शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

पोळले हात त्यांना विस्तवाचे दान रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 06:05 IST

गुरे राखणारा वीरा साथीदार अनेक आंदोलनाचा नेता आणि पुढे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा नायकही झाला. आता त्याच्या आठवणी तेवढ्या उरल्या आहेत.

ठळक मुद्दे‘कोर्ट’मधील शाहीर संभाजी भगतच्या आवाजातील गाण्यात शब्द आहेत - पोळले हात त्यांना विस्तवाचे दान रे! नुकतीच साठी उलटलेला वीरा साथीदार ते शब्द खरे करून, पुढच्या पिढीच्या हाती निखारे देऊन गेला.

- दिनानाथ वाघमारे, (संघर्ष वाहिनी, नागपूर)

कोर्ट सिनेमाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित केल्याची बातमी धडकली तसे माध्यमांचे फोन घणघणू लागले. सर्व जण वीरा साथीदार यांना भेटायला संघर्ष वाहिनीच्या कार्यालयाकडे येत होते. त्यावेळी वीरा, मी आणि मुकुंद झिरो माईल्सच्या टपरीवर चहा पीत होतो. वीराची दाढी वाढली होती. चेहरा नीट करावा म्हणून सलून शोधायला निघालो. शेवटी धरमपेठमध्ये एक दुकान मिळाले आणि वीराने दाढी केली. पण पैसे द्यायला खिशात हात घातला तेव्हा खिशातून ५ रु. निघाले. आम्ही होतो म्हणून स्थिती निभावून नेली. मुलाखत झाली, प्रसारितही झाली. प्रसिद्धीचा हा गवगवा मागे ठेवून दुसऱ्या दिवशी झालेल्या आंदोलनात वीरा नेहमीप्रमाणे उभा होऊन नारे देत होता.

‘कोर्ट’नंतर वीराला काही चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण तो साफ इन्कार करू लागला. आम्ही म्हणालो, वीरा पैसे मिळतील. पण तो बोलला, भाऊ मी तो नाही, मी कार्यकर्ता आहे. हो, ‘कोर्ट’चा नायक नारायण कांबळे म्हणजे खरोखरचा वीराच होता. शुभ्र पांढरी दाढी, रापलेला चेहरा, कणखर बाणा, राकट स्वभावाचा, पण आतमध्ये मृदू असलेला वीरा.

वीरासारखा कार्यकर्ता सहजासहजी घडत नाही. त्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागते. वीरा मूळचा वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील झडशी गावचा. खरे नाव विजय रामदास वैरागडे. वडील नागपूर रेल्वे स्टेशनवर हमाली करायचे व आई मोलमजुरी. दोघेही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक. मुलगा शिकावा, ही त्यांची इच्छा पण वीरा दहावी नापास झाला म्हणून थेट त्याला गुरे चारायला धाडले.

वीराने गाव सोडले. बुटीबोरीत कंपनीमध्ये कामाला लागला. परसोडी गावात राहिला. या काळात त्याचे लग्न झाले. पत्नी पुष्पा हिला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी लागली. वीरा मग नागपूरला आला. मिळेल ते काम केले. रिक्षा चालवली, हमाली केली, बांधकामावर मजुरी केली, खाणीतही काम केले. पत्रकार बनला. संघटना उभ्या केल्या. आंदोलने केली. मेहनतीनेच शरीर राकट झाले. शिक्षणात वीरा अपयशी ठरला, पण सामाजिक भान व लढाऊ वृत्ती होती. ही धग त्याला आंदोलनात घेऊन आली. गुरे राखणारा वीरा अनेक आंदोलनांचा नेता आणि पुढे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा नायकही झाला.

१९७०च्या दशकात बेरोजगारी, गरिबी, जातीव्यवस्थेविरोधात राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वात उभ्या झालेल्या रिपब्लिकन पँथरमध्ये वीरा सक्रिय झाला. १९८५च्या दरम्यान कारखान्यात मशीनवर काम करीत असतांना अपघातात एक बोट कायमचेच गेले. १९८४ला नागपूरमध्ये पारधी समाजाच्या युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेच्या विरोधात पन्नलाल राजपूत, गणेश पवार आदींच्या साहाय्याने पारधी समाजाची संघटना बांधून आंदोलन केले. चळवळीचा निष्ठावंत व संघर्षशील कार्यकर्ता म्हणूनच आयुष्यभर काम केले. जाहीर सभांमध्ये मार्क्स-आंबेडकर मांडायचा तेव्हा तत्त्वज्ञ वाटायचा. पथनाट्य, नाटके, लोककला, लोकसंगीत यामधून समाजव्यवस्थेचे स्वरूप लोकांसमोर अधिक प्रभावीपणे मांडता येते, हे त्याला ठावूक होते. त्यामुळे चळवळीत त्याने हा जलशांचा मार्ग स्वीकारला.

याच काळात नक्षल समर्थक असल्याचा ठपका त्याच्यावर बसला आणि पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा त्याच्यामागे लागला. मुंबईला ‘कोर्ट’ सिनेमाचे शूटिंग सुरू असताना वीराला अटक करण्यासाठी पोलीस तेथे पोहोचले होते. आंबेडकर, मार्क्सच्या विचारांचा पगडा असल्याने तो काहीसा विद्रोही व आक्रमक होता. पण त्याच्या विचाराला अधिष्ठान होते ते बुद्धाच्या विचारांचे. जातीव्यवस्थेचा तो कठोर विरोधक होता. आडनावावरून जात गृहीत धरली जाते म्हणून त्याने नाव बदलले. आदिवासी परंपरा व संस्कृती रक्षणाचे प्रतीक म्हणून मुलाचे लंकेश तर नातवाला क्रांतिकारी ‘अशफाक उल्ला’चे नाव दिले.

१३ एप्रिलला रोजी मी, रामा जोगराना व अन्य दोन साथी शाळाबाह्य मुले शोध मोहिमेवर असताना मुकुंद अडेवारचा फोन आला अन‌् सांगितले. ‘वीराभाऊ गेला.’ मी सुन्न झालो. ‘कोर्ट’मधील शाहीर संभाजी भगतच्या आवाजातील गाण्यात शब्द आहेत - पोळले हात त्यांना विस्तवाचे दान रे! नुकतीच साठी उलटलेला वीरा साथीदार ते शब्द खरे करून, पुढच्या पिढीच्या हाती निखारे देऊन गेला.