शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

मंगळाला गवसणी

By admin | Updated: September 6, 2014 14:58 IST

मंगळमोहीम हे नुसते नाव नाही, तर प्रचंड मोठे आव्हान आहे. अपुरा अर्थपुरवठा, प्रतिकूल परिस्थिती असताना भारताची ही मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत हे यान मंगळाभोवती फिरू लागेल. भारत या मोहिमेत यशस्वी झाला, तर जगाला आजवर जे जमले नाही ते आपण साध्य केलेले असेल..

 डॉ. प्रकाश तुपे

 
भारताचे मंगळयान तीनशे दिवसांचा अवकाश प्रवास संपवून २४ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाजवळ पोहोचत आहे. आत्तापर्यंत यानाने ७0 कोटी कि .मी.चा पल्ला पूर्ण केला असून, अपेक्षेप्रमाणे पुढील प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास यान मंगळाभोवती फिरू लागेल. भारताची ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत मंगळ मोहीम राबविणारा चौथा देश ठरेल. मंगळ मोहिमांना हमखास यश कुठल्याच राष्ट्राला मिळालेले नसून, दर तीन मोहिमांपैकी अवघी एकच मोहीम यशस्वी होते. रशियाला अवघे ११ टक्केच यश मिळाले असून, चीन व जपानच्या मोहिमा सपशेल फसल्या आहेत. आता भारतीय शास्त्रज्ञांची अवघड परीक्षा २४ सप्टेंबर रोजी होत असून, त्यात ते यशस्वी झाल्यास अमेरिका आणि रशियन शास्त्रज्ञांना जे सहज जमले नाही ते करून दाखविण्याचा मान त्यांना प्राप्त होईल.
मंगळ ग्रह बर्‍याच अंशी पृथ्वीसारखा असल्याने व तो आपल्या शेजारचा ग्रह असल्याने त्यावर जीवसृष्टी असावी, असा समज पुरातन काळापासून आहे. त्यामुळे अवकाश युगाला प्रारंभ झाल्याबरोबर चंद्रापाठोपाठ मंगळ मोहिमांना प्रारंभ झाला. सर्वप्रथम रशियाने मंगळाकडे ‘मार्स-१’ नावाचे यान १९६२ मध्ये रवाना केले. दुर्दैवाने या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटल्याने रशियाची ही मोहीम फसली. त्यानंतर दोनच वर्षांनी अमेरिकेने ‘मरिनर-३’ मंगळाकडे पाठविले व त्यांची मोहीमदेखील अयशस्वी झाली. मात्र, त्यानंतर पाठविलेल्या ‘मरिनर-४’ यानाने मंगळाचा परिसर गाठून मंगळाची छायाचित्रे घेतली. अमेरिकेच्या पुढील मरिनर यानांना यश मिळत असताना, रशियन मोहिमांना मात्र अपयशाला सामोरे जावे लागत होते. अखेरीस १९७१ मध्ये रशियाची ‘मार्स-३’ मंगळ मोहीम यशस्वी झाली व या मोहिमेमध्ये मंगळाभोवती आठ महिने फिरताना यानाने भरपूर निरीक्षणे घेतली. अमेरिकेने ‘मरिनर’च्या धर्तीवर व्हायकिंग याने बांधली व त्यातील छोट्या प्रयोगशाळा मंगळावर सुखरूपपणे उतरविल्या देखील. या मोहिमांमध्ये मंगळावरचे हवामान व तेथील माती, जीवसृष्टीस पोषक आहे काय किंवा होती काय? याचा वेध घेतला गेला. पुढील अमेरिकन मोहिमांमध्ये मंगळावर रोव्हर्स (बग्गी) उतरवून त्यांनी मंगळावर संचार करून भरपूर निरीक्षण केले. जपानने १९९८ मध्ये ‘नोझोमी’ नावाची मंगळ मोहीम राबविली. मात्र, त्यांचे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचलेच नाही. चीनची २0११ची मंगळ मोहीमदेखील फसली. कारण, त्यांचे यान पृथ्वीच्या कक्षेतच अडकले. या पार्श्‍वभूमीवर भारत मंगळ मोहीम राबवित आहे. भारताने आत्तापर्यंत  चंद्रापर्यंत मजल मारली असून, त्यापेक्षा १00 पट दूरच्या मंगळ  ग्रहाकडे यान पोहोचविण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे.
