शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खेळ मांडला ..

By admin | Updated: December 18, 2014 22:24 IST

खेळ खरे तर सगळ्यांच्याच आवडीचा विषय. खेळात रंगून जाताना वेळचे भानदेखील राहत नाही. अजूनही

 प्रा.डॉ. वर्षा गंगाणे,(लेखिका मराठीच्या प्राध्यापक आहेत) - 

खेळ खरे तर सगळ्यांच्याच आवडीचा विषय. खेळात रंगून जाताना वेळचे भानदेखील राहत नाही. अजूनही बालपणीच्या भावविश्‍वात रमायला लावणारी रम्य कल्पना किंवा आठवणी कोणत्या असतील, तर त्या म्हणजे खेळ आणि खेळासंबंधीचे अनुभव. बालपणी हुतुतू, लगोरी, विटी-दांडू, लपाछपी यासारखे मैदानी खेळ खेळायला अधिक आवडत. सुटीच्या दिवशी मैदानात किती वाजता यायचे, हे पूर्वनियोजनाने ठरलेलेच! उन्हाळ्याच्या सुटीत मात्र उन्हामुळे सगळे दुपारी घरात कोंडलेले असायचे. त्यावर आजी-आजोबांचा कडक पहारा असायचा. त्यामुळे घरकुल, चौरस, गोट्या, भातुकली यासारखे बैठे खेळच खेळले जायचे. हे खेळ खेळता-खेळता आपण कधी मोठे झालो, हे कळालेदखील नाही. खेळातील समरसता आणि आठवणी इतक्या गोड व अविस्मरणीय, की आजही त्या जशाच्या तशा डोळ्यांसमोर फेर धरून नाचतात.

