शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्मार्ट असण्याची सक्ती

By admin | Updated: October 8, 2016 14:27 IST

सुंदर दिसणारी माणसे जास्त लोकप्रिय होतात. गोऱ्या आणि देखण्या माणसांना नाटकात लवकर कामे मिळतात. त्यांच्यासाठी लेखक संहिता लिहितात. कॉलेजात पाहुणे आले की स्वागताला ‘स्मार्ट’ मुली लागतात..काळ्यासावळ्या, जाड्या, टकल्या, बुटक्या, दात पुढे असलेल्या, चष्मेवाल्या मुलामुलींनी मग काय करावे? अशा लोकांना आपण कधीच, कुठेच स्वीकारणार नाही का? त्यांना संधीच देणार नाही का? अशा लोकांना काय वाटत असेल निदान याचा तरी विचार आपण करणार की नाही?

- सचिन कुंडलकरनैसर्गिकरीत्या चांगले दिसणाऱ्या माणसांना आयुष्य जगणे थोडे सोपे जात असेल का? ह्या प्रश्नाचे आजच्या काळातले उत्तर ‘हो’ असे आहे. जे गोरे असतात, उंच असतात, देखणे दिसतात, ज्यांचे हसू सुंदर आहे, दात व्यवस्थित आहेत, ज्यांना चश्मा नाही, ज्यांच्या केसांचा रंग काळाभोर आणि चमकदार आहे अशा सुंदर स्त्री-पुरुषांना इतरांपेक्षा जगताना दरवाजे पटापट उघडले जातात. आजचे जग असे आहे जे दिसण्यावर फार लवकर भाळते.त्वचेचा रंग काळा असलेल्या, शरीराने जाड असलेल्या, टक्कल असलेल्या, केस पांढरे झालेल्या, दात थोडे पुढे असलेल्या माणसांना ती कितीही हुशार असली किंवा संवेदनशील असली तरी जगण्याची लढाई थोडी जास्त करावी लागते. समाजामध्ये हे इतके बेमालूमपणे आणि आपोआप चाललेले असते की वरवर पाहता तसे असण्यात काही चूक आहे असे दिसत नाही. आणि त्याविषयी कुणी काही बोलले की त्या व्यक्तीला स्वत:विषयी खोटी सहानुभूती तयार करायची असेल असे वातावरण तयार केले जाते. ह्याची सुरुवात शाळा-कॉलेजातून होते. सुंदर दिसणारी माणसे शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जास्त लोकप्रिय होतात. इतरांना आपल्यात काय कमी आहे असा प्रश्न पडत राहतो. गोऱ्या आणि देखण्या माणसांना नाटकात लवकर कामे मिळतात. त्यांच्यासाठी लेखक संहिता लिहितात. कॉलेजात पाहुणे आले की स्वागत करायला नेहमी उंच, गोऱ्या आणि ज्याला ‘स्मार्ट’ म्हणतात अशा मुलींची निवड केली जाते. अशा वातावरणात काळ्या दिसणाऱ्या, जाड्या असणाऱ्या, बुटक्या असणाऱ्या मुलामुलींना काय वाटत असेल याचा विचार कधी केला जात नाही. आपल्याकडे ह्या वयात अशा सध्या दिसणाऱ्या लोकांच्या मनात फार मोठा न्यूनगंडात्मक भाव वाढीला लागतो आणि मग आयुष्यभर तो त्यांची साथ सोडत नाही. शुद्ध भाषा येणे हा त्यातला अजून एक भयंकर प्रकार. भाषेचे इतके मोठे राजकारण आपण सर्वांनी करून ठेवले आहे की संवेदना महत्त्वाची की भाषा, असा प्रश्नसुद्धा आपल्या पालकांना, शिक्षकांना किंवा वर्गमित्रांना पडत नसावा की काय असे वाटते.