एकमेव अशी कला आहे, जी इंद्रियांशी निगडित नाही. ती मनाच्या संवेदनशीलतेशी संलग्न आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘संगीत ही स्वर्गीय कला आहे. ती आपल्याला अवकाशात घेऊन जाते. स्वर आपल्याला अस्तित्वाचा विसर पाडतात. (किशोरीताई व मालिनी राजूरकर यांच्या शास्त्रीय संगीताचे सर चाहते आहेत.) बाकीच्या कलांमध्ये पार्थिव घटक असतो. जसे, वास्तुकला, शिल्पकला भूमीशी बांधून ठेवतात. साहित्यकला (आणि नृत्यकलाही) ही स्वर्गाचं पृथ्वीशी नातं जोडते. साहित्य ही कला म्हणजे पार्थिव व अपार्थिव यांच्यातील ‘सेतू’ आहे.’ आपण सरांचे हे विचार ऐकून स्तिमित न झालो, तरच नवल!
अशी चर्चा चालू असताना एकदा मी त्यांना म्हटले, ‘काव्य हे तुमचं पहिलं प्रेम असताना याविषयाची ‘स्वरूप व समीक्षा’ असा ग्रंथ अजून कसा नाही निघाला?’
सर म्हणाले, ‘या विषयात लेखन अर्थातच खूप झालेलं आहे; पण एकत्रित आलेलं नाही. तुम्ही करता का ते काम? तुम्ही कवयित्री आहात. तुम्ही माझे लेख वाचा. निवड करा. त्यासंबंधी प्रस्तावना लिहा. सुरुवात तर करा; बाकीचं नंतर पाहू.
आणि अशा तर्हेने भावकाव्यासंबंधीच्या पुस्तकाच्या कामाला सुरुवात झाली. मी भावकाव्यासंबंधीचे सरांचे लेख पुन:पुन्हा वाचले. वारंवार सरांना भेटले; आमच्या विस्तृत चर्चा झाल्या.
प्राजक्ताच्या वृक्षाखाली उभे राहिल्यावर आपल्या अंगावर ती गंधफुले टपटप पडावीत अन् आसमंत दरवळून जावा तसाच अनुभव सरांशी बोलताना येतो. आपली मराठी भाषा किती सुंदर आहे, ते आपल्याला त्यांच्या साध्या साध्या बोलण्यातूनही जाणवतं. काव्य हे सरांचं ‘पहिलं प्रेम’ आहे, ते त्यांच्या अणुरेणूत भिनलेलं असावं का? म्हणून ते इतकं काव्यमय बोलतात? सरांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात कविता लिहिल्या आणि तेव्हा त्यांचा एक संग्रहही निघाला होता! त्या संग्रहाचं नाव इतर पुस्तकांच्या नावाप्रमाणे तेही वेगळंच आहे. ‘मेरसोलचा सूर्य’! पण सर म्हणतात, ‘माझ्या संग्रहापेक्षा माझा ललितनिबंधांचा संग्रह वाचा’ पुन्हा एक आकर्षक शीर्षक! ‘मेघ, मोर आणि मैथिली!’ तेही दुर्मिळच आहे. मला सरांजवळची एकुलती एक प्रत वाचायला मिळाली; आणि ते काव्यमय ललितनिबंध मी वाचले.
मला तर वाटतं, दभि सरांच्या समीक्षेमध्येच एक कवी मुरलेला आहे. त्यांचे स्फटीकगृहीचे दीप (याला बेस्ट ऑफ दभि म्हटलं जातं), जुने दिवे नवे दिवे, पस्तुरी हे ग्रंथही त्याची साक्ष पटवितात. त्यांच्या ग्रंथांच्या अर्पणपत्रिकासुद्धा वेगळ्या व काव्यमय आहेत.
सरांचा विनयभाव तर ठायीठायी दिसतोच; पण गीतकाव्याला संगीताचे अंकुर फुटले म्हणजे तिथे कसा कलात्मकतेचा हिरवागार गालिचा उलगडतो, ही जाणीवही व्यक्त होते. ही कृतज्ञता व्यक्तींना उद्देशून नव्हे तर संगीतकलेला उद्देशून आहे, हे सांगायला सर विसरत नाहीत. चर्चेदरम्यान सरांच्या तोंडून त्यांच्या स्वत:च्या कविता ऐकायला मिळाल्या. सर म्हणतात, ‘कविता ही सौंदर्यानुभवांची स्पंदनशील भावानुभावांची वेल असते. कवीचे सार्मथ्य त्याने उपयोजिलेल्या प्रतिमासृष्टीत व वापरलेल्या क्रियापदात, क्रियाविशेषणात व कृदंतात असते.’
दभिसरांनी मराठी साहित्याचा अभ्यास आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी केला आहे. गेल्या हजार वर्षांचा मराठीचा प्रपंच त्यांनी मांडला आहे. मराठी समीक्षेची पुनस्र्थापना व पुनर्रचना केली. प्राचीन रससिद्धांत व आनंदसिद्धांत याची व्यवस्था कुणालाच नीट जमेना; तेव्हा तो गुंता दभिंनी उलगडला. मराठीची परिभाषा सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
सरांना शब्द, त्यांचे नाद, नादमधुर शब्द यांचा खूप ‘नाद’ आहे. सुंदर सुंदर शब्द त्यांच्या लेखनातून वाचायला मिळतात. असे शब्द त्यांनी जमविलेले तर आहेतच; (उदा. पस्तुरी, अंभृणी) एवढेच नव्हे, तर जरूर त्या ठिकाणी सर स्वत:च नवीन शब्द तयार (कॉइन) करतात! उदा. साहित्यवंत. योग्य शब्दात व सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या वक्तृत्वातही ते ऐकायला मिळते. एकदा मी एक मूलगामी प्रश्न विचारला, ‘समीक्षेची नेमकी व्याख्या काय हो, सर?’ त्यांनी सांगितले, ‘कवितेचे उदाहरण घेऊ.एखाद्या कवितेचा परिचय करून देणे, त्यातील गुणदोष सांगणे इ. वरवरचे विवेचन म्हणजे रसग्रहण. समीक्षा हा त्या पुढचा टप्पा आहे. कवितेचा प्रच्छन्न अर्थ उलगडून सांगणे, त्यातील सौंदर्य उकलून दाखवणे, त्यातील भावनेला स्पर्श करणे, कवितेचे अनुकूल/ प्रतिकूल परीक्षण करणे, याशिवाय, ते लेखनपरंपरेच्या तुलनेत कोठे बसते, त्या लेखनामुळे परंपरेत काही भर पडली आहे का? का लेखन अनुकरणात्मक आहे? इ. थोडक्यात, त्या लेखनाचे साहित्यातील स्थान व मूल्य ठरवायचे, ही समीक्षेची व्याख्या.’ सर त्यानंतर म्हणाले, ‘मी समीक्षा लिहितो, म्हणजे माझ्याच नजरेने तुम्ही आस्वाद घ्यावा असं नाही. माझ्या हातातला दिवा इतरांच्या हातात देत नाही; मी त्यांच्या अंत:करणातला दिवा प्रज्वलित करतो. त्यांनी त्यांच्या वाटेने खुशाल जावे!’
(लेखिका साहित्यिक आहेत.)