शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

भीती नको, सावधानता हवी

By admin | Updated: August 23, 2014 11:53 IST

भारतीय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची कार्यक्षमता चिंता करावी अशीच आहे. त्यातही साथीचे आजार आले, की ही कार्यक्षमता वाढण्याऐवजी कमीच होते. गेल्या काही वर्षांत सातत्याने येत असलेल्या साथीच्या आजारांच्या पार्श्‍वभूमीवर आता आपण ही व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. अशा आजारांवरचा तो सर्वांत प्रभावी उपाय आहे.

 डॉ. श्याम अष्टेकर

 
गेल्या चार महिन्यांत पश्‍चिम आफ्रिकेतल्या चार देशांत (लायबेरिया, सिअरालिओन, नायजेरिया आणि गिनी)  इबोला या विषाणू साथीमुळे सुमारे १६00 व्यक्तींना लागण होऊन ८00वर बळी गेलेले आहेत. यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर्स व नर्सेसनादेखील लागण होऊन काही मृत्यू झालेले आहेत. उपचार करणार्‍यांपैकी एक मिशनरी डॉक्टर अमेरिकेत जिवंत परतल्याचे यू ट्यूबवर दृश्य आहे आणि उपचारांती तो जगण्याची शक्यताही आहे. या आजाराच्या आतापर्यंत ४-५ साथी येऊन गेल्या आहेत. या मुख्यत: मध्य आफ्रिका व पश्‍चिम आफ्रिकेत होत्या. हा विषाणू आफ्रिकेतल्या जंगली जनावरांमध्ये, काही वटवाघळांमध्ये आणि माकडांच्या प्रजातीत टिकून आहे. यांच्या संपर्कात आल्याने किंवा यांच्या मांसाशी निकटचा संबंध आल्यामुळे माणसांना ही लागण होते.
माणसाला आजार झाल्यानंतर इतर व्यक्तींना हा आजार निकटचा संपर्क, उल्टी, रक्त इ. मार्गाने पसरतो; पण श्‍वासावाटे हवेतून पसरत नाही. लागण झाल्यापासून २१ दिवसांनी आजाराची लक्षणे दिसतात. त्यात सामान्यपणे ताप, डोकेदुखी, अंगदुखी व उल्टी-जुलाब अशी लक्षणे असतात. पुढच्या आठवड्यात शरीरातल्या निरनिराळ्या भागांत रक्तस्राव व्हायला लागतो. त्यामुळे नाका-तोंडातून, लघवीवाटे रक्त जाऊ लागते. या विषाणूंचा हल्ला मुख्यत: सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर असतो व त्यामुळे सर्वत्र रक्तस्राव होऊन निरनिराळे अंतर्गत अवयव बंद पडायला लागतात. यामुळे सुमारे ९0 टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडतात. यावर आत्तापर्यंत कुठलीही लस किंवा औषध सिद्ध झालेले नाही. मात्र, प्रयोग सुरू आहेत. 
हा आजार रोखायचा असला, तर बरीच काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे रुग्ण लवकरात लवकर शोधून त्याला वेगळ्या बंदिस्त घरांमध्ये (क्वारंटाईन) मध्ये ठेवावे लागते. त्याची परिचर्या व उपचार करताना कमीत कमी संपर्क व तोही संरक्षित जामानिमा वापरूनच करावा लागतो. रुग्णालयात दाखल रुग्णांपासून इतर रुग्णांना हा आजार पसरू शकतो. मात्र, सुदैवाने हा सार्स किंवा फ्लूप्रमाणे हवेतून पसरत नाही. त्यामुळे याच्या फार मोठय़ा साथी येत नाहीत.  रुग्णाच्या प्रेतापासूनदेखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे प्रेतही दक्षतापूर्वक कपड्यात गुंडाळून जमिनीत गाडावे लागते. आफ्रिकन समाजात प्रेतावर पडून रडणे किंवा आलिंगन देणे ही सांस्कृतिक परंपरा आहे. त्यामुळे अशी दक्षता बहुधा शक्य नसते. या आफ्रिकन देशांमध्ये अनेक वर्षे यादवी व बंडे चालू असून, अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या आहेत. आरोग्यसेवाही क्षुल्लक आहेत. त्यामुळे एक तर सरकारवर विश्‍वास नाही व आरोग्यसेवाही फारशा नाहीत. त्यामुळे उपचार किंवा प्रतिबंधक उपाय होणे ही अवघड गोष्ट आहे. जंगलामधून लोक एक दुसर्‍या देशांमध्ये हिंडू, फिरू शकतात. त्यामुळे आजाराचा प्रसार वाढण्याचा धोका असतो. साधनसंपत्तीने समृद्ध अशी आफ्रिका तशी अविकसितच आहे आणि या आजाराच्या तडाख्याने आणखीनच गरीब होण्याची  शक्यता आहे. लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागृती नाही व चालीरिती बदलायला लोक उत्सुक नसतात. साहजिकच आफ्रिकेकडे असलेला पर्यटनाचा ओघ रोडावत आहे. पर्यटक आणि कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर आपापल्या देशांकडे परतत आहेत. यातून इतर देशांमध्ये इबोलाचे रुग्ण येऊ शकतात व या देशांना धोका निर्माण झाला आहे. 
