- निरंजन घाटे
दिवाळी धूमधडाक्यात साजरा करण्याचा उत्सव. मग फटाके ओघाने आलेच.
पण आपण जे फटाके वाजवतो हजारो रुपयांचा क्षणात धूर करतो, त्या फटाक्यांची सुरुवात केली तरी कुणी? या आगळ्यावेगळ्या
जगातील ही मुशाफिरी..
पूर्वी महाराष्ट्रात जेव्हा दिवाळी अंकांची धमाल असे, त्या काळातली म्हणजे 1985 च्या आसपासची गोष्ट. माङया ओळखीचे एक संपादक भेटले. गडबडीत होते. त्यांचे चार-पाच दिवाळी अंक असत. त्यातला एक धार्मिक आणि एक भविष्य, ज्योतिष अशा प्रकारचा असे. या दोन अंकांचा खप दहा हजारांवर होतो, असे ते म्हणत. ‘काय? गडबडीत?’ मी विचारले. गणपती नुकतेच संपले होते. ‘हो! शिवकाशीला निघालोय!’ मला आश्चर्य वाटले. ‘काय? तू फटाक्याचे स्टॉल लावणार की काय?’ मी आश्चर्याने विचारले. ‘नाही! चाररंगी कव्हर छपाई! शिवाय अंकांची छपाई. सर्व 4 दिवसांत होतं. प्रवासखर्च, हॉटेलचा खर्च करूनही स्वस्त पडतं! खूप प्रेस आहेत. फटाक्यांवर देवांची चाररंगी चित्रं छापतात. उरलेल्या वेळेत आपली छपाई. आम्ही चार-पाच जण जातो’. हे मला नवीन होतं. शिवकाशी म्हटलं की, फटाके एवढेच माहिती; तेसुद्धा अधूनमधून प्रचंड भयानक आगीच्या बातम्यांमुळे.
सातव्या शतकात भारतीय रसायनशास्त्रज्ञ नागाजरुनाचे रसायनशास्त्रविषयक ग्रंथ चिनी प्रवाशांनी चीनमध्ये नेले. या संस्कृत ग्रंथांची त्यांनी चिनी भाषेत भाषांतरं केली. त्यावरून अनेक प्रयोग केले. त्यांनी जे शोध लावले, त्याचे मूळ या भाषांतरात आहे, असे म्हटले जाते. आपण खुळ्या अंधश्रद्धांमुळे जे गमावले ते चीनने कमावले. सोडा, गंधक, फॉस्फरस आणि चिनी माती यांच्यावर प्रयोग करून चिन्यांनी स्फोटक दारू बनवली. त्यापासून एकीकडे युद्धात वापरायची दारू आणि अगिAबाण बनवले. तर दुसरीकडे स्फोटके, फटाके बनवले. चीनमध्ये इसवी सनाच्या दहाव्या शतकात म्हणजे शोभेचे फटाके तयार करायला सुरुवात झाली. दरवर्षी 18 एप्रिलला चीनमध्ये फटाकेनिर्मितीच्या शोधाचा वाढदिवस साजरा केला जातो.
फटाक्यांना इंग्रजीत ‘क्रॅकर्स’ म्हणतात. ‘बॅँग फॉर द बक्स’ हा इंग्रजी वाक्प्रचार ही फटाक्यांचीच देणगी आहे. आतषबाजीला इंग्रजीमध्ये ‘फायरवर्क्स’ असे म्हणतात. तर फटाकेनिर्मितीतली पायरो (आग) टेक्निक (तंत्र) असे म्हणतात. फटाकेनिर्मात्यांना पायरो-टेक्निशियन असे म्हटले जाते. अलीकडचे फटाके आणि आद्य फटाके यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. चीनमध्ये आणि नंतर भारतात फटाके बनवत असत ते सुरुवातीला बांबूच्या पोकळ भांडय़ात किंवा मातीच्या पातळ मडक्यात दारू ठासून भरून केले जात. मडकं जितकं पक्कं तितका आवाज मोठा. बांबू जितका अरुंद आणि लांब तितका तो आकाशात उंच जाणार, असं सोपं गणित त्या वेळी असे. त्यात काही वेळा खनिजयुक्त माती मिसळून फटाके रंगीत बनवले जात तर गुरांच्या शेणामुतात कालवलेल्या दारूच्या फटाक्याचा उजेड आणि धूर जास्त व्हायचा. याचं कारण त्या काळातल्या फटाकेनिर्मात्यांना ठाऊक नव्हतं. मातीतील वेगवेगळी मूलद्रव्ये फटाक्यांना रंग देत, तर प्राण्यांच्या मलमूत्रतला अल्पसा फॉस्फरस उजेड निर्माण करीत असे.