मी ह्या सगळ्याचा अप्रत्यक्ष आणि थेट असा दोन्ही अनुभव घेतला आहे. आपण दिसायला चांगले नसतो तेव्हा आपण शाळा-कॉलेजात कसे पुढे येत नाही हे मी अनुभवलेले आहे. नीट मराठी बोलता येत असले तरी नीट इंग्रजी बोलता न आल्याने आमच्या कॉलेजात माझे अनेक वेळा हसे झाले आहे. नुसते इंग्रजी बोलता येत नाही म्हणून नव्हे, तर आमच्या कॉलेजात जी मुले बाहेरगावाहून येत आणि आपल्या गावाकडची ‘बोली मराठी’ बोलत त्यांनाही सगळे पुष्कळ हसत असत. जाडेपणावर सतत विनोद करणे, ज्यांना पीटीच्या तासाला धावता पळता येत नाही अशा मुलांना आणि मुलींना शिक्षकांनी मारहाण करणे हे मी पाहिले आणि अनुभवलेले आहे. माझ्या पुण्याच्या सुप्रसिद्ध वाणिज्य महाविद्यालयात आमच्या पीटीच्या बाई आम्ही पंधरा सोळा वर्षाचे असतानासुद्धा आम्हाला सतत कानाखाली मारायच्या, वस्तू फेकून मारायच्या आणि अर्वाच्य शिव्या द्यायच्या. मला शारीरिक कसरतींची कधी गोडी नव्हती. माझे वजन खूप होते आणि मला वेगाने धावता पळता येत नसे. त्या बाईंमुळे माझी कॉलेजची सर्व गोडी संपली. मला ती जागा आवडेनाशी झाली. त्यांच्याइतकी भीतिदायक आणि बिकट बाई मी त्यानंतर कधी आयुष्यात पहिली नाही. आपण जे करतो आहोत त्याची त्यांना जरासुद्धा लाज कशी वाटत नसेल? साध्या दिसणाऱ्या माणसांचे प्रश्न इथे सुरू होतात, ते संपत कधी नाहीत. त्यांची लग्ने होताना त्यांचे रूप आड येते. आपण कसेही दिसत असलो तरी सगळ्यांना मुली मात्र सिनेमातील नटीसारख्या हव्या असतात. आपल्या सिनेमातला हिरो कसाही काळासावळा असला तरी नटी मात्र गोरी आणि सुंदरच लागते. कुठलाही मराठी सिनेमा आठवून पहा. काळ्या नट्यांना आई, मावशी, मैत्रीण अशा भूमिका किंवा मग सरळ सामाजिक चित्रपटात समाजसेविकेच्या किंवा शिक्षिकेच्या भूमिका कराव्या लागतात. असा हा काळ आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र, केरळ ह्या राज्यांतील सर्व सिनेमांत हिरो कसाही दिसला तरी चालतो, पण मुलगी गोरीपान आणि देखणी असावी लागते, हा सिनेमाच्या धंद्याचा नियम बनवून ठेवला गेला आहे. हल्ली लग्नाच्या ज्या वेबसाइट उघडल्या आहेत तिथे फोटो टाकावा लागतो. जी मुले आणि मुली सुंदर असतात, गोरी असतात त्यांना आपसूक लग्नाच्या जास्त मागण्या येतात. मुलींनासुद्धा फक्त गोरे आणि देखणे नवरे असले की पुरे असे वाटते. माझ्या आजूबाजूच्या कुटुंबातील अनेक मुलींनी कॉलेजच्या वयात एकापेक्षा एक अशा बिनडोक गोऱ्या मुलांशी लग्ने केली आणि आता त्या चाळिशीला आल्यावर पस्तावून बसल्या आहेत. आमच्या घरातसुद्धा अशी घाईने, दिसण्याच्या प्रेमात पडून केलेली बरीच लग्ने मोडली. दिसणे आयुष्यभर पुरत नाही हे त्यांना तरुण वयात कधीच कळले नाही. माझी एक मोठी बहीण सरळ आणि शहाणी निघाली, जिने रूपापेक्षा त्या माणसाचे गुण पाहिले. मला तिचे फार कौतुक आहे. माणसाचे