निळू दामले
हेरट या इराणच्या हद्दीजवळच्या अफगाण शहरात भारतीय वाणिज्य दूतावासावर नुकताच हल्ला झाला. हल्लेखोर दूतावासासमोरच्या एका इमारतीत होते. हल्लेखोरांनी मशिनगनमधून गोळीबार केला आणि रॉकेट लाँचरमधून हँडग्रेनेड दूतावासात भिरकावले. दूतावासात स्फोट झाले, आग लागली. दूतावासाच्या रक्षकांनी प्रतिकार केला. त्यात चार हल्लेखोर ठार झाले. दूतावासातलं कोणीही जखमी झालं नाही.
हल्ल्याची जबाबदारी तालिबान किंवा कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. दूतावासावरचा हल्ला घातक ठरला नाही, हल्लेखोरांचं पारिपत्य झालं, याचं कारण दूतावासावरचा पहारा भारतीय सरकारनं नेमलेला स्वतंत्र पहारा होता, अफगाण सुरक्षेवर भारत सरकार अवलंबून नव्हतं.
अफगाण सुरक्षा व्यवस्था खात्रीची नसते. ती अकार्यक्षम असते. कधी कधी सुरक्षा सैनिक पळून जातात किंवा दुर्लक्षच करतात. त्यामुळं हल्लेखोर इमारतीच्या थेट आतपयर्ंत घुसू शकतात. असा हल्ला होण्याची कुणकुण दुतावासाला होती. बहुधा त्याची सूचना दूतावासानं अफगाण अधिकार्यांना दिली होती. अफगाण सरकारवर दूतावास अवलंबून राहिला असता, तर अनर्थ झाला असता.
ही घटना २३ मे रोजी घडली. त्याआधी २१ मे रोजी घडलेली एक घटना लक्षात घेण्यासारखी आहे. त्या दिवशी करझाई यांनी अफगाण सुरक्षा व्यवस्थेतल्या खासमखास तुकडीतल्या दोघांना कामावरून काढून टाकलं. एक होता ३३३ या नावाच्या तुकडीतला. तुकडी परदेशी माणसं, संस्था, हॉटेल्स इत्यादींवर होणार्या हल्ल्यांचा अंदाज घेऊन ते हल्ले मुळात थोपवत असे. दुसरी तुकडी मादक द्रव्य, तस्करी इत्यादी व्यापारांशी संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करत असे. मादक द्रव्य तस्करी आणि तालिबान यांच्यात निकटचा संबंध असतो. तो पैसा तालिबानच्या उपयोगी पडत असतो. या दोन्ही तुकड्यांना तालिबान घाबरत असे. अनेक हल्ले त्यांनी परतवले होते.
करझाई यांनी त्यांना काढून टाकताना संशयितांना आरोप निश्चित न करता अडकवून ठेवणं, मशिदीत जाऊन संशयितांना पकडणं, मशिदीत तपासणीसाठी कुत्रे नेणं, असे आरोप केले आहेत. खरं म्हणजे हे आरोप किरकोळ आहेत. त्यांची विभागीय चौकशी करता आली असती. ही कारवाई सरकारमधल्या अंतर्गत हेवेदाव्यांमधूनही उद्भवलेली असू शकते. भ्रष्टाचार हेही यातलं मूळ असू शकतं. करझाई भ्रष्ट लोकांना संरक्षण देतात आणि कार्यक्षम लोकांना त्यामुळंच दूर सारतात, असा आरोप होत असतो.
हा हल्ला कोणी केला असेल? अफगाण तालिबाननं केला असेल का? शक्यता नाकारता येत नाही. कारण, अफगाण तालिबानचा बाहेरून आलेल्या लोकांवर राग आहे. अमेरिकेवर राग आहे. कारण, अमेरिका ही आक्रमक आहे, असं तालिबानचं म्हणणं आहे. भारतावर राग आहे, याचं कारण अफगाणिस्तानात अनेक कल्याणकारी योजनांत भारत गुंतलेला आहे. भूकंपाच्या जागी मदत दिली आहे. रस्ते, इस्पितळं, शाळा इत्यादी बांधायला भारत सरकारनं मदत केली आहे. भारतानं आजवर सुमारे २ अब्ज डॉलरची मदत केली आहे. तालिबान म्हणतं, की बाहेरच्या मदतीची त्यांना आवश्यकता नाही. जसे कसे गरीबबिरीब असू, आम्ही आमचं पाहून घेऊत.
