- प्रा. डॉ. वर्षा गंगणे
ग्रीष्माच्या काहिलीवर हळुवारपणे फुंकर घालण्यासाठी अलवार पावलांनी मृग येतो आणि वातावरणात एक आनंददायी लकेर उमटते. अगदी बालपणापासून,
असे हे जगाचे फिरे चक्र बाळा।
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा ।
या ओळी तीन ठळक ऋतूंची ओळख करून देतात. हिवाळ्यातील बोचरी थंडी, उन्हाळ्यातील अंगाचा दाह करणारी उष्णता आणि पावसाळ्यातील थंडगार सरी, त्या-त्या ऋतूंचे वेगळे वैशिष्ट्य व अस्तित्व पटवून देतात. ग्रीष्मातील रणरणते ऊन व त्यामुळे वाढलेले तापमान मनुष्य, प्राणी, पक्षी, लता, वृक्ष, पृथ्वी, तलाव, जलचर, उभयचर सगळ्यांनाच त्रस्त करून टाकणारे असते. जंगलातील वणवे, भीषण पाणीटंचाई, निर्जन रस्ते याची साक्ष पटवून देतात. शेवटी-शेवटी तर उन्हाळा जीवघेणा वाटू लागतो. कधी एकदाचा जून महिना उजाडेल आणि मृगधारा बरसतील, असे प्रत्येकाला मनापासून वाटू लागते. पावसाच्या थेंबासाठी प्रत्येकजण चातकाप्रमाणे आतुर असतो. डोळे आभाळाकडे लावून बळीराजा आपल्या कामाला लागतो. मोसमी पावसाच्या आगमनाच्या गोड बातम्या ऐकण्यासाठी कान अगदी आतुर झालेले असतात. मृगाच्या प्रतीक्षेत मनदेखील हळवं होऊन स्वप्नमाला गुंफायला लागतं.
अक्षयतृतीयेला भेंडवळीत घटाची मांडणी करून जाणकार मंडळी पावसाचे जणू भाकीतच करतात. कधी - कधी तर हे भाकीत हवामानखात्याच्या अंदाजापेक्षाही खरे आणि सिद्ध ठरणारे असते. कदाचित म्हणून शेतकरी व ग्रामस्थांचा यावर अधिक विश्वास असतो. मृगाची पहिली सर कधी बरसणार? इथपासून, तर या वर्षी कोणत्या भागात पाऊस कमी तर कोणत्या भागात अधिक पडणार, कोणत्या भागात कोणते पीक अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणार अगदी इथवर घटाच्या मांडणीतून पावसाचे अंदाज व्यक्त केले जातात. थोडक्यात, पावसाविषयीचे भविष्य सांगणारे हे एक ज्योतिषशास्त्रच म्हणायला हवे. पावसाचे मनाप्रमाणे अंदाज ऐकून शेतकर्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. तो उत्साहाने व आनंदाने पेरणीच्या हंगामाची तयारी करतो. भेगाळलेल्या, पोळलेल्या जमिनीला तृप्त करण्यासाठी व त्यातून मोत्यांची रास काढण्यासाठी त्याचे अथक प्रयत्न सुरू होतात. प्रतीक्षा असते ती केवळ मृगधारांची.
शेतांप्रमाणेच कौलारू घरांची डागडुजी सुरू होते. गरिबांच्या झोपड्यांना मृगधारांचे भयही फार. त्यामुळे झोपड्या शिवल्या जातात. निकामी झालेले खांब व जुने झालेले बांबू काढून नवीन आधार दिला जातो. गृहिणींची पावसाळ्यातील वस्तूंची बेगमी करण्याची लगबग सुरू असते. पापड, लोणची, वड्या, कडधान्ये वाळवून साठविली जातात. घरातील जमिनीला जागोजागी पडलेली छिद्रे मातीने लिंपून बंद केली जातात. कारण मृगधारांसह अनेक कीटकांच्या प्रजाती आपली डोकी वर काढतात. घराभोवतीची जागा स्वच्छ करून कुंपण बांधले जाते. परसबागेत लावण्यात येणार्या फळभाज्या व वेलींची रचना केली जाते. एकूणच काय, तर मृगाच्या आगमनाची जय्यत तयारी सर्वच पातळ्यांवरून सुरू असते.