खेळात एखादं शेंबडं बाळदेखील सामावून घेतलं जायचं, इतका जिव्हाळा व आापुलकी असायची. खेळांमधून मोठय़ांच्या अनुकरणाचे चित्र आपोआप रंगायचे; त्यामुळे संस्कारांचे पाठदेखील खेळातून गिरविले जात असत. खेळताना चुकून तोंडातून अपशब्द बाहेर पडले, तर मोठय़ांची ओरड असायचीच. त्यामुळे खेळ म्हणजे निरागसता, प्रेम, आनंद, उत्साह आणि सामंजस्य यांचा सुंदर मिलाफ असायचा. एक सुदृढ, सशक्त, सुजाण पिढी घडविण्याचे सार्मथ्य खेळात असायचे. जुने खेळ विनामूल्य असले, तरी त्या काळच्या खेळांत संस्कारांचे वैभव होते. म्हणूनच खेळही मूल्यवान होते. पण, काळ बदलला अन् खेळांचे स्वरूपही बदलले. विभक्त कुटुंबामुळे मुले एकटी झाली. आई-बाबांच्या कमी सहवासामुळे अनुकरणाला वाव राहिला नाही. सजीवांपेक्षा निर्जीव घटकांसह खेळ खेळण्यात अधिक वेळ जाऊ लागला. जगण्याच्या संकल्पना बदलल्या. विश्‍व संकुचित झाले. ज्याचा एकूण परिणाम म्हणजे एकलकोंडेपणा वाढला, शब्दभांडार कमी झाले., संवादकौशल्य हरवले. पैसा, प्रशिक्षक, सुसज्ज व आदर्श मैदाने गरजेची वाटू लागली. थोडक्यात, खेळ पैसेवाल्यांचे झाले. त्यामुळे खेळानेही गरीब व श्रीमंत असे दोन वर्ग निर्माण झाले. गल्लीबोळांतले, मजेदार अनुभव आणणारे स्वस्त आणि मोकळे, स्वच्छंदी खेळ हरवत गेले आणि आयुष्याला एक प्रकारचा बोजडपणा येत गेला. खेळात निरागसतेपेक्षा दिखाऊपणा व अपेक्षा वाढल्या. ‘खेळ म्हणजे गंमत’ ही संकल्पना हरवत गेली, असे म्हणावेसे वाटते. स्पर्धा, पैज, बक्षिसे, सत्कार, स्मृतिचिन्हे व त्यासाठी परस्परांचा द्वेष, खुन्नस या भावना वाढत गेल्या. हल्लीच्या खेळांचे असे बीभत्स स्वरूप बघून बालपणीचे खेळ हरवलेत की काय, असे वाटू लागते. 
खेळ खेळण्याचेही अनेक प्रकार आहेत. कोणी गंमत म्हणून खेळ खेळतात, तर कोणी जगण्याचे साधन म्हणून! एक दिवस वाटेत डोंबार्‍याचा खेळ रंगात आलेला पाहिला आणि पावले तिथेच थबकली. एक लहान पोर ढोलकीच्या तालावर एका दोरीवरून काठी हातात घेऊन संतुलन साधत पुढे चालत होती. ढोलकीच्या ठेका चुकला, की पोर कोलमडणार हे नक्की! समोरचे दृश्य बघून जमिनीवर अंथरलेल्या कापडाच्या तुकड्यावर काही जण पैसे टाकीत पुढे जात होते, तर काही नुसतीच बघ्याची भूमिका वठवत होते. क्षणभर वाटले, काय हे बालपण? पण... पोटासाठी अख्खं कुटुंब रस्त्यावर आलेलं! दोरीवरच्या खेळातून आपलं पोट भरणारं! या मुलांचे बालपण, शिक्षण, आनंद सगळेच त्या खेळापुरते सीमित. खेळाच्या याच चौकटीत वाढायचं, राहायचं आणि जगायचंही. एखादी बडी असामी (मनाने)  दया दाखवून एखादी मोठी नोट देऊन गेली, तर त्या दिवशी दसरा-दिवाळी साजरी करायची; नाही तर सगळे दिवस सारखेच. डोंबार्‍याचा खेळ बघून मन बधिर झालं. विचार करू लागलं, की खेळाची संकल्पना इतकी लाचार, कठीण व डोईजड कशी असू शकते? मनात आलेल्या या प्रश्नासह गर्दीतून वाट काढली.
आपले आयुष्य म्हणजेही एक खेळच नाही का? जीवनाच्या मैदानावरील आपण सर्वच खेळाडू. प्रत्येकाच्या जीवनाप्रमाणे खेळाचा प्रकार व स्वरूप तेवढे वेगळे. कोणी सुखात लोळत पडलेले, तर कोणी दु:खाचे एकेक कढ पचवत राहणारे. कोणाचा खेळ रोज रडायला लावणारा, तर कोणाचा खदखदून हसवणारा. सुख-दु:खांचा, ऊन-सावलीचा खेळ प्रत्येकाच्या आयुष्यात पाठशिवणी खेळत असतो. या खेळात सावलीतील सगळ्या आठवणी गोड, भराभर सरकणार्‍या, जीवनाचा आनंद लुटायला लावणार्‍या, हव्याहव्याशा असतात; तर दु:खाच्या उन्हात सगळं जीवन होरपळून निघतं. एखादी दुर्घटना मनात कायमची सल ठेवून जाते. दु:खाचे घोट प्राशत चेहर्‍यावर खोटे हसू आणत दिवस पुढे ढकलण्याचे प्रयत्न करावे लागतात. उन्हातला (दु:खातला) खेळ इतका रंगात येतो, की त्याचे विविध पैलू आपली छाप कायमची मनावर उमटवतात. हळव्या मनाला असंख्य छिद्रे पडतात. कटू अनुभवांच्या जखमा जशा वेदनेने भळभळू लागतात.