मन काय आहे, त्याचे विचार कसे आहेत, त्याच्या आवडीनिवडी आपल्याशी जुळतात का ह्याचा विचार सोयरिक जुळवताना जवळजवळ केला जात नाही. अनेक व्यवसाय आणि नोकऱ्या अशा आहेत जिथे दिसण्याने छाप पाडणाऱ्या माणसांनाच कामाला ठेवून घेतले जाते. मग उरलेली साधीसुधी दिसणारी माणसे आपले आयुष्य कसे जगत असतील? मोठ्या शहरामध्ये जगताना सतत जो एक आत्मविश्वास गोळा करत राहावा लागतो तो कुठून गोळा करत असतील? त्यांना त्यांची प्रेमाची माणसे ‘तू छान दिसतोस’ किंवा ‘तू छान दिसतेस’ असे कधी म्हणत असतील का? मला स्वत:ला माझ्याविषयी हा प्रश्न अनेकवेळा पडला आहे आणि त्यामुळे तो मला इतरांविषयीसुद्धा पडतो.अशी समाजाकडून अप्रत्यक्षपणे दुखावलेली आणि बाजूला सारलेली माणसे मग गोरे होण्याची क्रीम वापरतात. अघोरी व्यायाम आणि चुकीची उपासमार करून बारीक होण्याचे प्रयत्न करत राहतात. उंची वाढवणारी फसवी औषधे घेतात. टीव्हीच्या जाहिराती पाहून वेगवेगळ्या जडीबुटी घेत राहतात. सुंदर दिसण्यासाठी दातांचे आकार बदलून घेतात. अनेक चुकीचे सल्ले घेऊन शरीरावर शस्त्रक्रिया करून घेतात. केसांचे विग शिवून घेतात. टक्कल होते म्हणून हसणारा समाज तुम्ही विग घातलीत तरीही तुम्हाला हसत बसतो. ह्या सगळ्या उपायांचे माणसाच्या मनावर खोलवर परिणाम होत असतात. माझ्या मापाचे कपडे मोठ्या दुकानात मिळेनासे झाले म्हणून एका काळात मी महागडे बूट खरेदी करायचो. कारण मोठ्या ब्रांडचे काहीतरी आपल्याकडे हवे अशी ओढ मला वाटायची. माझ्या मापाचे दुकानात फक्त बूटच मिळायचे. दुकानात कपडे घ्यायला गेलो की तिथले सेल्समन मला अनेक वेळा चेष्टा करून सांगत की माझ्या मापाची रेडिमेड पॅँट मिळणार नाही. ह्या गोष्टीमुळे मी रागावून व्यायामाला लागलो. आनंदाने आणि किंवा चांगल्या प्रेरणेने नाही. आणि त्यामुळे चांगल्या व्यायामाचे फायदेसुद्धा मला कधी मिळाले नाहीत.माझी एक मैत्रीण मला म्हणाली की तिने चरबी कमी करण्याची शस्त्रक्रिया करून घेतली. कारण तिचा नवरा तिच्या बाळंतपणानंतर वाढलेल्या कमरेबद्दल मित्रांसमोर चारचौघात तिची चेष्टा करून हसू लागला. त्या शस्त्रक्रियेनंतर तिला खूप त्रास झाला. आपण लोकांची सतत चेष्टा केली नाही तर आपला काही तोटा होईल का? काळ्यासावळ्या, जाड्या, टकल्या, दात पुढे असलेल्या, चष्म्याचा मोठा नंबर असलेल्या, पायावर मोठी काळी जन्मखुण असलेल्या अशा सगळ्या माणसांनी काय करावे अशी लोकांची अपेक्षा असते? चुकीचे आणि अशुद्ध बोलणाऱ्या माणसाला आपण कधी पुढे येण्याची संधीच देणार नाही का? लहानपणी केस पांढरे झालेल्या मुलीला कुणी लग्नाला स्वीकारणार नाही का? सुंदर आणि स्मार्ट असण्याची ही काय सक्ती आहे? (उत्तरार्ध)

(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)

kundalkar@gmail.com