रोहिणी नक्षत्रात येऊन गेलेल्या वळवाच्या पावसाने, पावसाच्या परिणामांचे सर्व अंदाज अगदी प्रात्यक्षिकासह सिद्ध केलेले असतात. तप्त जमिनीला तात्पुरता दिलासा मिळालेला असतो. वातावरणात सुखद गारव्याचे आभास निर्माण होतात. सकाळचे गार वारे हवेहवेसे वाटतात. आकाशात मधूनच एखादा पांढरा ढग वेगवेगळे आकार घेत कापूस पेरीत असतो. मधूनच ऊन-सावलीचा खेळ सुरू होतो आणि मृग येण्याची खात्री पटू लागते. हवामानविषयक बातम्या ऐकताना मॉन्सून अंदमानात दाखल, केरळमध्ये थडकणार ही वाक्ये ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. कवितेच्या या ओळी मनात फेर धरतात
मृगधारांनी भिजेल बाई धरणी ।
चल गाऊ सखये पावसाची गाणी ।।
भिजता-भिजता दु:ख जाईल वाहून ।
सुखाच्या राशी येतील अंगणी ।।
डोळ्यांसमोर स्वप्नांचा मोर पिसारा फुलवून नाचू लागतो. मृगधारा बरसण्यापूर्वीच त्यांच्या येण्याच्या कल्पनेनेच रसिक मने मोहरून जातात. बघता-बघता एक दिवस मृगाचे टपोरे थेंब धरणीवर येतात. मातीचा कण कण भिजून त्याचा सुवास वार्यासवे रानभर होतो. मृग आल्याचा संदेश अगदी दूर दूर कानाकोपर्यांतून लगबगीने वार्यासह पोहोचविला जातो. रानातील झाडे-वेली ही बातमी ऐकून गळ्यात गळे घालून आनंदाने डोलू लागतात. मृगधारांचे येणे म्हणजे सृष्टीला चैतन्याचे मिळालेले सुगंधदान, विरहानंतर संपलेली वसुधेची प्रतीक्षा, रोम-रोम फुलविण्याचे सार्मथ्य असणारी भावना, मरगळलेल्या देहाला व मनाला उभारी देणारी संजीवनी, सावळ्या भुईच्या सोसण्याच्या क्षमतेचा अंत, अत्तराहून मादक-मोहक, भूल पडणारा, जगातील सर्वांनाच हवाहवासा वाटणारा मृद्गंध, चातकाची संपलेली प्रतीक्षा, मयूराचे बेभान होणे, काजव्यांची लखलखण्यासाठी लागलेली पैज, आभाळाचे अप्रतिम लावण्य, भुईला दान देण्याची उदारता, निर्जीवांना जीवदान देण्याचे श्रेष्ठत्व, वार्याची नाचणघाई, धुळीचा गगन चुंबण्याचा प्रयत्न, पाखरांची गाणी, सगळेच सुंदर, अवर्णनीय, शब्दातित. हळूहळू थेंबाच्या धारा आणि धारांच्या सरीवर सरी असा मृगाचा अनोखा व देखणा प्रवास सुरू होतो. खरंच मृगधारा आपल्या डोळ्यांदेखत बरसू लागतात आणि मनातही आनंदाची कारंजी थुईथुई नाचायला लागतात. मन पाखरू होऊन स्वप्नांच्या गावातून फेरफटका मारून येतं. सखीला आपल्या सजणाची आठवण येऊन डोळे भरून येतात आणि मृगधारांसह ‘सजल नयन नित धार बरसती’ या ओळीची अनुभूती होते. टिटवी ओरडून-ओरडून मृगाच्या येण्याचे संकेत देते. पक्ष्यांच्या गगनभरारीचे देखणे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडून जाते. मधुमालती आणि मदनमस्त आपल्या सुगंधी फुलोर्यांसह फुललेला असतो. जणू त्याची आणि मातीची सुवासाच्या बाबतीत पैज लागलेली असते. मन अंगणातून घरात यायला काही केल्या तयार होत नाही.
निसर्गाच्या लावण्याचा व ऐश्वर्याचा साक्षात्कार होण्याची ही सुरुवात असते. गाव असो वा शहर, पहिल्या पावसात भिजायला बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. कारण मृगधारा प्रत्येक मनाला वेड लावणार्या, ताजंतवानं करणार्या, सगळं विसरायला लावणार्या असतात. जरा सूक्ष्म निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं, की मृगाच्या सरीसवे प्रत्येकाची वागणूक लकबी थोड्याशा बदललेल्या दिसतात. माळिणींच्या हातातली बिलवर अधिकच किणकिणतात, भूमिपुत्राच्या चालण्यात एक वेगळाच डौल आलेला असतो. तरुणाईच्या ओठांवर शीळ घुमू लागते. मधूनच, डोळ्यांत आनंदाची एक लकेर उमटून जाते. सुगरणीचे खोपे एका लयीत झुलतात, सृजनाची गाणी आसमंतात अलवारपणे घुमू लागतात. हिरवी मनं ‘झोपाळ्यावाचून झुलायचे’, या ओळीची अनुभूती घेतात आणि चेहर्यावर चिरतारुण्याचे लाजरे भाव प्रगट होतात. मृगसरीसवे येणारी संध्याकाळ मनाला भुरळ पाडणारी असते. संध्येच्या रंगात एक चमक बघायला मिळते.
पश्चिमेचा सूर्य उगाचच मोहक वाटतो आणि यापुढे सगळे सुंदर, स्वप्निल, मोहक, लोभसवाणे असेल असा जणू संदेश देऊन जातो. टेकडीच्या पल्याड जाताना पसरणारा संधिप्रकाश सृष्टीच्या अथांगतेची, सहनशीलतेची, आशावादी असण्याच्या अर्मयाद क्षमतेची खूण पटवून देतो. दूर मंदिरातील आरतीचा नाद मृगधारांच्या नादासवे एका अनुभूतीची प्रचीती घडवून जातो. ऋतूंची परिक्रमा आणि सर्जनाचे चक्र मृगधारांसवे पुन्हा नव्याने सुरू होते. मृग म्हणजे सृष्टीच्या सर्जनाची जणू नांदीच असते. ज्यामधील प्रत्येक अनुभव अवर्णनीय, अथांग, श्रेष्ठ, नादमय, अर्थपूर्ण व विश्वाला व्यापून उरणारा असतो. जरा सखोल विचार केल्यास मृगधारा बरेच काही सांगून जातात. या मृगधारा मनातही नावीन्याची, चैतन्याची पेरणी करून जातात आणि जीवनाचा प्रत्येक क्षण प्रसन्न वाटू लागतो. म्हणूनच मृगधारा अशाच सतत बरसत राहाव्यात, असे वाटत राहते आणि शब्दांना पंख फुटतात.
‘‘अश्या बरसाव्या मृगधारा विरून जावा मळभ सारा
फुलून यावी स्वप्ने हिरवी गळून पडावा दंभ सारा’’
(लेखिका प्राध्यापिका आहेत.)