अफगाण तालिबानच्या कारवाया त्यांच्या देशापुरत्या र्मयादित आहेत. परदेशात जाऊन ते दहशतवादी कृत्यं करत नाही. ओसामा बिन लादेननं अल कायदामार्फत जगभर घातपाती कारवाया सुरू केल्या, तेव्हा तालिबानचा प्रमुख मुल्ला उमरनं त्याला विरोध केला आणि त्यामध्ये आपलं तालिबान सामील होणार नाही, असं सांगितलं. त्यामुळं अफगाण तालिबान आपल्या कुंपणात कारवाया करत असतं.
हे जरी खरं असलं, तरी हेरटमधला हल्ला ‘लष्करे तय्यबा’ या पाकिस्तानी संघटनेनं केला असण्याची शक्यता आहे. लष्करे तय्यबा ही स्पेशयलाइज्ड संघटना आहे. परदेश, विशेषत: भारत हे या संघटनेचं कार्यक्षेत्र आहे. मुंबईवरचा हल्ला याच संघटनेनं केला होता. २00८ आणि २00९मध्ये काबूलमधल्या भारतीय दूतावासावर या संघटनेनं दोनदा हल्ले केले होते. त्यात ७५ माणसं मारली गेली होती.
काबूलमध्ये भारतीय वास्तव्य असणार्या दोन गेस्ट हाऊसवर २0१0मध्ये हल्ला झाला. त्यात ६ भारतीय नागरिक ठार झाले होते. २0१३ मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सरहद्दीनजीकच्या जलालाबाद या अफगाण शहरामधल्या भारतीय वाणिज्य दूतावासावर लष्करनं हल्ला केला. त्यात दूतावासातल्या माणसांना इजा झाली नाही; परंतु दूतावासात काम करणार्या सभोवताली वावरणार्या माणसांना इजा झाली. त्यात पाकिस्तानी-अफगाण माणसं मेली. त्यात ६ मुलं होती.
लष्करे तय्यबाच्या शाखा पाकिस्तानामध्ये वझिरीस्तान या विभागात आहेत. हक्कानिया कुटुंबानं चालवलेले मदरसे आणि लष्करी केद्रं यांमधून लष्करे तय्यबा आपली यंत्रणा उभारतं आणि त्यातून तयार झालेली माणसं जिहादी, दहशतवादी कारवायांसाठी वापरतं. एका मोठय़ा जिहादी छत्रीखाली अनेक संघटना वावरत असतात. अफगाण तालिबान, लष्करे तय्यबा, लष्करे जांघवी, तहरिके तालिबाने पाकिस्तान इत्यादी. प्रत्येक संघटनेनं स्वत:चा खास विभाग, खास काम ठरवलेलं आहे. जसे कानांचे, डोळ्यांचे, पोटाचे, मणक्याचे, दातांचे इत्यादी विशेष भागांचे डॉक्टर्स असतात, तसं या लोकांनी स्वत:चं स्वतंत्र कौशल्य तयार केलेलं आहे. एकूण मोठय़ा जिहादी छत्रीखाली असल्यानं अफगाण तालिबानशी मतभेद असले, तरीही लष्करे तय्यबाला अफगाणिस्तानात कारवाया करायला अफगाण तालिबान परवानगी देते, आवश्यक ती मदतही देते. हेरट हे गाव इराणच्या जवळ आहे. तिथं इराणचा प्रभाव आहे. इराण आणि तालिबान यांच्यात मतभेद असल्यानं हेरटमध्ये तालिबानचा प्रभाव काहीसा कमी आहे. त्यामुळं हेरट हे शहर काहीसं सुरक्षित मानलं जातं. तरीही तिथं हल्ला झाला. तालिबानच्या ऐवजी लष्कर गुंतलेलं असल्यानं तसं घडू शकलं असावं.
(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे
अभ्यासक आहेत.)