चीनमध्ये फटाके हे दुरात्म्यांना हाकलण्यासाठी वापरले जात असत. बांबू फार झपाटय़ानं वाढतो. ओला बांबू आगीत टाकला तर फुटून आवाज करतो आणि त्याच वेळी खूप ठिणग्या उडवतो. ही भुतं पळवून लावण्यासाठी त्यात ठासून दारू भरली की जो स्फोट होतो. त्यामुळे सर्व समंधादी मंडळी पळून जातात, अशी तेव्हा समजूत होती. निआन नावाचा एक दुरात्मा हा माणसं आणि पिकांचं, तसंच पाळीव जनावरांचं भक्षण करतो, अशी त्या काळात समजूत होती. बांबू आणि दारूच्या स्फोटाला माणसं घाबरतात तर भुतं नक्कीच घाबरणार, असं त्रैराशिक मांडून फटाके उडवले जात असत. चिनी नववर्षदिनी त्यामुळेच फटाके उडवतात.
फटाक्याच्या दारूत सोडा (सॉल्टपीटर म्हणजे पोटॅशियम नायट्रेट), गंधक आणि कोळशाची भुकटी हे तीन प्रमुख घटक असतात. जितका सोडा अधिक तेवढा फटाका जास्त स्फोटक असतो; कारण पोटॅशियम नायट्रेटमुळे या मिश्रणाला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो. एखाद्या भांडय़ात किंवा डब्यात किंवा खोक्यात ही दारू ठासून भरली जाते. तेव्हा होणा:या स्फोटात त्या आवरणाचे तुकडे होतात. जे आवरण फुटायला जास्त विरोध करते, त्याचे तुकडे जास्त दूर उडतात आणि स्फोटाचा आवाज मोठा होतो. या भांडय़ांची एक बाजू उघडी असेल तर त्यातून ज्वाला, ठिणग्या आणि धूर बाहेर पडतो. फटाक्यांच्या माळात फटाक्यांच्या वाती ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ अशा पेटतात. त्या त्या क्रमाने पेटतात, त्या क्रमाने फटाके फुटत जातात. काही वाती तुटतात, तर काही फटाके दूर फेकले जातात आणि विझतात. साधारणपणो तेराव्या शतकात जिहादीकडून क्रूसेडरना ही कला मिळाली आणि फटाके युरोपात पोहोचले. तर काही इतिहासकारांच्या मते, मार्को पोलोने चीनमधून येताना फटाके बनवायची कला युरोपला आणली. इतिहासकार इटलीचा असेल तर फटाके आणण्याचे श्रेय क्रुसेडरना दिले जाते. इटलीतील फटाके निर्मात्यांनी युरोपमधील सर्वश्रेष्ठ फटाके बनवणारे, असे बिरुद बराच काळ मिरवले. आजही अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट फटाके बनवणारेमूळचे इटलीतून आलेल्या स्थलांतरीतांचे वारस आहेत. फटाकेनिर्मितीच्या ठिकाणी काही र्निबध पाळावे लागतात. फटाके बनविण्याकामी कुठलेही यंत्र वापरले जात नाही. सर्व साधनसामग्री ही लाकडीच असावी लागते. धातूच्या वस्तूंना जिथे मज्जाव असतो. फटाके बनवणा:यांना सुती कापडाचे कपडेच वापरावे लागतात. कृत्रिम धाग्याचे कपडे वापरून चालत नाही. कारण या कपडय़ांवर स्थिर विद्युत साठते आणि ठिणग्या उडून फटाक्यांची दारू पेटण्याची शक्यता असते. जे कृत्रिम धाग्याच्या वस्त्रंचे तेच लोकरीच्या वस्त्रंचे. फटाक्यात दारू भरण्याचे काम करणा:यांची अंतर्वस्रेदेखील सुती कापडाचीच असतात.