जागतिक आरोग्य संघटनेने इबोलाची साथ एक जागतिक संकट समजून उपाययोजना जाहीर केल्या आहेत. तसे २00५ पासूनच एच.१ एन १ फ्लूच्या साथीपासून आंतरराष्ट्रीय आरोग्य दक्षतेसंबंधी नियमावली व यंत्रणा विकसित करण्यात येत आहेत. विशेषकरून विमानतळांवर संशयित रुग्णांसाठी (मुख्यत: ताप) तपासणी व लागल्यास क्वारंटाईनची सोय करावी लागते. भारत सरकारने अशी यंत्रणा असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत भारतात एक रुग्ण परत आल्याचे वृत्त आहे. तथापि, केवळ रुग्णसंख्येवर न जाता संभाव्य आजाराचा धोका लक्षात घेऊन सर्व दक्षता घेणे आवश्यक आहेत. गेल्या दोन शतकांत वाढत्या जागतिक व्यवहारांमुळे अनेक आजार देशोदेशी पसरले आहेत. त्याबद्दल व्यापक नियंत्रण व उपचार पद्धतीही विकसित झाल्या आहेत. कोणत्याही सांसर्गिक आजाराबद्दल जागतिक संघटना दक्ष असतात व इबोलासारख्या काही अत्यंत सांसर्गिक आजारांबद्दल तर फारच काळजी घ्यावी लागते. 
तरीही जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार इबोलाची साथ मुख्यत: आफ्रिकेतच सीमित राहण्याची शक्यता आहे. भारतीय उपखंडात आतापर्यंत एकही नवीन केस दृष्टिपथात आलेली नाही. याबद्दलच्या सर्व सूचना जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या आहेत. त्याचबरोबर आफ्रिकन अर्थव्यवस्था या साथीमुळे कोसळू नये म्हणून प्रवासावर सार्वत्रिक निर्बंध घातलेले नाहीत. मात्र, इथल्या सर्व विमानतळांवर संशयित रुग्ण शोधून बाजूला करण्याची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात. मला हे फारसे खरे वाटत नाही. आपल्या प्रचंड गर्दीच्या विमानतळांवर एवढी थर्मल टेस्टिंगची यंत्रणा आहेच कोठे? अशा कोणत्याही साथीमुळे गरीब देशांच्या अर्थव्यवस्था कोसळू शकतात आणि त्यातून नवनवी संकटे निर्माण होत जातात. अर्थव्यवस्था चालू ठेवून साथीचे नियंत्रण करणे, हेच मुख्य सूत्र असते. भारताला प्लेगच्या साथीच्या वेळेला आंतरराष्ट्रीय व्यापारात फटका बसला होता, हे मुद्दाम सांगितले पाहिजे. अशा आजारांच्या थोड्या केसेस जरी असल्या, तरी भीती जास्त पसरू शकते. 
भारतातले काही डॉक्टर्स या साथीमुळे नायजेरियात इच्छेविरुद्ध अडकवून ठेवल्याची बातमी आपण टी.व्ही.वर पाहिली असेल. रुग्णशुश्रूषेपासून मागे सरकणे हे वैद्यकीय नितिमत्तेला सोडून असले, तरीदेखील त्यांच्या आरोग्याची पूर्ण सिद्धता करणे हे त्या त्या देशावर बंधनकारक आहे. अर्थात, हे जेमतेमच पाळले जाते. मेडिसीन सान्स फ्रॉंटियर्स या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेनेदेखील त्यांचे बरेच डॉक्टर्स-नर्सेस या रुग्णसेवेत बळी गेल्यामुळे आम्हाला अधिक काही करता येणार नाही, असे जाहीर केले आहे.  त्या देशांची मूळ आरोग्यसेवा जुजबीच असल्यामुळे या कामाला हे देश कसे पुरे पडणार? जागतिक बँकेसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी यासाठी मदत जाहीर केली आहे; पण मुख्य प्रश्न प्रशिक्षित मनुष्यबळाचा आहे.
या व अशा आजारांच्या साथी अधूनमधून येतच राहतात. या नव्या जागतिक व्यवस्थेत आपल्या आरोग्यसेवा यासाठी सक्षम व सिद्ध करणे, हे अपरिहार्य आहे. भारतातली आरोग्यसेवा जास्त करून खासगी असल्याने अशा सार्वत्रिक उपाययोजना लागू करण्याचे काम दुबळ्या सरकारी सेवांनाच करावे लागते. तरीही आता भारतामध्ये निदान काही प्रांतांत तरी अशा आजारांचा सामना करण्याची क्षमता आहे. पण, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये निरनिराळे तापाचे आजार उद्भवताना दिसतात. हे आपल्या मागासपणाचे निदर्शक आहे. शेवटी देशाचे एक अंग चांगले, तर दुसरे दुबळे असून चालत नाही. या निमित्ताने आपण हा धडा घ्यायला हवा.
(लेखक सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.)