- प्रा. डॉ. द. ता. भोसले
गावाला लागून असलेल्या नदीच्या काठावर शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीची तीन-चार देवळं अर्धवट पडलेल्या स्थितीत ओळीनं स्थापन केलेली. पाऊस-पाण्याचा मारा, दुरुस्तीचा अभाव, पूजाअर्चाकडे दुर्लक्ष, पुजार्याचा आळस आणि गावकर्यांची उदासीनता, यामुळे दर वर्षी देवळाचे दहा-वीस दगड निखळून पडायचे. मरायला टेकलेल्या वृद्ध माणसासारखी या देवळांची अवस्था झालेली. गावातील माणसं सणासुदीला किंवा एखाद्या विशेष प्रसंगीच या देवळात जात. नैवेद्य दाखवत. एरव्ही हे सारे देवदेवता निरा२िँं१्रूँं१ताप्रमाणे ओलसर जमीन, काळपटून गेलेल्या भिंती, कुबट वास व लोंबणारी कोळिष्टके यांच्या सोबतीने दिवस कंठीत होते. नाही म्हणायला गावचा बंडोपंत पुजारी सवड मिळेल तसा या देवळात जाई. दोन उदबत्त्या आणि चार फुले देवासमोर ठेवी. घंटा वाजवून देवाला जागे करी आणि गंजलेला व पार कुजून गेलेला दरवाजा कसाबसा पुढे ओढून घेई. कडी-कुलपाचा प्रश्नच नव्हता. कारण दाराला कडी नव्हती. कोयंडा नव्हता. त्यामुळे भक्त सोडून सगळे प्राणी हक्काचा निवारा समजून देवळात विसावा घ्यायला यायचे. विशेषत: गावातल्या बेवारस आणि रोगग्रस्त कुत्र्यांचे ते हक्काचे माहेरघर झालेले होते.
पण, योगायोगाने या सार्या देवांचे भाग्य एकाएकी उजळले. एका वर्षी भीषण दुष्काळाने गावाला भाजून काढले. गावकर्यांना प्यायला पाणी मिळाले नाही. तेथे शेतीला कुठले? दुष्काळामुळे अन्नपाण्यासाठी माणसे देशोधडीला लागली. दुसर्या वर्षी एका विचित्र तापाने गावाला पार आडवे झोपविले. घरटी माणूस आजारी पडला. त्यात काही दगावलीसुद्धा. डोळ्याच्या साथीने गावाला आंधळे केले, ते तिसर्या वर्षी. या साथीमुळे लहान लेकरांचे फार हाल झाले. त्यातून गाव कसेबसे सावरत असतानाच एका विचित्र रोगाने गावातली जनावरे मरू लागली. अनेकांची दावणच मोकळी झाली. हे सारे अरिष्ट का घडते, कशामुळे घडते, याचे कारणच कुणाला कळेना. सारा गाव हैराण झाला. हतबल झाला. या दैवी कोपाची चर्चा ग्रामपंचायत कार्यालयाच्या ओट्यावर सुरू असतानाच बंडोपंत पुजारी भेदरलेल्या चेहर्याने गावकर्यांत आले आणि हात जोडत म्हणाले, ‘‘मंडळी, एक नवलाची गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाकडे आलो. आज पहाटे-पहाटे मी गाढ झोपेत असताना माझ्या स्वप्नात नदीकाठच्या देवळातले देव आले. मुठी आवळलेल्या, रागीट चेहरा आणि वटारलेल्या डोळ्यांनी त्यांनी मला खडसावले, म्हणाले, सार्या गावकर्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. जणू आम्हाला वाळीत टाकले आहे. एखाद्या भक्ताचे पाय कधी देवळाला लागत नाहीत. देवळात दिवा नाही. भक्तिभावाने केलेली पूजा नाही, की अभिषेक नाहीत. या पापाची शिक्षा म्हणून चार वर्षे आम्ही गावाला झपाटून टाकले. दर वर्षी आमची आठवण व्हावी म्हणून संकटे आणली. काहींना यमसदनाला पाठविले. आता आमची चांगल्या ठिकाणी प्रतिष्ठापना करा. यथासांग पूजाअर्चा सुरू करा. आमच्या नावानं सप्ताह सुरू करा. यात्रा चालू करा. गावकर्यांनी यात कुचराई केली, तर सार्या गावावर अरिष्ट आणू. सार्या गावाची आम्ही स्मशानभूमी करून टाकू.’’ घाबरलेल्या बंडोपंतांनी देवांचा हा सांगावा सांगितला व तो मटकन खाली बसला. काहींना बंडोपंताचं स्वप्न खरं वाटलं, मात्र काहींनी त्याला विचारले, ‘‘पंत, सगळे देव तुमच्या सपनात येण्याइतकं पुण्य तरी केवा केलं? लबाडी करण्यात तुमचा जलम गेला. लुबाडण्यात तुमी पटाईत; म्हणून इच्यारतो. आन् दुसरं मंजी देव तुमच्याच सपनात कसं आलं?’’ तरीही भोळ्या भाबड्या व श्रद्धाळू गावकर्यांनी यावर विश्वास ठेवला. बराच वेळ गावकर्यांची चर्चा झाली. देवांना गावात आणण्याचे ठरले. बंडोपंताने सुचवल्याप्रमाणे नव्याने बांधलेल्या शाळेच्या दोन खोल्या देऊळ म्हणून वापरायच्या ठरल्या. त्या दोन वर्गातील मुलं दाटीवाटीने दुसर्या एखाद्या वर्गात बसवायचे ठरले, म्हणजे चार खोल्यांत सात वर्ग आणि दोन खोल्यांत चार देव अशी व्यवस्था करण्यात आली. घाबरलेल्या गावकर्यांकडून बंडोपंतांनी पूजा-अर्चा, आरती, दक्षिणा, सप्ताह, प्रसाद या गोष्टींसाठीही वचन घेतले. दर पौर्णिमेला महाअभिषेक घालण्याचा नवस बोलायला लावला. या देवांना प्रसन्न करण्यासाठी गावकर्यांची चढाओढ लागली न पडलेल्या स्वप्नाची भुरळ घालून नाना निमित्ताने गावकर्यांना अंधळ्या श्रद्धेच्या जोरावर आता भरपूर कमाई करता येणार, याचा बंडोपंतांना अतिव आनंद झाला. खर्या अर्थाने पंताला देव पावला.