16 मे 177क् हा दिवस फटाक्यांच्या इतिहासात अत्यंत दु:खदायक मानला जातो. तसेच फटाक्यांच्या अपघातातील सर्वात मोठय़ा अपघातांपैकी एक असे या घटनेचे वर्णन करण्यात येते. 16 व्या लुईचा विवाह झाला, त्या आनंदाप्रीत्यर्थ त्या दिवशी आतषबाजी आयोजित करण्यात आली होती. ती पाहणारे प्रेक्षक उधळले आणि झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 8क्क् हून थोडी जास्त माणसं मेली. पुढेही ही जागा प्लासदला कोंलोर्स म्हणून ओळखली जाऊ लागली.
सुरुवातीच्या काळात फटाक्यांमध्ये दोनच रंग असत. चंदेरी पांढरा आणि नारंगी हे ते दोन रंग. 18क्क् सालानंतर हळूहळू शोभेच्या फटाक्यांमध्ये वेगवेगळे रंग भरू लागले. रसायनशास्त्रच्या प्रगतीमुळे हे शक्य झाले. काही रासायनिक संयुगे शोभेच्या दारूत मिसळली तर पडणा:या प्रकाशाला हवा तो रंग देता येतो, हे फटाका व्यावसायिकांना त्यांनी दाखवून दिले. आता सर्व ज्ञात रंग फटाक्यांच्या ज्योतींमध्ये निर्माण केले जातात. बहुतेक सर्व महत्त्वाच्या फटाके निर्मात्यांच्या पदरी रसायनशास्त्रतील तज्ज्ञ असतात. त्यांना भरपूर पगार मिळतो. पूर्वी फटाक्यात निळी ज्योत निर्माण करणो अशक्य आहे, असे मानले जात होते. पुढे मॅगAेशियम आणि अॅल्युमिनियमच्या मिश्रधातूच्या ज्वलनातून निळी ज्योत बाहेर पडते, हा शोध लागला. या मिश्रधातूला मॅग्नेलियम असे म्हणतात. हे औद्योगिक गुपित पळवण्याचे प्रयत्न औद्योगिक हेरगिरीच्या उदाहरणात नेहमीच नमूद केले जाते. आकाशात फटाक्यांमार्फत रंगांची जी नवलाई निर्माण केली जाते, त्यासाठी वेगवेगळ्या धातूंचे क्लोराइड (क्षार) जबाबदार असतात. बेदीयम, हिरवा, स्ट्रॉन्शियम, तांबडा, सोडियम, पिवळा आणि तांबडा, निळा असे हे रंगांचे आणि धातूंच्या क्षारांचं समीकरण आहे.
आपल्याकडे दिवाळीत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 4 जुलैला म्हणजे स्वातंत्र्यदिनी, इंग्लंडमध्ये ‘गायफॉक्स डे’ला, तर फ्रान्समध्ये ‘बॅस्टील डे’ला फटाक्यांची आतषबाजी केली जाते. पाश्चात्य देशात अलीकडे आवाज करणारे फटाके उडविण्यावर बरेच र्निबध घातले गेले आहेत. त्यांच्यात आणि आपल्यातला महत्त्वाचा फरक म्हणजे तिथे ते पाळले जातात. आजही फटाक्यांच्या निर्मितीत चीन अग्रस्थानी आहे. तिथे सर्वाधिक फटाके बनवले जातात आणि ते निर्यात करण्यातही चीन अव्वल क्रमाकांवर आहे. जपानी संशोधनात फटाक्यांचा धूर अत्यंत विषारी असतो, हे सिद्ध केलेय. त्यातही नारंगी रंगाचा धूर सर्वात विषारी असतो. त्या सर्वच फटाक्यांच्या धुरामध्ये गंधकाची ऑक्सइड्स असतात.
आपल्या शरीरातील आद्र्रतेमुळे त्यांचे गंधकाच्या आम्लात रूपांतर होते. (सल्फ्युरस आणि सल्फ्युरिक आम्ल) त्यामुळे आपली ेष्मल त्वचा भाजून फुप्फुसांच्या अस्तराला इजा होते. त्याचप्रमाणो आपल्या डीएनए रेणूंवर परिणाम होतो. त्यामुळे पुढच्या पिढीत काही जननिक दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फटाक्यांच्या धुरापासून जितके दूर राहता येतील, तितकं राहणं श्रेयस्कर ठरते. त्यामुळेच अलीकडे पाश्चात्य देशात अलीकडच्या काळात संगणकाच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने दूर नियंत्रणाचा वापर करून फटाके उडविले जातात. आपल्याकडे हे शक्य नसेल तर निदान तोंडावर आणि नाकावर रुमाल बांधून फटाके उडवायला काय हरकत आहे!