भारताचे मंगळयान ५ नोव्हेंबर २0१३ रोजी मंगळाच्या प्रवासास निघाले. उड्डाणानंतर जवळजवळ महिनाभर यानाने त्याची कक्षा वाढवत नेली. जवळ जवळ सहा वेळा इंजिनाच्या साह्याने यानाची कक्षा २४,000 कि.मी.पासून २ लाख कि.मी.पर्यंत वाढविली गेली. यान पृथ्वीपासून ७0000 कि.मी. दूर असताना यानातील रंगीत कॅमेर्‍याच्या साह्याने भारताचे छायाचित्र घेऊन कॅमेर्‍याची चाचणी घेण्यात आली. तसेच, यानातील सर्व यंत्रणा ठाकठीक असल्याची खात्रीदेखील करण्यात आली. आता यान पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले व १ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा २२ मिनिटे यानाची इंजिने प्रज्वलित करून, यान खर्‍या अर्थाने मंगळाच्या दिशेने मार्गस्थ झाले. यानाच्या हालचालीवर बंगलोर व बॅलुलु येथील अँटीनांच्या साह्याने नियंत्रण ठेवले जात होते. मंगळ यानाची कक्षा तपासण्याची व त्यात थोडाफार बदल करण्याची पहिली क्रिया ११ डिसेंबर रोजी पार पडली. यान आता मंगळाकडे ताशी ११000 कि.मी. वेगाने झेपावत होते. एप्रिल ९ रोजी यानाने मंगळपर्यंतचा निम्मा टप्पा पार केला. यानाचा वेग व कक्षा ठीकठाक आढळल्याने शास्त्रज्ञांना ऑगस्टमध्ये फारसे काही करावे लागले नाही. ऑगस्टच्या अखेरीस यानाने ६0 कोटी कि.मी.चे अंतर कापले. या वेळी यानाचा वेग तासाला ९८,000 कि.मी. एवढा प्रचंड होता. पुढच्या आठवड्यात म्हणजे- १४ सप्टेंबर रोजी यानाचा वेग, कक्षा यांचा अंदाज घेऊन, योग्य त्या दुरुस्त्या करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.
मंगळयानाचा सर्वांत महत्त्वाचा व तांत्रिकदृष्ट्या अवघड असा टप्पा २४ सप्टेंबर रोजी पार पाडला जाईल. मंगळ यानातील यंत्रणा हा टप्पा संगणकाच्या साह्याने पार पाडणार असून, या काळात यान पृथ्वीच्या दृष्टीने मंगळाच्या पाठीमागे असेल. तसेच, यानाचा संदेश पृथ्वीवर पोहचण्यास जवळ जवळ ११ मिनिटांचा अवधी लागणार असल्याने शास्त्रज्ञांना संपूर्णपणे यानातील स्वयंचलित यंत्रणेवर भरवसा ठेवावा लागणार आहे. यानातील ‘लिक्विड अपोगी मोटर’ गेली २९७ दिवस बंद असून, ती २४ सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू होणे अपेक्षित आहे. 
मंगळ मोहिमेतील हा सर्वांत कठीण टप्पा असून, योग्य वेळी मोटर चालू झाल्यासच मंगळ यान अपेक्षित कक्षेत जाऊन मंगळाभोवती फिरू लागेल. चंद्रमोहिमेतदेखील याच प्रकारे यानाची बंद असलेली मोटर चालू करून, यान अपेक्षित कक्षेत नेले होते. याचमुळे शास्त्रज्ञांना खात्री आहे, की या वेळी देखील गेली दहा महिने बंद असलेली मोटर योग्य वेळी चालू होईल व यान मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात पकडले जाऊन, त्याभोवती फिरू लागेल. मंगळयानाची कक्षा अंडाकृती असून, यान मंगळाजवळ असताना ३६0 कि.मी. उंचीवर असेल, तर दूर असताना त्याचे मंगळापासूनचे अंतर ८0,000 कि.मी. एवढे होईल.
भारतीय अवकाश संस्थेने (इस्रो) अवघ्या पंधरा महिन्यांत मंगळ मोहिमेचा आराखडा तयार केला. त्यानुसार मंगळयान १३५0 किलो वजनाचे असून, त्यामध्ये ८५0 किलो इंधन व १५ किलो वजनाची ५ शास्त्रीय उपकरणे आहेत. मंगळावरच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी फोटोमीटर असून, तो वातावरणातील ड्युटेरियम व हायड्रोजनचे निरीक्षण करून, तेथील पाण्याविषयीचे निष्कर्ष काढेल. स्पेक्ट्रोमीटरच्या साह्याने मंगळावरील खनिजांचे मोजमाप केले जाईल. तसेच, मिथेनचे प्रमाण 
मोजून तेथील जीवसृष्टीविषयी अंदाज करता 
येईल. रंगीत छायाचित्रे घेणारा कॅमेरा मंगळाची व त्याच्या चंद्राची भरपूर छायाचित्रे घेईल. ही सर्व 
कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.
मंगळ मोहिमेसाठी भारत ४५0 कोटी रुपये खर्च करीत असून, तो इतर राष्ट्रांच्या मोहिमांपेक्षा खूपच कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘ग्रॅव्हिटी’ सिनेमाच्या खर्चापेक्षा कमी खर्चात भारत मंगळ मोहीम राबवित आहे. या मोहिमेला अपेक्षित यश मिळाले, तर अवकाश क्षेत्रात भारताचे मोठे नाव होईल व पहिल्याच प्रयत्नात मंगळाला गवसणी घालण्याची करामत करून, दाखविल्याने शास्त्रीय जगतात भारतीय शास्त्रज्ञांची मान उंचावेल हे नक्की.
(लेखक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ  आहेत.)