शाळेला लागून असलेल्या दोन खोल्यांत गावकर्यांनी देवांची स्थापना केली आणि त्या दिवसापासून देवांच्या मंदिराला तेज आले नि ज्ञानमंदिराला अवकळा आली. दोन-दोन वर्ग एकच करून मुलांना बसविले, तरी जागा अपुरी पडली. छोट्याशा खुराड्यात पाचपन्नास कोंबड्या कोंडाव्यात तशी गत झाली. दोन शिक्षकांना बसायला जागा नाही. शिकवायला जागा नाही. एका शिक्षकाचे गणित दुसरा वर्ग ऐके. दुसर्या शिक्षकाची कविता गणितात खोडा घाली. त्यामुळे दोघांपैकी एक जण शाळेबाहेरच तरंगू लागला. आधी हॉटेलात मग पानपट्टीवर त्यानंतर देवळात आणि शाळा सुटायच्या वेळेला वर्गावर, असा त्याचा छान दिनक्रम सुरू झाला. देवळातल्या झोपेने शिक्षकांची प्रकृती सुधारली; पण मुलांचा अभ्यास सुधारेना. सहावीच्या मुलास चौथीचे गणित येईना आणि चौथीच्या पोराला कोणताही पाढा येईना. दुसरीच्या पोराला त्याचे संपूर्ण नाव लिहिता येईना. बाप तोच असला, तरी नाव लिहिताना दुसराच येऊ लागला. शाळेचीही गुणवत्ता घसरली आणि बंडोपंताची धनसंपदा चढत-चढत वर गेली. लक्ष्मीने सरस्वतीचा पराभव केला.
शाळा आणि देऊळ जवळच असल्याने मुलांच्या अभ्यासाला आणखी एक वैताग आला. रोज सकाळ-संध्याकाळ स्पीकर लावून आरती सुरू झाली. भक्तांचे मंत्रपठण, महाराजांचे अध्यात्म प्रवचन, चार वाजता भजन यांची रेलचेल सुरू झाली. मध्येच एखादा भक्त देवावरची आपली श्रद्धा स्पीकरवर सांगू लागला. देणगीदारांचा जाहीर सत्कार शाळेच्या समोर आणि मुलांच्या साक्षीने घडू लागला. भक्तांनी पंतांना हार घालायचे नि पंतानी भक्तांना हार घालायचे. दर पौर्णिमेला अभिषेक सुरू झाला. अन्नदान सुरू झाले. भाविकांची गर्दी वाढतच चालली. महापूजा, महाअभिषेक, महाप्रसाद यामुळे मंदिर घुमू लागले आणि मुलांची शाळा तितक्याच झपाट्याने महारोगासमान दिसू लागली. अनेकदा तर वर्गात शिकवणारे शिक्षक स्पीकर चालू झाला, की शिकवणे बंद करून विद्यार्थ्यांसह टाळ्यांचा ठेका धरून आरती गाऊ लागले. त्यामुळे सहावी-सातवीतील मुले तर शाळेलाच जाईनात. ती मंदिराच्या दाराजवळ बिनकामाची चर्चा करू लागली किंवा पानपट्टीच्या खोक्यावर आधी तंबाखू सेवन नंतर गुटखा सेवन, त्यानंतर सिगारेट सेवन आणि शेवटी ‘देशप्रेमा’पोटी देशीदारूचे सेवन, अशी झपाट्याने प्रगती करू लागली. पोरांचे हे पराक्रम पाहून अनेक पालक हबकून गेले. ते आधी या उनाड पुत्राला नमस्कार करू लागले आणि त्याच्यात सुधारणा व्हावी म्हणून नंतर देवाला नमस्कार करू लागले. एखादा गाव स्वत:च पेटवलेली चूड स्वत:च्या कासोट्याला कसा लावतो, याचे हे छान उदाहरण आहे. मातीत लोपलेल्या दगडी मूर्तींना गावाने वर काढले आणि ईश्वराचे रूप असलेल्या सजीव मूर्तींना गाव भक्तिभावाने मातीत गाडू लागले!
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व निवृत्त प्राचार्य आहेत.)