सुखापेक्षा दु:खाचे खेळ अधिक काळ आपला खेळ दाखवितात एवढे मात्र खरे! पण, निसर्गाने ठरविल्याप्रमाणे दु:खामागून सुखाला भरते येतेच आणि कदाचित म्हणूनच ‘याला जीवन एैसे नाव’ असे म्हटले जात असावे. सुख-दुखांच्या, ऊन-सावलीच्या खेळात आयुष्य अनुभवांचे अनेक ताणेबाणे विणत एक सुंदर, मऊ, उबदार, गर्भरेशमी शेला पांघरून अंतिम खेळाच्या तयारीला लागतो. ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे!’ जीवनाची वाटचाल आदिमापासून अंतिमाच्या भेटीसाठी आतूर होते आणि आयुष्यातील एक चिरंतन, शाश्‍वत, ठरलेला खेळाचा प्रवास सुरू होतो. जीवनमरणाचा खेळ खेळत असताना मागे वळून पाहिल्यास हा खेळ कोणी हसत-हसत खेळलेला, तर कोणी रडत-कण्हत खेळलेला असतो. मृत्यू हे एक शाश्‍वत व चिरंतन सत्य असून, त्या अनामिकाच्या, निराकाराच्या पायाशी एकरूप होतानाच हा खेळ खर्‍या अर्थाने रंगात येतो आणि म्हणूनच नेहमी असे वाटते, की बालपणीचे खेळ आणि अंतसमयीचा खेळ यांत बराच गहिरा संबंध आहे. बालपणीचे खेळ जेवढे निरागस, भाबडे, सुसंस्कारी, निष्कपट कलंकहीन, स्वच्छंदी, आनंददायी, भावनाप्रधान असतील, त्याचीच प्रतीके तरुणाईत जीवन जगताना बघायला व अनुभवायला मिळतात आणि त्याचे पडसाद वार्धक्याच्या अंतिम समयी प्रकर्षाने उमटतात. नशिबाच्या भोगापेक्षा, तळहातांवरील रेषांपेक्षा कर्माचे ठसे अधिक स्पष्टपणे या क्षणी उमटलेले दिसतात. थोडक्यात काय, तर बालपणीच्या खेळांमधील स्वरूपाचे प्रतिबिंब अवघ्या हयातीत बघायला मिळते व त्यांचे कवडसे जीवनमरणाच्या खेळात, अंतिमाच्या खेळावर पसरतात.
सहज खेळले जाणारे खेळ इतके महत्त्वाचे, आपली छाप सोडणारे असतील, असे कधीच वाटले नव्हते. अगदी वर्तमान भाषेत बोलायचे झाल्यास, टाइमपास करण्याचे एक साधन म्हणजे खेळ, इतकी कोती संकल्पना आज आहे खेळाची! पण, जीवनाला एका सूक्ष्म अंतरंगातून बारकाईने न्याहाळल्यास खेळांचे महत्त्व, खेळांचे अस्तित्व, त्यांचे रंगणे, हसवणे व भान हरपायला लावणे आयुष्य जगायला शिकवणारे असते. खेळातील विविध रंग व छटा आपल्या वागण्या-बोलण्यातून बघायला मिळतात.
खेळातील पहिला गुरू म्हणजे निसर्ग. खेळांचे रमणीय प्रदर्शन केले जाते ते निसर्गाद्वारेच! खेळाचे बाळकडू निसर्गाद्वारे कळत-नकळत दिले जाते. ऋतूंचा खेळ रंगला, की सर्वत्र चैतन्य पसरते. पावसाळी हवा वेड लावते. मातीचा गंध श्‍वासात भरून उरतो. कोवळ्या उन्हाचा तुकडा हवाहवासा वाटतो. गुलाली संध्याकाळ एका अनामिक आनंदाची साक्ष असते. माळरानातील पाखरांच्या खेळात डोळे दिपवण्याचे सार्मथ्य असते. फुलपाखरांचा फुलांशी असणारा खेळ, वार्‍याचा लता-वेलींशी, फुलांचा सुगंधाशी, इंद्रधनूचा सप्तरंगांशी, शरदाचा चांदण्यांशी आणि सागराचा किनार्‍याशी रंगणारा खेळ आपल्याला एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात, रमायला लावतात, सारे दु:ख विसरायला लावतात.
सागराच्या लाटेसह किनार्‍यावर येणार्‍या कवड्या, शंखशिंपले लाट निघून गेल्यावर परत सागराकडे धाव घेतात. हा खेळ इतका नयनरम्य असतो, की तो कधी संपूच नये असे वाटते. रंगीबेरंगी कवड्या व शंखशिंपल्यांचे पूर्ण सार्मथ्यानिशी सागराकडे धावणे व त्यास सर्मपित होणे, हा खेळ बरेच काही शिकवून जातो. जीवनही असेच नाही का? अथक चालत राहायचे. जीवनाच्या खेळात रंगून सार्मथ्यानिशी चिरंतन शाश्‍वताला सर्मपित व्हायचे. त्याच्याशी एकरूप व्हायचे नवीन खेळ नव्याने खेळण्यासाठी!
(लेखिका मराठीच्या प्राध्यापक आहेत.)